Geeta Ghatge Patil

Others

3  

Geeta Ghatge Patil

Others

पैसा मॅटर करत नाही

पैसा मॅटर करत नाही

3 mins
345


    पैसा जीवन जगण्यासाठी आवश्यक बाब आहे. पण सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत.पैशाने ऐश्वर्य लाभेल, सुख आणि समाधान नाही. पैश्याने वस्तू विकत घेता येतील ,आनंद आणि मनःस्वास्थ विकत मिळत नाहीत. पैशाचा उपयोग आपल्या स्वजनांसाठी त्यांच्या कम्फर्टसाठी जी व्यक्ती करते, पैसा व नाती, आदर, निर्व्याज प्रेम यांची गल्लत जी व्यक्ती करत नाही,तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने संतुलित, आनंदी आयुष्य जगू शकते. अन्न, वस्त्र, निवारा, औषध, शिक्षण या मूलभूत गरजा भागवून उरतो तो पैसा भोगण्यासाठी!

त्याचा उपयोग सारासार विचार करून सद्सद्विवेक बुद्धीने करणे म्हणजे त्या पैशाचा योग्य विनियोग करणे. अविचाराने अनावश्यक खर्च करणे म्हणजे उधळेपणा.

आनंदाने, समाधानाने जगायला किती नि काय लागत हे एकदा कळलं की जमलं सुखी आयुष्याचं सूत्र!!

    वस्तू खरेदी करताना शक्यतो त्या उत्तम प्रतीच्या असाव्यात अस पाहतो किंबहुना आपल्या सर्वच वस्तू  ब्रँडेड असाव्यात असं आपलं मानणं असतं. रेमंड,लॅकमे,डेनिम, पार्क अवेन्यू, डेनवर, रेबॅन,वुड लँड,sparks, असे काही famous ब्रँड्स  च्या वस्तू केसांपासून पायापर्यंत आपण वापरतो.

    या ब्रँडेड वस्तूत रुबाब आहे तोच रुबाब माझ्या आचार, विचार, कृतीत आहे का?याचा परामर्श प्रत्येकाने घ्यावा. ब्रँडेड गॉगल लावल्यावर भवताल ब्रँडेड दिसत नाही ,आहे तसाच दिसतो. ब्रँडेड कपड्याची पुटं आपल्या शरीरावर चढतात आणि अंतकरणही अहंकाराच्या थरांनी लडबडून जातं.साधी वस्त्र वापरणाऱ्या आणि साधी राहणी जगणाऱ्या लोकांचा दुस्वास सुरू होतो.

    इथून तिथून सर्व मानव समानच की!

    त्वचेच्या आवरणाखाली जिवंतपणाची लक्षणे सांगणारी हृदय, फुफुसे ,रक्तवाहिन्या, किडन्या, इ.अवयवांची जत्रा सर्वांच्याच शरीरात एकसारखीच असते. तिथे गरीब ,श्रीमंत, काळा, गोरा, ब्रँडेड, साधा, देशी, उच्च- नीच,गोत्र, धर्म, हे भेद नसतात.

    आपण भुलतो वरलिया रंगा!

    पैशाने विकत घेतलेल्या या रंगीत कपड्यांच्या रंगावर ,गंधावर फिदा!व्यक्तीच्या असण्यापेक्षा दिसण्याला भुलणारे वेडे जग. 

    कधी विचार केलाय? माझं दिसणं आवडण्यापेक्षा माझं असणं इतरांच्या पसंतीस उतरलं पाहिजे. माझ्या विचारांची इतरांना गरज पडावी किंवा इतरांचे विचार मी जाणून घ्यावेत. नाही, असा विचार आपण करत नाही किंवा तसा विचार मनाला शिवतही नाही. बर त्यासाठी प्रयत्नशील नसतोही आपण! चढवले कपडे नि केला मेकअप की आपला कायापालट झाला असा विचार करणारी मंडळी आपण. 

    भुलवणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अनेक गोष्टी या जगात उपलब्ध असतात. इशाऱ्याच्या अंतरावर !

    पैसा फेकून त्या घ्यायच्या नि अस्वस्थ व्हायचं की पैसा सत्कारणी लावायचा ही चॉईस ज्याची त्याची. पैशाच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध करता येतं. विचार नि कृतीच्या माध्यमातून कुटुंब नि समाजाला ही समृद्ध करता येतं .नीतिमत्ता, सदाचार, परोपकार, शैक्षणिक ,कौटुंबिक सामाजिक प्रगती, व्यवसाय वृद्धी, प्रवास, असेल सुबत्ता तर थोडं सत्पात्री दान करण्याची वृत्ती, गरजूस मदत, बांधवांचा, मित्र परिवाराचा उत्कर्ष यासाठी पैशाचा उपयोग करता येतो.

     निर्जीव वस्तूत पैसा गुंतवावा. सजीव गोष्टीत, सळसळत्या मैत्रीत, प्रेमात, कुटुंबातील नात्यात पैशामुळे गैरसमज निर्माण होता कामा नये.

     समाजप्रिय माणसाला त्याच्या अवतीभोवती नेहमी त्याच्यावर unconditionally प्रेम करणारे, कौतुक करणारे सहचर ,सखे सोबती, मित्र परिवार हवे असतात. आपण प्रेम, आदर, काळजी दिली तरच आपल्याला त्या भावना परत मिळतात ,( नियमच आहे , "फर्स्ट गिव्ह थेन टेक "(first give then take)) ,त्यासाठी पैसा खर्च करण्याची गरज नसते. गरज असते समोरच्या व्यक्तीच मन समजून घेण्याची.

     काहींना स्वतःच्या पैश्याचा ,श्रीमंतीचा ,देखणेपणाचा ,वडिलार्जित इस्टेटीचा फार गर्व असतो .ते आपल्याहून कमी मिळकत असलेल्या ,कमी सुबत्ता असलेल्या आपल्या नातेवाईकांचा ,मित्रांचा ,सहकाऱ्यांचा द्वेष करतात.गरीब असणाऱ्याला आपल्याकडे काहीतरी मागेल म्हणून जवळ करीत नाहीत किंवा त्यांच्या सावलीच्याही संपर्कात येत नाहीत.याउलट ज्यांनी शून्यातून आपलं जग उभं केलंय त्यांना स्वाभिमान असतो ,ते श्रीमंताकडे लाचारीने जात नाहीत ,कष्टाची भाजी भाकरी खातात ,आपली स्वप्नं हळूहळू पुरी करतात .याचा अर्थ ते मागे नसतात, अशी कष्ट करून सुखी असणारी लोकंच खऱ्या अर्थाने समाधानी असतात. लाखो कोट्यवधी खर्चून मोठं घर ,गाडी ,जमीन ,सर्व सुखसोयी घेता येतात पण सुख मिळत नाही.त्या गोष्टी मिळवण्यासाठी जीवाचं रान केलेलं असत पण दिवस भर कष्ट करून पडल्या पडल्या जी झोप येते ती विकत मिळते का कुठे? "200 रुपयांचं मनस्वाथ्य द्या हो!"असं कधी म्हणत नाही आपण.

     मनस्वास्थ्य मिळवावं लागत, त्यासाठी मनाला सवय लावावी लावते, आल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची, आसू पुसून चेहऱ्यावर हासू लेण्याची,हसत उद्याची प्रतीक्षा करण्याची,सकारात्मक पद्धतीने जीवन जगण्याची.ओठांवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून समतोल साधण्याची.

     मी आता जिथे आहे तिथे ताठ मानेने कसं पाय रोवून जगता येईल हा एकच विचार माणूस म्हणून आपण करायचा.सुख दुःख येत राहणार.सुखानं हुरळून जायचं नाही आणि दुःखाने कोलमडून पडायचं नाही ,इतर कोणाशी आपली तुलना करायची नाही ,तेव्हाच जगण्याचा सोहळा खऱ्या अर्थाने अनुभवता येतो .

     म्हणूनच 'पैसा मॅटर करत नाही'.

     जो मनाने श्रीमंत तोच खरा श्रीमंत.


Rate this content
Log in