Smita Bhoskar Chidrawar

Drama Inspirational

3  

Smita Bhoskar Chidrawar

Drama Inspirational

असं सासर हवं ग ब्बाई

असं सासर हवं ग ब्बाई

7 mins
262


मधुराने डोळे उघडले आणि एकदम ताडकन उडालीच ! 

" बाप रे , आठ वाजले ? कसं शक्य आहे ? इतक्या उशिरापर्यंत मागच्या कित्तेक वर्षांत झोपलेली नाहीये मी . मग आज असं कसं झालं ? आरुची शाळा बुडाली आता , रोहितला ऑफीसला उशीर होणार आता , उगीच त्याचं ऐकून घ्यावं लागेल . ते एकवेळ ठीक आहे पण आई ...आई ? त्या किती बडबड करतील दिवसभर ? आणि त्यांनी मला इतक्या उशिरापर्यंत झोपू कसं दिलं ? आतापर्यंत घर डोक्यावर घ्यायला हवं होतं त्यांनी ? काय झालं असेल ? " मधुरा धडपडत उठू लागली तसा आनंदी चेहेरा घेऊन रोहित आला , ते सुद्धा तयार होऊन .

" गुड मॉर्निग मधू . अग कशाला उठलिस ? झोप ना मस्तपैकी . मी आज लंच करेन ऑफिसमध्ये . खरंतर मला जायची ईच्छा नाहीये पण खूप महत्त्वाची मीटिंग आहे ना माझी त्यामुळे जावच लागेल . पण मी लवकर येईन . संध्याकाळी मस्त जाऊ कुठेतरी . बाय " मधुराला काही बोलू न देता तिला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकत रोहित पटकन निघून गेला .

मधुरा गडबडीत पटकन आवरून आली . किचन मधुन काहीच आवाज नव्हता . 

ती बाहेर आली तर बाबा किचन मध्ये होते . प्लेटमध्ये इडली , वडे दिसत होते . सांबारचा मस्त वास येत होता.पण पॅकेट मधून तो सांबार काढायला त्यांना जमत नव्हतं . 

" काय ग कसं काढायचं हे ? या लोकांना नीट डब्यात देता येत नाही का सांबार ? पुढच्या वेळी घरूनच डब्बा देत जा मला . आणि एकही चमचा कसा नाही सापडत या घरात ? " बाबा म्हणाले .

" थांबा हो तुम्ही , मी काढते . नाहीतरी उगीच सांडासांड करून कामं वाढवून ठेवाल . आणि समोरच आहेत ना चमचे , तुम्हाला काही म्हणजे काही सापडत नाही . असं करा या प्लेट्स घेऊन टेबलावर बसा मी आणते सांबार आणि चटणी काढून . आणि हळू बोला जरा . ती पोर कधी नव्हे ते झोपली आहे शांत उगीच उठायची तुमच्या आवाजाने . ती उठली की तिला देइन गरम करून मी . तिचा आवडता नाश्ता आहे ना आज . " आई म्हणाल्या .

मधुरा जागीच थबकली . 

" अग उठलीस का बाळा , झोपायच ना अजून थोडा वेळ . पण बरं झालं उठलीस . बाबांनी तुझ्या आवडीचा वडा सांबार आणला आहे . गरम गरम खाऊन घे बरं . मग चहा घेऊया . " आईंनी मधुराला टेबलवर बसवलं . 

" आरु कुठे आहे ? दिसली नाही ? " मधुराने विचारलं .

" अग तिला बस मध्ये बसवून आलो मी . गेली ती शाळेत . शहाणी झाली आता आपली आरु . पटपट आवरते . त्रास देत नाही . बॅग फार जड आहे पण तिची . या लोकांना कळत नाही . एवढ्याश्या लेकराला इतकं ओझं देतात . मला काय म्हणाली माहितीये ? म्हणाली ' आजोबा मी बिग गर्ल झालिये आता . आणि गुड गर्ल पण . आता मी येईन एकटी घरी . तुम्ही येऊ नका मला घ्यायला . ' " बाबा नातीच्या कौतुकात मग्न होते .

" हो हो शहणीच आहे माझी आरु , फक्त दूध प्यायच म्हणजे जीव जातो तिचा . अखंड बडबड करते पण खायच्या नावाने मात्र शंख . अन्नपूर्णा आहे तिच्या पोटात . इतकी एनर्जी कुठून येते काय माहिती . अग मधू खा की तू . थंड होतं ना . काळजी करू नकोस मी आरुला पराठा करून दिला छोटासा खाल्ला तिने आणि डब्यातही दिलाय . " आई म्हणाल्या.

" काय हे आई बाबा ? मला उठवायच ना . उगीच करत बसलात सगळं . बरं आता जेवायला काय करू सांगा ? " मधुरा अपराधी पणें म्हणाली .

" अग तू काही करू नको . तुझी बिशी आहे ना आज . मस्त मज्जा करा . आपल्या शेजारी ती कमल येते ना स्वयंपाकाला तिला सांगितले आहे आजपासून पोळ्या करायला . बाकीचं मी करीन . तू किती दमशिल एकटी ? तुझे क्लास , अरूचा अभ्यास , बाहेरची कामे , हा रोहित सुद्धा इकडची काडी तिकडे करत नाही . तुलाच सगळ्यांच्या मागे मागे करावं लागतं . आता आराम करत जा बरं . 

नाहीतर असं करा ना तू आणि रोहित मस्तपैकी जाऊन या ना कुठेतरी फिरायला चार दिवस . किती दिवसात गेला नाही कुठे . आरूला इथेच राहू दे . आम्ही सांभाळतो तिला . तुम्हालाही गरज आहे एकमेकांच्या सोबत वेळ घालवण्याची . " आई म्हणाल्या.

नाश्ता झाल्यावर आईंनी मस्तपैकी चहा केला . तिघांनी गप्पा मारत चहा घेतला .

मधुराचा दिवस मस्त गेला . भिशीच्या मैत्रिणीसोबत मस्तपैकी एन्जॉय केलं तिने . उद्या तिचा स्पेशल दिवस होता . तिचा वाढदिवस आजच तिच्या मैत्रिणींनी साजरा केला. त्यामुळे ती अधिकच खुशीत होती .

रोहित लवकर येणार म्हणाला होता पण आलाच नाही . आज मित्राकडे पार्टी ठरली त्यामुळे तो रात्री उशिरा येणार होता . आई बाबा झोपले . आरुला घेऊन मधुराही झोपली . काही वेळाने तिला अनेक आवाज ऐकू येऊ लागले . ती ताडकन झोपेतून उठली ...आरु तिच्या शेजारी नव्हती..ती घाबरून हॉल मध्ये आली . सगळीकडे अंधार होता...आणि अचानक लाईट लागले...

" हॅपी बर्थडे तू यू..." एकदम जल्लोष झाला . आई , बाबा , रोहित , आरुषी सगळेच हसत तिला विश करत होते . आरुषीने आज्जीच्या मदतीने सुंदरसा केक बनवला होता . मधुराने केक कापला आणि सगळ्यांना भरवला . आनंदात सगळे झोपेच्या अधीन झाले .

मधुरा सकाळी उठून पाहते तर जवळच सुंदरस ग्रीटिंग कार्ड होतं तिच्या आरूषिने स्वतःच्या चिमुकल्या हातांनी बनवलेलं ते कार्ड बघून मधुराला खूप आनंद झाला . तितक्यात एक मोठा टेडी बियर चालत तिच्याकडे आला...

" सरप्राइज ...मम्मा हा मी तुझ्यासाठी स्पेशल घेतला आहे माझ्या खाऊच्या पैशातून सेवींग करून " मधुराला मिठी मारत तिची लाडकी लेक म्हणाली . मधुराच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले .

आता रोहितची वेळ होती . त्याने मधुराला डोळे बंद करायला सांगून तिच्यासाठी आणलेला डायमंडचा सुंदर नेकलेस तिच्या गळ्यात घातला आणि तिला आरश्यासमोर उभ केलं 

" वाह आता खरी त्या नेकलेसला शोभा आली . किती सुंदर दिसतेय माझी राणी . असं वाटतंय की फक्त तुझ्यासाठीच बनलाय हा . " रोहितने आनंदाने मधुराला मिठीत घेतलं .

मधुरा काही बोलणार इतक्यात आई , बाबा आत आले.

" हे जगातल्या सगळ्यात बेस्ट सूनबाईसाठी म्हणजेच आता आमच्या लेकीसाठी .." आई बाबांनी काश्मिरची तिकिटे हातात ठेवली . मधुरा पाया पडण्यासाठी वाकली पण आईनी तिला मिठीत घेतलं . बाबांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला .

" हे काय आई , बाबा ? इतकं मोठं सरप्राइज ? खरंच याची काही गरज नव्हती . आणि आम्ही दोघच का ? आपण सगळे जाऊया ना " मधुरा अत्यानंदाने म्हणाली .

" नाही नाही आम्ही म्हातारा म्हातारी काय करणार तिकडे येऊन ? तसही तुम्हा दोघांना गरज आहे ...आणि आरुला सुद्धा आम्ही छान सांभाळू . तुम्ही मस्त एन्जॉय करा . ते सेकंड हनिमून का काय म्हणतात ना ते . तुम्ही आलात की मग आम्ही जाऊ ." बाबांनी हळूच रोहितला डोळा मारला . मधुरा आणि रोहित दोघेही मस्तपैकी लाजले .

" चला तयारीला लागा , उद्या सकाळीच निघायचं आहे . आणि आज काय काय करायचं ? सगळं आज मधूच्या आवडीच बरं का . " आईनी फर्मान सोडलं .

दिवस आनंदात गेला . संध्याकाळी मधुराच औक्षण करून आई , बाबांनी तिला खूप आशीर्वाद दिले . या सगळ्या प्रेमाच्या वर्षावात मधुरा अगदी न्हाऊन निघाली होती .

सगळी तयारी झाली . उद्या सकाळी लवकर निघायचं म्हणून बॅग भरून रोहित , मधुरा तयार होते . काश्मीरची स्वप्न बघत मधुराला कधी झोप लागली ते कळलेच नाही . 

दोघं काश्मीरला पोचले . अगदी स्वर्गच तो ...काय सुंदर होतं सगळंच...रोहित , मधुरा सगळं विसरून एकमेकांत हरवले होते .

" ये हसीन वादिया , हे खुला आसमान..." रोहित गात होता आणि मधुरा अगदी नव्या नवरीप्रमाणे लाजेने चूर झाली होती .

एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत अगदी लहान मुलांप्रमाणे दोघं बागडत होते .

दोघं आता स्कीइंग साठी आले होते . बर्फात नीट उभही राहता येत नव्हतं . एकमेकांना सावरत असतांनाच मधुरचा तोल गेला आणि ती धाडकन पडली .

डोळे उघडून बघते तो काय ? तिच्या बेडरूम मधल्या बेडवरून ती पडली होती . शेजारी रोहित झोपलेला होता. म्हणजे हे स्वप्न होतं तर ...

तितक्यात बेल वाजली ...दूधवाला आला असणार ...ती बाहेर आली ...

" काय ग मधुरा , रोज रोज कशी उशिरा उठते तू ? पंधरा मिनिटं उशीर झाला आज तुला . आटप आता लवकर . चहा ठेव आणि नाश्त्याला चमचमीत काहीतरी कर . आणि माझी मैत्रीण येणार आहे आज घरी . पुरनपोळी कर .आणि घरीच थांब आज कुठे बाहेर जाऊ नकोस ..." आईंची रोजची टकळी सुरू झाली आणि मधुरा खऱ्या अर्थाने स्वप्नातून सत्यात आली .

नेहमी प्रमाणे सगळेजण तिचा वाढदिवस विसरले होते . रोजच्या धावपळीत ती स्वतःला विसरून जाणार होती . घरची कामं , सासूचे टोमणे , सासऱ्यांची फरमाईश , नवऱ्याच्या तालावर नाचताना आणि लेकीच्या लीला बघताना तीचा दिवस कधी संपायचा ते तिचं तिलाही कळणार नव्हतं. रोजचं तेच तेच वाईट वाटणारं आयुष्य सुरू झालं होतं .पण कालचा एक दिवस ती अगदी चांगले क्षण जगली होती .

पण या एका रात्रीच्या गोड स्वप्नात ती कितीतरी आनंदाचे क्षण जगली होती हे काय कमी होतं ? तिच्या मनातला तो काश्मीर सत्यात उतरण्याची वाट बघत ती कामाला लागली..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama