STORYMIRROR

Jayashree Kelkar

Inspirational

3  

Jayashree Kelkar

Inspirational

कथा तिच्या स्त्री_स्वत्वाची _________________

कथा तिच्या स्त्री_स्वत्वाची _________________

3 mins
168

खरचं आयुष्य असा एक रंगमंच आहे की जिथे आपण सर्वचजण वेगवेगळ्या भूमिकेतून रोजच्या जीवनाचा टप्पा कसा सुखकारक होईल यासाठी चेहेऱ्यावर असंख्य मुखवटे घालून वावरत असतो...

आपल्या आजूबाजूला असे मुखवटे घातलेली अनेक माणसे आपल्याला दिसतील...होणाऱ्या अनेक प्रकारच्या शारीरिक तसेच मानसिक वेदना लपवून सतत चेहेऱ्यावर हास्याचा मुखवटा धारण करणारी,रोजच्या जीवनातील परिस्थितीत सतत फक्त वजाबाकी आणि भागाकार हीच दोन गणिती प्रमेये वाट्याला येणारी... बेरीज आणि गुणाकार क्वचितच अनुभवायला मिळणारी असंख्य माणसे आपल्याला दिसतात...

अशीच एक सत्यकथा तिच्या

 *स्त्री_स्वत्वाची* 

ती...एका खेडेगावात जरी जन्मली असली तरी थोडे अपंगत्व असल्यामुळे आणि वडिलांच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या गावात इयत्ता ५ वी पर्यंतच शिकली...कालांतराने वडील नोकरीतून मुक्त होईस्तोवर तिची आई तिच्या २ लहान बहिणी आणि धाकटा भाऊ यांना घेऊन एका मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी राहिली...

तिथे तिचे शिक्षण ९ वी पास असतानाच ओळखीत जे स्थळ आले त्याची कसलीही चौकशी न करता केवळ मोठ्या शहरात ती जाणार म्हणून तिचे लग्न लावून दिले आणि सुरू झाला तिचा वनवास !!..

रोज शेजारीपाजारी यांच्याशी बोलताना आणि वागतानाचा वेगळा हसरा अभिनय आणि घरी तो असतानाचा वेगळा केविलवाणा अभिनय ...

त्यातच त्याचा बाहेरख्यालीपणा सहन करतानाचा तिरस्कार, राग आणि स्वतःची दुरावस्था होताना, बघतानाचा ,रोजचा मार खाताना,वेगवेगळे अत्याचार, अन्याय सहन करतानाचा बापुडवाणा मुकाभिनय...

आणि एके दिवशी हे सर्व सहन न होऊन स्वतःची कमाई स्वतः करायची या जिद्दीने घराबाहेर पडलेले तिचे पाऊल...

कोणासमोर ५ पैशासाठी सुद्धा हात पसरायला लागू नयेत म्हणून रोज सुरवातीला घराबाहेर नोकरी शोधण्यासाठी पडणारा तिचा दुबळा प्रयत्न अखेर यशस्वी झाला... 

हळूहळू आत्मविश्वास येऊन कणखरपणे तिने त्याच्याविरोधात जाऊन टाकलेले अन्यायविरोधी प्रयत्न...आणि या प्रत्येकवेळी चेहेऱ्यावरचे हसू मावळू न देण्याची कला ...खूप छान निभावले तिने....

आता तिला बाहेरच्या जगात वावरताना अजिबातच दुबळेपणा वाटत नाही ...आता त्याची तिला बिलकुल भीती वाटत नाही ...उद्याचा दिवस कसा उजाडेल हेच जिला माहीत नव्हते त्या तिने स्वकर्तुत्वाने हळूहळू पैसे जमवून २ खोल्या स्वतःच्या मालकीच्या केल्या...दोन्ही मुलांची शिक्षणे झाली...

आता तिला एकच चिंता आहे की एकदा मुलांची लग्नं पार पडली की तिला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे ..ही तिची आस आहे आणि ती तिच्या जिद्दी स्वभावामुळे नक्कीच पार पाडेल यात शंकाच नाही...

स्वतःचे अपंगत्व असतानाही तिला जशी जमेल तशी मदत ती दुसऱ्या अपंग व्यक्तीला करू लागली...काही अंशी का होईना समाजाचे ऋण हे फेडलेच पाहिजे हा इतरांकडून ऐकायला मिळालेला विचार स्वतःची तितकीशी परिस्थिती नसताना सुद्धा अमलात आणणे ... यावरून तिची इतरांविषयी वाटणारी कळकळ, आस्था ही तिच्यात असलेली ममता, माया दर्शवते...

अशी ही *ती* ...

तिच्या नशिबात जे दुःख आले त्याचा बागुलबुवा न करता,खूप वेळा नवऱ्यापासून फारकत घेण्याचा विचार मनात येऊनही केवळ मुलांसाठी तिने तो विचार तडीस नेला नाही ...

आणि आता तर ती एक स्वतःच्या बळावर आत्मविश्वासाने ठामपणे घट्ट पाऊल टाकणारी जिद्दी स्त्री आहे ..

खरं म्हणजे लहान वयात तिनेही सुखीसंसाराची,मुलाबाळांची,स्वतःच्या प्रगतीची..अशी अनेक स्वप्ने उराशी बाळगली असतील...स्वप्न काय गरीब माणसं पाहू शकत नाहीत का ? तर याचे उत्तर आहे हो...प्रत्येकाने स्वप्न ही बघितलीच पाहिजेत...आणि जो उद्याची स्वप्न बघतो तोच ती पुरी होण्यासाठी प्रयत्नशील असतो पण अश्या परिस्थितीत हिने काय करायचे ? झालेला स्वप्नभंग हिने कधीही आपल्या चेहेऱ्यावर दिसू दिला नाही ..झगडत राहिली,कष्ट उपसत राहिली....

हळूहळू तिचेही वय वाढत होते,अधूनमधून आजारपण येऊ लागले...पण कधीही चेहेऱ्यावर निराशा दिसू दिली नाही...

अशी ती *ही*...आता मानाने जगते आहे ...

तिच्या मते, तिला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या ऋणातून तिला मुक्तच व्हायचे नाहीये कारण कर्माच्या सिद्धांतानुसार जर तिने तिला मिळालेले ऋण फेडले तर त्या व्यक्ती तिला पुढील जन्मात भेटणार नाहीत..म्हणूनच तिला ते ऋण मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचे आहेत ...

सर्व अयोग्य परिस्थितीशी मुकाबला करत असताना सुद्धा तिचा उंच उंच जाणारा झोका कधीतरी जमिनीवर खूप खाली यायचा पण तरीही निराश न होता धीटपणे पुन्हा झोक्यावर स्वार होऊन तो आणखी उंच कसा जाईल याचा सदैव ध्यास ठेऊन तो झोका कायम उंचावरच राहील असा प्रयत्न करणारी ती ...

यावरून सुचलेल्या चार ओळी ...

जिद्द च तर होती ना तिची अन्यायाविरुद्ध झगडायची...  

पोहता येत नसले तरी हातपाय मारीत किनारा गाठण्याची...

वाटेत आलेल्या उलट्या प्रवाहाविरुद्ध नेटाने पोहण्याची...

मोठमोठ्या लाटा अंगावर येताना बाजूच्या खडकाचा आधार घेत प्रवाहात घट्टपणे पाय रोवता येण्याची कला अवगत करण्याची...

निसरड्या वाळूतून पाय घसरलाच तर बाजूच्या झुडूपांचा आधार घेत हार न मानण्याची...

अशी *ती*...

स्वतःचे *स्वत्व* जपणारी...एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational