Geeta Ghatge Patil

Fantasy

3.8  

Geeta Ghatge Patil

Fantasy

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

3 mins
583


      आज हवेत गारवा दाटून आला होता. सकाळपासूनच आभाळ कुंद होऊन कृष्णमेघांनी ओथंबून गेलं होतं .आता कोणत्याही क्षणी आकाशातून त्या रुपेरी धारा पृथ्वीच्या ओढीने खाली धावत येतील असं वाटतं होतं ,आणि ते मनोहारी तुषार बरसायला सुरवात झाली सुद्धा !झाडांच्या

पानांवर एकसारखे नृत्य करीत त्या धारा अखंड मोत्यांचे देणे सृष्टीला बहाल करत होत्या, तीही आसुसलेली होतीच, त्या अत्तरात सृष्टी न्हाऊन गेली .चिंब झाली .सगळे चराचर न्हाऊन निघाले. खिडकीतून ती सगळे सोहळे पाहून तृप्त झाली .तसे सगळेच ऋतू ती या खिडकीतूनच पाहत होती.

गेली कित्येक दिवस ब्रेन हॅमरेज झाल्याने ती अंथरुणाला खिळून होती. फक्त डोळ्यांची हालचाल नि हृदयाची धडधड

चालू आहे म्हणून काय ती जिवंत होती. तिला बोलताही येत नव्हते. नर्स तिला औषधाचा डोस द्यायला आली, जाता जाता तिचं पांघरून नीट करताना तिने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ,माईचे डोळे भरून आले होते .नर्सने मायेने तिच्या कपाळावरून हात फिरवला नि माईचे डोळे पुसले. जाणार होती पण ती माई शेजारी बसून राहिली . ती म्हणाली ,"माई ,बाहेर पाऊस पडतोय पाहिलात?

आज छान सरी कोसळतायत आणि म्हणून माईचा चेहरा आज फुलला आहे."ती एकसारखी माईशी गप्पा मारत होती.

"तुमच्या बिल्डिंग बाहेर अंगणात तुम्ही लावलेला मोगरा, सोनचाफा ,ब्रह्मकमळ,जास्वंद,लिली, निशिगंध, गुलाब सगळे फुलून आलेत .अंगण ओलं चिंब झालंय, तुमचा मोती अंग आखडून बसलाय बघा एका कोपऱ्यात. तुमचा कडीपाट (झोपाळा)वाऱ्यावर हिंदोळे घेतोय. त्या इटुकल्या वेली ,पिटुकली पाखरं आणि त्यांचा मधुर चिवाट ऐकू येतोय ना तुम्हाला. miss करतायत हो तुम्हाला."

तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी ओघळले ,

तिचा जीव की प्राण असणारी तिची फुल झाडं तिच्या नजरेसमोरून हटेनाशी झाली.

तिला आठवलं अशाच एका पावसात आणलेली निरनिराळ्या रंगातील गुलाब रोपं लावताना मुलं ,नातवंड ,नवरा सर्वांना तिनं कामाला लावलं होत.खत ,माती ,नारळाची केसर ,वाळू ,सगळं गोळा करून कुंड्या मध्ये रोपं लावून तिने सर्वांकडून अंगणात छान सुशोभन करून घेतलं होतं.

थोड्या दिवसांनी जेव्हा फुलं लागायला लागली तेव्हा अंगण तेच पण जागा किती प्रसन्न दिसत होती.

नर्स सांगत होती ,"सकाळी तुमची दोन्ही नातवंडे येऊन गेली, तुम्हाला झोप लागली होती,, परत आल्यावर येतो म्हणून सांगून गेलेत."

       तिला आठवला तो पाऊस. चिऊ लहान असताना आलेला. तो टपोऱ्या थेंबांचा वळवाचा पाऊस .चिऊला घेऊन मंदिरात गेली होती ती आणि वादळ वारे आणि गारा घेऊन बरसला होता तो .त्या गारा चिऊच्या फ्रॉकमध्ये आणि स्वतःच्या पदरात गोळा करून घरी येऊन मोठ्या बाउल मध्ये ठेवल्या होत्या .चिऊचे हात गारठून गेले होते.नाही म्हंटल तरी आपणही त्यादिवशी लहान होऊन पावसात भिजलो होतोच की!

स्वतः लहान असताना येरे येरे पावसा करत घेतलेली गिरकी आठवून माईच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित पसरले.

        शाळेतून परत येताना गोणपाटाच्या इरल्यात पाऊस धारा झेलत भिजलेलं अंग आठवून ती शहारली. पहिली छत्री आल्यावर त्यात अनुभवलेला पाऊस ,आंनदरावांशी लग्न झाल्यानन्तर पहिल्यांदा माहेरपणाला येताना पंचमीच्या भुरभुरणाऱ्या पावसाची नि आकाशाला गवसणी घालणाऱ्या झोपळ्यांची आठवण होऊन ती पुन्हा मोहरली.

संसारात स्थिरावल्यावर कोण्या एका सुट्टी दिवशी मुलांना सोबत घेऊन केलेली पावसाळ्यातली हिरवीगार ,मंतरलेली सहल आठवून तिला हुशारी आली. असे किती पावसाळे निरपेक्षपणे अव्याहतपणे कोसळताना, तिने अनुभवले होते .तिचे मन घरातील सुना नातवंडे यांच्या किलबिलाटाने तृप्त झाले होते.

अलीकडे ती ,तिची झाडे,तिचे आंनदराव,तो झोपाळा ,दोन कप चहा आणि यथेच्छ गप्पा आणि ओंजळीत मावत नव्हते इतके सुख अस जगणं सुरू होतं .

अचानक डोक्यातून वेदना यायला सुरवात काय झाली नि ती जागीच कोसळली .तातडीने दवाखान्यात नेले ,,ब्रेन हॅमरेज झाल्याने ती किती तरी दिवस बेशुद्ध होती .शुद्धी वर आली तेव्हा सगळे कुटुंब अवती भोवती होतं. तिला किती बर वाटलं होतं सगळ्यांना एकत्र बघून ,पण तिला हालचाल करता आली नाही की बोलता आलं नाही ,नातवंडांचे लाड करता आले नाहीत ,की नवऱ्याकडे लटका राग व्यक्त करता आला नाही.

"माई ,माई ! अग बघ ना पावसात कशी न्हाऊन निघालीय सारी धरती !"माईचा मुलगा अनुराग म्हणाला.

व्हीलचेअर वर बसवून तिला बाहेर व्हरांड्यात आणलं होतं .

ती पाहत होती सगळा चराचर मोहक दिसत होता. तिच्या ओथंबल्या नयनांची भाषा नभाला कळायची ,तिला त्या कृष्णजावळच्या ,श्यामवर्णी मेघांची आठवण आली की तोही कोसळायचा धुवांधार नि बेधुंद होऊन पाहत राहायची तिच्या प्रिय सख्या पाऊसराजाला! 

तिला अनंत आठवणींच्या खजिना रिता करून जायचा हा आठवणीतला हा पाऊस .

आणि माई गुणगुणायची......

"पाऊस दाटलेला ,माझ्या घरावरी या ,

दारास भास आता हळुवार पावलांचा ......

पाऊस दाटलेला"

आजही माई गुणगुणत होती पण मनातल्या मनात आणि ते थेंबांचे हवेहवेसे संगीत तिच्या  उमटत होते तिच्या स्पंदनात.

माईच्या समोर पावसाने तिच्या हव्याश्या आठवणींच्या सडा  पसरून ठेवला होता .माई तृप्त नजरेने समोर अंगणात कोसळणारा पाऊस पाहत होती .


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy