संस्कार भाग -५
संस्कार भाग -५


'अवो सरुबाई किती काम करताय कवाधरनं.आता थोडं बसा. जायचं आहे ना माईंकडं कामाला आजपासून?'शोभीनं सरुच्या हातातील भांडी काढून घेतली.'आधी ज्ञानाला उठवा.त्याचीबी आजपासून शाळा हाय न्हवं.'
'आताच उठीवते त्याला.'सरु ज्ञानाला उठवू लागली.आज तिला काय करू अन् काय नको असं झालं होतं.दहाच्या आत माईंकडं पोहोचायचं होतं.उमेश आज लवकर दादांकडे जाणार असल्याने सरुला एकटीलाच तिथे जायचं होतं. उमेशने तिच्याकडून पत्ता घोटून घोटून पाठ करून घेतला होता.उमेश दादा वैनींना कारने फॅक्टरीत नेत असे आणि फॅक्टरीतही काम करीत असे त्यामुळे त्याला दरमहा घसघशीत कमाई होत होती.
'ज्ञाना,नीट जाशील न्हवं शाळेला?जी पुस्तकं गावावरुन आनलीत ती समदी घिऊन जा.'ज्ञानाने मान डोलावली.त्यालासुद्धा नवी शाळा,नवे सर, नवीन मुलं कसे असतील या विचाराने बाकबुक होत होतं.
सरुने डोक्यावरून पदर घेतला आणि चटाचटा पाय उचलू लागली.काल माईंकडं जाताना रस्त्याच्या खुणा तिने लक्षात ठेवल्या होत्या.दादांच्या टॉवरपाशी ती आली आणि थबकली. रखवालदाराने आपल्याला अडवलं तर! पण त्याने तिला काहीच विचारले नाही,उलट लिफ्टमधून कसं वर जायचं ते सांगितलं. सरुने घाबरतच आठ नंबरचं बटण दाबलं आणि लिफ्ट चालू झाली.
धडधडत्या हृदयाने सरुने दादांचे दार वाजवले. दार सावकाशपणे उघडले. दारात माई उभ्या होत्या.त्यांनी तिला न्याहाळले आणि मानेनेच आत येण्याची खूण केली. सरु त्यांच्या मागोमाग चालू लागली. त्या घराच्या आतील भागात तिला घेऊन गेल्या. 'बया, केव्हढं मोठ्ठं घर ', हनुवटीला हात लावून ती नकळत म्हणाली. माई किंचित हसल्या. एका खोलीत तिला घेऊन गेल्या. 'ही माझी खोली '.
खोलीत सगळ्या भिंती देवांच्या, गुरूंच्या तसबिरींनी भरून गेलेल्या होत्या.सरुची नजर भिंतींवर भिरभिरत होती. श्रीराम, शंकर, विष्णू,कुठले कुठले महाराज.... तिला दोन तीन गुरु ओळखू आले. फारच देवभक्त दिसत होत्या माई.सरुच्या आता लक्षात आले, माईंच्या गळ्यात रुद्राक्षाची ठसठशीत माळ दिसत होती. माई पलंगावर बसल्या.
'देवावर विश्वास आहे की नाही तुझा?' त्यांनी अचानक विचारले.
'आदी होता पण आता नाई ',सरु कडवटपणे म्हणाली.
'का?'
'काय चांगलं केलंय द्येवानं माजं, एवढ्या ल्हान वयात माजा धनी काडून घेऊन ग्येला.'
'देवानं नेला नाही, त्याचा देवावरचा भरोसा कमी पडला म्हणून त्यानं आशा सोडली.'
'म्हंजे?'
'जसे तू आणि ज्ञानेश्वर दोघंजण गावाहून एका रात्रीत निसटून आलात तसे तिघेजण येऊ शकला असता '.
'व्हय, खरं म्हनताय तुमी.' सरु म्हणाली.
'देव स्वतः मुकुट, हातात शस्त्र, अस्त्र घालून आपल्या भक्तांसाठी धावून येत नाही तर कोणाला तरी पाठवतो. तुझ्या गावातल्या नवऱ्याच्या मित्राने जीव धोक्यात घालून तुम्हाला मुंबईत पाठवलं, उमेश शोभानं आपलेपणाने ठेवून घेतलं म्हणजे ते एकप्रकारे देवदूतच नव्हेत का?'
'व्हय जी,' सरु उत्स्फूर्तपणे म्हणाली. 'देवासारखे धावून आले आमचं रक्षण करायला.'
'म्हणूनच देवावरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नकोस.'
'बरं आता मला नाश्ता वाढून आण. तुला स्वयंपाकघर दाखवते. माईंच्या मागोमाग सरु चालू लागली. वाटेत दोन्ही बाजूला खोल्या होत्या.
'अजून कोण कोण रहातं घरात? दादां वैनींची लेकरंबाळं?' सरुची भीड बरीच चेपली होती.
>
'नाही. दादाला मूलबाळ नाही. 'माई तुटकपणे म्हणाल्या. त्यांना या विषयावर उगाच विचारलं असं सरुला वाटलं.
रस्त्याच्या कडेला रहाणाऱ्यांना ढीगभर पोरं हुत्यात आन् हिकडं मात्र....
माईंनी तिला स्वयंपाकघरात त्यांचा नाश्ता कुठे ठेवला असतो, चहा,साखरेचे डबे,जेवणाचे पदार्थ सारे दाखवून ठेवले. सरु सारे मनापासून आत्मसात करत होती. अतिशय प्रामाणिक स्वभाव होता तिचा. उगाच कामाची अळं टळं करणं, गप्पा मारत टाईमपास करणं असल्या गोष्टी तिच्या स्वभावातच नव्हत्या.
'तुला लिहीता वाचता येतं?' माईंनी अचानक अनपेक्षित प्रश्न विचारला.
'व्हय जी, मी सातवी पास हाय.'
'अरे वा, बरंच झालं की! मला रोज वेगवेगळे ग्रंथ वाचून दाखवत जा'.
'बापरे, मला जमंल?'
' का नाही जमणार? कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायचा नाही. मला जमेल असंच म्हणायचं. मग ते जमतं '.
'मास्तरीणबाईच वाटत्यात! 'सरु स्वतः शीच म्हणाली. पण आदल्या दिवशी जेव्हढ्या कडक वाटल्या होत्या तेव्हढ्या नाहीत.आनि काय चांगलं चांगलं सांगत्यात.खरंच उमेशभाऊजी म्हणत्यात तशाच आहेत माई.
'काय गं ज्ञानेश्वर गेला का शाळेत?'
'व्हय जी,आज पहिला दिवस आहे त्याचा .लैच खूष हाय त्यो.'
अशाच गप्पा झाल्या, सरुने त्यांना नाश्ता, जेवण वाढून दिले, चुकतमाकत धार्मिक ग्रंथातील काही भाग वाचून दाखवला तोवर संध्याकाळ झाली. वैनी घरी आल्या.
'कसा झाला आजचा पहिला दिवस?' त्यांनी हसत हसत विचारले.
'छान' माईंनी एका शब्दात उत्तर दिले.
'सरु मला छानपैकी एक कप चहा करून आण बघू '.
'आणते जी ',सरु तत्परतेने म्हणाली.
'हिला सरु न म्हणता सरस्वती म्हणायचं. इतकं छान देवीचं नाव ठेवलंय मग त्याचा अपभ्रंश कशाला करायचा? हो की नाही सरस्वती?'
काहीच न कळल्याने तिने नुसती मान डोलावली.
ती चहा करत असताना वैनी आत आल्या.
'आज ज्ञानेश्वरचा शाळेतला पहिला दिवस आहे ना?'
'तुला घरी जावंसं वाटत असेल ना?'
काहीच न बोलता सरुने मान डोलावली.
'आता मी आले आहे ना,तू जा घरी.'वैनींनी परवानगी दिली तसे सरुचे डोळे भरून आले.
'किती चांगली हायसा तुमी सगळेजनं '
'हां पण तेव्हढेच कडक पण आहोत बरं का! जर कामचुकारपणा केला, काही आगळीक केली तर खपवूनही घेत नाही आम्ही!' वैनींनी हसत हसत पण स्वतः ची अट ठामपणे सांगितली.
'न्हाई जी, मी कधीच असं वागणार न्हाई.तुमी निश्चिंत -हावा.' सरुने वैनींना आश्वस्त केले.
'आम्हाला उमेशने तुझ्याबद्दल सांगितलं आहेच. पण आपलं खुंटा बळकट करुन घ्यावा म्हटलं 'वैनी हसत हसत म्हणाल्या.
सोज्वळ दिसणाऱ्या वैनीसाब सरुला खूपच आवडल्या. हां,पण त्यांनी ताकीदच दिली आहे, नुसतं वैनी म्हणायचं. वैनीसाब नाही. सरु खुद्कन हसली. तिने माईंचा निरोप घेतला. उद्या नक्की याच वेळेस यायचं असं माईंनी बजावलं.आणि सरु निघाली घरी यायला.
ज्ञानाच्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला असेल या विचाराने तिची पावलं चटचट घराच्या दिशेने चालू लागली.