संस्कार भाग -७
संस्कार भाग -७
संध्याकाळी वर्षावैनी घरी आल्या.आल्या आल्या त्यांनी सरुला हाक मारली आणि सरुच्या हातात एक छोटी पिशवी ठेवली.
'काय हाय वैनी यात?'
'अगं उघडून बघ की!'
सरुने पिशवी उघडली.त्यात चार पाच मंगळसूत्र आणि टिकल्यांची एक डबी होती.ज्याचे सरुला दडपण आले होते तेच सरुसमोर येऊन ठाकले होते.तिचा पडलेला चेहरा पाहून वर्षा वहिनी गालातल्या गालात हसल्या.
'का गं, काय झालं?'
'काही नाही जी.हे मी घातलं तर लोक काय म्हणतील?'
'कोण लोक?'
वर्षावैनींच्या रोखठोक प्रश्नाने सरु गोंधळली.
'हे बघ सरु,असं तुझ्या मंगळसूत्र घालण्याने लोकांना त्रास होणार आहे का?त्यांचे पैसे खर्च होणार आहेत का त्यांची तब्येत बिघडणार आहे?'
'नाही जी ',सरु गोंधळली.
'मग तुझ्या मंगळसूत्र घालण्याशी आणि टिकली लावण्याशी लोकांचा संबंध येतोच कुठे?एक लक्षात ठेव, कुठलीही वेगळी कृती करताना दोन गोष्टी स्वतःला विचारायच्या, या गोष्टीचा मला तोटा तर होणार नाही ना?दुसरी गोष्ट, माझ्या वागण्याने लोकांना त्रास तर होणार नाही ना? जर या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आली तर ती नवीन गोष्ट स्वीकारण्यास काहीच हरकत नसते.'
सरुने मान डोलावली.
' अगं आज मला चहाबिहा काही मिळणार आहे की नाही?'
' आनते जी ',म्हणत सरु लगबगीने स्वयंपाकघरात गेली.'किती छोट्या गोष्टींचा बाऊ केला जातो अजूनही आपल्या समाजात! वर्षावैनींना वाटले.
'शोभे, काय आनलंय बघ माझ्यासाठी वर्षावैनींनी ',सरुने पिशवी शोभापुढे केली.
'लै छान हैत की मंगळसूत्रं ,एक एक करून शोभीनं ती बाहेर काढून निरखायला लागली.
'वर्षावैनींचा चॉईस चांगलाच आहे.'शोभीची ती प्रतिक्रिया बघून सरु थक्कच झाली.
'अगं, माझ्यासाठी आणलीत त्यांनी ', माझ्यासाठी वर जोर देत सरु म्हणाली.
'मंग? मला म्हाईतीये.'शोभी सहजपणे म्हणाली.
'अवं सरुबाय,इथं चालतंया समदं.आनि कुनाला वेळच नाही कुनी काय घातलंय त्ये बघायला.समदे धावतच असतात उठल्यापासून.कोन काय करतंय, अंगावर काय घातलंय कुनालाबी वेळच नाही अशा गोष्टींमध्ये लक्ष घालायला.बिनधास्त घाला आणि टिकली लावा.काई हुत न्हाई.आनि त्यो डोईवर पदर न घेता छान पिनप करा म्हणजे लोकांना लक्षात येणार नाही तुम्ही बाहेर गावाहून आलात म्हणून.लोकांना म्हणजे वंगाळ लोकांना ',शोभीनं खुलासा केला.
सरुच्या मनातील गोंधळ अजून दूर झाला नव्हता.तिला स्वतः ला इतकं बदलावं लागेल याची कधी कल्पनाच केली नव्हती.
ज्ञाना लवकर जेवून खोलीच्या कोपऱ्यात बसून गृहपाठ पूर्ण करत होता.शीतल बाजूला बसून खेळत होती.उमेश,शोभी आणि सरु जेवायला बसले होते.
'आजची भाजी दादांना फार आवडली बरं का! फक्त जास्त तिखट आहे म्हणत होते.
'ते तुमची डब्यातली भाजी खातात?'सरुने आश्चर्याने विचारले.
'हां आम्ही सारे कामगार,आफिसर आणि दादा... एकत्रच जेवायला बसतो रोज.हां पण जर दादांना मिटींग असेल, भेटायला कोणी पाहुणे आले असतील तर ते नसतात आमच्यात.पण इतर वेळी आमच्या बरोबर असतात.वैनी मात्र वेगळ्या जेवायला
बसतात.त्यांचं पथ्य असतं म्हणून.दादा जेवायची वेळ पाळतात.म्हणतात, आपण कमावतो कशासाठी? पोटासाठी ना?मग त्याचे हाल झाले तर काय उपयोग?'
'यांचा आधीचा मालक लैच खडूस होता.काहीतरी कारण काढून पैसे कापायचा.दुपारचे चार वाजले तरी जेवायला भेटायचं नाही.मग तब्येत खराब झाली. पण मालकाला त्याचं काय बी वाटायचं नाही.मग दादांचं काम गावलं तशी ती नोकरी सोडून दिली.दादांकडे काम करायला पुण्य लागतं. लोकं त्यांच्याकडे काम करायला मिळेल का अशी वाट बघत असतात.हां मात्र कामात टाळाटाळ केली तर लगेच नारळ मिळतो हातात!'उमेश दादांचं कौतुक करण्यास थकत नव्हता.
ज्ञाना कोपऱ्यात अभ्यास करताना दादांचं कामगारांशी कसे वागतात हे लक्ष देऊन ऐकत होता.
'मी मोठ्ठा झालो की असाच वागेन ',ज्ञाना मनाशी म्हणाला.
नुसत्या भाषणबाजीने माणसांवर संस्कार होत नसतात.आपलं जर आदर्श वर्तन असेल तर आपोआपच तसे संस्कार होत रहातात.
सकाळी सरुने थरथरत्या हाताने गळ्यात मंगळसूत्र घातलं, टिकली लावली.लगेच चेहऱ्यावरचा भकासपणा जाऊन तो टवटवीत दिसू लागला.पाचवारी साडी पिनप करायला शोभीनं मदत केली.
'किती छान दिसताय सरुबाई आता!अशाच टापटीप -हात जावा.अवं नीटनेटकं राहिल्यानं आपलं मन बी प्रसन्न रहातं.'
शोभीचं म्हणणं सरुला पटलं.नुसता थोडाफार फरक केला रहाणीत तर किती छान वाटतंय!
शोभीनं शीतलला शेजारच्या मावशींकडे ठेवलं.ज्ञाना अभ्यास करत होता.'ज्ञाना, तुझ्या शाळेची वेळ झाली की नीट कुलूप लावून चाबी शेजारच्या मावशींकडे ठेव आणि जा ',दोघींनी ज्ञानाला बजावले आणि त्या निघाल्या.शोभीचं हॉस्पिटल विरुद्ध दिशेला होतं.तिने सरुबाईचा निरोप घेतला आणि ती चालू लागली.
आज सरु नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती.मुळातच ठसठशीत रुप असलेली सरु आज आणखीनच सुंदर दिसत होती.
तो दाढीवाला समोरुन येत होता.तोंडात पान, कुठलेतरी गाणे गुणगुणत होता.सरुचं हृदय भीतीने बंद पडतंय की काय असं तिला वाटू लागलं पण माईंची सूचना तिला आठवली आणि ती अचानक रस्त्यावर उभी राहिली.तिच्या या अनपेक्षित कृतीने तो दाढीवाला बावचळला.सरु त्याच्याकडे रोखून बघत राहिली तशी तो तिथून पटपट निघून गेला.सरु मनाशी हळूच हसली.'किती साधी गोष्ट आहे ही,आपण उगाचच घाबरत होतो ', आणि ती चटचट माईंकडे निघाली.आज तिला सुद्धा छान पैकी गाणं गुणगुणावसं वाटत होतं.
'मी आज फूल झाले ', सरु गुणगुणू लागली.
