डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

तिचं राज्य - स्वयंपाकघर

तिचं राज्य - स्वयंपाकघर

3 mins
241


सरला एक आनंदी स्वच्छंदी मुलगी. तिला अगदी भरभरून जगायला आवडायचं . गुणीही ती तितकीच! पण लहानपणापासून च फक्त वरवरची कामं ती करायची. स्वयंपाकासारख्या किचकट विषयात तिने अजून हात घातला नव्हता.

पण जरा मोठी झाली आणि आई म्हणाल  " अगं मुलगी म्हणून नाही पण स्वतःला कधी काही खावेसे वाटले तर ते बनवता यायला हवे ना! म्हणून शिकून घ्यायचं थोडं थोडं. " ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली आणि सरला मॅडम स्वयंपाक नाही पण यात डोकं घालायला राजी झाल्या. पहिल्यांदा आईनी एक मेनू शिकवला. अगदी हे इतकं घे ,हे असं कर, हे इतकं घाल वगैरे विधी नी तिनी पदार्थ बनवला.आई नी घरी बाबांना सांगितलं आज सरी ने बनवलं हे. पण मॅडम काही मानायलाच तयार नाहीत. ती म्हणाली तूच तर सारं सांगितलं मी तर फक्त चम्मच हलवला.


या पोरीची जरा तऱ्हा च निराळी होती. दुसऱ्या दिवशी आईला फर्मान. आज मी हा हा पदार्थ करणार तू मला फक्त कृती सांगायची ,काय घालायचं ते सांगायचं. ते किती घालायचं ,कसं घालायचं. ते माझे मी बघणार. इंटरनेट चे दिवस तर नव्हतेच ते. आणखी आईला दुसरी सूचना होती की ती किचन मधे काम करतांना कुणाची ढवळाढवळ अजिबात नकोय.झालं मॅडम किचन मध्ये गेल्या आणि क्षणात किचन चे दार बंद. आत कुणालाच एन्ट्री नव्हती.


पोरगी आत काय करत असेल या विचाराने आई बाहेर चिंतेत बसलेली. काही वेळाने दार उघडण्याची चाहूल. काय प्रताप केलेत लेकीने ? आईच्या मनात प्रश्नचिन्ह!

पण हे काय किचन उघडताच सुवास दरवळतोय, म्हणजे पदार्थ साधला की काय? आणि खरंच शंका अगदी खरी असते. सरी ने अगदी स्वतः च्या अकलीने पदार्थ बनवला असतो तोही उत्तम. अशीच चुकत माकत ती स्वतः च्या हिंमतीवर बरेच काही शिकते. पण तिच्या दार लावून करण्याच्या पद्धतीमुळे कुणासमोर करायचं म्हटलं की ती मात्र बिचकायचीच. पण पोरगी मात्र कुठे अडणार नाही याचा विश्वास आईला येतो.


मोठी होते सरी शिक्षणासाठी घराबाहेर पडते. हे नवं विस्तारलेले जग,नव्या मैत्रिणी. मधामधात येणाऱ्या काही प्रसंगांनी मैत्रिणींचे ट्रेण्ड कूक असणे आणि तिचा काठावरचा प्रवास यातली तफावत जाणवते. मग सुट्ट्यांमध्ये घरी गेली की नवनवीन पदार्थांवर हात साफ करत जाते. इकडले ,तिकडले बघून ,विचारून नवनवीन गोष्टीही शिकते.

अगदी थोडं थोडके बनवून बघायची सवय असलेली सरी मात्र कुणासमोर काही बनवायचं म्हटलं की अजूनच बिचकत असते.


आता तर मॅडम लग्न होऊन सासरी येतात. सासरी सासू बाई ,नणंद म्हणजे सुगरणी. जरा इकडची तिकडे चव झाली की सासूबाईं चा ओरडा. एवढ्या सुगरण सासूबाईंच्या दोन्ही सुना म्हणजे शिकाऊ उमेदवार. सरीची जाऊ म्हणजे तर सरी पेक्षा वरची केस. एक वर्षा आधी लग्न होऊन आलेली अन् सासरी येऊन स्वयंपाक शिकलेली.त्यामानाने सरीची कंडीशन बरी.नवनवीन पदार्थ जे सासूला येत नसतात ते बनवत सरी आपलं निभवून नेते. स्वतः ही करत करत शिकते अन् जाऊ ला पण हळूहळू शिकवत जाते.


या सगळ्या कार्यक्रमात दोघीही कधी चुकात जातात. कधी कधी काही बिघडलं तरी साधायला शिकतात. एकिनी चुकवले तर दुसरीने सावरायचे असं करत मन जपणं,नाती सांभाळणं, निगुतीने जसे पदार्थ करायचे तसे च घरातल्या लोकांना सुद्धा जपायचे हे दोघीही स्वयंपाक घरातूनच शिकतात. दोघींनाही एकमेकींच्या रूपाने बहीण ,मैत्रीण,सुहृद सारं काही मिळते.


पुढे जाऊ बाहेर राहायला गेल्यावर ,सगळी जिम्मेदारी सरीवरच येते. काही दिवसांनी सासूबाई सुद्धा स्वयंपाकातून सन्यास घेतात. अन् ही नवशिकी सरी अगदी पंचवीस तीस लोकांचा स्वयंपाक सहज करायची क्षमता ठेवते.तिचा तो आवाका पाहून महेरच्यानाच आश्चर्याने तोंडात बोटं घालायची पाळी येते.


अशी ही सरी,खूप सुगरण नाही बनली जरी तरी चार लोकांना विविध पदार्थ खाऊ ठेवण्याची क्षमता नक्कीच ठेवते. हेच तिचं यश असतं एवढे दिवसातल्या तिच्या स्वयंपाक घरातल्या वावराचं.....!

कारण


हेच तर असते तिचं राज्य, तिचा एकछत्री अंमल असलेले..!


धन्यवाद!


Rate this content
Log in