Smita Bhoskar Chidrawar

Drama Inspirational

3  

Smita Bhoskar Chidrawar

Drama Inspirational

अनोखे वाण संक्रांतीचे

अनोखे वाण संक्रांतीचे

4 mins
238


" संक्रांत " म्हणजे सगळ्या स्त्रियांचा अगदी आवडीचा सण ...घरची पूजा , तिळगुळ ,वाण आणि मुख्य म्हणजे हळदीकुंकू ...रोज नटून थटून हळदी कुंकवाला जाणे आणि आपल्या सगळ्या मैत्रिणीसोबत धम्माल करणे ... खरचं खुप छान असतो हा सण .एरवी कुठल्याही समारंभात वर्ज असणाऱ्या काळ्या रंगांचे कपडे अगदी मनसोक्त घालून मिरवण्याचा आनंद काही औरच ! काळ्या रंगावर कुठलीही ज्वेलरी खुलून दिसते म्हणून मला विशेष आवडणारा हा काळा रंग .घरची सगळी रोजची कामे आणि त्यात पुन्हा नट्टा पट्टा करून हळदी कुंकू एन्जॉय करायची एनर्जी खरच कुठून येते ते कळत नाही पण वर्षातून एकदा फक्त स्त्रियांसाठी असणाऱ्या या सणासाठी ' इतना तो बनता है ना ' ...आणि मुख्य म्हणजे हळदी कुंकू म्हटल की घरचेही विरोध करू शकत नाहीत त्यामुळे तर प्रॉब्लेम च नसतो.

घरच्या सगळ्या मंडळींना माहित असतं की आता ही काही लवकर परत येत नाही त्यामुळे तसे घरचेवातावरण ही शांत असते ( त्यांनाही ही शांती एन्जॉय करायची असते ना ... कारणं आपण बायका कायम कट कट करतो यावर नवरोबा आणि मुलांचे एकमत असते ) त्यामुळे आता तयार होऊन जाताना मेक अप खराब होईल म्हणून आई रागावणार नाही हे माहीत असल्यामुळे मुलं हवा तो दंगा घालायच्या तयारीत असतात .रात्री मोस्टली ' वन पॉट मील ' असतं कारण आपण मस्त हादडून आलेलो असतो आणि इतकं बोलून बोलून थकूनही जायला होतं नाही का ... मुलंही मग त्यांच्या आवडीच्या खाऊची फर्माईश अगदी धीटपणे करतात ( त्यांना माहिती असतं की आता नाही कोण म्हणतं ...अती हुशार ना आपली मुलं ) असो , चालतं कधी कधी म्हणून आपणही सोडून द्यायचं असतं नाहीतर उद्या मुलांनी आपल्याला जाऊ दिलं नाही तर ? त्यापेक्षा हे बरं ...ते ही खुश आणि आपणही!

हळदी कुंकवाला जायचं म्हणजे असच कसं जायचं ? बरीच पूर्वतयारी लागते ...आणि मुख्य म्हणजे कुठल्या ग्रुप मध्ये मागच्या वर्षी नेसलेली साडी कुठली ते ही आठवावं लागतं नाहीतर रिपीट साडी घालून गेलो तर पंचाईत होते अगदी. आपल्या घरचं हळदी कुंकू म्हणजे तर विचारायलाच नको ...घरचं कार्य म्हणून अगदी सगळ्यांना राबवत असतो आपण ते ही अगदी चार दिवस आधीपासून .आणि मुख्य दिवशी तर घरादाराला मिलिटरी चा फील येतो. सगळं कसं व्यवस्थित राहिलं पाहिजे असा दम आदल्या दिवशीच सगळ्यांना मिळालेला असतो .दिवसभर मर मर करून पायाचे अगदी तुकडे पडतात पण इलाज नाही ,संध्याकाळी अगदी सुंदर दिसावं लागतच ! 

नवरोबा सुद्धा आज लवकर घरी जाण्यात काही अर्थ नाही हे समजून मित्रांबरोबर पार्टी च प्लॅनिंग करून तयारीत असतात .

सगळा कार्यक्रम अगदी छान पार पडला की केलेल्या श्रमाचे चीज होते आणि प्रसन्नपणे आपण स्वतःलाच शाबासकी देतो.

असा हा पारंपरिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतांना आम्ही मैत्रिणींनी त्यात एक ' ट्विस्ट ' आणलाय बरका .....आणि तो कसा सुरु झाला आधी ते सांगते , 


माझ्याघरी हळदी कुंकू होतं म्हणून नवीनच शेजारी राहायला आलेल्या गीताला मी आमंत्रण द्यायला गेले तशी ती रडायलाच लागली , एक महिन्यापूर्वीच तिचा नवरा अपघातात दगावला होता ...मला हे माहीत नव्हते पण तिची अवस्था अगदी केविलवाणी होती .मग मनात एक विचार आला आणि मी तिला शपथ घालून घरी येण्याची गळ घातली . तिच्याबरोबर अजून दोन काकूंना ज्या की गितासारख्याच मानसिक अवस्थेतून जात होत्या त्यांनाही घरी येण्याची विनंती केली.त्या तिघी खूपच अवघडलेल्या होत्या आणि बाकी येणाऱ्या स्त्रियाही .सगळ्यांची स्थिती पाहून मी म्हणाले की काय चूक आहे ग गीताची ? आणि या काकुंचीही ? त्यांचे नवरे देवाघरी गेले यात त्यांचा काय दोष ? त्यांनी का असं जीवन जगायचं ? ज्या पुरुषांच्या बायका जातात त्यांना तर समाजातील अश्या कुठल्याच प्रथाना तोंड द्यावे लागत नाही ना ,मग हा नियम फक्त स्त्रियांच्या वाट्यालाच का ? आणि आपण स्वतः स्त्री असूनही आपल्याला या गोष्टीचा त्रास का व्हावा ? सगळ्यांनीच मग त्यांची माफी मागितली आणि मग गीताच्या सुंदर नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली .

माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी आणि त्यांची मदत करण्यास आलेली त्यांची मैत्रीण ह्यांना सगळ्यात आधी मी वाण दिले तेव्हा सगळ्यांचा मनातल्या हळुवार भावना जपल्या गेल्या . 

मग आम्ही सगळ्यांनी नेहमीसारखी खूप धम्माल केली ! आणि यात लहान मोठा किंवा कुठल्याही प्रकारचा भेद नव्हता .

तेव्हापासून मी आणि माझ्या मैत्रिणी अश्या सगळ्या स्त्रियांना आवर्जून बोलवतो की ज्यांना काही कलुशित परंपरांमुळे या आनंदापासून आणि मानापासून वर्जित ठेवले जाते .आणि खरंच हा संक्रांतीचा सण एक वेगळीच अनुभूती देऊन जातो !सोबतच संक्रांतीचे वाण हे गरजू लोकांकडून घ्यायचं हा ही एक छोटासा प्रण आम्ही घेतलाय. आणि दरवर्षी आपल्यापरीने कोणातरी व्यक्तीच्या जीवनात थोडासा आनंद ह्या संक्रांतीच्या रूपाने घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू राहील !

तर मग या संक्रांतीपासून असच एखादं आनंदाचं वाण लुटायला काय हरकत आहे ...!


तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या !

लेख आवडला तर लाईक आणि शेअर करा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama