Pratibha Tarabadkar

Abstract

3  

Pratibha Tarabadkar

Abstract

स्मृती

स्मृती

2 mins
185


  त्या दिवशी मला घरुन निघायला जरा उशीरच झाला होता.शक्य तितक्या लगबगीने चालत समोर दिसणाऱ्या रिक्षाच्या सीटवर जाऊन आदळले.तो पोरगेलासा रिक्षावाला नियमानुसार कानात वायरवाले बोळे घालून,मोबाईलवर नजर एकाग्र करून समाधि अवस्थेत गेला होता.म्हटलं याची ब्रह्मानंदी लागलेली टाळी आपल्यालाच मोडावी लागणार म्हणून त्याच्या पाठीवर ठकठक केलं तशी दचकून त्याने मागे वळून पाहिलं.

   'शिवाजी पुतळा चलो '

  'शिवजी पुतला?वो कहां है?'त्याच्या चेहऱ्यावरील भलेमोठे प्रश्नचिन्ह पाहून मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.डोंबिवलीसारख्या शुद्ध मराठी शहरात आता हिंदी बोलणं अनिवार्य झालं आहे.

   'इधरसे सीधा रामचंद्र टॉकीज चलो,फार उतार लगेगा उधरसे खाली उतरो और बाद में राईट साईड को वळो.'मी माझ्या फर्ड्या हिंदीत सांगितले.अरे हाय काय नाय काय!

  तरी रिक्षावाला अजून बुचकळ्यातच पडलेला होता.

  'रामचंद्र टाकीज?वो कहां है?'

अरे देवा याला रामचंद्र टॉकीज माहित नाही?मी आता त्याची गाईड व्हायचं ठरवलं.रिक्षा चालू झाली.

   'ये देखो रामचंद्र टॉकीज,'मी बोटाने इशारा केला आणि क्षणात भानावर आले.खरंच की, रामचंद्र टॉकीज आहे कुठे?ती तर कितीतरी वर्षांपूर्वी जमीनदोस्त होऊन त्या जागी एक टोलेजंग इमारत उभी राहिली आहे.पण माझ्या मनात मात्र ती जागा अजूनही रामचंद्र टॉकीज म्हणूनच बंदिस्त झाली आहे.

  काही स्थान, वस्तू, व्यक्ती आपल्या मनाच्या कप्प्यात स्मृती रुपात जतन झालेल्या असतात.आपल्याही नकळत!

   माझी एक मैत्रीण लग्न करून माटुंग्यात स्थायिक झाली आणि अनेक वर्षांनी भेटली.माझं लहानपण माटुंग्याला गेलं असल्याने ती माटुंग्यात नक्की कुठे रहाते याबद्दल जाणण्यास मी उत्सुक होते.मैत्रिणीने अनेक खाणाखुणा सांगितल्या पण मला काही कळेना.शेवटी ती मला म्हणाली आमच्या बिल्डिंगमध्ये हिरव्या चाफ्याचे झाड आहे.तत्क्षणी माझ्या मनात प्रकाश पडला.हिरव्या चाफ्याची बिल्डिंग! म्हणजे हिरव्या चाफ्यामुळे ती बिल्डिंग माझ्या स्मृतीमध्ये जतन झाली होती.

   एकदा आम्ही मैत्रिणी पूर्वीच्या आठवणी जागवत होतो.जुन्या मैत्रिणींचे संदर्भ आले आणि एकजणीने विचारले, 'अगं ती जयश्री वाटवे कुठे असते सध्या?'

  'कोण जयश्री?'सगळ्याजणी विचारात पडल्या.

  'अगं ती नाही का हसरी जयश्री?'

  'ती होय,ती पुण्याला असते.'

जयश्री वाटवे म्हटल्यावर लक्षात न आलेली ती मैत्रीण हसरी जयश्री म्हटल्यावर ताबडतोब लक्षात आली कारण तिच्या चेहऱ्यावर सदैव विलसणारे हास्य! अगदी दुःखद प्रसंगी भेटायला गेल्यावरही तिच्या चेहऱ्यावरील हास्य मावळत नसे म्हणून हसरी जयश्री!

  अशा अनेक स्मृती आपल्या मनात जतन झालेल्या असतात आणि संदर्भ आला की उफाळून येतात.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract