आता माझी लाज तुला पांडुरंगा
आता माझी लाज तुला पांडुरंगा
आता माझी लाज तुला पांडुरंगा
बापूजी बारहाते पांडुरंगाची पूजा करत होते, आणि अचानक त्यांची पत्नी धावत पळत मंदिरात आली. अक्षरशः तिला धाप लागली होती, अगं! एवढं काय झालं? अर्ध्या तासाने मी घरी येणारच होतो ना! एवढ्या तातडीने देवळात का पळत आलीस?
जमुनाबाईंच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या, आणि हातामध्ये चिठ्ठी होती.
ती तशीच तिने आपल्या नवऱ्याच्या हातात दिली.
बाबा माझं " "दिलशाद" वर प्रेम आहे, आणि मी त्याच्याबरोबर जात आहे ,तो माझ्याशी लग्न करणार आहे मी मुंबईला चालले.
तुमची नलू
बापूजींना चिठ्ठी वाचून भोवळच आली, बायकोला स्वतःचं दुःख सोडून त्यांना सांभाळायला लागलं.
त्यांची नलू बारावीला होती, जिल्ह्याच्या गावी कॉलेजला जात होती, आणि हा दिलशाद कोण? आणि तिला कधी भेटला? हेच त्यांना माहीत नव्हते.
मुलगी अगदी शांत, सरळ, खाली मान घालून कॉलेजला जाणारी आणि येणारी, रोजची एसटी पकडण्यासाठी स्टैंड वर जाताना सुद्धा ती मान वर करून बघत नव्हती, आणि आपली नलू असं काही करू शकते हा त्यांना विश्वासच बसत नव्हता.
बापूजी बारहाते यांचा गावात प्रशस्त वाडा भरपूर शेती आणि वाडवडलार्जीत विठ्ठल मंदिर. त्यांनी पूजेला पुजारीच ठेवला होता पण तो नेमका त्याच्या गावी गेला होता. त्यामुळे बापूजी आज स्वतः पूजा करण्यासाठी गेले.
पांडुरंगा! पिढ्यानपिढ्या तुझी भक्ती या घरात आहे .
मुलांवर सगळे उत्तम संस्कार, दोन मुली लग्न होऊन गेल्या, मुलगा बाहेर गावी आहे आणि हे शेवटचं लाडक शेंडेफळ, त्याला कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं नाही, पण तुझ्या भक्तीची हीच का रे फळ मिळणार?
कुठे असेल माझं लेकरू, कुठे असेल माझी नलू?
मुलगी अविंधा बरोबर पळून गेली .
गावात तोंड दाखवू कसं? कोणाला?
या गावात नेहमी निती नियमाने वागलो, लोकांना नियम शिकवले, ज्ञान दिले ,चांगले राहण्याचे सांगितलं आणि माझ्याच वाट्याला हे फळ!
पांडुरंगा आता हे काळ तोंड कोणाला दाखवणार नाही. तुझ्या पायावर डोकं आपटून मी प्राण देणार! बापूजी बडबडू लागले. नशीब देवळात कोणी नव्हतं .
जमुनाबाईंनी त्यांना समजावलं आणि घरी नेलं.
पुढे काय हा प्रश्न होता कारण गावात या गोष्टीचा बभ्रा करायचा नव्हता.
अहो हातावर हात धरून बसू नका, कॉलेजला जाऊन चौकशी करा, पोलिसात तक्रार द्या,
मी यातलं काही करणार नाही आणि कुणाला काही सांगणार नाही विठ्ठलाला काळजी असेल तर तो माझ्या मुलीला परत आणेल.
अहो असं म्हणून कसं चालेल पांडुरंग काय प्रत्यक्ष येणार का? तुमच्या मुलीसाठी! आपणच हात पाय हलवले पाहिजे ना?
बापूजींनी आपल्या पत्नीचे काही ऐकलं नाही मात्र तोंडात पाण्याचा थेंब ही न घेता त्यांनी निर्जल उपोषण मांडलं,.
पांडुरंगाची भांडण मांडलं
"आता माझी लाज तुला पांडुरंगा"
आता माझ्या मुलीला तूच परत आणायची नाहीतर आयुष्यात तुझ्या देवळाची पायरी पुन्हा चढणार नाही नाही तुलाच मी तिथे ठेवणार नाही. वाडवडिलांर्जित देऊळ मी जागेवरच ठेवणार नाही.
गोपाला गिरीधारी
खबर लेना मेरी
खबर लेना मेरी
नही तो होगी
तेरी मेरी.
++++++++++++++++++++++++
नलू चे डोळे आता खाडकन् उघडले होते. जे स्वप्न दाखवून आणि गोड गोड भूल थापा मारून दिलशादने तिला सोबत आणले होते.
त्या साऱ्याची धुंदी क्षणात उतरली.
गावातली मुलगी मुंबईत पहिल्यांदाच आली, कधी काही येण्याचे कारण पडले नव्हते आणि त्यांचे कोणी नातेसंबंध देखील नव्हते, मुंबईची चकाचौंध पाहून तिचे डोळे पांढरे झाले .
अरे वा! या शहरात आता आपण राहायचं, दिलशाद बरोबर संसार करायचा किती छान! नलू दिसायला खूप सुंदर होती, घरातल्या चारही भावंडात उजवी.
आणि वयाच्या 16/ 17 व्या वर्षी, ही अशा पांढऱ्याशुभ्र घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराची स्वप्न पाहत होती आणि तिच्या आयुष्यात दिलशाद आला. दोन महिन्यात तिच्यावर अशी काय जादू केली, तिला काय खरी खोटी स्वप्ने दाखवली, ती तिची तिलाच माहीत पण कोणाकडे मान वर करून बघणारी नलू डायरेक्ट पळून जायला तयार झाली.
दिलशादने दोन दिवस तिला एका हॉटेलवर ठेवली, पण अगदी तिला हातही लावला नाही.
तिच्या मनात त्याच्याबद्दल अगदीच चांगली प्रतिमा झाली, खरच लग्न झाल्याशिवाय हा मला हात देखील लावणार नाही. किती चांगला आणि प्रामाणिक आहे माझा दिलशाद!
पण तिसऱ्या दिवशी
तो बाहेर नाश्ता आणण्यासाठी गेला होता आणि
कोणीतरी दरवाजा ठोठावला, दार उघडले तर दारात दोन अरब उभे, तिला आपल्या सोबत घेऊन जायला, तेव्हा तिला कळले की दिलशादने आपल्याला विकून टाकले आहे, आणि हा अरब आपल्याला सोबत नेणार आहे.
तिच्या हातात दुबईचे तिकीट देऊन तिला आपल्या सोबत लवकर चलण्याविषयी ते दोघे सांगू लागले, घाई करू लागले. बाहेर पडताना आरडाओरडा करायचा नाही, नाहीतर तुझ्या आई बापाला खतम करू , अशी चिठ्ठी तिला दिलशाद ने त्यांच्यासोबत दिली होती. आणि नलूच्या पायाखालची जमीन सरकली, आता कुठे जायला थारा नव्हता, एकतर गावी आई बापाला काय तोंड दाखवणार? शिवाय सगळीकडे ही बातमी झाली असणार, आणि माझ्यामुळे यांनी माझ्या आई-वडिलांना मारले तर, काही केले तर नको त्यापेक्षा मी यांच्यासोबत जाते.
नलूचे डोळे रडून रडून लाल झाले होते, पण आता ते डोळे पुसायला कोणीच नव्हते, तिने आपले कपडे घेतले आणि खाली उतरली, खाली टॅक्सी उभी होती, दोघे अरब तिला घेऊन टॅक्सीत बसले, टॅक्सी विमानतळाकडे जाण्याआधी ग्रँड रोडच्या मार्केटमध्ये नेली, कारण त्यांना तिच्यासाठी बुरखा घ्यायचा होता. एकजण बुरखा घेण्यासाठी खाली उतरला, दुसऱ्या तिच्या सोबत बसला होता, अचानक त्याच्या पोटात कळ आली म्हणून तो सुलभ कडे पळाला, ही गाडीत एकटीच होती. खरंतर हिला पळून जाण्याचा चान्स होता, पण हिला काही समजत नव्हते, तेवढ्यात एका अगदी हमाला सारख्या दिसणाऱ्या माणसाने, गाडीची काच वाजवली, नलू तू इकडे कुठे?
आपल्याला कोणीतरी नावाने ओळखते आहे म्हणून तिने पाहिले,
अगं ओळखत नाहीस का मी तुझा विठ्या मामा!
जमुनाताईने मला तुला आणायला पाठवल आहे, चल लवकर! उतर खाली, असे म्हणून तो तिला हाताला धरून गर्दीत नाहीसा झाला.
नलूला आधी काही समजलेच नाही, विठ्या मामा नावाचा कोणी मामा आहे हे पण तिला माहीत नव्हते. आईच्या तोंडून कधी ऐकले नव्हते,
मामा! मी कधी तुम्हाला बघितले नाही, तुम्ही कधी घरी येत नाही, पण बरं झालं तुम्ही भेटलात! मी फार संकटात आहे.
अगं वेडे तुझ्या बापाने मला सारखी हाक मारून, साद घालून तुला आणायलाच पाठवलंय. घरी येत नसलो तरी मी तुम्हाला रोज भेटतो, रोज दिसतो.
अग मी तुमच्या गावातलाच नाही का?
नलूला काही समजले नाही पण तिने आपली मान डोलावली.
विठ्या मामाने परळ डेपोत नेऊन तिला गावच्या एसटीत बसवून दिले. बघ मागच्या सीटवर मी बसलोय, काळजी करू नको, इकडे तिकडे उतरू नको, घरी जा! कुठे काही बोलू नको सरळ आपल्या घरी जा!
सकाळी सकाळी एसटी, गावात पोहोचली
तिला वाटले आता सगळे माझ्याकडे पहात असतील, म्हणून ती अगदी ओढणी डोक्यावर पुढे घेऊन, विठ्ठल मंदिरावरूनच पुढे घराकडे निघाली होती कारण तोच रस्ता होता, सहज मंदिराकडे पाहिले तर आईबाप तिला तिथेच दिसले, ते धावतच मंदिरात शिरली,
बापू मी आले! बापू मी आले! माय बाप दोघांनी पण पाठीमागे पाहिले तर त्यांची लाडकी मुलगी समोर उभी होती. कशी आलीस? कोणी आणलं? अग तूच नाही का विट्या मामाला पाठवलंस,
तो म्हणाला तुझ्या बापाने मला सारख्या हाका मारून पाठवून दिले विट्या मामाने मला एसटीत बसवून दिलं, आणि इथपर्यंत सोडायला पण आला. आईला पण आश्चर्य वाटलं की आपल्याला कोणी विठू नावाचा भाऊ नाही मग हिला आणायला कोण गेलं?
कुठे आहे तुझा विठ्या मामा!
हा काय माझ्या पाठीमागेच तर घेत होता.
तिने मागे वळून पाहिलं तर मागे कोणीच नाही, आणि समोर विठ्ठलाकडे पाहिले तेव्हा तिला त्याच्यामध्ये विट्या मामा दिसला.
हा बघ,! हा बघ!, या विठ्ठलाच्या जागी उभा आहे हाच मामा मला न्यायला आला होता.
आता विठ्या मामा म्हणजे कोण हे तिला पण कळून चुकले होते.
तिघांच्याही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
बाहेर रेडिओवर अभंग लागला होता
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा
पती लक्ष्मीचा जाणतसे
सकल जीवांचा करितो सांभाळ
तुझं मोकलील
ऐसे नाही
