Pratibha Tarabadkar

Inspirational

3  

Pratibha Tarabadkar

Inspirational

संस्कार भाग - १

संस्कार भाग - १

4 mins
13


   'पुंडलिक,ए पुंडल्या हायीस न्हवं घरात?'एकामागोमाग एक मारलेल्या हाळ्या ऐकून सरु बाहेर आली.घेलाचंद सावकाराचा मुनिम बाहेर उभा होता.

  'न्हाई त्ये भाईर गेल्यात '

 'कवा यील?'

'काय सांगता येत न्हाई '

'त्याला म्हनावं घेलाशेटचा निरोप हाय,आट दिवसात कर्ज फेडलं न्हायी तर वाईट परिणाम हुतील ध्यानात ठीव म्हनून !'

  मुनिमाची जरबेची भाषा, तिच्या शरीरावरुन फिरणारी त्याची अधाशी नजर....सरु अगदी घाबरून गेली.त्याची ती गलिच्छ नजर दिवसभर तिला आठवत राहिली.

  'आये,माजा गनिताचा पेपर मिळाला.पैकीच्या पैकी मारकं मिळाले.गुरूजी म्हनाला असाच आब्यास केलास तर म्होट्टा हपिसर हुशील,'ज्ञाना तिच्यापुढे पेपर नाचवत म्हणाला.पण सरुचे त्याच्याकडे लक्षच नव्हते.ती सारखी दाराकडे बघत होती.सकाळधरनं पैशाची व्यवस्था बघायला गेलेला पुंडलिक अजून आला नव्हता.

  'काय झालं? झाली पैशांची येवस्था?'पुंडलिक दारात चप्पल काढत असतांनाच सरुने अधीरपणे विचारले.

  'न्हाय', पुंडलिक उदासपणे पुटपुटला.सगळ्यांचीच गत आपल्यागत झालीया.अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक नासलंया.कुनी कुनाला मदत करायची?एकादशीकडं म्हाशिवरात्र!'पुंडलिक हात तोंड धुवायला गेला.

  पुंडलिकाचा आता एकच उद्योग झाला होता. घेला शेठ कडून घेतलेलं रीण फेडण्यासाठी कुठूनतरी पैसा गोळा करण्यासाठी वणवण फिरायचं आणि संध्याकाळी रिकाम्या खिशानं अन् पडलेल्या तोंडानं घराकडे परतायचं.घेलाशेटच्या तगाद्यानं पुंडलिक अगदी त्रासून गेला होता.आणि एक दिवस अचानक....

   'सरु, अगं सरे लवकर चल तुझ्या शेताकडं ',गावातली रखमा धावत तिला बोलवायला आली.धावत आल्यानं तिचा ऊर धपापत होता.चेहरा उन्हामुळे लालभडक झाला होता.भांडी घासणाऱ्या सरुला काही कळेना.रखमा तिला ओढत शेताकडे नेऊ लागली.त्या वीतभर शेतात अख्खं गाव लोटलं होतं.सरुला आश्चर्य वाटलं.आपल्या शेतात असं काय झालं आहे?सारेजण शेतातील आंब्याच्या झाडाकडे माना उंचावून बघत होते.सरुने वर पाहिले....पुंडलिकचा निष्प्राण देह झाडावर लटकत होता.सरु भोवळ येऊन खाली कोसळली.

  पोलीस आले, त्यांनी पुंडलिकचे शव खाली उतरवून पोस्टमार्टेमसाठी रवाना केले.

  'सरु, अगं सरुबाय ऊठ,'तोंडावर पाणी शिंपडल्यामुळे जाग्या झालेल्या सरुला गावातील आयाबाया उठवत होत्या.रखमा तिचं डोकं मांडीवर घेऊन पदरानं वारा घालत होती.सरुने आजूबाजूला नजर फिरवली आणि ती भानावर आली.आपल्या आयुष्यात किती भयंकर उलथापालथ झालीये या जाणीवेने तिने हंबरडा फोडला.कसंबसं चालवत साऱ्याजणी तिला घरी घेऊन आल्या आणि तिला भान आले.

'ज्ञाना,माजा ज्ञाना कुटंय?'

  'कायबी काळजी करु नगंस त्याची.आमच्या घरात जेवन करुन झोपलाय त्यो ',सुभद्राआजीने तिला समजावलं.

पुढचे काही दिवस सरु बधीरावस्थेतच होती.पुंडलिकचे अंत्यसंस्कार, दिवसकार्य गावकरी,पुंडलिकचे मित्र, यांनीच पाहिले.नाहीतर सरु एकटी काय करणार होती?पुंडलिकचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते त्यामुळे त्याचे मित्रच त्याचे आप्त झाले होते.सरुचे आईवडील दिवसाला येऊन गेले.त्यांनी सरुला आणि ज्ञानाला आपल्या घरी नेण्याचा विषयच काढला नाही.तेरावं झालं,हातावर पाणी पडलं तसं तडक घरी निघून गेले.

सरु आणि ज्ञानाला पुंडलिकचा मित्र विजय कडून जेवणाचा डबा येत होता.बावरलेल्या ज्ञानाला मात्र शाळेला पाठवत होते.

  'सरु, अगं सरे,'विजयच्या बायकोने,रंजीने हाक मारली तशी डोक्याला हात लावून बसलेली सरु भानावर आली.हळूहळू उभी रहात ती खोपटाच्या दाराशी आली.'सरुबाय, जेवणाचा डबा ',हातातला भाजी भाकरीचा डबा पुढे करत विजयची बायको पुटपुटली,'सरुबाई, भाकरीच्या खाली चिठ्ठी हाय ती नीट वाचा आनि मंग फाडून फेकून द्या.'विजयची बायको वळली आणि चटाचटा निघून गेली.सरु गोंधळून डबा हातात धरून तशीच उभी राहिली.रंजी असं का बरं म्हणाली असेल?

सरुने घराचं दार लावलं आणि भाकऱ्या उचकल्या.भाकऱ्यांच्या तळाशी प्लॅस्टिकच्या पिशवीत चिठ्ठी होती.

  'सरुबाई तुम्हाला आणि ज्ञानाला घेलाशेट सावकारापासून जिवाला धोका आहे तवा समदी महत्वाची कागदपत्रं...राशनकार्ड, आधारकार्ड,शाळंचं काय कागद आसंल त्ये समदं,जनमदाखला जे काय आसंल त्ये समदं एका पिशवीत भरून ठिवा.तुमची आनि ज्ञानाची कापडं जे काय घ्येता यील त्ये घिवून तैय्यार -हावा.रातची बुदवड मुंबई एस्टीमधून मुंबईला जावा.तिथं उम्या आमचा मैतर तुमाला घियाला यील.त्यो तुमाला समदं सांगेल.'

   गावाची वेस कंदी ओलांडली न्हाई आन् आता रातच्या एस्टीनं मुंबैला जायाचं? काय करू?कसं हुनार आमचं?आन् घेलाशेटपासून जिवाला धोका हाय म्हनं?आरं द्येवा,कसं काय निभायचं समदं?सरु जमिनीवर कोसळली.तोंडात पदराचा बोळा कोंबून रडू लागली.हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदू लागलं.

  सरु उठली.मनाचा हिय्या करून तिने चिठ्ठीत सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्रे एका पिशवीत भरली.दुसऱ्या पिशवीत तिचे आणि ज्ञानाचे कपडे भरले आणि धडधडत्या हृदयाने बसून राहिली.ज्ञाना जेवून झोपी गेला होता.या खळबळीची त्याला काहीच जाणीव नव्हती.

  घराबाहेर काळाकुट्ट अंधार आणि निशब्द शांतता होती.हलक्या आवाजात दार वाजले.आपलं हृदय भीतीने बंद पडतंय की काय असं क्षणभर सरुला वाटले पण धाडस गोळा करून तिने हळूच दाराची कडी काढली.दारात विजयभावोजी आणि रंजना उभी होती.रंजी पुढे होऊन सरुच्या कानात कुजबुजली,'सरुबाय, तुमच्या पिशव्या द्या माज्याकडं आनि ज्ञानाला घेऊन भाईर पडा.'

   सरुने दोन्ही पिशव्या रंजीच्या हातात सोपवल्या आणि झोपलेल्या ज्ञानाला उठवले आणि त्याच्या कानात कुजबुजली ,'ज्ञाना,आवाज न करता माज्यासंगट चल.आजिबात कायबी प्रश्न ईचारायचे न्हाईत.'

   वडीलांच्या आकस्मिक मृत्यूने लहान वयातच समंजस झालेल्या ज्ञानाने मान डोलावली आणि पायात स्लीपर चढवल्या.

  विजय, रंजना,सरु आणि ज्ञाना भराभर रस्ता काटू लागले.एस्टी स्टॅण्ड निर्मनुष्य होता.साहजिकच आहे, मध्यरात्री तिथे कशाला कोण येतंय?

  दुरून एस्टी बसचे दिवे दिसू लागले आणि सारेजण हुश्शार झाले.एस्टी स्टॅण्डच्या आवारात शिरली.बसमध्ये तुरळक प्रवासी दिसत होते.कंडक्टरशी विजय काहीतरी बोलला.त्याने कंडक्टरच्या हातात दोघांच्या तिकीटाचे पैसे ठेवले.सरुच्याही हातात शंभराच्या दोन नोटा ठेवल्या,असू देत अडीनडीला म्हणत.

  सरु आणि ज्ञाना सीटवर बसले अन् कंडक्टरने बेल मारली.

सरु आणि ज्ञाना निघाले एका अज्ञात प्रवासाला!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational