संस्कार - भाग ६
संस्कार - भाग ६
घराच्या ओढीने सरु भराभर चालू लागली.माझा ज्ञाना शाळेतून आला असेल, शाळेत काय काय गमतीजमती झाल्या ते सांगण्यासाठी माझी वाट पहात असेल...सरु आपल्याच नादात रस्ता काटत होती आणि अचानक तिला जाणवले, कोणीतरी आपला पाठलाग करीत आहे.सरुचे अंग घामाने भिजले.एका अनामिक भीतीने तिच्या मनाचा ताबा घेतला.
बायकांचं सहावं इंद्रिय सदा सतर्क असतं.काहीतरी विपरित घडणार असेल तर ते सावध होतं अगदी तसंच सरुचं झालं.तिने चालण्याचा वेग वाढवला.कशीतरी ती समतानगरच्या हद्दीत शिरली आणि हळूच मागे वळून पाहिले.एक दाढीवाला माणूस तिच्याकडेच बघत होता.
'बरं झालं ही दोन चाळींमधील वाट चिंचोळी आणि अंधारी आहे.त्या माणसाला कळणार नाही मी कुठल्या घरात शिरते आहे ते!
'आये,'ज्ञाना सरुला बिलगला.'आज लैच मजा आली शाळेत.हेडसरांनी सगळ्या वर्गात नेऊन माझी ओळख करून दिली.'आपल्या शाळेत एक हुशार विद्यार्थी दाखल झाला आहे असं म्हणून ते माजे प्रगतीपुस्तकावरचे मारकं वाचून दावित होते ', सांगताना ज्ञानाचा चेहरा आनंदाने फुलून आला होता.
'व्हय रे ज्ञाना, इतकं कौतुक केलं तुजं,'शोभीनं मायेनं ज्ञानाचा चेहरा कुरवाळला.सरु आपल्या लेकाकडे डोळे भरून बघत होती.आनंदाश्रू डोळ्यातून कधी टपकले तिचं तिलाच कळलं नाही.
'ऐकलं का, आपल्या ज्ञानाचं आख्ख्या शाळेत कौतुक केलं हेडमास्तरांनी,'शोभी उमेशला जेवण वाढतांना म्हणाली.
'व्हय रं ज्ञाना,लै मोठ्ठा हो आमच्या सुभाषदादांसारखा,'ज्ञानाच्या पाठीवर हात फिरवत उमेश म्हणाला.
सरु अचानक अस्वस्थ झाली.तिला तिचा पाठलाग करणारा माणूस आठवला आणि अंगात कापरं भरल्यागत झालं.शोभीचं तिच्याकडे लक्ष गेलं.
'सरुवैनी काय झालं हो? एकदम चेहरा का असा झाला तुमचा?'
'काय न्हाई ', ज्ञानाकडे पहात ती म्हणाली तशी शोभीनं ज्ञानाला सांगितलं,'जा तर ज्ञाना थोडावेळ शीतलशी खेळ.'
ज्ञाना गेल्यावर सरु म्हणाली,'भावजी,माझा कोणीतरी पाठलाग करतंय अशी मला भीती वाटतेय.त्या घेलाशेटचा माणूस तर नसेल?'सरु भीतीने थरथरत होती.
'न्हाई वैनी,तुमी कायबी काळजी करू नका.आजच मी विज्याला फोन केला ज्ञानाच्या शाळेच्या दाखल्याबद्दल, तेव्हा विज्या म्हणाला, तुम्ही घरी नाहीत म्हटल्यावर घेलाशेट आणि त्याच्या मुनिमची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यागत झाली होती.आख्ख्या गावभर तुम्हाला शोधत फिरत होते.पण कोणीच तुम्हाला पाहिलं नव्हतं.आणि पाहिलं असतं तरी त्यांना कोण सांगणार होतं? सगळं गाव त्यांना शिव्याशाप देतंय.'
माणसांना पिळून पिळून पैसा गोळा केलाय मेल्यांनी!तळपट होवो मेल्यांचं,'कडाकडा बोटं मोडत शोभी म्हणाली.
'वैनी तुमचा कोणी पाठलाग करत असेल तर उद्या माझ्याबरोबर माईंकडे चला.बघूया कोण आहे तो हलकट ',उमेश म्हणाला.
सकाळी सरु उमेशबरोबरच बाहेर पडली.डोक्यावर पदर घेऊन शक्यतो चेहरा लपवत ती आजूबाजूला नजर फिरवत होती.पण आज त्या दाढीवाल्याने तिच्या बरोबर एका माणसाला (उमेशला) पाहिले आणि तो वेगाने अदृश्य झाला.सरुला हायसं वाटलं.पण मग तिला वाटलं,आज उमेशभाऊजी सोबत होते पण रोज रोज ते शक्य होणार नाही.काय करावं बरं? जरा बरं चाललंय तर ही नवीन बला!
'काय रे उमेश,दिसला का तुला तो माणूस?'सुभाषदादांनी दार उघडल्या उघडल्या विचारले.
'नाही हो दादा, मी वैनींबरोबर आहे म्हटल्यावर पळून गेला पळपुटा.'
'याचा अर्थ भित्रा आहे तो.सरस्वतीला घाबरवायचा प्रयत्न करतोय.'
'सरस्वती, तुझ्या गळ्यात काय आहे?'वर्षावैनींनी विचारले.
'काही नाही जी
.धनी होते तवा डोरलं होतं गळ्यात पण त्ये गेले आणि तवापासून काहीच घालत नाही.'
'मग आता गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली लाव.'
'काय बोलताय वैनीबाय तुमी?'सरु घाबरुन म्हणाली.'असलं वंगाळ काम मी कशी करू?धनी गेले आनि आता डोरलं घालून टिकली भी लावायला सांगता?'
'वर्षा म्हणतेय ते बरोबर आहे ',माई म्हणाल्या.'ते बाईच्या संरक्षणाचं साधन आहे.मंगळसूत्र आणि टिकली पाहिली की सहसा हे लंपट पुरुष मागे लागत नाहीत.'
'पण...
'आता पण नाही अन् बिण नाही.आजपासून गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली पाहिजे.वर्षा,आज येताना सरस्वतीसाठी हे सगळं घेऊन ये.'
'बरं म्हणत वर्षावैनी,सुभाषदादा आणि उमेशभाऊजी बाहेर पडले.
'माई,लोक असं वंगाळ का वागतात हो?'
'जगात जसे सज्जन आहेत तसेच दुर्जनही आहेत.ते का आहेत याचा विचार करायचा नाही.आपलं त्यांच्यापासून रक्षण करणे इतकाच हेतू ठेवायचा.डोळे असे करारी ठेवायचे की वाह्यात वागणाऱ्या कोणालाही आपली भीती वाटली पाहिजे.समोरच्या माणसाने रोखून पाहिले की आपण कधीही नजर खाली करायची नाही तर त्याच्याकडे करारीपणाने, धारदार नजरेने पहायचे.आपला त्यांना धाक वाटला पाहिजे.मग काय बिशाद आहे त्यांची परत तुझी खोडी काढायची!'
'माई, मी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं तवा तुमच्या नजरेचं मला लैच भ्या वाटलं होतं.'
सरुच्या या बोलण्यावर माई किंचित हसल्या.
'मी नुसतं तुला भाषण देत नाहीये.हे माझे अनुभवाचे बोल आहेत.'
'म्हंजे?'
'माझा सुभाष फक्त दोन वर्षांचा होता जेव्हा त्याचे वडील गेले.'
'या बया,'सरुने तोंडावर हात ठेवला.
'अफरातफरीचा खोटा आळ त्यांच्यावर आला आणि घाबरुन गळफास लावून घेतला त्यांनी! एकदाही विचार केला नाही ,आपली अवघी एकवीस वर्षांची बायको आणि दोन वर्षांच्या मुलाचं काय होईल याचा!'
'म्हंजी माज्यासारखंच म्हना की!'
'होय.अगदी तुझ्यासारखंच.नवरा गेल्यावर जबाबदारी नको म्हणून आईवडील अलिप्त राहिले.आपली मुलगी लहान आहे, गृहिणी आहे....पैशांचं काय करेल, मुलाला कसं वाढवेल...काsही नाही! आणि सासरीही उजेडच होता.'माईंनी सुस्कारा सोडला.
'म्हणूनच उमेशने जेव्हा तुमच्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला तेव्हाच आम्ही ठरवलं, तुला होईल तेव्हढी मदत करायची.मी,सुभाषने जे भोगलं तशी वेळ तुमच्यावर येऊ नये.'
'लै उपकार झाले माई तुमच्या सर्व्यांचे आमच्यावर',सरुने हात जोडले.
'अं हं... नुसते हात जोडून काम होणार नाही.मला तुझ्याकडून एक वचन हवंय.'
'कोनतं जी?'
'हे तुझे खडतर दिवस फार काळ रहाणार नाहीत.ते सुधारतीलच.पण जेव्हा तुझी परिस्थिती चांगली होईल तेव्हा तू सुद्धा एखाद्या अशाच संकटात सापडलेल्या माणसांना मदत करशील.'
'व्हय जी, तुम्ही सांगितलेलं मी कधीच विसरणार नाही आणि ज्ञानावरही हेच संस्कार करेन.'
'काय म्हणालीस?ज्ञाना?'
'न्हाई,चुकले.ज्ञानेश्वर!'
'आता कसं बोललीस,'माई हसल्या आणि सरु ही त्यांच्या हसण्यात सामील झाली.
पण माई काय म्हणतात, मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली लावायची?शोभी काय म्हणेल? आणि आपल्याला ओळखणाऱ्या माणसांनी पाहिलं तर तोंडात शेण घालतील ना आपल्या!सरु विचारात पडली.