Geeta Ghatge Patil

Abstract

3  

Geeta Ghatge Patil

Abstract

फसलेला valentine

फसलेला valentine

4 mins
246


 संक्रांतीच्या तिळगुळाची लगबग संपून 15दिवस होत आलेले,10 वी च्या वर्गात valentine day ची क्रेज वाढत चाललेली, तिळगुळ देताना,' तिळगुळ घ्या ,गोड बोला ! 'असं कधीच आपल्याशी न बोलणाऱ्या मुली बोलल्या तेव्हा पासून हृदयातली गोड feeling अधिकच गोड होत चाललेली. या वर्षी शाळेचे शेवटचे वर्ष, पुन्हा आयुष्यात कोण ,कधी,कुठे ,कसे भेटेल माहीत नाही म्हणजे शाश्वतीच नाही. मग उनाड मुलांनी मनाचा हिय्या केला.ठरलं या वर्षी काही करून शाळेतल्या सर्वात हुशार नि सगळ्यांची आवडती सुलू ! सुलुला valentine day दिवशी चिट्ठी द्यायची. त्यावेळी greeting ची प्रथा ,पण valentine day च ग्रीटिंग सापडलं तर बेदम मार बसणार म्हणून चिट्ठीचा पर्याय ठरला,

 त्यातल्या त्यात सुलुच्या जास्त ओळखीचा आणि तिच्या गावच्या अभ्यान चिठ्ठी द्यायचा विडा उचलला. दिवस वेळ ठरला.

 चिठ्ठीत मजकूर काय लिहायचा यावर खलबत झालं, अभ्याच अक्षर म्हणजे फार्मासिस्ट पण लाजेल असं, मग सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या सुन्याला लिहायला सांगून त्याच्याकडून चिट्ठी मस्त वहीच्या 4 पानांवर लिहून घेतली.

       

प्रिय मैत्रीण सुलू,

           आज valentine day, आजच्या दिवशी मैत्री घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. आपल्यातली ही मैत्री अशीच राहू दे .आशा आहे माझ्या मनातील असणाऱ्या तुझ्या बद्दलच्या निर्मळ मैत्रीला तू वाईट किंवा वेगळे समजणार नाहीस.आपल्यातील मैत्री अशीच वाढत राहो हीच मंगलकामना।.......

           ............

           ..........

                 तुझाच मित्र अभय

                  

अशीच मैत्रीवर भाष्य सांगणारी 4 पानं.


सुली म्हणजे लेडी पहिलवान!सगळ्या भावांच्या गर्दीत वावरणारी फक्त मुलीचे ड्रेस घालते म्हणून मुलगी ,बाकी सगळे गुण मुलग्याचे! कडी पहिलवान पण tomboy!!

अरे ला कारे करणारी, कोणाच्याही अंगावर धावून जाणारी ,आणि प्रसंगी लाथा बुक्यांचा प्रसाद देऊ शकणारी मुलीचे कपडे घालणारा मुलगा! हुशार, चाणाक्ष, पोरांच्या तिरक्या नजरेला तितक्याच तिखट पणे प्रतिउत्तर देणारी लवंगी मिरची!

मुलांसाठी चिट्ठी प्रकरण गंमतच होतं म्हणा ,किंवा नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या teenager लोकांचं नसत धाडस, म्हंटल तर हवंहवंसं म्हटलं तर करून बघायला काय जातंय अस बेजबाबदार फीलिंग.

वर्गात 2 गट पडलेले. सुली समर्थक पण सुली मनापासून आवडणारे राजा, पम्या, अंदया,संत्या आणि सुलीला चिठी देऊन आम्ही किती धाडसी आहोत हे दाखवण्यास आतुर झालेले यांचा म्होरक्या अभ्या!

     सकाळच्या तासाला सुलीला सांगून सतर्क करूया काय?असा काही मुलांच्या मनात विचार आला. पण वेळ जमून अली नाही, सुली नेहमी त्या खिदिखीदि करणाऱ्या आणि घाबरट पोरीच्या घोळक्यात! तयारी जोरात चालली होती, रोज सुलीच्या दिनचर्येच बारीक निरीक्षण सुरू झालं. सुली येते कधी, जाते कधी, ती कोणत्या वेळी कुठे जाते,कोणासोबत असते ,एकटी कधी असते ,सगळी सगळी माहिती काढून झाली ,सकाळी 10,ते 10.30 या वेळेत ती ग्रंथालयाच्या कट्यावर एकटी असते हे लक्ष्यात येताच

जागा फिक्स केली.

सुलीला चिठी तिथेच द्यायची ठरलं.अंदयाला सुली खूप आवडायची. म्हणजे त्याला वाटायचं सुली फक्त आपली मैत्रीण आहे, ती इतर कोणा मुलाशी बोलत नाही,सुलीला ही तो आवडायचा. तस पक्क नव्हतं पण कधी कधी सुली अंदयाला चोरून बघते, तो खेळू लागला की त्याला चिअर करते, त्याच्यासाठी ती टाळ्या वाजवते, नि उड्या पण मारते ,त्याचा खोखो,running ,बघायला ती मुद्दाम थांबते हे अंदयाला माहीत होतं.

   आणि तो दिवस उगवला. सगळी तयारी फुल्ल करून, जीव मोठा करून , गेले आठवडाभर घरात लपवून ठेवलेल्या चिठीचा ऐवज जपून खिश्यात ठेऊन अभ्या शाळेत 9 लाच आला. आज त्याच्या काळजाची धडधड वाढली होती, पण तो तस दाखवत नव्हता, बाकीची उनाड पोरं त्याच्या पाठीशी हिय्या करून उभी होतीच. सगळ्या नजरा सुलीला शोधत होत्या, सुली gate अधून येताना दिसली, एकटीच, खबऱ्या मुलाने खबर दिली. सगळे तयार झाले, आता पुढं काय होणार?सुली चिठी घेणार का?अभ्या सुलीचा मार खाणार ?

   इकडे अंदया बेचैन झालेला, त्याला हा प्रकार थांबवायचा होता ,पण तो तस करू शकणार नव्हता, त्याला अभ्याला विरोध करायची हिम्मत होत नव्हती.तो दात ओठ खात मुठी आवळत बसून राहिला, त्यानं ठरवलं आपण विपरीत घडू द्यायचं नाही.

   सुली ग्रंथालयाच्या कट्यावर आल्यावर ,'गोंदया आला रे!!'ची इशारत झाली.ती कसलंस पुस्तक वाचत बसली होती मन लावून, निळ्यापांढर्या युनिफॉर्ममधली,दोन घट्ट वेण्या पांढऱ्या शुभ्र रिबन लावून बांधलेली ,पायात उंच टाचांचे सँडल घालणारी, जेमतेम दिसणारी पण तरीही शाळेचा आकर्षण बिंदू असणारी ती!

   अभ्या तिच्या समोर उभा राहिला ,बाकीची पोरं वर्गाच्या खिडकीत, व्हरांड्यात, झाडाखाली कुठं कुठं उभी होती. अंदया मात्र पळत पळत येऊन त्याच्या मागे उभा राहिलेला, मुठी आवळून.त्याचा आवेश बघून ,आता अभ्या मार खातय, अशी धारणा झालेला अंदया समर्थक ग्रुप दुसरीकडे आता काय होणार म्हणून वाट बघत थांबलेला. सुलीने अभ्या आणि मागोमाग अंद्याला पहिला. तिला काही कळेना. हा असा का थांबलाय? 

"काय रे काय झालं? का असा पुतळा उभा केल्यासारखा उभा आहेस?"अस सुली म्हणाली .काय बोलावं हे अभ्याला कळेना."काही नाही ,.......,तुझी ......गृहपाठाची वही पाहिजे होती."

   अडखळत काहीतरी जे सुचेल ते बोलून तो मोकळा झाला." कुठली?"

   " अंम .... ते ...गणिताची. " 

   "अरे काल जमा केली की सरांकडे ."

  " बर,मग तपासून दिली की मला दे ."

  "बर "सुली म्हणाली

  प्रेक्षक मुलांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचलेली,आता अभ्या चिठ्ठी सुलीला देणार की तसाच परत येणार ?पोरांनी पैजा लावल्या जागेवरच ! 

  इतक्यात बाकीच्या मुली सुलीजवळ जाऊन बसल्या, आणि अभ्याचा प्लॅन फसला.आता आपल्याला बोलता येणार नाही हे तो कळून चुकला. हातावर मूठ आपटत तो परत वर्गात फिरला,"आयला ह्या पोरींना पण आताच यायचं होतं . " म्हणत अभ्या चरफडत वर्गात जाऊन बसला. ", पोरांनी एकच गलका केला त्याच्यापुढं.

  " सुलीला चिठ्ठी देणार म्हणून पैज लावली होतास ना?

  चल हरलास तू ,तू काय हे काम पूर्ण करशील अस वाटत नाही गड्या!" अभ्या रागाने गोरामोरा झाला .डोळे मोठे करत ,काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत बसून राहिला.

  अंदया खुश!!! त्याच्या मनासारखं झालं होतं .सुलीला चिट्ठी न देता अभ्या गेल्यामुळे अंदयाच्या मनात जोरात विजयाचा शंख घुमू लागला, त्याच्या चेहऱ्यावर विजयी भाव! न बोलता त्याच काम झालं होतं .त्याने सुटकेचा निश्वास टाकला नि तोही वर्गात परतला.

  अंदया आणि सुली समर्थक टोळकं अभ्याच्या टोळक्याला बघून उगीचच हसायला लागलं होतं."आला मोठा चिठ्ठी देणारा!"म्हणून त्याला चिडवायला लागले.

  वर्गात हशा का पिकलाय हे मुलींना माहीतच नव्हतं.सुली मैत्रिणींचा कंपू सोबत घेवून वर्गात खिदळत विराजमान झाली!!!! 

"आज कायतरी झालंय बाई पोरांना, काहीतरी वेगळं वातावरण झालंय बाई ."अस म्हणत मुली पुन्हा आपल्या चर्चेत गुंग झाल्या .

जिच्यासाठी हा खटाटोप केला तिच्या गावी बातमीच नव्हती. ती अनभिज्ञ ,तिला तर valentine day कशाकरता साजरा करतात तेच माहीत नव्हतं. ती निरागस ,tomboy !!

              


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract