Geeta Ghatge Patil

Tragedy

3  

Geeta Ghatge Patil

Tragedy

उन्हातले हात

उन्हातले हात

3 mins
164


सकाळी जाग येताच सुरज जागा झाला.अंग दुखत होतं,थोडीशी कसर अंगात होती.त्याला विश्रांतीची गरज होती, तरीही तो उठला. आळस करून त्याला चालणार नव्हतं. पपा दवाखान्यात होते. कॅन्सरवर उपचार घेत होते. कदाचित यानंतर त्यांना परत दवाखान्यात न्यावच लागणार नव्हतं, पैसा पाण्यासारखा खर्च होत होता, ना त्या पैशाला यश येत होतं, ना डॉक्टरांच्या उपचाराला ना प्रार्थनेला. हळूहळू सगळी गात्र बधिर होत जाणाऱ्या पप्पांना तस बघणं शक्य नव्हतं. जन्म गेला त्या पित्याचा आम्हाला हवं नको बघण्यात,आज व्हेंटिलेटर लावल्यावर नजरेने बोलणारे पप्पा, त्यांची ती विकल अवस्था!'मला इथं मरायचं नाही, मला घरी घेऊन चला !' त्यांचे अडखळणारे शब्द ऐकून हृदयाला पीळ बसला होता. जवळचे सगळे पैसे संपले होते. तो दवाखान्यात थांबून राहिला तर घर चालणार नव्हतं. पप्पांच्या छायेत नांदणारे कुटुंब, पप्पांच्या आजारपणात विखुरल होतं. आमचे पप्पा रॉयल माणूस!सुगंध शंकर घाटगे. गोरा रंग, घारे डोळे, रुबाबदार व्यक्तिमत्व, आवाजात जरब, नि माणसं जोडण्याची कला. सतत हसमुख, मिस्कील स्वभाव. हसून हसवून लोकांची जत्रा जमवणारे पप्पा!लोक त्यांना मास्तर म्हणत. Royal enfield वापरणारे, कष्टातून वर आलेले कष्टाची किंमत जाणणारे,माणसातल माणूसपण जपत कित्येकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारा रॉयल माणूस!

त्यांच्या रॉयल्टीला ब्लड कॅन्सर ने ग्रासलं.नि हसतं खेळतं घर मोडकळीस आलं. सगळ्या आप्तेष्टांनी सावरलं नसत तर कदाचित पुन्हा उभा राहता आलं नसत. हे सगळं आठवतच तो आवरू लागला. आज कामावरून परत आल्यावर पप्पांना भेटायला दवाखान्यात जाणार होता. अंघोळीच पाणी डोक्यावर ओतून घेताना त्याचा अश्रू चा बांध फुटला, खूप रडला तो. त्याला पप्पांच्या कुशीत शिरायचं होत ,पण पप्पा....

त्यांच्या साऱ्या संवेदना हरवत चालल्या होत्या. सर्वात लहान असून पप्पाच्या आजारपणात त्याने घरची जबाबदारी उचलली होती. सगळं बघत होता नेटानं पण आज त्याला गलबलून आलं .स्वतःला सावरून बाथरूममधून तो बाहेर आला, डबा घेऊन निघाला कामावर. स्वतः fire engineer असताना घरचा बांधकाम व्यवसायात तो बघत होता. पप्पा बघत होते तोपर्यंत स्वतःची साईट सुरू असायची पण आता तो दुसऱ्याच्या हाताखाली गवंडी काम करत होता उदरनिर्वाहासाठी, दिवस दिवस उन्हात राबत होता. सिमेंट वाळूच आता त्याच जगण्याचं साधन बनलं होतं. तो कामावर जायचा, आपल्याच विचारात मग्न असायचा, कोणाशी बोलत नसायचा, आतल्या आत आवंठा गिळायचा नि नित्यक्रम करत राहायचा, हौस मौज करायच्या वयात कष्ट करून कुटुंब सांभाळत होता.पप्पांना डिस्चार्ज मिळाला. वेदनेने विव्हळणारे,विकल, क्षणा क्षणाने मरणासन्न होणारे पप्पा घरी आले.सेवेसाठी आई, बहिणी, भाऊ, आत्या सगळे आले .सूरज दिवसभर काम करी आणि रात्री पप्पांसाठी जागा राही. 

वेदनेने भरलेले दिवस जात होते, अश्याच एका वेदनादायी दिवशी सर्वांच्या आशा मालवून देवाने पप्पांना बोलावून घेतलं, आपल्या जवळ शांत चिरनिद्रा घेण्यासाठी. त्यांना सगळ्या वेदनांतून मुक्त केलं देवाने!!घर कोलमडले, पोरकं झालं, कोणी कोणाचं सांत्वन करावं कळेना.घरातली लगबग थांबली, पेशंटबरोबर होणारी त्रेधा, धावपळ सगळं संपल त्याक्षणी!!पोरकेपणाची वेदना आयुष्य भर आम्हाला देऊन सुगंध घाटगे नावाचा अध्याय संपला. रितीप्रमाणे 10 -12 दिवस घरात थांबणं भाग होत. कार्य झाल्यावर परत आला दिवस सारखाच म्हणत आज तो कामाला गेला. परत उन्हा तान्हात राबत राहिला. बापाचं निस्सिम प्रेम, नि माया आठवत राहिला. आसवं गाळत राहिला.

 बापाच्या राज्यात सुखात घालवलेला काळ आठवून तो व्यथित झाला. इच्छा असून तो पप्पांच्या शेजारी बसू शकला नव्हता; कारण त्याने घरचा भार कोवळ्या हातावर पेलला होता. कुटुंबाला आधार देण्यासाठी त्याला कष्टाशिवाय पर्याय नव्हता. आज परत आल्यावर पप्पांच्या खुर्चीकडे लक्ष जाताच त्याचं उसनं अवसान गळून पडलं, उन्हात राबून आटलेल्या डोळ्यांनी परत वाहायला सुरवात केली. आता पाठीवरून हात फिरणार नव्हते, मायेने पाहणारे ते घारे डोळे कुठंतरी हरवले होते, प्रत्यक्षात पुन्हा कधीही पप्पा दिसणार नव्हते.नावाप्रमाणे आपल्या सुगंधी आठवणी मागे ठेवून ते आम्हाला पोरकं करून गेले होते. पप्पांच्या आठवणीत ओक्सााबोक्षी रडून त्याचे उन्हात रापलेले हात ,अगदी हुबेहूब पप्पांसारखे दिसत होते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy