Geeta Ghatge Patil

Abstract

3  

Geeta Ghatge Patil

Abstract

आई सावित्रीस

आई सावित्रीस

2 mins
198


आई सावित्री!

तुला मनाचा मुजरा!!कारण आज माझ्या हातात लेखणी आणि समाजात मलाच नव्हे समस्त स्त्री वर्गाला असलेल्या स्थानास तुझे बलिदान, तुझे योगदान कारणीभूत आहे.

   आई तू शिकली नसतीस,धाडस केले नसतस तर आमच्या नशिबी आजही चूल आणि मूल," रांधा, वाढा,उष्टी काढा " हेच आले असते.

 शहाण्या जाणकार ज्योतिबा फुल्यांची तू सवरती, जाणती धर्मपत्नी होऊन 'अखंडपणे' लिहिती होऊन समाजातील दंभ तू तुझ्या लेखणीने उभा चिरलास. त्यायोगे समाजात शहाणपणाचं,उदारतेचं, स्मानतेचं अस वेगळंच वातावरण निर्माण झालं.

  पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या स्त्रियांच्या दयनीय अवस्थेत बदल घडवण्यासाठी तू तुझ्या नवऱ्याबरोबर खंबीरपणे उभी राहिलीस नव्हे ,त्यांच्या कार्यात उतरलीस. त्यावेळी समाज रूढींना हादरे बसले. जणू धरणीकंप आला होता. त्यामुळे कर्मठ, सनातनी लोक घाबरले. त्यांनी तुझ्या कार्याला थांबवण्याचा ,तुला अडवण्याचा प्रयत्न केला. नाना तऱ्हानी तुला नमविण्याचे कारस्थान केले. तुझ्या अंगावर शेण -चिखलाचा मारा केला, तुझ्या अंगावर ते वेडे थुंकले, तुझी वाट अडवली,तुला धमकवलं,अडवली जाशील ती तू नव्हेस, तू नमली नाहीस ,तुझं काम तू अविरत अविचलपणे करत राहिलीस. तू कणखरपणे, ताठ मानेने निर्भीडपणे या जुन्या कुप्रथांच्या जोखडांना तोडलेस.समाजपरिवर्तनाच्या अभिनव क्रांतीच्या मार्गातील ज्योतिबांच्या मार्गातील तू सहकारी, साथी झालीस. 

  अजाणतेपणी धूळ पाटीवर अक्षर गिरवणाऱ्या कोवळ्या मुलींपासून कैक विधवांची तू माऊली झालीस.त्यांच्या कित्येक अनाथ बालकांची माता बनून त्यांना लळा लावला व त्यांच्या मनात मायेचा मळा फुलवलास.

   तुझ्या कार्याचा आवाका मोठा होता आई!तुला संभाव्य अडचणींचा पुरेपूर अंदाज होता. तुझे निरीक्षण जबरदस्त होते. तू ज्योतिबांच्या नंतरही भविष्याचे आडाखे बांधत राहिलीस आणि साकारत राहिलीस तुला हवे असलेले इच्छित ध्येय्य अवघ्या स्त्रीवर्गाच्या भविष्यासाठी!

   तू रेखीत राहिलीस तुझ्या सृजनात्मक रचना आणि ओढलेस वाभाडे कुप्रथांवर 'सुबोध रत्नाकरा 'तून.

   तू सिद्ध करून दाखवलस की स्त्री म्हणजे वास्तव, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, दातृत्व आणि पुरुषाच्या बरोबरीने करता येणारे कर्तृत्वदेखील!

   तुझी "काव्यफुलें" "बावनकशी" काव्यसंग्रह म्हणजे पक्व मनाचा हळुवार हुंकार!

   तुझा प्रवास खूप खडतर होता, तुम्ही 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा उघडलीत मुली शाळेत येऊ लागल्या पण धर्म भ्रष्ट झाला म्हणून लोकांनी तुला विरोध केला, शेण फेकून मारलं; पण तू चिडलेल्या ज्योतिबांना सांगितलंस,'अहो!घाण तर त्यांचे हात झालेत. असे अडथळे या वाटेत येतच राहतील'.समाजात तुला बहिष्कृत केलं, जिवंतपणी तुमची प्रेतयात्रा काढली, पण तू डगमगली नाहीस. तुझी शिक्षणाची यात्रा कधीच थांबली नाही.तुझ्यावर टीका करणाऱ्यां समाजाला तू तुझ्या विचारांचे मोती 'काव्यफुलांच्या'रुपात सोडून गेलीस .

   अशी तू महान ,तेजस्वी, भविष्याचा वेध घेणारी, चिंतनशील,विवेकशील ,संवेदनशील,हळुवार मनाची, साऱ्या महिलांची आई ,आद्य शिक्षिका, ज्योतिबांची सावली न राहता तुझ्या स्वकर्तृत्वाच्या तेजस्वी आभेने तळपणारी साक्षात सावित्री!!!

   आई तुझ्या अजरामर कार्यास आमचा त्रिवार मानाचा मुजरा. जोपर्यंत आमच्या जीवात जीव असेल तोपर्यंत तुझे नाव आमच्या हृदयाच्या पाटीवर चिरकाल कोरलेले असेल.

   तुझ्यापुढे आमचा माथा सदैव कृतज्ञतेनेच टेकेल!!!

सावित्रीची लेक असल्याचा सार्थ अभिमान आजन्म राहील.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract