Pratibha Tarabadkar

Abstract

3  

Pratibha Tarabadkar

Abstract

मदत

मदत

3 mins
229


   भर उन्हाळ्याचे दिवस होते.शरीराची नुसती तलखी होत होती.ए.सी.अखंड चालू असे.दोन्ही मुलींचा मुक्काम तिथेच असे.

  त्या अंग भाजणाऱ्या उन्हाळ्यात बिल्डिंगला रंग लावण्याचे काम चालू होते.कॉंट्रॅक्टरच्या हाताखाली पाच सहा विशीची मुलं काम करत होती.रंग घासताना नाकातोंडात जाऊ नये म्हणून तोंडाला फडके बांधून,घाम पुसत त्यांचे काम चालू होते.

   कुठे ए.सी.त लोळणाऱ्या आपल्या मुली आणि कुठे ही तळपत्या उन्हात काम करणारी त्यांच्याच वयाची मुलं!

 पटकन पाघळणारे माझे हृदय पाघळले आणि त्या मुलांना त्यातल्या त्यात मी काय बरं मदत करू शकेन याचा विचार करू लागले.मी त्यांच्यासाठी रोज फ्रिजमधील थंडगार पाण्याच्या बाटल्या भरून ठेवू लागले.नंतर विचार केला,आपण त्यांना रोज ताक करून दिले तर! त्यांच्या पोटात थंडावा येईल आणि उन्हाळा बाधणार नाही.झाले, त्या दिवसापासून एक मोठा लोटा भरुन ताक त्यांना देऊ लागले.त्यांच्यामध्ये एक अशोक नावाचा चुणचुणीत मुलगा होता त्याला हाक मारुन साधारण दुपारी अडीचच्या सुमारास ते जेवायला बसण्या अगोदर मी तो ताकाचा तांब्या अशोककडे सुपूर्द करीत असे.

  आज नेहमीप्रमाणे ताक नेण्यासाठी अशोकला आवाज दिला.अशोक आला.बरोबर दुसरा मुलगा पण होता.अशोकला ताकाचा लोटा दिला आणि सहजच दाराशी रेंगाळले.मुलं पुढे गेली होती.त्यांना मी दाराशी उभी आहे हे लक्षात आलं नाही.

   'आशक्या, या डोकरीपासून (म्हातारीपासून)सांबाळून -हा.सारकं अशोक अशोक करत आसते.'

  'माला म्हाईती हाय,ती डोकरी (म्हातारी) माझ्यावर लाईन मारती हाय त्ये!'

 माझे हातपायच गळून गेले.जगात फक्त नर आणि मादी हेच नातं असतं का?माया,ममता, वात्सल्य या भावना नसतात?

   

कुठेतरी वाचलेलं मला आठवलं,

   

अपात्र व्यक्तीला तू कितीही दान केलेस तरी ते व्यर्थ आहे.

   या प्रसंगी जरी मी फार मोठे दान वगैरे केले नसले तरी तळपत्या उन्हात त्यांचे काम सुसह्य व्हावे या सदिच्छेने मी धडपडत होते तर त्या मूर्खांनी,अपात्रांनी त्याचा असा अर्थ काढावा?

 अर्थात त्यानंतर मी त्यांना दारातही उभे केले नाही.

   अशीच एकदा मंदिरातून निघताना 'ताई'अशी कापऱ्या आवाजातील हाक ऐकू आली.मी मागे वळून पाहिले तर एक आजीबाई डोळ्यात केविलवाणा भाव आणून माझ्या कडे बघत होती.समोर एक फडके अंथरुन देवळाच्या कडेला ती बसली होती.फडक्यावर थोडी चिल्लर होती.

   'ताई, मला माझ्या घरच्यांनी हाकलून बाहेर काढलीये.म्हणतात, अजून किती वर्ष पोसायची तुला थेरडे? म्हणून मी इथे येऊन बसलेय ', घळाघळा अश्रू वहात होते बिचारीच्या डोळ्यातून!'थोडे पैसे द्या ताई, न्हाई म्हणू नका,'तिच्या स्वरातील अजिजी, कारुण्य याने नेहमीप्रमाणे माझे प.पा.हृदय(पटकन पाघळणारे हृदय) पाघळले आणि हाताला येतील तितके पैसे मी तिच्या फडक्यावर टाकले.

घरापर्यंत येईपर्यंत वृद्धपणी आईवडिलांना बाहेर काढणाऱ्या मुलांच्या व्हॉट्स अप वर आलेल्या असंख्य पोस्ट्स माझ्या डोळ्यासमोर येत होत्या आणि आपण शक्य तितकी मदत आजीबाई ला करायची असा निश्चय मी मनाशी केला.

   दुसऱ्या दिवशी सकाळी साजूक तूप लावलेल्या पोळ्या,मोठा डाव भरुन भाजी बांधून घेतली आणि निघाले त्या बिचाऱ्या दुर्दैवी आजीबाईकडे! देवळाच्या कडेला ती फडके पसरुन बसली होतीच!

  

  एखादा दाता जरी छोटा असला तरी त्याचे देणे कधी कमी ठरत नाही या न्यायाने जरी मी पोळीभाजी नेली होती तरी ती त्या दुर्बल आजीसाठी महत्वाचीच आहे!या विचाराने मला खूप बरं वाटलं.

  येणाऱ्या जाणाऱ्या पुढे हात पसरणाऱ्या आजीच्या हातात मी व्यवस्थित पॅक केलेली ती पोळीभाजी ठेवली.

   'काय आहे हे?'आजीने खेकसून विचारले.आजीचा आवेश पाहून मी जरा गांगरलेच.

   'ताजी पोळीभाजी आहे.पोळ्यांना साजूक तूप लावलं आहे.तुम्हाला नीट पचण्यासाठी!'मी चाचरत म्हणाले.

   'पैशे असतील तर दे.कोण खाणार तुझी ती भाजी पोळी?'स्वरात जमेल तितकी तुच्छता आणत तिने पोळीभाजीचा पॅक दूर भिरकावला.

   मी हतबुद्ध होऊन तिच्याकडे बघतच बसले.

   'ताई लै माजोरडी हाये ती म्हतारी,'हा तमाशा बघणारा भाजी विक्रेता म्हणाला.

   'येव्हढी म्हतारी झालीय तरी खाण्याची वासना कमी नाही झाली.घरातले लोक कंटाळलेत तिला.रोज भीक मागून पैसे जमवते आणि वडापाव,भजी खाते.तिला तुमच्या हातचं खाणं आवडणार आहे का?'

    तेव्हापासून कानाला खडा लावलाय.भावनेच्या भरात पटकन कोणालाही मदत करायला जायचं नाही!प.पा.हृदयाला (पटकन पाघळणाऱ्या हृदयाला)पण मी हेच बजावते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract