शिकायला गेलो एक
शिकायला गेलो एक
शिकायला गेलो एक विषय नाटकाचे परीक्षण नुकतेच आम्ही प्रशांत दामले आणि ऋषिकेश शेलार (तुला शिकवीन चांगला धडा फेम) यांचे "शिकायला गेलो एक" नावाचे नाटक पाहिले खरोखर दर्जेदार विनोदी नाटक आहे प्रशांत दामले सारख्या एवढ्या दिग्गज नटासमोर त्या मानाने ऋषिकेश शेलार नवखाच, पण त्याच्यासमोर चांगलाच उभा राहिला आहे आणि दोघांचेही कॉमेडी टाइमिंग जबरदस्त. कोल्हापूरचा एक आमदार आपल्या बिघडलेल्या मुलांसाठी चांगल्या शिक्षकाच्या शोधात असतो त्याचवेळी त्याला प्रशांत दामले चा पत्ता मिळतो ज्याच्या शाळेचा रिझल्ट 100% लागत असतो. आणि प्रशांत दामलेचा त्यादिवशी आदर्श शिक्षक म्हणून सत्कार होणार असतो . हा आमदार त्याच्या घरात आपली दहा-बारा मुले घेऊन जबरदस्ती शिरतो आणि त्याचा वेगळा सत्कार करतो सुरुवातच एवढी गमतीशीर आहे की बॅनर वरती "शाने गुरुजी" लिहिलेलं असतं ते खरे साने गुरुजी असतात. आणि गुरुजी नको म्हणत असताना हा आमदार ऐनकेन प्रकारेन आपल्या मुलाच्या शिकवणीसाठी गुरुजींना राजी करतो. त्यासाठी गुरुजींची मुलगी महिना 75 हजाराची फी ठरवते तीही आमदार देण्यास तयार होतो. मग सुरू होतात खऱ्या गमती जमती, ऋषिकेश शेलार म्हणजेच विद्यार्थी मास्तरांना सरळ सांगतो या नादामध्ये पडू नका आतापर्यंत 24 मास्तर आलेत आणि गेलेत तुम्ही 25 सावे. मग प्रशांत दामले नेहमीची मास्तरांची ट्रिक म्हणजे मैत्रीच्या नात्याने शिकवणीस सुरुवात करण्याचा विचार करतो तू माझं एक ऐकायचं मी तुझं एक ऐकणार आणि मग तो गुरुजीला सांगतो माझी तंबाखू तुम्ही खा तर मी तुमची शिकवणी मान्य करेल आणि विद्यार्थ्याला शिस्त लागायच्या ऐवजी, मास्तरच तंबाखू खायला खिडकीतून पचापच थुंकायला शिकतो. मग विद्यार्थी त्याला अगदी क्लब डान्स पिणे हे सगळे प्रकरण शिकवतो. आणि आदर्श मास्तर देखील सगळ्या गोष्टी करतो. ही गोष्ट आमदाराला आणि मुलीला कळते तेव्हा दोघे पण त्याची निर्भर्त्सना करतात. आमदार आपल्या मुलाला घरी घेऊन जातो पण घरी नेल्यावर मुलगा इतका चांगला वागू लागतो आणि सगळ्यांचा आदर करू लागतो की बापाला वाटते मास्तर मुळे मुलगा एवढा तरी सुधारला आहे तो पुन्हा आणून मुलाला तिथे शिकवणीला टाकतो पुन्हा यांचे येरे माझ्या मागल्या चालू. पण त्यात पण खरी गोष्ट अशी असते जी विद्यार्थीच सायकॉलॉजी समजून घेऊन त्या मुलीला देखील सांगतो कारण ती पण आता आपल्या बापाचं तोंड बघायला तयार नसते. मास्तर ची बायको त्याच्याशी लग्न केल्यानंतर त्याला सांगते की माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं घरच्यांच्या जबरदस्ती खातर मी लग्न केलंय आणि ती मनापासून त्याची कधीही होत नाही शिवाय एका मुलीच्या बाळंतपणातच ती मरते त्यानंतर मास्तर आपले पूर्ण आयुष्य त्या मुलीसाठी काढतो. त्यामुळे आयुष्यात तरुण वयात ह्या असल्या सगळ्या गोष्टी करायच्या राहून जातात. त्यामुळे काही काळ मास्तर बहकतो, पण शेवटी तो आदर्श शिक्षक असतो, तो जागेवर येतो. आणि मुलाला देखील चांगले शिक्षण घेण्यास भाग पाडतो. मग तो रिझल्ट येईपर्यंतचा टेन्शनचा काळ . जो मुलगा आतापर्यंत दहा वेळा दहावीला बसलेला असतो मग पास का नापास वगैरे टेन्शन मास्तर पण डोळे झाकून कान झाकून मुलगा पण डोळे झाकून कान झाकून पण मुलगी रिझल्ट घेऊन येते आणि असा तो, वांड आणि वाया गेलेला मुलगा चक्क पास होतो. साधारण चार किंवा पाच पात्रामध्येच हे नाटक अतिशय सुंदर भट्टी जमलेली आहे. पूर्ण विनोदाचा कल्ला आणि तुमचा चांगला टाइमपास. दोन अडीच तास हलकेफुलके आणि खळखळून हसणारे हे नाटक जरूर पाहण्यासारखे आहे.
