STORYMIRROR

Pratibha Tarabadkar

Inspirational

3  

Pratibha Tarabadkar

Inspirational

संस्कार भाग -९

संस्कार भाग -९

5 mins
19

  'सरुबाई, मला तुमाला काय तरी सांगायचंय ',शोभी चाचरत म्हणाली. रात्रीचं जेवण उरकून भांडी पण घासून झाली होती.आता थोडा वेळ टि.व्ही.बघायचा आणि मग अंथरुणं टाकून निजायचं हा रोजचा क्रम होता. त्याप्रमाणेच सगळं शिस्तीत चाललं होतं.मग इतक्या हळू आवाजात,घाबरत घाबरत शोभी काय सांगतेय? सरुला आश्चर्य वाटलं.'काय झालं गं शोभे?'

    'मला आधी वचन द्या, तुम्ही ज्ञानाला रागावणार नाही, मारणार नाही म्हणून!'

   सरुच्या मनात एकदम चर्र झालं.एव्हढं काय झालं आज? ज्ञानानं काय केलंय असं? सरुने शोभीचा हात धरला.

    'शोभे, ज्ञानानं काय केलंय लवकर सांग, माझं हृदय धडधडायला लागलंय ',सरु कापऱ्या आवाजात म्हणाली. ज्ञाना निवांत टि.व्ही.बघत बसला होता.त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते.

     'सरुबाई,ज्ञाना शाळेच्या वेळेला दप्तर घेऊन बाहेर पडतो पण अर्ध्या एक तासात परत येतो.शेजारच्या मावशींकडे हल्ली चाबी ठेवत नाही.घर उघडून दिवसभर टी.व्ही.बघत बसतो.मावशींनी दोन तीन दिवस त्याच्याकडे लक्ष ठेवलं आणि आज मला सांगितलं. म्हणून मी तुमच्या कानावर घातलं.'

   शोभीच्या खुलाशानं सरुचे हात पाय गार पडले.असा का वागायला लागला ज्ञाना अचानक? त्याला तर शाळा लैच आवडते.मग?

     शोभीनं उमेशला आत बोलावले आणि त्याच्याही कानावर ज्ञानाचं वागणं घातलं.उमेश या अनपेक्षित बातमीने आश्चर्यचकित झाला.काय झालंय ज्ञानाला असं अचानक?

    तिघेही बाहेरच्या खोलीत आले.प्रथम उमेशने टि.व्ही.बंद केला.ज्ञानाने आश्चर्याने उमेशकाकाकडे पाहिले.

    'ज्ञाना,शाळा कशी चाललीये? अभ्यास चांगला चालू आहे ना?'

    'व्हय काका, मस्त हाय शाळा!'ज्ञाना उत्तरला.

   ज्ञाना खोटं सुद्धा बोलायला लागला? तिघेही अस्वस्थ झाले.

    'ज्ञाना खोटं बी बोलाय लागलास तू?' सरुचा आवाज तिच्या नकळत वाढला.

     'ज्ञाना तू का बरं शाळेला जात न्हाईस बाबा?' शोभीनं कळवळून विचारले पण ज्ञाना ओठ आवळून ढिम्म बसून राहिला.त्याने हूं की चूं केले नाही. तिघांनीही त्याला खोदून खोदून विचारले पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

     'तू काही सांगत नाहीस तर मी शाळेत जाऊन विचारतो ',असे उमेशने म्हटल्यावर 'नको नको काका, शाळेत नको जाऊस म्हणत ज्ञानानं गळाच काढला.

     काय करावं आता? सारेजण चिंतेत पडले.

ज्ञाना दिवसभर एकटा घरी रहातो या चिंतेने सरुला उद्या माईंकडे जायचं की नाही या विचाराने ग्रासले.

   'सरुवैनी तुमी चिंता करू नका.मी दादा माईंशी बोलून घेतो आताच 'म्हणत उमेश मोबाईल वर फोन करायला लागला.

   'भाऊजी, इतक्या रात्री.... त्यांना राग नाही येणार?'

    'नाही.काहीतरी कारण असल्याशिवाय मी त्यांना फोन करणार नाही हे माहितीये त्यांना!'

     'हॅलो, दादा...असं म्हणत उमेश घराबाहेर गेला आणि दादांशी बोलू लागला.

     'उद्या ज्ञानाला घेऊन सरुवैनी तुम्ही जरा लवकरच दादांकडे जा.'

    'न्हाई, म्या न्हाई जानार ', ज्ञाना ओरडला. 'दादा मारत्याल माला.'

    'न्हाई रं पोरा, तुला कशाला मारतील?' उमेश ज्ञानाला प्रेमानं जवळ घेत म्हणाला.

     सकाळी जरा लवकर आवरून सरु ज्ञानाला घेऊन दादांकडे जायला निघाली.

    'आये,दादा मारतील मला? म्या शाळंला जात न्हाई म्हनून?'

     'न्हाय रं माज्या लेकरा, तुला शाळा इतकी आवडायची,आभ्यास करायला आवडायचं मंग अचानक तू जाईनासा झालास,आमाला काई सांगत भी न्हाईस मंग काय करायचं सांग!'सरुने सुस्कारा सोडला.

    ज्ञाना आज पहिल्यांदाच दादांकडे येत होता.ती भलीमोठी बिल्डिंग, लिफ्ट... सारेच त्याला नवीन होते. डोळे विस्फारून तो सगळीकडे भिरीभिरी पहात होता.

     'मोठ्ठा झालो की मी भी अशाच बिडलिंग मध्ये राहीन.'त्याने मनाशी ठरवले.

सरुने बेल वाजवली.दारात माई होत्या.

    'अरे वा,हा ज्ञानेश्वर वाटतं. चांगला उंच आहे की!'

   ज्ञाना बावचळून उभा राहिला होता. सरुने त्याला खूण केली तशी तो माईंच्या पाया पडला.

     'अरे सुभाष, ज्ञानेश्वर आलाय बघ ', माईंनी आता बघून हाक मारली.

    'आलो आलो करत सुभाषदादा केस पुसत बाहेर आले. ज्ञाना त्यांच्याकडे बघतच राहिला.प्रचंड आवडले दादा त्याला.उंच धिप्पाड,त्यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर.....म्या मोठ्ठा झालो की दादांवाणीच होणार तो स्वतःशीच पुटपुटला.

     'काय ज्ञानेश्वर, कशी वाटली मुंबई तुम्हाला?'सोफ्यावर बसत दादांनी त्याला शेजारी बसवत विचारले. तेव्हढ्यात शारदाबाईंनी एका प्लेटमध्ये कांदेपोहे आणि वाटीत लाडू आणला ज्ञानासाठी.

     'नगं मला,' ज्ञाना संकोचून म्हणाला.

    'अरे खावं प्यावं या वयात.वाढीचं वय आहे तुझं ',माई म्हणाल्या आणि सरुला त्यांनी आत येण्याची खूण केली.

    ज्ञाना लाजत लाजत खाऊ लागला.खाऊन, पाणी पिऊन तो ताजातवाना झाला.आतापर्यंत त्याची भीड जरा चेपली होती.दादा त्याच्याशेजारी शीळ घालत तिरक्या नजरेने न्याहाळत होते.

    'ज्ञानेश्वर, खूप हुशार आहेस म्हणतो तुझा उमेशकाका!'

    ज्ञाना आपली स्तुती ऐकून लाजला.

न्हेमी पैला नंबर येतो माजा ',ज्ञाना म्हणाला.

     'अरे वा मस्तच की!'दादा त्याची पाठ थोपटत म्हणाले.

'माजे गुर्जी न्हेमी म्हणायचे, ज्ञाना हपिसर हुनार म्हनून!'

     'अरे वा क्या बात है ज्ञानेश्वर,मग मुंबईत सुद्धा तुझं नाव गाजलं पाहिजे बरं का!'

त्याबरोबर ज्ञाना गंभीर झाला.त्याने मान खाली घातली.त्याच्या नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

     'ओह कमॉन ज्ञानेश्वर, असं रडण्याने प्रश्न सुटतात का? '

     'दादा मला सर्व्या प्रश्नांची उत्तरं येत्यात.म्या हात वरती केला की वर्गातली पोरं हसत्यात,घाटी घाटी म्हनून चिडवत्यात. माला न्हाई शाळेला जायाचं ' ज्ञाना स्फुंदून स्फुंदून रडू लागला.दादा थोडा वेळ स्तब्धच बसले.काय हे, एका होतकरू, हुशार विद्यार्थ्याला केवळ त्याच्या बोलण्याच्या ढंगावरून त्याला नाउमेद करावं?

    'काय रे ज्ञानेश्वर,तुमचे सर ओरडत नाहीत का त्या मुलांना?'

     'ओरडत्यात पण ती मुलं ऐकतच नाहीत गुर्जींचं! लैच टारगट हैत.'

    दादांना ज्ञानाचं हे शाळेत न जाण्याचं कारण अगदीच अनपेक्षित होतं.त्यांनी ज्ञानाची ही समस्या वेगळ्या पद्धतीने हाताळायची ठरवली.

      'हे बघ ज्ञानेश्वर,आपण का बरं बोलतो? बोलण्याचं उद्दीष्ट काय आहे?'

    'लोकांशी संपर्क साधन्यासाटी ', ज्ञानानं पटकन उत्तर दिले. खरंच हुशार आहे पोरगं, दादांनी मनातल्या मनात ज्ञानाची पाठ थोपटली.

     'अरे,आपली ही मराठी भाषा आहे ना,ती प्रत्येक बारा कोसांवर बदलते असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे शब्द,हेल काढून बोलले जाते.उदाहरणार्थ कोकणात वेगळ्या प्रकारे तर विदर्भात वेगळी,मराठवाड्यात वेगळी तर खानदेशी भाषा.... सगळ्याच मराठीत बोलल्या जातात फक्त ढंग वेगळा. मात्र परीक्षेत प्रमाण भाषा लिहावी लागते. समज तुझा पेपर कोकणातील शिक्षकांकडे तपासायला गेला तर त्यांना तपासायला अडचण येईल म्हणून एकच प्रमाण भाषा लेखी परीक्षेत वापरावी लागते. 

त्या मुंबईच्या मुलांना कदाचित तुझी भाषा वेगळी वाटत असेल.पण म्हणून त्यांनी तुझी टिंगल केली तर ते चुकीचं आहे.'

      'म्हणूनच माला मुंबईच्या शाळेत जाऊ न्हाई वाटतं.'

      'अरे या कारणामुळे शाळेतच जायचं नाही हे चुकीचं आहे.'

    'तू शाळेत कशासाठी जातोस? शिकायला की मुलांकडे लक्ष द्यायला?'

    'शिकायला'

    'जर शिकायला जात असशील तर एक काम करायचं, तुझी परीक्षा कधी आहे?'

    'पुढच्या आठवड्यात सुरू होनार!'

     'मग असा जोरदार अभ्यास कर, असे दणदणीत मार्कं मिळव की त्या चिडवणाऱ्या मुलांची बोलतीच बंद होईल.'

     'हां, मी खूप खूप अभ्यास करेन.दादा मला तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय....'ज्ञाना पटकन बोलून गेला आणि मग लाजला. दादांनी हसत हसत त्याच्या पाठीवर थाप मारली.

     'बघ हं मला वचन दिलं आहेस,चांगला अभ्यास करून मार्कं मिळवणार म्हणून.पेपर मिळाले की दाखवायला आण.'

     'नक्की दादा.'ज्ञानाला दादांशी बोलून आत्मविश्वास वाढला होता.खूप खूप अभ्यास करायचा, मोठ्ठं व्हायचं, अगदी दादांसारखं ',त्याचा विचार अधिकच पक्का झाला होता.

     'आये, मी एकलाच जाईन घरला. माला रस्ता कळलाय.आनि शाळंला पण जाईन ', ज्ञानानं सरुला सांगितलं आणि तो मान ताठ करून दादांच्या घरातून बाहेर पडला.

     'सरुताई, उमेश, शाळेच्या शिक्षकांच्या कानावर घाला,मुलं ज्ञानेश्वरला त्रास देत आहेत, जरा लक्ष ठेवा म्हणून!'चला उमेशराव,आज ऑफिसला जायचंय की नाही? अगं वर्षा...'

    'आले आले ',करत वर्षावैनींनी लगबगीने पायात चपला घातल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational