डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract Inspirational

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract Inspirational

संकटावर मात करू की...?

संकटावर मात करू की...?

4 mins
208


  अस्मिता आपल्या केबिन मधे बसून महत्वाचे कागद पत्र चेक करून सह्या करत होती . सहीच्या खाली तारीख लिहितांना तिचं लक्ष कॅलेंडर कडे गेलं आणि ती तारीख अन् त्या तारखेनंतर चे काही दिवस आठवून तिच्या अंगावर काटाच आला....!


कामाला जायची घाई असलेली अस्मिता ,वय वर्षे जवळपास पंचावन्न!! सगळं आवरून झालेलं, दूधवाला आला दूध गॅसवर ठेवलं. दूध तापलं की आंघोळीला जायचं पूजा,जेवण उरकलं की बास्स रेडी...! ती वेळ तशी चाकरमान्यांसाठी घाईचीच पण सरावाने साधते सारे. दूध तापून वर यायला थोडा अवकाश म्हणून ती तिथेच थांबली..., तेवढ्यातच कचरा गाडी वाला आला ,त्याची शिट्टी आणि आरोळी...!

दूध तापायला आलेलं ,कुणी असेल समोर म्हणून तिने आवाज दिला पण काहीच रिस्पॉन्स नाही..! कुणीच नाही वाटतं घरी म्हणत ती स्वतः च घाई घाईने कचरा टाकायला गेली आणि गॅस वरचं दूध वाचवायच्या नादात एका पायरीवरून स्लीप झाली. ...!


ती जी खाली बसली ते उठताच येईना...! तितक्यात मोहल्ल्यातल्या कुणीतरी तिला तसं पडतांना पाहिलं अन् काही जणांना मदतीला बोलावून तिला उचलून आत घेतलं. पन्नाशी च्या वरचं वय अन् सत्तर च्या वरून असलेले वजन...! वाकडा तिकडा पडलेला पाय अन् संपूर्ण शरीराचा त्यावर आलेला भार.....!


खूपच असह्य वेदना आणि कळा निघत होत्या तिच्या पायातून...!लगोलग घरच्या लोकांना बोलावून घेतलं दवाखान्यात नेलं x-ray काढला, उजव्या पायाच्या दोन्ही हाडांना आडवी क्रॅक होती. रॉड घालणे,ऑपरेशन करणे याला पर्याय नव्हता.


हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केलं गेलं पण मग शुगर वाढलेली. बी पी चा त्रास तर होताच...!अखेर उपचारांनी सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होणार हे नक्की झाले. अस्मिता चे पती तीच्यासोबत होते त्यामुळे घरच्या व्यवसायाची आणि म्हाताऱ्या आजोबांची जबाबदारी तिच्या पंचवीस वर्षीय मुलावर आणि शिकणाऱ्या वीस वर्षीय मुलीवर येऊन पडली.


नेमके काय झाले कळेना पण मित्राच्या रिसेप्शन ला गेलेला मुलगा अचानक पाय ढिला पडला म्हणून खाली पडला तर त्याला उठताच येईना..! मित्रांनी आणून फॅमिली डॉक्टरांना दाखवले. त्यांनी उपचार केले तात्पुरतं बरं वाटलं पण सी टी स्कॅन ची असलेली गरज आणि न्युरोलॉजिस्ट च ओपिनियन गरजेचं होतं....!


घरी बहीण फक्त एकटीच होती आणि म्हातारे आजोबा. ती डॉक्टरांशी बोलली. आईला सांगितलं तर आईचा बी पी अजून वाढेल आणि ऑपरेशन अजून लांबेल हा विचार करून तिने तिच्या बाबांना फक्त कल्पना दिली आणि त्यांनी आईजवळच राहावे असं ठरवलं. मावशीला फोन करून सारी कल्पना दिली आणि तिला सोबत यायला तयार केलं. शेजारच्या चुलत काका काकूंना आजोबांची काळजी घ्यायची विनंती केली . अन् ती शहरातल्या हॉस्पिटल ला भावाला घेऊन रवाना झाली.फॅमिली डॉक्टर सुद्धा जातीने हजर होते.


प्रसंग खूप बाका होता. तरणा ताठा लाडका भाऊ त्याला नेमके काय झाले कळत नव्हते. काहीच त्रास नसतांना असं कां झालं काहीच कळत नव्हतं तिला. एक झालं की एक संकट फेर धरून सभोवती नाचत होते तिच्या सुध्दा धैर्याची जणू परीक्षाच सुरू होती.


सगळ्या टेस्ट पूर्ण झाल्या आणि B 12 च्या कमतरते मुळे सगळं झाल्याचं निष्पन्न झालं. उपचाराने सगळं बरं होईल हाच एक मोठा दिलासा होता. परंतु सी टी स्कॅन मधे असलेले चेंजेस बघता आणखी एक आठवडा कळजीचाच होता.


तिकडे अस्मिता चे ऑपरेशन झाले. पण एवढं सगळं होऊनही मुलगा आणि मुलगी साधे बघायला आले नाही हे तिला विचित्र वाटत होतं. सगळं ठीक तर असेल ना घरी??? हा प्रश्न राहून राहून तिला सतावत होता. कारण तिच्या मुलांचं तिच्यावर असलेलं निखळ प्रेम तिला माहित होतं.


सगळं माहीत होताच भाऊ आणि वहिनी मात्र धावत पळत आले होते आणि तिला आधार देत होते. पती सुद्धा तिला सावरत होता.


घरचे सगळेच्या सगळेच एकदम गायब झाल्याने म्हातारे आजोबा मात्र बिथरले होते अन् त्यांनीही तब्येत बिघडवून घेतली होती. आता काय करावे ? हा ही मोठा प्रश्नच होता..!

शेवटी अस्मितेच्या पतीने आपल्या मोठ्या बहिणीला विनवणी करून,हात जोडून "बाई ग तशीही घरी तू एकटीच असतेस , तेव्हा दोन दिवस येऊन थोडं बाबांकडे बघ म्हणून विनवलं होतं. मोठ्या मिनत वारिने ती यायला तयार झाली होती.


आठवड्याभरात सगळी परिस्थिती सामान्य झाली होती पण त्याआधी च्या दिवसांनीं मात्र सगळ्यांच्या अगदी तोंडचे पाणी पळवले होते. अगदी आगीतून फुफाट्यात जाणे काय असते याची अगदी प्रचिती सगळ्यांना आली होती.


प्रसंग अगदी बाका होता पण अनेक गोष्टींची जाणीव करून देणारा होता. या काळात आपल्या परक्या ची चांगलीच जाणीव झाली होती. शेजारी आणि दूरचे नातेवाईक कामी आले होते पण सख्ख्या नणंदांनी मात्र भाव खाल्ला होता. अस्मिताचे बहीण ,भाऊ हे वेळ काळाचा विचार न करता धाऊन आले होते. भाचा लग्नाचा असल्याने या गोष्टीचा गवगवा करू नये हे त्यांना कळले होते. याउलट सख्ख्या आत्या मात्र लोकांना काहीही सांगून स्वतः च्या भाच्याच्या तब्येतीबद्दल विकृत चित्र लोकांच्या मनात निर्माण केले होते जेव्हा की तो पूर्ण बरा झाला होता.


सगळ्यात महत्वाचे म्हणजे जीला ती अतिशय अल्लड समजत होती आणि कसं करावं ह्या पोरीचं असं जीच्याबद्दल तिला वाटत होतं तिने तर समजदारी,निर्णयक्षमता अन् अतुलनीय धैर्य दाखवत जो परिस्थितीचा सामना केला होता की तिची सारी चिंता च मिटली होती. तिची लेक एक खणखणीत नाणे आहे हे तिने तिच्या कर्तृत्वाने दाखवून दिले होते.


(असे प्रसंग आयुष्यात येतच असतात. असं म्हणतात की संकटं कधीच एकटी येत नाहीत तर अगदी चारही बाजूंनी ती अगदी घेरून टाकतात.

 अशा वेळी अगदी वावटळीत किंवा चक्रव्यूहात फसल्यासरखी अवस्था होते.सुटकेचा मार्ग अस्पष्ट असतो अन् गर्भगळीत झाल्यासारखी अवस्था असते. एकप्रकारे नियतीच आपली परीक्षा घेत असते. अशावेळी गरज असते ती फक्त अतुलनीय धैर्याची...! हिमतीने परिस्थितीचा सामना करण्याची...!

अशाच परिस्थितीत आपल्यातील उणीव आणि बलस्थानं सुद्धा कळत असतात . आपल्या खरोखरीचे जवळचे कोण तेही अशाच काळात कळते.

 शेवटी प्रत्येक सूर्यास्तानंतर सूर्योदय हा असतोच...! फक्त गरज असते ती धैर्याने परिस्थिती हाताळण्याची...!!!)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract