Pratibha Tarabadkar

Drama Inspirational

3  

Pratibha Tarabadkar

Drama Inspirational

चौकट

चौकट

4 mins
226


  मनाली घराच्या दिशेने तिची स्कूटी दामटू लागली.आपले गावाबाहेरील पॉश कॉम्प्लेक्समधील घर भाड्याने देऊन हे मध्यवर्ती भागात त्यांनी रिसेलचे घर घेतले होते.कुहूची शाळा, मंदारचे ऑफिस आणि तिचा ट्यूशन क्लास इथून जवळ पडत होते त्यामुळे येण्याजाण्याचा वेळ वाचत होता.होते घर छोटेसेच, आजूबाजूला जास्त करून ज्येष्ठ नागरिकच रहात होते.वेळेची बचत होत असल्याने मनालीला कुहूचा अभ्यास, घराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत होता.

  शेजारच्या पार्सेकर काका काकूंशी लगेचच गट्टी जमली होती कुहू आणि मनालीची.अतिशय मोकळ्या, बोलक्या स्वभावाच्या होत्या पार्सेकरकाकू.

   ट्यूशनक्लासहून येताना मनालीला वाटेत रोज एक प्रौढ जोडपे फिरायला जाताना दिसे.उंच, शिडशिडीत काका आणि आटोपशीर बांध्याच्या काकू.काका काकू अतिशय टापटीप होते.काका कायम कडक इस्त्रीच्या कपड्यात आणि काकू अतिशय सुंदर, चापून चोपून नेसलेली साडी,केसात गजरा किंवा एखादे फूल, हातात पाटल्या बांगड्या.... अगदी नित्यनेमाने ते जोडपं संध्याकाळी दिसायचं.मग ऊन असो थंडी असो की पाऊस!

    'पार्सेकरकाकू,ते रोज जोडप्याने फिरायला जातात ते कोण हो?'

  'ते ना, ते धामणे', काकू थोड्या नाराजीने उत्तरल्या.

   'किती छान जोडपं आहे ना, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा ',मनाली म्हणाली.

    'हूं:, काकूंनी नाक मुरडले.'सगळीजणं त्यांना लैला मजनू म्हणतात.जेव्हा बघावं तेव्हा जोडीनं फिरत असतात.किती वेळा धामणेबाईंना म्हटलं, आमच्याबरोबर भजनाला चला, ट्रीपला चला, नाटकाला चला पण कसलं काय!दोघांना एकमेकांशिवाय करमतच नाही.'

   पार्सेकरकाकू म्हणत होत्या ते काही खोटं नव्हतं.धामणेकाका कधी एटीएम मध्ये गेलेले, काकू बाहेर त्यांची वाट पहात उभ्या, कधी जोडीनं देवळात देवासमोर हात जोडून नमस्कार करताना तर कधी बाजारात भाजी घेताना पण जोडीनंच.तू तिथे मी या उक्तीप्रमाणे.अगदी सयामी जुळेच जणू!

   धामणे काकाकाकू रोज दिसायचे पण स्मितहास्यापलिकडे एका शब्दाचीही देवाणघेवाण नाही.पार्सेकर काकाकाकूंच्या अगदी उलट.पार्सेकर काका काकूंचं एक बरं होतं, वयस्कर होते तरी आपापल्या वर्तुळात व्यस्त होते.दोघांची स्वतंत्र मित्रमंडळी, वेगळी मंडळं होती.एकत्र तरी वर्तुळं वेगवेगळी.

  नेहमीप्रमाणे मनाली पहाटे उठली आणि तिने स्वयंपाकघराची खिडकी उघडली.ती जरा अस्वस्थ झाली.समोरच्या धामणेकाकूंच्या बिल्डिंगखाली आपसात हलक्या आवाजात कुजबुजत माणसं उभी होती.मधूनच दबक्या आवाजात हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता.काहीतरी अशुभ घडले होते खास.दुधाची पिशवी आणि पेपर घेण्यासाठी मनालीने दार उघडले तर तिला शेजारच्या पार्सेकरकाकू धापा टाकत जिना चढताना दिसल्या.

    'काकू काय झालं हो? समोरच्या बिल्डिंगखाली एव्हढी माणसं का जमली आहेत?'

   'अगं ते धामणे रात्री अचानक गेले.दोघेजण टीव्ही बघत होते.त्यांनी बायकोला पाणी आणायला सांगितले.ती पाणी घेऊन येईपर्यंत इकडे यांचा जीव गेला.'

    'बापरे किती अकस्मात मरण,'मनाली शहारली.'कसं होईल धामणेकाकूंचं?'

   'त्यांचा मुलगा आशिष दिल्लीहून आणि मुलगी अर्चना चेन्नईहून नुकतेच पोहोचले आहेत.'पार्सेकरकाकू बोलत बोलत कुलूप उघडून त्यांच्या घरात शिरल्या.मनाली शाळेसाठी कुहूला उठवू लागली.

   मनालीचे अर्धे लक्ष घरात आणि अर्धे लक्ष समोरच्या बिल्डिंगकडे होते.धामणेकाकांना खाली आणले.काल संध्याकाळी फिरायला जाताना पाहिलेले काका आज लोकांच्या खांद्यावर होते.पुढाकार घेणारा त्यांचा मुलगा आशिष असावा.थोड्या वेळाने धामणेकाकूंच्या हाताला धरून त्यांची मुलगी आली.धामणेकाकू कमरेतून पार वाकल्या होत्या.कशीबशी पावलं टाकत त्यांनी धामणेकाकांच्या कलेवरावर झोकून देत हंबरडा फोडला,'असे कसे मला एकटं सोडून गेलात हो SSS ', त्यांच्या मुलीने त्यांना कसेबसे सावरले पण काकू पुन्हा पुन्हा काकांच्या देहावर झेप घेत होत्या.शेवटी त्यांना दोन तीन बायकांनी धरुन ठेवलं तेव्हा कुठे धामणेकाकांना शववाहिनीत ठेवता आलं.

    दोन तीन दिवसातच धामणे यांच्या घरात सामसूम दिसली.पार्सेकरकाकूंना मनालीने विचारलं तर मुलगा धामणेकाकूंना दिल्लीला घेऊन गेलाय आणि सर्व दिवसकार्य काशीला करणार आहेत असं कळलं.

 हळूहळू धामणेकाका काकू विस्मरणात गेले.

   एक दिवस मनाली भाजी घेऊन घरी येत होती.समोरुन एक स्त्री आली.कॉटनची चुरगळलेली फिकट रंगाची साडी, हातात काचेच्या दोन बांगड्या, कपाळावर दिसेल न दिसेल अशी टिकली आणि चेहऱ्यावर भकासपणा.मनालीला ती स्त्री ओळखीची वाटली पण कोण ते काही आठवेना.ती स्त्री पुढे गेल्यावर मनालीला एकदम आठवलं, अरे या तर धामणेकाकू! बापरे किती रया गेली आहे काकूंची!

  भर दुपारी बेल वाजली.मनालीने दार उघडले.चाळीशीची एक स्त्री उभी होती.

    'पार्सेकरकाकू घरी नाहीत का?'

'नाही.त्या भजनाच्या प्रॅक्टिसला गेल्यात आणि काका दासबोध पठणाला गेलेत.'

    'मी समोरच्या बिल्डींगमधल्या धामणे यांची मुलगी अर्चना.'

   'अरे, या या, आत या ना.सॉरी हं, मी तुम्हाला ओळखलं नाही.'

   'अहो तुम्ही नवीन आहात.आमच्या आईवडीलांना तर इतकी वर्षे इथे राहूनही कोणी ओळखत नाही.'अर्चना कडवटपणे म्हणाली.मनालीने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले.

    'तुम्हाला वाटत असेल,ही बाई अशी काय बोलते आहे पण खरं सांगू का, आमच्या आईवडिलांनी स्वतः भोवती एक चौकट आखून घेतली होती.त्या चौकटीत फक्त त्या दोघांचंच विश्व सामावलेलं होतं.एकमेकांपलिकडे त्यांना दुसरं जगच नव्हतं.नातेवाईक, मित्र मंडळी, ग्रुप्स यांना त्यांच्या आयुष्यात काही स्थानच नव्हतं.फक्त ते दोघेच! आमच्या कडे किंवा दादाकडे सुद्धा एक आठवड्याच्या वर कधी राहिलेच नाहीत.किती वेळा सांगितलं जरा लोकांमध्ये मिसळा, आपला संपर्क वाढवा पण दोघांनीही कधी मनावरच घेतलं नाही.स्वत:नेच आखलेल्या चौकटीत बंदिस्त राहून आपल्यातच मश्गूल राहिले.त्यांच्या कधी लक्षातच आलं नाही की बाबांच्या अकस्मात मृत्यू सारखी वेळ येऊ शकते आणि कोणीतरी मागे एकटंच राहू शकतं.बाबांनी आईला इतकं प्रोटेक्ट केलं होतं की तिला साधे बॅंकेचे व्यवहार येत नाहीत.ती आता कसं काय निभावेल याची चिंता आम्हाला रहाणार आहे.बरं ती माझ्या कडे किंवा दादाकडे कायमचं रहाणं शक्यच नाही.म्हणून पार्सेकरकाकूंना सांगायला आले होते की त्यांच्या मंडळात आईला सामावून घ्या.आमच्या आईला ते आवडणार नाही, अवघड जाईल पण आता त्याला इलाज नाही.'

    'तुम्ही काही काळजी करू नका.पार्सेकरकाकू त्यांना नक्कीच घेऊन जातील त्यांच्या मंडळात.अगदी सोशल आहेत त्या.'मनाली म्हणाली.

   'तुम्हाला पण एक रिक्वेस्ट करू का?'अर्चनाने चाचरत विचारले.'माझ्या आईला कधी बॅंकेत, मोबाईलचा प्रॉब्लेम, कधी वेळ पडली तर मदत कराल का?'

     'अहो त्यात काय एवढं, नक्की करेन.तुम्ही काही काळजी करू नका.'मनालीने अर्चनाला आश्वस्त केले.अर्चना रिलॅक्स झाली.

    धामणेकाकू आता पुष्कळ वेळा पार्सेकरकाकूंबरोबर दिसतात.कधी भाजी आणायला तर कधी भजनी मंडळात जाताना.कधी समवयस्क बायकांशी गप्पा मारताना तर कधी त्यांच्याबरोबर नाटक सिनेमाला जाताना.

    धामणेकाकूंच्या चेहऱ्यावरचा उदासपणा, भकासपणा जाऊन आता टवटवी दिसू लागली आहे.

   मध्यंतरी मनालीला गाठून एटीएम कार्ड कसं वापरायचं ते शिकवशील का अशी गळही घातली त्यांनी.

   आपणच आखलेल्या चौकटीतून बाहेर पडायची धडपड सुरू आहे धामणेकाकूंची!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama