संस्कार भाग -४
संस्कार भाग -४
उमेश कामाचं स्वरूप सरुला सांगू लागला.
'आमचे सुभाषभाऊ आहेत ना त्यांच्या आई...माई म्हनत्यात त्यांना,माईंना दिवसभर सोबत करायची.'
'बास? येवढंच काम?'सरुने आश्चर्याने विचारले.
'व्हय.साठीच्या हायेत त्या.एक म्हैन्यापूर्वी बाथरुममधी घसरुन पडल्या.फार काय लागलं न्हाई पर एकट्याच घरी होत्या.तवापासून आमचे दादा वैनी घाबरत्यात त्यांना घरात एकटं सोडायला.'
'घरी कुनी नसतं का त्यांच्या?'
'न्हाई,दादा वैनी बिजनेससाठी दिवसभर अॉफिसमधी असत्यात.वैनी संध्याकाळी लवकर घरी येत्यात पण दिवसभर माई एकट्याच म्हनून कोणीतरी विश्वासाचं माणूस घरात हवंय त्यांना '.
'सरुबाई अजाबात ईच्यार करु नका.लै चांगली मान्सं हैसा ती.'शोभा म्हणाली.
'मी करीन काम.'सरु म्हणाली.
'मंग उद्या धा वाजता तैय्यार -हावा'.उमेश म्हणाला.
'आनि म्या एकटा घरी -हाऊन काय करू?' ज्ञानाने भेदरलेल्या नजरेने रडवेल्या स्वरात विचारले.
'मी खाते व्हय रं तुला?' शोभीनं हलकासा धपाटा घातला.'मला आज साप्ताहिक सुट्टी आहे.'
'अरे, तुजं सांगायचं विसरूनच गेलो. जवळच्या मराठी शाळेत चौकशी करून आलोय. तिथल्या हेडमास्तरांशी बोललो. वैनी तुमी त्याची समदी कागदपत्र आनलीया न्हवं?'
'व्हय.समदी आनलीत.'
'हेडमास्तरांना म्हनलं, घाईघाईत गाव सोडावं लागलं. शाळेत दाखल करुन घ्याल का तर लगेच राजी झाले. मराठी शाळेत हल्ली कोणी जायला मागत नाही म्हनत हुते.मग ज्ञाना जाशील ना शाळेत? खूप शिक आन् मोठ्ठा हो.आमच्या दादांसारखा.'
ज्ञानाने न बोलता मान डोलावली.
'दादा म्हनजे तुमचे सायेब?'
'व्हय. त्येच.पन त्यांना सायेब म्हनलेलं आवडत नाही.दादाच म्हनायचं अशी सक्त ताकीदच आहे त्यांची. देवमानूस हाय आमचा दादा ',उमेशने डोळे मिटून चक्क हात जोडले.
ज्याच्या नुसत्या उल्लेखाने हात आपोआप जोडले जातात अशी माणसं आहेत या जगात? इतक्या पराकोटीच्या वाईट माणसांचे अनुभव घेतलेल्या सरुला नवल वाटले.
'वैनी, आधी मी तुम्हाला दादांच्या घरी घेऊन जातो.मग परत येऊन ज्ञानाला शाळेत घेऊन जातो.ज्ञाना तयार रहा.ज्ञानाने खुशीने मान हलवली.
उमेश आणि सरु दादांकडे जायला निघाले. शोभाला आज साप्ताहिक सुट्टी असल्याने ती घरीच होती.सरु आणि उमेश समतानगरमधून बाहेर आले.रस्ता तुडुंब गर्दीने ओसंडून वाहत होता पण सरुला आज त्याचे नवल वाटले नाही.सगळ्या गोष्टींची सवय होते हेच खरे.
'या बया केव्हढ्या मोठ्या इमारती! सरु आजूबाजूच्या टॉवर्स कडे डोळे विस्फारून बघू लागली. इकडे बघू की तिकडे बघू असं तिला झालं.
'वैनी चटाचटा पाय उचला, उशीर झालेला आवडत नाही त्यांना. नियमाचे लै कडक आहेत ते.'
सरु भानावर आली आणि उमेशच्या मागून भराभर चालू लागली.आठ दहा इमारती ओलांडून एका मोठ्ठ्या टॉवरच्या आवारात उमेशने प्रवेश केला.खाली प्रवेशद्वाराशी गणवेशातील रखवालदार बसला होता. त्याने वहीत नोंद केली आणि ती दोघं लिफ्ट पाशी आली.
लिफ्ट पाशी आल्यावर सरु घाबरलीच पण उमेश बरोबर असल्याने ती लिफ्टमध्ये शिरली.
अतिशय सुंदर सजवलेल्या दाराची बेल उमेशने वाजवली.दोन मिनिटात दार उघडले गेले.दारात उभे असलेले दादा असावेत बहुतेक.काळ्यापांढऱ्या केसांचे, उंचेपुरे, हसतमुख दादा.त्यांचे लक्ष बावरुन उभ्या असलेल्या सरुकडे गेले.दारातून बाजूला होत त्यांनी हाक मारली
'माई, वर्षा बाहेर या.'
सरु विस्फारलेल्या नजरेने घर न्याहाळत होती.बाबौ किती मोठं घर.लैच झ्याक.आसं घर आपल्या समद्या गावात बघायला मिळायचं नाही.
चालण्याचा आवाज ऐकून ती भानावर आली.
समोर एक वयस्कर आणि एक चाळीशीची अशा दोन बायका उभ्या होत्या.वयस्कर बाईची नजर इतकी तीक्ष्ण होती की जणू काही आरपार जात होती. उमेशभावोजी म्हणत होते त्या माई याच असाव्यात.मध्यम वयाची स्त्री मात्र हसतमुख होती. वयस्कर बाईने खुर्चीकडे बोट दाखवून तिला बसण्याचा इशारा केला.
'नाव काय तुझं? माईंनी खणखणीत आवाजात विचारले.
'जी सरु',सरु चाचरत म्हणाली.
'सरु म्हणजे सरस्वती नाव आहे ना तुझं?'
'व्हय जी पन् समदे सरुच म्हनत्यात.'
'आमच्याकडच्या कामाचं स्वरूप उमेशभाऊंनी सांगितलं असेलच ',आता बोलण्याचा ताबा वर्षावैनींनी घेतला.
'व्हय जी.माईंना काय हवं नको पहायचं.'
'आम्ही दोघं दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो म्हणून माईंना सोबत करायची. त्यांची काळजी घ्यायची.'
'मला काय धाड भरलीये काळजी घ्यायला ',माई फणकारल्या.
'माई,वर्षा बोलते आहे ना मग तू लक्ष घालू नकोस.'
सरु खुद्कन हसली. एव्हढ्या मोठ्ठ्या घरातबी सासू सुनेची फुणफुण हायेच.
'पगाराचं काय? तुझी काय अपेक्षा आहे?'
सरु या अनपेक्षित प्रश्नाने गोंधळली.तिने उमेशकडे पाहिले.
'वैनी तुमच्या मनाला काय योग्य वाटेल ते द्या.'उमेश म्हणाला.
'महिन्याला पंधरा हजार ठीक आहेत? माईंना काम पटलं तर अजून वाढवता येईल.'
'पंधरा हजार? सरुच्या कानांवर विश्वासच बसेना.'चालेल' उमेश म्हणाला.
'दादा, मी ज्ञानाला म्हणजे यांच्या मुलाला शाळेत घेऊन जाऊ?आज त्याला शाळेत न्यायचं आहे.'
'अरे नक्की घेऊन जा.आम्ही आज टॅक्सीनं जातो. काय वर्षा,आज जरा बदल करुया. चालेल ना?' सुभाषदादांनी वर्षावैनींना हसत हसत विचारले. वर्षावहिनींनी मान डोलावली.
'तू आजपासूनच थांबशील का माईंबरोबर?'
'न्हाई हो वैनीसाब, उद्यापासून नक्की यीन. ज्ञानाला शाळेत घालायचं तर मी पाहिजे ना. बाबा न्हाईये त्याला मग नवीन शाळा असल्यानं भेईल त्यो.'
'बरं पण उद्या सकाळी याच वेळेस ये.'माई म्हणाल्या.
सरु उठली आणि माईंच्या पाया पडली.'उद्या नक्की येईन मी,'असे दादावैनींना सांगून ती उमेश बरोबर निघाली.
'वैनी कशी वाटली मानसं तुमाला?'
'दादावैनी लै चांगली वाटली पन् म्हातारी लैच खडूस वाटती '.
'हां म्हातारी म्हनू नका त्यास्नी,माईच म्हनायचं.सुरुवातीला कडक वाटतील पन् सोभावानं लै चांगल्या हैती '.
दोघं घराच्या दिशेने चालू लागले.आता ज्ञानाच्या शाळेत जायचं होतं.
ज्ञानाची शाळापण समतानगरच्या जवळच होती.शाळेत जाण्यासाठी ज्ञाना केव्हाचा तयार होऊन बसला होता.
शाळा होती जेमतेम बांधलेली.बैठी,थोडी अंधारी.शिक्षकांचा शिकवण्याचा आवाज ऐकू येत होता.उमेश हेडमास्तरांच्या केबिनमध्ये शिरला.मागोमाग सरु आणि ज्ञाना.
'सर, मी बोललो होतो त्याप्रमाणे या ज्ञानाला शाळेत घालायचं आहे.'
'काय रे ,नाव काय तुझं?' चष्म्यातून रोखून बघत करड्या आवाजात सरांनी विचारले. ज्ञाना बावचळला.अडखळत म्हणाला,'ज्ञाना सर'
'असं नाव सांगतात होय? पूर्ण नाव सांग.'
'ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील.'
'अस्सं,बरं याची कागदपत्रं आणली आहेत का?'
'व्हय जी ',सरुने तत्परतेने सारी कागदपत्रे पुढे केली.सरांनी ती चाळली.
'यात स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दिसत नाही!'
'मी मागवून घेतो लवकरच,' उमेश तत्परतेने म्हणाला.
'उद्यापासून शाळेत ये ', सरांनी समारोप केला.
'विजयला फोन करून मागवून घेतो ते सर्टिफिकेट ',उमेश म्हणाला.'मग काय ज्ञाना आवडली का शाळा? खूप अभ्यास करून मोठं व्हायचंय ना?'
'दादांसारखं?'सरु म्हणाली आणि खळखळून हसली. तिच्या मनावरचं ओझं कमी होऊ लागलं होतं.महिन्याला पंधरा हजार ती कमावणार होती.ज्ञाना शाळेत जाणार होता.डोळ्यांसमोर जो निराशेचा अंधार पसरलेला होता तो हळूहळू आशेच्या किरणामध्ये परावर्तित होऊ लागला होता. घरी जाऊन कधी एकदा शोभीला सगळं सांगते असं तिला झालं होतं.
