STORYMIRROR

Pratibha Tarabadkar

Abstract Inspirational

4  

Pratibha Tarabadkar

Abstract Inspirational

छंद

छंद

2 mins
2

       वाटेत मैत्रीण भेटली आणि कोपऱ्यात उभ्या राहून आमच्या गप्पा सुरू झाल्या. रस्त्यावर नेहमीप्रमाणेच भरपूर गर्दी होती आणि येताजाता माणसं आमच्याकडे त्रासिक कटाक्ष टाकत जात होती पण आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत गप्पा चालूच ठेवल्या होत्या. 'अय्या, अगं मीना तू? 'माझ्या मैत्रिणीला बघून तिची मैत्रीण जाता जाता थबकली आणि गप्पांमध्ये व्यत्यय आल्यामुळे कपाळावर पडलेल्या आठ्यांना कसोशीने लपवत मीनाने माझी आपल्या मैत्रिणीशी ओळख करून दिली. 'ही प्रतिभा, ही लिखाण करते! ' माझी अशी ओळख करून दिल्याने गोरीमोरी होत मी म्हटलं, 'अधूनमधून काहीबाही लिहीते झालं! ' 'तुम्ही लेखिका आहात का? तुम्हाला किती पैसे मिळतात लिहील्याबद्दल?तुमचा मोबदला कसा मिळतो? प्रत्येक शब्दावर पैसे ठरलेले असतात की वाक्यावर?' बंदुकीतून सटासट गोळ्या सुटाव्यात तसे त्या भोचक मैत्रीण नंबर दोनचे प्रश्न येऊन आदळत होते.मी तर अगदी भांबावून गेले. अरेच्चा असा विचार तर मी कधी केलाच नव्हता 🤔 मनपटलावर एखादा विचार आला की डोळ्यासमोर शब्द उत्स्फूर्तपणे नाचू लागतात. भावना मनात उचंबळू लागतात आणि कधी एकदा त्या भावनांना शब्दरुपाने प्रकट करू असे होते आणि उत्साहाने लेखणी सळसळू लागते. बघता बघता त्या विचारांना मूर्त स्वरूप येते. पण.... या सगळ्या घडामोडींमध्ये पैशाचा विचार आपल्या मनात कधीच कसा काय आला नाही? आपल्या उत्कट भावनांना मूर्त स्वरूप देताना हे सारे व्यावहारिक विचार बाजूला पडले! मिळाला तो केवळ आनंद, परमानंद! भावोत्कट समाधान! ध्यान, समाधी म्हणतात ती हीच का? माणसाला एखादा तरी छंद असावा असे म्हणतात ते याचसाठी का? आपले ताणतणाव, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थान, शारीरिक व्याधी विसरून, देहभान हरपून, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केलेली कृती म्हणजेच छंद का? या विचारमंथनातून मला सुचलेली कविता ...... छंद छंद म्हणजे छंद म्हणजे छंद असतो पैशांचा आणि त्याचा काही संबंध नसतो कोणी काव्यात रंगतो तर कोणी भजनात दंगतो कोणी गडकिल्ले चढतो तर कोणी पुस्तकात गढतो कोणी संगीतात डुंबतो तर कोणी जंगलं धुंडतो कोणी रांगोळीत रमतो तर कोणी चित्रात गुंततो कोणी वाद्यात रमतो तर कुणी रंगात डुंबतो मुशाफिरीत कुणी देशोदेशी हिंडतो तर कोणी बागकामात रमतो प्रत्येकाचा छंद आगळा, प्रत्येकाचा मोद वेगळा जीवनाचा सूरताल छंदानेच गवसतो सगळा! नाही फायदा तोट्याचा सौदा नाही पैशाची मोजदाद फक्त आपुलीच आपल्याला दाद छंदाचे नसते कसलेच मोजमाप काळ, व्यवहार याला देतो काट लोक ओढतील ताशेरे दुर्लक्ष करावे सारे छंदाविना जीवन जगणे जळाविना मत्स्याचे जगणे! छंद म्हणजे छंद म्हणजे छंद असतो पैशांचा आणि त्याचा काही संबंध नसतो कोणी म्हणे छांदिष्ट कोणी म्हणे खूळ पण हेच तर असतं आमच्या आनंदाचं मूळ छंद म्हणजे सुखी माणसाचा सदरा असतो तो चढवला की दुःख विवंचना विसरायला लावतो आणि म्हणूनच तो आमचा आत्मानंद असतो छंद म्हणजे छंद म्हणजे छंद असतो पैशांचा आणि त्याचा काही संबंध नसतो प्रतिभा ताराबादकर


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract