मनातला नाना
मनातला नाना
सौ ज्योती दीपक गोसावी दुसंगे कशिश पार्क ठाणे 8 /9/ 2026 मनातला नाना आज अचानक नाना पाटेकर यांनी जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली. नानाची सुरुवात ही रंगभूमीपासून झालेली आहे "हमीदाबाईची कोठी," हे विजयाबाईं सोबत केलेले नाटक, पुरुष हे विजय तेंडुलकर यांचे नाटक अशा दिग्गज लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. नाटकातून केलेल्या अभिनयामुळे वास्तववादी आणि ताकतीचा अभिनय लाभला. नुकताच नाना आणि अशोक सराफ यांचा देखील एक किस्सा काल-परवाच मोबाईलवर आला होता, ज्यामध्ये नानाकडे तेव्हा पैशाची कडकी असायची आणि अशोक सराफ काही ना काही निमित्त काढून नानाला पाच रुपये दहा रुपये देत असायचा . नाना त्याच्या डोक्याला तेल लावायचा पाय दाबून द्यायचा. आणि एकदा तर नानाकडे गणपतीत पैसे नव्हते तेव्हा अशोक सराफ ने त्याचा दरवाजा वाजवून कोरा चेक दिला माझ्या अकाउंटला 15000 आहेत त्यातले पाहिजे तेवढे काढून घे, नानाने 3000 काढले आणि नंतर कित्येक वर्षांनी ते तीन हजार अशोक सराफ ला परत केले तेव्हा अशोक सराफ म्हणाला "नाना आता पैसेवाले झालास" तुमच्याकडे पैसे आले वाटतं तेही हसत हसत दोघांनी पण त्या प्रसंगाची आठवण जागवली. पण एवढा नावलौकिक कमावल्यानंतर देखील, आताच्या काळात सुद्धा नाना पाटेकर, अशोक सराफ भेटल्यावर त्याचे पाय दाबून देत असे. हे झाली मैत्री, असा देणारा आणि असा जाणीव ठेवणारा दोघेही पुन्हा होणार नाहीत. 1970 च्या दशकात सुरुवातीला नाना पाटेकर यांनी अगदी लहान सहान भूमिका केल्या, आपण मराठी माणसे तर त्यांना भालू या सिनेमापासून ओळखतो. भालू या सिनेमातील छोटीशी आणि खलनायकाची भूमिका देखील लक्षात राहण्यासारखी होती. नानाचा अभिनय, नानाचा एक वेगळाच खर्जातला आवाज आणि अगदी सहजरीत्या असणारी डायलॉग डिलिव्हरी , आणि नानाचा साधेपणा सगळ्यांनाच भावायचा. सुरुवातीला अंकुश आणि प्रतिघात या दोन सिनेमा पासून सुरुवात. अंकुश मध्ये बेरोजगार आणि वाट चुकलेला तरुण साकार केला, तर प्रतिघात मध्ये मुख्य भूमिका नसताना देखील न्यायाच्या बाजूने उभा राहणारा , व राजकारणी गुंडाला अटक करणाराएक पोलीस शिपाई ज्यामुळे त्याच्या कुटुंबावर देखील अत्याचार होतात त्यानंतर 1989 मध्ये आलेला परिंदा, त्यामधील शांत पण क्रूर स्वभावाचा अन्नासेठ नानाने केला. त्यामधील खलनायकाच्या भूमिकेने नानाला राष्ट्रीय फिल्मफेअर मिळवून दिले. (क्रांतिवीर 1994) त्यामध्ये प्रताप नारायण टिळक या नावाने अन्यायविरुद्ध लढणारा आणि त्यापेक्षा जनतेला पेटवून देणारा नाना लोकांना भावला. त्यांचा तो "कलम वाली बाई" हा डायलॉग अगदी प्रसिद्ध झाला. त्यातील एक सीन आहे , एका बाईला तिची सासू त्रास देत असते आणि छोटा मुलगा रडत पडत नानाकडे येतो, नाना त्याला विचारतो मी काय करू? मला काय सांगतोस? उचल दगड आणि मार त्या म्हातारीच्या डोक्यात, आणि खरंच तो मुलगा अचानक आपल्या आजीच्या डोक्यावर दगड भिरकावतो . असा जनमानसातल्या भावना अन्यायाविरुद्ध भडकवणारा नाना 1993 मध्ये आलेला तिरंगा त्यातला इन्स्पेक्टर वागळे कोणी विसरला असेल का? आणि त्याच्या एंट्री च्या वेळी वाजणारा ॲम्बुलन्सचा सायरन, जाड भिंगाचा चष्मा, त्यातून ती नजर राजकुमार आणि वागळे यांच्यातलं खोटं खोटं भांडण सगळं काही मनाला भावणार . (आप तक छप्पन 2004) मध्ये त्यातला एन्काऊंटर स्पेशालिस्ट साधू आगाशे वेलकम या सिनेमातला "उदय शेट्टी" एक प्रकारे मोठा डॉन असून देखील कांदे बटाट्याची गाडी ढकलणारा आणि "आलू लेलो" म्हणत फिरणारा आणि विनोदाची निर्मिती देखील करणारा . आणि 2016 मधला नटसम्राट वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेले आणि कायम तरुण असणारे हे नाटक पुन्हा एकदा लोकांना सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि मराठी, नॉन मराठी सगळे लोक तो सिनेमा पाहायला गेले. त्यातला विक्रम गोखले यांच्यासमोर मारलेला तो डायलॉग अरे! तू कलाकार म्हणून पण नालायक आहेस, आणि माणूस म्हणून पण नालायक आहेस. दुसरा मैला चा दगड मराठी चित्रपट "डॉक्टर प्रकाश बाबा आमटे" खरे प्रकाश आमटे यांना पाहिलेले असून देखील चित्रपटात नानाच प्रकाश आमटे वाटत होता. स्वतःच्या पाठीमागे वाघाला घेऊन चालणारा आमचा हा अभिनयातला वाघ कसा विसरता येईल 1996 मध्ये आलेला अग्निसाक्षी त्यातला विकृत आणि saddest नायक, तो देखील अगदी आठवणीत राहतो. खामोशी द म्युझिकल या सिनेमातील मुका मनुष्य आणि जेव्हा आपली मुलगी जन्माला आली आणि ती बोलते की नाही, ऐकते की नाही यासाठी होणारी बापाची घालमेल मोठ्या प्रभावीपणे नानाने सादर केली . या चित्रपटांव्यतिरिक्त स्लमडॉग मिलियनेअर, , , अपहरण, राजनीती आणि द अटॅक्स ऑफ २६/११ हे चित्रपटही त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय चित्रपट आहेत. 1999 मध्ये अमिताभ आणि नाना यांचा आलेला एकमेव चित्रपट कोहराम उत्कंठा वाढवणारा ॲक्शन थ्रिलर आणि देशभक्तीपर असा होता अनेक चित्रपटातून खलनायक पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ता राजकारणी इत्यादी अनेक भूमिका नाना जगला पण वास्तविक आयुष्यात तो अतिशय साधेपणाची भूमिका जगत होता. त्याचा पेहराव कायम लेंगा आणि कुडता . समाजभान असणारा कलाकार, लोकांना मदत करणारा कलाकार, नाम ची संस्थापना करताना नानाने कोणाला मदत मागितली नाही, की स्वतःच्या कार्याचा गाजावाजा केला नाही, की टीव्हीवर येऊन एका एपिसोड चे लाख दीड लाख घेऊन सामाजिक कार्य केले नाही. प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नानाने या गोष्टी केल्या . आणि मग "अकेला चलता था धीरे धीरे कारवा बनता गया" अशी त्या नाम फाउंडेशन ची परिस्थिती झाली. कोणासमोर ही आपले परखड मत मांडण्यास नाना कधी घाबरला नाही, मग कधी त्याला त्याचा खूप त्रास देखील दिला गेला, कधी कोणी उत्तर दिले नाही पण नानाचे प्रश्न हे जनतेच्या मनातलेच प्रश्न असायचे. असा नाना आपल्या मनातला नाना आज अचानक एक्झिट घेऊन गेला. पण त्याच्या कार्याने तो कायम लोकांच्या मनात अमर राहील.
