Pratibha Tarabadkar

Horror Thriller

3  

Pratibha Tarabadkar

Horror Thriller

सेल्फी भाग -४

सेल्फी भाग -४

4 mins
208


रॉकीला आता रोजच ते भयानक स्वप्न पडू लागलं होतं.घरभर पाणी,त्यात आपण बुडतोय, श्वास गुदमरतो आहे आणि अचानक एक कवटी त्या पाण्यातून वर येते आणि भेसूर हसते हीssहीssहीss


रॉकी बेचैन झाला होता.रात्र रात्र झोप नाही,अस्वस्थपणे रात्रभर सिगारेटी फुंकत बसून रहायचं,

डोळ्यावर झापड आली तरी रॉकी झोपायलाच घाबरू लागला होता.

याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर दिसू लागला होता.डोळ्याभोवती काळी वर्तुळं,सतत केलेल्या धुम्रपानामुळे भूक मेली होती,बारीक खोकलाही येऊ लागला होता.कामावरचे लक्ष उडाले होते.त्याची गर्लफ्रेंड समुद्रात वाहून गेली हे कळल्यावर मॅनेजरने थोडे दिवस सहानुभूतीने वागवले पण असं किती दिवस चालणार? तोही आता रॉकीवर ओरडू लागला होता.

असाच एक दिवस रॉकी फूड पार्सल्सची डिलिव्हरी करायला त्याच्या बाइकवरुन चालला होता.सिग्नलला बाइक थांबवली होती आणि शेजारीच त्याच्या 'द अॅडव्हेंचर्स 'मधला त्याचा मित्र बंटी बाइकवर होता.बंटीचे लक्ष त्याच्याकडे गेले.


'अरे तू किती खराब झालायस?'बंटी म्हणाला.'इतकं मनाला लावून घेऊ नकोस,साराचं आयुष्य तेव्हढंच होतं म्हणून ती वाहून गेली आणि तू तिच्या शेजारी बसलास पण तुला काही झालं नाही.'

रॉकी खिन्नपणे हसला.तो थोडीच सांगू शकत होता की साराला मीच पाण्यात ढकललं म्हणून?

सिग्नल बंद झाला.बंटी बाइकवरुन जाता जाता ओरडला,'रॉकी, मंगळवारी सकाळी ७ वाजता टार्गेट आहे.तू बाणेश्वराच्या धबधब्याला ये ', आणि बंटी वेगाने निघून गेला.


रॉकी रात्री रुमवर आला.झोपायचं तर नव्हतंच.त्याने सिगारेट शिलगावली आणि तो विचार करू लागला, काय हरकत आहे परत 'द अॅडव्हेंचर्स 'मध्ये जायला लागले की मित्र भेटतील, जरा वातावरण बदलेल.

कदाचित सतत साराचा विषय निघत राहिल्यामुळे आपल्याला ते भयंकर स्वप्न पडत असेल.त्या भयंकर स्वप्नाची आठवण आली तशी तो शहारला.काहीही करुन आपण टार्गेट पूर्ण करायला जायचं म्हणजे जायचंच.त्या नुसत्या विचारानेच रॉकीला बरं वाटलं.त्याने दुसरी सिगारेट पेटवली आणि मंगळवारी असणाऱ्या टार्गेटचा विचार तो करू लागला.


मंगळवारी बाणेश्वराच्या धबधब्याजवळ सगळे जमले .बंटी,सनी,मिठ्ठू,प्रॅडी,सूझी आणि एक नवीन मुलगीसुद्धा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झालेली दिसत होती.


रॉकीला पाहिल्यावर सगळ्यांनी एकच जल्लोष केला.'वेलकम रॉकी,हमारे दोस्त ',म्हणत साऱ्यांनी खुषीने त्याचे स्वागत केले.साराचा विषय त्यांनी कटाक्षाने टाळला त्यामुळे रॉकीसुद्धा रिलॅक्स मूडमध्ये आला.

आजचा टास्क होता धबधब्याच्या टोकावर, जिथून पाणी खाली कोसळतं तिथपर्यंत जायचं.सगळेजण उत्साहात तयार झाले.आज मिठ्ठू सगळ्यात आधी धबधब्याच्या टोकावर जाऊन पोहोचला होता.सर्वांनी एकच जल्लोष केला.


ती नवीन मुलगी सुद्धा तयारीची दिसत होती.तिनेपण हा टास्क बऱ्यापैकी पूर्ण केला. मोनिका नाव होतं तिचं.फिल्ममध्ये काम शोधायला आलेली स्ट्रगलर होती अशी माहिती रॉकीला कळली होती.


सारेजण पांगले.आता पुढील टास्क त्यांना पंधरा दिवसांनी कळणार होता.रॉकीला जी मरगळ आली होती ती जाऊन त्याची जागा उत्साहाने घेतली होती.तो कामातही रस घेऊ लागला होता.त्याच्या लक्षात आले,ते भयानक स्वप्न खूप दिवसात पडले नाहीये आणि आपल्याला शांत झोप लागतेय.रॉकी हुशारला.कदाचित सतत साराचा विषय निघत राहिल्यामुळे आपल्याला ते स्वप्न पडत असावे असं त्याला वाटलं.रॉकीची तब्येतही झपाट्याने सुधारू लागली होती.


यावेळी 'द अॅडव्हेंचर्स 'तर्फे टास्क देण्यात आला, वेगाने येणाऱ्या नवभारत एक्स्प्रेस समोर सेल्फी काढून रेल्वे ट्रॅवरून बाजूला उडी मारायची.त्याप्रमाणे सारेजण सांगितलेल्या स्पॉटवर जमले.नवभारत एक्स्प्रेस जवळ येऊ लागली.सारेजण तयार होते.इतरांनी पटापट सेल्फी काढून बाजूला उडी मारली पण नवीन आलेली मोनिका ऐनवेळी गोंधळली आणि ब्लॅंक होऊन तिथेच उभी राहिली.रॉकीने प्रसंगावधान राखून तिला ट्रॅक वरून बाहेर ओढली.दोघेजण बाजूला कोसळले आणि नवभारत एक्स्प्रेस बाजूने धाडधाड करत निघून गेली.मृत्यू अगदी एका पावलावर आला होता पण रॉकीने तिला वाचवले होते.दोघेजण थोडावेळ ट्रॅकशेजारील गवतावर पडून राहिले.इतक्या वेगाने ही घटना घडली होती की त्या दोघांचे ऊर कितीतरी वेळ धपापत होते.मोनिकाने रॉकीचे पुन्हा पुन्हा आभार मानले.


त्या दिवसापासून कुठल्याही टास्कच्या वेळी मोनिका रॉकीच्या आसपास रहात असे.कदाचित त्यामुळे तिला दिलासा मिळत असावा.


हळूहळू साराची आठवण धूसर होऊ लागली होती.मोनिका आणि रॉकी एकत्र फिरू लागले होते.कधी बाइकवरुन सुसाट वेगाने लांबवर जात तर कधी कुठे कधी कुठे...


'रॉकी आपण तुळशीबाईच्या शिखरावर जायचं? मला खूप दिवसांपासून तिथे जायचं आहे पण नेहमी काहीतरी कारण निघतं आणि राहून जातं.तू तिकडे गेला असशील ना?'


'हो, मी पुष्कळ वेळा गेलोय त्या शिखरावर! खूप उंचावर आहे, दगडधोंड्यांनी भरलेल्या वाटेनं जायला जाम थ्रिलींग वाटतं.आपण जाऊया नक्की!'रॉकी तुळशीबाईच्या शिखरावर जाण्याच्या कल्पनेने उत्तेजित झाला होता.


रॉकी आणि मोनिकाने तुळशीबाईचा डोंगर चढण्यास सुरुवात केली.रॉकीने म्हटल्याप्रमाणे संपूर्ण वाट दगडधोंड्यांनी भरलेली,अवघड अशी होती.म्हणूनच कदाचित रॉकी आणि मोनिका सोडून त्या वाटेवर कोणीही नव्हतं.संपूर्ण चित्त एकाग्र करून ती वाट चालावी लागत होती कारण जागोजागी पाण्याच्या ओघळांनी निसरडी झालेली, निखळलेल्या दगडांमुळे अडथळा आल्याने चढायला अतिशय अवघड वाट होती .रॉकी आणि मोनिका कधी एकमेकांमागोमाग तर कधी हात धरुन चालत होते.जवळजवळ दोन तास लागले त्यांना वर चढायला.तुळशीबाईच्या शिखरावर पोहोचले आणि दोघांनी बसकणच मारली.ती कठीण चढण चढून एकदाचे शिखर पादाक्रांत केले होते त्यांनी!

रॉकी आणि मोनिका ते थोडावेळ स्वस्थ बसून राहिले.जरा जिवात जीव आला आणि ते दोघे उठून आसमंत न्याहाळू लागले.तुळशीबाईचे ते शिखर अत्यंत चिंचोळे होते.चारही बाजूला खोल खोल दऱ्या,सगळा प्रदेश रुक्ष,दूरवर पसरलेल्या डोंगररांगा....


'मोनिका',रॉकी जोरात ओरडला तशी त्याचे प्रतिध्वनी उमटले.मोनिकाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.


'ए रॉकी,चल ना आपण मस्तपैकी सेल्फी काढूया.'मोनिका लडिवाळपणे म्हणाली.


'नो प्रॉब्लेम ',रॉकी तिला चिकटून उभा राहिला.मोनिकाने दोघांच्या समोर मोबाईल धरला.

रॉकी हादरला.मोनिकाच्या जागी सारा दिसत होती.सारा....रॉकीची बोबडीच वळली.


'तुला काय वाटलं मी तुला अशीच सोडेन? धोकेबाज,लग्नाचं वचन देऊन समुद्रात ढकललंस मला? आता बघ मी काय करते ते!'मोनिका उर्फ सारा विकटपणे हसत म्हणाली.रॉकीचा थिजून दगड झाला होता.तो डोळे विस्फारून बघत राहिला.


मोनिका... नाही सारा हवेत विरघळू लागली.तिच्या हातातील मोबाईल धाडकन् जमिनीवर पडला.सारा अदृष्य झाली.


रॉकीला अचानक जोरदार धक्का मारला गेला आणि रॉकी त्या खोल दरीत कोसळला.....दरीत रॉकी धाडदिशी पडला.त्या आवाजाने पक्ष्यांनी घाबरून कलकलाट केला आणि मग सारे काही शांत झाले.


शांत..... शांत


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror