Pratibha Tarabadkar

Others

3  

Pratibha Tarabadkar

Others

अजि आणि माजी भाग -२

अजि आणि माजी भाग -२

3 mins
231


अजि आणि माजी भाग -२


'कसा झाला प्रवास ?'नम्रताने चहा पिता पिता विचारले.

'एकदम छान.आता अंघोळ करून जरा ताजीतवानी होते.'शुभाआजीने,नम्रताच्या आईने जांभई देता देता हात उंचावून आळस दिला आणि ती अंघोळीला गेली. नम्रताने सोनूला उठवायला सुरुवात केली.

   'सोनू उठ.आठ वाजलेत.'

  'ए आई,झोपू दे ना मला.माझी व्हेकेशन सुरू आहे ना!'

  'अगं नाश्ता तयार करायचा आहे ना, काय करू?'

  ' काय करशील?'

 'पोहे ?'

'नको, कंटाळा आलाय पोह्यांचा ', सोनूने पांघरुणातूनच नकार दिला.

  'मग उपमा?'

  'शी'

'शिरा '

'काय गं आई तेच तेच पदार्थ करतेस? काही तरी युनिक कर ना!'

  'सोनू तुझ्यासाठी मी एक युनिक पदार्थ करते बघ,खा के उंगलिया चाटती रह जाओगी', शुभाआजीचा आवाज ऐकून सोनूने डोक्यावरचे पांघरूण फेकून दिले आणि ती ताडकन उठून शुभाआजीच्या गळ्यात पडली.नम्रता चक्रावून बघतच राहिली.नशीब कार्टीने ट्रॅकपॅंट घातली होती नाहीतर आईचे लेक्चर ऐकावे लागले असते.पण सोनू बेडवरून डायरेक्ट आजीच्या गळ्यात कशी पडली? आणि आईला बरं चाललं? मी जर माझ्या लहानपणी असं केलं असतं तर आईने पाठीत धपाटाच घातला असता वरुन म्हणाली असती,'एव्हढी घोडमी झालीये आणि आईच्या अंगाअंगाशी काय करतेस?'आणि नातीबरोबर सगळं चालतंय....

   'शुभूआजी, मी अंघोळ करून येते तोपर्यंत तू तुझा युनिक पदार्थ करून ठेव 'असं सांगून सोनू बाथरूममध्ये घुसली.

   'हे बघ माझं नवीन क्रिएशन', शुभाआजीने सोनूसमोर डिश ठेवली.

'हे काय आहे?'सोनूने डिश मधील पदार्थ पाहून डोळे विस्फारले.

   'फोडणीचे नूडल्स '

  'काय?'सोनू किंचाळली .'फोडणीचे नूडल्स कधी असतात का?'

 'मला सांग, तुम्हाला चायनीज भेळ आवडते, चायनीज डोसा खुषीने खाता,व्हेज मोमोज खाता मग फोडणीचे नूडल्स खायला काय हरकत आहे?'

सोनू निरुत्तर झाली.तिने तोंड वाकडे करत एक चमचाभर खाऊन पाहिलं आणि भाज्या घालून केलेले फोडणीचे नूडल्स तिला फारच आवडले.तिने त्यावर तावच मारला.शुभाआजीने नम्रताकडे पाहून डोळे मिचकावले.

  सोनू अंघोळ करून आली तेव्हा शुभाआजी बॉंबे टाईम्सची पुरवणी वाचत होती.सोनूने तिच्या शेजारीच बसकण मारली.

   'हे काय आजी,तू पण ही सप्लिमेंट वाचतेस?आई बाबा तर म्हणतात,ही पानं फक्त रद्दी म्हणून उपयोगी आहेत.'

   'मी वाचते बाई ही पुरवणी,'शुभाआजी गंभीरपणे म्हणाली,'अगं त्यामुळे आपलं किती सामान्य ज्ञान वाढतं, कोणाचं कुत्रं किती क्यूट आहे, कुठल्या नटीचा सध्या कुठला बॉयफ्रेंड आहे, कुठल्या नटानं किती करोडला जुहू/ पाली हिलला घर घेतलं, कुठल्या प्रोड्यूसरने कुठल्या मॉडेलची गाडी घेतली वगैरे जागतिक महत्वाचं , मोलाचं ज्ञान याच पुरवणी मधून तर मिळतं,'शुभाआजीने सोनूकडे बघून डोळे मिचकावले.आजीच्या बोलण्यातील विनोद कळून सोनू खुद्कन हसली.

   आजी आणि नातीचं कशावरून एव्हढं खुदूखुदू चाललंय हे नम्रताला कळलं नाही पण दोघीजणी खूष आहेत हे पाहून तिला बरं वाटलं.

  सोनूच्या शाळेला कुठलीतरी दीर्घ सुट्टी असल्याने टाईमपास कसा करायचा हा सोनूसमोर यक्षप्रश्न उभा होता.आधीच 'सारखा मोबाईल बघू नकोस, टीव्ही लावू नकोस 'अशी ताकीद मिळाल्याने तिची पंचाईत झाली होती.मग काय करायचं बरं?सोनूने आयडिया काढली आणि सरळ एक मेंदीचा कोन घेऊन आली.

   शुभाआजी सोनूची मेंदी काढणं बघायला येऊन बसली.

  'आजी, तुमच्या वेळी होती का गं मेहंदी?

   'हो होती की, पण आमच्या वेळी असे रेडिमेड कोन नव्हते बरं का! आम्ही कुंपण म्हणून लावलेल्या मेंदीच्या झाडाची पानं आणून ती वाटायचो पाटा वरवंट्याने.'

'पाटा वरवंटा? म्हंजे?'

'म्हंजे वाघाचे पंजे!काहीच कसं माहित नाही गं तुला सोने?'

  'ए आई, तिला कसा बरं कळेल पाटा वरवंटा? मी लहान होते तेव्हापासून सगळ्यांकडे मिक्सर आला होता.पाटा वरवंटा तुझ्या लहानपणी असेल.'नम्रताने लेकीची बाजू घेतली.

  'हो ते ही खरंच म्हणा '

   'आजी मेंदीचं कुंपण म्हणजे?'

   'अगं आमच्या लहानपणी मुंबईत छोट्या छोट्या बिल्डिंग्ज होत्या.तळमजल्यावर रहाणारे लोक घरासमोर बागा करीत असत.मेंदीचा वास उग्र असतो आणि चव कडवट असते त्यामुळे बकऱ्यांपासून बागेचं संरक्षण व्हावं म्हणून मेंदीची कुंपणं असत.'

   'बकऱ्या?तू मीन गोटस्?डोंट टेल मी! मुंबईत बकऱ्या कशा असतील?'सोनूच्या स्वरात आश्चर्य होते.

  'हो.बकऱ्या,गायी,म्हशी सगळं काही होतं मुंबईत.'

   टॉवर्स बघायची सवय असलेल्या सोनूला हे सारं ऐकावं ते नवलच वाटत होते.

    'अगं आमच्या लहानपणी टीव्ही, मोबाईल नव्हते.सुटीत दुपारी पत्ते,कॅरम खेळायचो.खेळतांना आरडाओरडा केला की घरातील मोठी मंडळी रागवायची.मग आम्ही सूंबाल्या करायचो.मग टाईमपास म्हणून मेंदीची पानं तोडून आणत असू आणि आईला मस्का मारुन आळीपाळीने पाटावरवंट्यावर मेंदी वाटायचो.आणि बरं का गं सोने, मेंदी वाटताना ती अधिक रंगावी म्हणून एक सीक्रेट इन्ग्रिडियंट घालत असू',

हे सांगताना शुभाआजीचे डोळे चष्म्याआडून मिश्किलपणे लुकलुकत होते.

   'कुठलं सीक्रेट इन्ग्रिडियंट?'सोनूने उत्सुकतेने विचारले.

  'कान कर इकडे ', खुदूखुदू हसत शुभाआजी म्हणाली.सोनूने कान पुढे केला.आजी सोनूच्या कानात कुजबुजली त्याबरोबर सोनू जोरात किंचाळली आणि खदाखदा हसत जमिनीवर गडबडा लोळू लागली.

   'एव्हढं काय टाकायचात मेंदीत?'नम्रताने आश्चर्याने विचारले.

   'आई, शुभाआजी मेंदीत काय घालायची माहितीये?चिमणीची शी!',सोनूला परत हसण्याची उबळ आली.

   'शी:, काही तरीच काय आई, असं कोणी घालतं का मेंदीत?'

  'अगं खरंच नम्रता, आईशप्पथ!,शुभाआजीने गळ्याला चिमटा काढला.

   आपली आई दिवसेंदिवस वयाने मोठी आणि वागण्यात पोरकट होऊ लागली आहे, नम्रताला वाटले.

  नातीशी सीक्रेट शेअर करणारी आपली आई आपल्याशी कधीच इतक्या मोकळेपणाने वागली नाही याचे नम्रताला वैषम्य वाटले.


क्रमशः



Rate this content
Log in