अनोखं ' स्पेशल ' प्रेम
अनोखं ' स्पेशल ' प्रेम
प्रेम ! या दिवसांत सगळीकडे प्रेमाचे वारे अगदी धुंवाधार वाहत आहेत .सगळेजण अगदी प्रत्येक नात्यात प्रेम शोधत आहेत . प्रेमाच्या अनेक परीभाषा या निमित्ताने व्यक्त होत आहेत .
प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
सगळ्यांना ते वेगवेगळ्या रूपात गवसत ,
प्रत्येकाला मात्र ते सुखावत !!
तसच ते मला नव्याने गवसलय...
आपण एकावर प्रेम करतो म्हणजे दुसऱ्यांवर प्रेम करू शकत नाही असं नसतं ना , थांबा थांबा . काळजी करण्यासारखी गोष्ट नाही बरं ...
तर आता माझ्या नवीन प्रेमाबद्दल , कोण आहेत ती जी नव्याने माझ्या मनावर राज्य करू लागली आहेत ?
माझ्या नवीन गोष्टीत रमण्याची आणि शिकण्याची आवड तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच . त्यामुळे नेहेमीच ' ही सध्या काय करते ? ' याची काळजी सगळ्यांनाच असते .
तर हे माझं नवीन ' स्पेशल प्रेम ' म्हणजे खरंच काहीतरी स्पेशल आहे . मी नवीनच ' स्पेशल ' असणाऱ्या मुलांना प्रेम द्यायला आणि त्यांच्याकडून भरभरून घ्यायला शिकते आहे . हा अनुभव खरंच खूप आगळा वेगळा आहे . खूप दिवसांपासून असलेली माझी इच्छा देवानेच पूर्ण केली असे म्हणायला हरकत नाही . इच्छा असणं पण कुठलाही अनुभव नसताना अचानक हो संधी मिळणं हा दैवयोग नक्कीच आहे .
इंटरव्ह्यूला गेले होते नेहेमीच्या शाळेतल्या मुलांसाठी पण तिथे गेल्यावर मात्र त्यांनी मला ' स्पेशल ' मुलांसाठी निवडलं . मनात थोडी शंका होती ' आपल्याला जमेल का ? काहीच
अनुभव नाही कसं होईल ? काही चूक झाली तर ? ' अश्या अनेक शंका मनात होत्या . पण समोरून मिळालेला आशेची किरण आपल्या आयुष्यात एक नवीन अनुभूती देऊन जाणार आहे याची प्रचिती नक्कीच येऊ लागली होती .
जमेल तेवढं पुण्य पदरात पाडून घ्यायला मला नेहेमीच आवडतं . यामध्ये आनंद देण्याचा आणि मिळवण्याचा स्वार्थ नक्कीच आहे .
या मुलांना बघून खरंच फार वाईट वाटतं. त्यांना शिकवताना सुरुवातीला वाटायचं की इतकी छोटी गोष्ट सुद्धा सरळ करत करत नाहीत ही मुलं ! पण त्यांचा साध्या साध्या गोष्टी करतानाचा स्त्रगल बघून मन भरून येतं . प्रत्येक क्षणाला बदलणारा त्यांचा मूड सांभाळताना तारेवरची कसरत होते . उगीचच चिडणारी , रडणारी ही निष्पाप लेकरं ' जादू की झप्पी ' दिली की शांत होतात .
व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने त्यांच्याकडून मिळालेली गोड भेट ही खऱ्या अर्थाने आनंद देऊन गेली .
त्यांनी काढलेली अनाकलनीय चित्र त्यांच्या अक्षरात शुभेच्छा देऊन जेव्हा हातात पडली तेव्हा डोळ्याचं पारणं फिटलं .
आपण त्यांचं आयुष्य बदलू तर शकत नाही पण त्यांना आपल्या स्वतःची काळजी घेता यावी , त्यांनी स्वावलंबी बनाव इतका प्रयत्न आपल्याकडून व्हावा यासाठी नेहेमीच देवाकडे प्रार्थना करते .
या स्पेशल मुलांकडून मिळणारं प्रेम आणि त्यांच्या डोळ्यातला आनंद हे खरंच सर्वोच्च आनंदाचं स्थान आहे .त्यांच्याकडून मिळालेली व्हॅलेंटाईन गिफ्ट ही सगळ्यात मोलाची आहे .