STORYMIRROR

Jayashree Kelkar

Fantasy

3  

Jayashree Kelkar

Fantasy

मी श्रावण क्वीन

मी श्रावण क्वीन

5 mins
214

आज खूप दिवसांनी पाऊस उघडला होता...हवेत एक प्रकारचा चैतन्य आणणारा गारवा होता...खूप दिवसांनी सकाळीच फिरायला बाहेर पडले...तरी जाताना सुनेने टोकलेच...आई...बाहेर सर्व रस्ते निसरडे झाले असतील...पडाल कुठेतरी आणि आमच्या डोक्याला नसता ताप होईल ... नका जाऊ...पण मी ठरवलेच होते की आज खूप दिवसांनी बाहेर जाता तरी येतंय...लक्षच दिले नाही तिच्या बोलण्याकडे...

मस्त पंजाबी ड्रेस घातला आणि निघाली स्वारी फिरायला... वाटेत नेहमी माझ्यावर भुंकणारी कुत्री आज अजिबातच भुंकली नाहीत ...त्यातली दोन कुत्री बहुदा खूप दिवसांनी मोकळ्या हवेत आपापसात प्रेमालाप करत होती...

उद्यानात शिरल्यावर तर इतके प्रसन्न वाटत होते ना...झाडांची पाने ,वेली आपापसात कुजबुजत होती...एका ठिकाणी हास्य क्लब भरला होता...वातावरणात सगळीकडे उत्साह भरला होता ...

फिरून झाल्यावर थोडावेळ बाकावर टेकले...हल्ली ना थोडे चालल्यावरही दमायला होते ...नेहमीच्या मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्या...थोड्या फार गप्पा मारून सर्वजणी घरी यायला निघालो...

उद्यानाच्या बाहेर एक मोठा श्रावण क्वीन स्पर्धेचा बोर्ड दरवाज्याच्या जवळ लावलेला बघितला...

श्रावण क्वीन स्पर्धा

उत्सुकतेने सर्वजणी थांबलो ...वाचून आणखी औत्सुक्य निर्माण झाले... चक्क या वर्षी नेहेमीच्या १८ ते २५ वयोगटाशिवाय वयोवृध्द महिलांसाठी पण ती स्पर्धा खुली होती...खूप मज्जा वाटली ते वाचून...लगेच माझे मनसुबे रचणे सुरू झाले ...काहीजणी तर मला वेड्यात काढायला निघाल्या... माझ्याही मनात द्वंद्व सुरू झाले...घेऊया का भाग स्पर्धेत ???पण लोक काय म्हणतील...लागलेत म्हातारीला चाळे...असुंदे...म्हणुदेत त्यांना काहीही ... घेऊयाच भाग स्पर्धेत...

खूप उत्साहाने घरी आले कारण नाव नोंदवायचे होते ना...नातीला आडूनआडून विचारून नोंदवले एकदाचे नाव...

मग कुणालाही कळू न देता सुरू झाली माझी घरी प्रॅक्टिस ...माझ्या खोलीचे दार आता बराच वेळ बंद राहू लागले ...सूनेने मला खूप वेळा विचारले की आई ,तुम्ही खोलीत कोणाशी बोलता ?आणि सतत चालण्याचे आवाज का बर येतात तुमच्या खोलीतून ?

नात तर सारखीच दरवाजा धडाधडा वाजवायची...अग आजी तुझ काय चाललंय खोलीत ?तुला बरे वाटत नाहीये का ?पण मी बरी ताकास तूर लागू देईन...मी त्यांना सांगितलं की मला सध्या अध्यात्मात रुची वाटतेय...नवीन श्लोक शिकतेय...आणि ते म्हणताना जोरजोरात चालतेय...म्हणजे व्यायाम पण होतोय ना माझा...खर म्हणजे मी आरशासमोर उभी राहून स्वतःचे कलाकौशल्य थोडक्या शब्दात सांगायची तालीम करतेय...आणि रॅम्प वॉक का कॅट वॉक पण असतो म्हणे...मी आपली यूट्यूब वर बघून तसे चालायची प्रॅक्टिस करतेय तर माझ्या खोलीबाहेर म्हणे यांना कसले कसले आवाज येताहेत... येऊंदेत...

शेवटी सूनेने मुलाकडे चुगली केलीच की आई सध्या थोड्या विचित्र वागताहेत,कधी स्वतःशीच गप्पा मारल्यागत,कधी मान वेळावून तर कधी मान मुरडून बोलतात...

पण मी पडले ना उस्ताद ...त्याला काहीबाही सांगून पटवले की मला काहीही झाले नाहीये...अरे नवीन श्लोक शिकायचे म्हणून मोठ्याने म्हणतेय...आणि थोडी मान आखडलीय म्हणून तुम्हाला तसे वाटतेय...काळजी करू नका...

शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला...एक बरे होते की आम्हा वयस्कर बायकांना त्रास होऊ नये म्हणून एकच दिवस आमची स्पर्धा ठेवली होती ...

घरात सांगितले की आज दिवसभर आम्ही शाळेतल्या मैत्रिणी बाहेर भेटणार आहोत आणि कृपया मला फोन करू नका कारण दिवसभर आमचा सिनेमा,हॉटेल मध्ये खाणे,संध्याकाळी पुन्हा काहीबाही खाऊन घरी येण्याचा कार्यक्रम ठरला आहे...दिली ठोकून एक/दोन मैत्रिणींची नावे...कारण त्यांनीही या स्पर्धेत कोणालाही न सांगता भाग घेतला होता ना...उंदराला मांजर साक्ष...दुसर काय...

कोणता ड्रेस घालू या विचारात २ रात्री घालवल्या ...शेवटी घरून साडीच नेसून गेले...हो ..कोणाला शंका पण यायला नको ना...एका मैत्रिणीच्या घरी जाऊन तिचा एक पायघोळ गाऊन घातला...

अहो ..पण नाही त्याला ओढणी...नाही पदर...अशी नुसतीच छाती दाखवून कसे काय चालायचे ?मोठा गहन प्रश्न ! छे,छे...मला नाही बर असल जमायचं ...अखेर कसेबसे स्वतःला समजावले ...आखूड केसांचा अंबाडा विग घालून बांधताना लक्षात आले की खूपच चांदी डोक्यात चमकतीये ... केसांना कलप कधीच केला नव्हता ना...त्यासाठीही मनाला राजी केले...

आरशात बघताना जाणवले की किती वाईट दिसतेय मी... डोळ्यातला मोतीबिंदू थोड्याशा मेकअपने आणखीनच उठून दिसत होता की...कानातले यंत्र लपवायला पुरेपूर त्रास सहन करायला लागला...शेवटी विचार केला की वयोवृध्द लोकांसाठीच तर ही स्पर्धा आहे ना...मग कशाला लपवायचे हे सारे ? शेवटी गाऊन काढून साडीच नेसली... त्यातच मी जास्त कंफर्टेबल असते... 

अखेर पोचले की स्पर्धेच्या ठिकाणी... आवार तर पूर्ण रंगीबेरंगी झाले होते ...१८ ते २५ वर्षांची नाजूक फुलपाखरे इकडेतिकडे नजाकतीने हसत बागडत फिरत होती पण माझ्या वयस्क मैत्रिणी जरा जास्तच नटल्या होत्या...काय ती एकेकीने प्रसाधने केली होती... डार्क लिपस्टिक काय,रुज काय,अनेक थप्पी लावलेले पावडर चे गोळे काय ...काय ते त्यांचे त्यांच्या वयाला न शोभणारे कपडे ...अर्धे अंग उघडे टाकणारे टॉप्स, मिनी स्कर्ट ,काहींनी छान साड्या पण नेसल्या होत्या पण मोकळा गळा असलेला ब्लाऊज... ब्लाऊज कसला तो...फक्त ब्रेसीयर च घातलेली वाटत होती...आणि मी ...माझी मलाच लाज वाटायला लागली की... शी...मला साधं नटता पण येत नाही... जाऊंदे...आता आलीये इथवर तर होऊन जाऊंदे ..आर या पार...

पहिली फेरी होती जनरल नॉलेज ची...टीव्ही वरचा कौन बनेगा करोडपती नियमित बघत असल्याने ती स्पर्धा मी विनासायास पार पाडली...

दुसरी फेरी होती कॅट वॉक ची ....अहो मांजरीला तर मी भयंकरच घाबरते...त्यामुळे कॅट वॉक या शब्दानेच मला घाम फुटला...माझा नंबर पुकारल्यावर मला तर सारखी मांजरच डोळ्यासमोर दिसायला लागली हो ...त्यामुळे शुक शुक शुक शुक शब्द मनात मोठमोठ्याने म्हणून पाय पुढे टाकला आणि आपोआपच घाबरून पाऊले वेडेवाकडी पडायला लागली ना...आणि एका हाताने साडी सावरू का दुसऱ्या हाताने कमरेवर हात ठेऊन चालू ... काहीच नीट उमगेना... शिवाय पायात उंच टाचेच्या चपला...मध्येच पाय दुमडला...पण परीक्षकांना तो अभिनयचं वाटला... पाऊल दुखावल्यामुळे चालताना अगदी मांजरासारखेच चालू लागले की...आणि टाळ्यांच्या कडकडाटामुळे भानावर आले...

चला ...ही पण फेरी पार पडली...

हुश्श...

आता तिसरी आणि अंतिम निर्णायक फेरी...ती कधी एकदा पार पडतेय असे झाले होते...

कारण डोळ्याला चष्मा न लावल्यामुळे डोळे खूप दुखू लागले होते...रोज केसांचा शेपटा घालणारी मी आज विग लावून अंबाडा घातला होता..त्यामुळे डोके जड होऊन दुखायला लागले होते .

तरीपण मनाच्या उत्साहापुढे शारीरिक कमजोरी फिकी पडली...आज होऊन जाऊंदे ...दुखण्याचे उद्याचे उद्या बघू...

शेवटी तो अंतिम फेरीच्या प्रश्नाचा क्षण आला ...प्रश्न होता की..आजच्या आजी आजोबा ह्या पिढीचे सँडविच झाले आहे का...

इतर सर्वांनी उत्तर दिले की हो...आपल्या सासुसासऱ्यांची जुनी पिढी आणि आपल्या मुलांची किंवा येऊ घातलेली नवीन पिढी या दोन्ही मध्ये आमची पिढी मधल्यामध्ये भरडली जाते .

माझे उत्तर मात्र वेगळे होते... मला असे वाटत नाही...आपण जर तरुण पिढीशी जमवून घेतले, आमच्या वेळेस हे असे होते तसेच तुम्ही करायला पाहिजे असा हेका सोडला, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या ,एकमेकांना त्यांची स्पेस दिली तर सँडविच होणारच नाही...

माझ्या उत्तराने थोडावेळ सर्व जण स्तब्ध झाले...आणि टाळ्यांच्या कडकडाटात यावर्षीची मिसेस श्रावण क्वीन म्हणून माझे नाव जाहीर झाले...

ते ऐकताच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ...

मी घरी आले ती हवेत तरंगतच...

घरी आल्यावर मी माझा मिळालेला श्रावण क्वीन चा मुकूट सर्वांना दाखवला...

आणि जेंव्हा मी शेवटच्या निर्णायक प्रश्नाचे दिलेले उत्तर घरी सांगितले तेंव्हा सून म्हणालीच ...

आई काय बेमालूमपणे थाप मारली हो तुम्ही ...तुमच्या उत्तराप्रमाणे तुम्ही कुठे वागताय हो...यामुळेच तर सतत आपल्यात वाद होत राहतात.

आणि मी स्वप्नातून पूर्ण बाहेर आले ...

अरेच्चा...हे स्वप्न होते तर !

पण मी मात्र आता पक्क ठरवलं आहे की आपण नक्कीच भाग घ्यायचा ...आणि नक्कीच होऊन दाखवायचे श्रावण क्वीन...


बासष्ट वर्षांची मी,रुबाब मात्र षोडशवयीचा...

खरे दागिने कुलुपात,मिरवते साजशृंगार नकलीचा !


चमकतीये चांदी डोक्यात, सोन्याचा मुलामा दातात...

मोती झाला डोळ्यात,रुपेरी यंत्र विसावलंय कानात !


मनातल्या मनात खूपच मनचे मांडे खाते...

भरतनाटय नर्तन,कॅट वॉक करून मिसेस वर्ल्ड होण्याचा पल्ला सहजच गाठू शकते !


मेकअप,वॅक्सिंग, फेशिअल सगळंच करायचय मला...

हे करू का ते करू विचारात,कवळीच लागली की हलायला !


तरीही मी हट्टी, विचारांची पक्की...

करुनी रिनोव्हेशन शरीराचे, सध्यातरी मिसेस श्रावण क्वीन होऊन दाखवीन नक्की !



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy