संस्कार भाग -८
संस्कार भाग -८
सरुच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. गाणे गुणगुणतच ती माईंच्या बिल्डिंगच्या आवारात शिरली. रखवालदाराने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. किती वेगळी दिसत होती सरु आज! सरुने बिल्डिंगच्या लिफ्टचे बटण दाबले.
'अरे वा सरस्वती, काय छान दिसतेयस गं आज!' वर्षावैनींनी दार उघडल्या उघडल्या केलेली आपली प्रशंसा ऐकून सरु लाजलीच!
'सरस्वती,आज जरा गोंधळ झालाय. आपल्या स्वैंपाकाच्या शारदाबाईंची तब्येत अचानक बिघडली. मी भाजी करुन ठेवली आहे,तू ऐनवेळी माईंना पोळ्या किंवा भाकरी करुन वाढशील ना?'
'तुमी काय बी काळजी करू नका. मी गरम गरम करुन वाढेन.'सरु तत्परतेने म्हणाली. तोपर्यंत माई आतून बाहेर आल्या.
'अरेच्चा, ही कोण टीपटॉप बाई आहे?'
'काय वो माई तुम्ही पन!'सरु लाजून चूर झाली.
'वैनी नाश्ता केला का, नाही तर पटदिशी करुन देते.'
'अगं नाश्ता केला मी. चल मी निघू का आता?' वैनींनी घड्याळात बघत बघत पायात चपला चढवल्या.
सरुला खूप बरं वाटलं.या देवमाणसांसाठी काही तरी करण्याची तिला संधी मिळाली होती.
'माई,बसा खुर्चीवर, मी तुम्हाला गरम गरम भाकरी करुन वाढते,'सरुची लगबग बघून माई गालातल्या गालात हसल्या.आपला अंदाज सहसा चुकत नाही.
'किती सुरेख केली आहेस गं भाकरी! अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोल गरगरीत,पातळ ,पापुद्रा सुटलेली!'
माईंनी केलेली प्रशंसा ऐकून सरु लाजली.
'अहो साधी भाकरीच तर आहे.रोजच करते मग ती चांगली जमणारच ना!'
'सरु, स्वयंपाकाचं दुसरं नाव काय आहे माहितीये? पाककला! ही पण एक कलाच आहे.आपल्या देवींमधली अन्नपूर्णा ही पाककलेची देवी मानली गेली आहे.तिथं देव्हाऱ्यात तिची मूर्ती आहे बघ, मांडीवर स्वयंपाकाची पळी आहे तिच्या.घरच्या स्त्रीला अन्नपूर्णेचं स्वरूप मानतात,कुटुंबियांचं पोट भरते ना ती म्हणून! तेव्हा स्वयंपाक करणं हे हलकं काम नाही हे कायम लक्षात ठेव.'
'माई तुम्ही किती छान समजावून सांगता हो! शाळेतल्या वर्गात बाई शिकवायच्या तसंच वाटतं अगदी.'
'वाटणारच.अगं शाळेत शिक्षिका म्हणून चाळीस वर्षं नोकरी केलीय मी!'
'या बया, चाळीस वर्षं?'हनुवटीवर हात लावून सरुने आश्चर्याने विचारले.
'होय.त्या नोकरीनेच तर आम्हाला तारून नेलं.अर्थात मी पाट्या नाही हं टाकल्या! अगदी प्रामाणिकपणे मुलांना शिकवलं, संस्कार करण्याचे प्रयत्न केले, बहुतांशी यशस्वी झाले.अजूनही मुलं भेटायला येतात मला.'
'तुमी शाळेत कसं शिकवायचं त्याचं शिक्षण घेतलं हुतत?'
'आधी नव्हतं घेतलं.'आपल्या मागून येण्याची खूण करत माई त्यांच्या खोलीमध्ये आल्या.
'लग्न झालं तेव्हा एस.एस.सी.होते मी. पाच बहिणी आणि एक भाऊ होते मला. वंशाला दिवा व्हावा म्हणून वडिलांचा संसार वाढला होता.मग काय, पटापट मुलींची लग्न उरकली वडिलांनी!'
'मग पुढे काय झालं?'
'सुभाषच्या वडिलांनी गळफास लावून घेतला आणि माझा संसार उद्धवस्त झाला. मदतीला कोणीच नातेवाईक पुढे आले नाहीत. काय करावं सुचेना तेव्हा माधवकाका आणि रमाकाकूंनी मदतीचा हात पुढे केला.'देव आणि गुरूंच्या तसबिरींच्या मध्ये असलेल्या एका जोडप्याच्या फोटोकडे माईंनी बोट दाखवले. साधे शर्ट पँट घातलेले गृहस्थ आणि साडी नेसलेली स्त्री होती फोटोत. देवादिकांच्या तसबिरींमध्ये इतक्या साध्या दिसणाऱ्या जोडप्याचा फोटो?
अनेक वेळा सरुला त्या फोटोंबद्दल माईंना विचारायचा मोह झाला होता पण तिला धीर होत नव्हता.आज माई आपणहूनच त्याविषयी बोलत होत्या.
'सुभाषच्या वडिलांचे क्रियाकर्म झाले आणि सर्व नातेवाईक आपापल्या घरी परतले. पुढे काय हा प्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा होता. दोन वर्षाचं पोर होतं पदरात. काय करू? हा प्रश्न मनाला पोखरत होता आणि तेव्हाच आमचे हे शेजारी माधवकाका आणि रमाकाकू पुढे आले.
'आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस?'काकांनी विचारलं. मी काय सांगणार होते त्यांना? डोळ्यासमोर अंधार पसरलेला होता.
'हे बघ,तू एस.एस.सी.झाली आहेस, डी.एड.कर आणि शाळेत नोकरी कर.'
'पण सुभाषला कोण सांभाळेल?'
'त्याची काळजी तू नको करूस. मी आणि काकू दोघे मिळून सुभाषला सांभाळू. नाहीतरी मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत, आम्हाला पण विरंगुळा होईल आणि तुझं शिक्षणही सुरळीत पार पडेल.'
'काका काकूंनी मला दिलेला शब्द पाळला.सुभाषला व्यवस्थित सांभाळले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. आज सुभाष इतका सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्ती आहे तो केवळ काका काकूंमुळे. सुभाष हुशार विद्यार्थी होता. मेहनती होता. स्कॉलरशिपवर शिकला आणि आता एक यशस्वी उद्योजक आहे ते केवळ आणि केवळ काका काकूंमुळेच.'माई आज भरभरून बोलत होत्या.
'मग आता कुठे आहेत काका काकू?'
'देवाघरी', माईंनी वर बोट केले.'जेव्हा सुभाष पैसे कमवू लागला तेव्हा त्याने काका काकूंना विचारले, 'काय पाहिजे ते सांगा, मी सगळं करीन. तेव्हा काका काकूंनी काय मागितलं असेल?'
'जेव्हा कधी तुला दुःखी कष्टी माणसं दिसतील तेव्हा त्यांना मदत करायची.'
'एव्हढंच मागितलं त्यांनी?' सरुने आश्चर्याने विचारले.
'हो.खरं म्हणजे सुभाषचे ते जीव की प्राण होते दोघेजण. काहीही मागितले असते तरी सुभाषने त्यांच्या पायावर आणून ठेवले असते पण त्यांना कसलाही मोह नव्हता.त्यांच्या शेवटच्या दिवसात सुभाष, मी आणि वर्षा रात्रंदिवस त्यांच्या उशापायथ्याशी सेवा करायला हजर होतो पण काही उपयोग झाला नाही.'माईंनी सुस्कारा सोडला आणि काका काकूंच्या फोटोला हात जोडले. सरुनेही नकळत त्यांचे अनुकरण केले.
माई म्हणतात,देव स्वतः मुकुट घालून, हातात शस्त्र अस्त्र घेऊन येत नाही तर अशी देवस्वरुप माणसं आपल्यासाठी पाठवतो.काका काकू अगदी तसेच होते ना!
