Pratibha Tarabadkar

Inspirational

3.4  

Pratibha Tarabadkar

Inspirational

युवाशक्ती

युवाशक्ती

2 mins
73


 मध्यंतरी माझ्या पुतण्याचे लग्न झाले.आधीच्या पिढीने साठी पार केली असल्याने सारा पुढाकार यंग ब्रिगेडने घेतला होता.अगदी बसमधून सामान काढण्यापासून सबकुछ.

थोड्या वेळाने पाहिलं तर ही सारी तरुण मंडळी शेरवानीत तर मुली छानपैकी मेकप, साड्या नेसून सीमांत पूजनासाठी तैय्यार ! त्या विधीसाठी सारी लगबग तरुणाईची होती आणि फक्त देखरेख अनुभवी ज्येष्ठ पिढीची.

   सीमांत पूजन आटोपले, आवराआवर झाली आणि एखाद्या नाटकातील सीन ट्रान्सफर व्हावा त्याप्रमाणे सगळा तरुणवर्ग परत टी शर्ट, बर्म्युडा,लेगिन्स,कुर्त्यामध्ये.दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता हळद लावण्याचा कार्यक्रम आहे हे ऐकून ज्येष्ठांमध्ये खळबळ उडाली पण तरुण मंडळी एकदम कूल होती.रात्रभर हल्लागुल्ला करुनही पहाटे पाच वाजता सारेजण तैय्यार! समस्त नवीन पिढीने पिवळेधमक कुर्ते परिधान केले होते ज्यावर 'शास्त्र असतं ते 'असा लक्ष वेधून घेणारा लोगो.फक्त नवरा मुलगा पांढऱ्या कुर्त्यात!त्याच्या त्या नव्या पांढऱ्या कुर्त्यावर हळदीच्या हाताने पंजे उमटवताना बघून समस्त जुन्या पिढीतील स्त्रिया हळहळत होत्या,'एखादा जुना शर्ट तरी घालायचा ना,आता हा नवाकोरा कुर्ता वाया जाईल '.

    नवरी मुलगीही पांढरे कपडे घालून, छान फुलांचे दागिने घालून हळदीसाठी आलेली.मुलाकडच्या तरुण मंडळींनी तिला आपल्या घोळक्यात बोलावून नेले आणि लागले की हो झिंगाटच्या तालावर नाचायला! नवरी मुलगीही त्यांच्याबरोबर नाचताना त्या मंडळींशी असलेला अंतराय कधी गळून पडला आणि ती सासरच्या माणसांमध्ये कधी एकरुप झाली कळलंच नाही.

   त्यानंतर लगेचच एका संस्थेच्या संमेलनास उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. तेथे ज्येष्ठ,अनुभवी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे पस्तीस,चाळीशीचे स्वयंसेवक होते.गुलाबी कुर्ता परिधान केलेले ते तरुण वेगाने इकडून तिकडे वावरत होते.अती ज्येष्ठ मंडळींना हाताला धरून अदबीने खुर्चीवर बसवत होते,सर्वांशी नम्रतापूर्वक बोलत होते.स्त्री स्वयंसेविकाही सुंदर भरजरी साड्या लेवून संमेलनाची स्टेजमागील बाजू सांभाळत होत्या.बरं हे सारेजण उच्चविद्याविभूषित, ऑफिसमध्ये मोठमोठ्या जबाबदारीची कामं संभाळणारे पण त्याबद्दलच्या अहंकाराचा लवलेशही नव्हता.सारेजण एकजुटीने, एकदिलाने काम करीत होती.आपलं संमेलन यशस्वी कसं होईल याकडेच साऱ्यांचे लक्ष होते. असे तरुण स्वयंसेवक जर संस्थेला लाभले तर संस्था लवकरच प्रगतीचा आलेख उंचावेल यात शंका नाही.

   ही सगळी दृश्य अनुभवताना वाटले,आपण उगाचच तरुण पिढीच्या नावे ओरडत तर नाही ना?सतत नकारात्मक विचार फैलावणाऱ्या समाजमाध्यमांचा आपल्यावर प्रभाव तर पडत नाही ना ?तरुणांची शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत,समन्वय (co ordination), एकमेकांच्या संपर्कात रहाण्याची कला आपण कधी लक्षातच घेत नाही का? त्यांच्या पोशाखाला नावं ठेवणारे आपणही आपल्या आधीच्या पिढीपेक्षा वेगळे पोशाख करत होतोच ना!बेलबॉटम,टाईट पॅंट घालून कपाळावर झुलपं वागवणारे तरुण आणि साड्यांऐवजी मुलीही सर्रास पंजाबी ड्रेस आणि गाउन घालत होत्या,वेण्यांऐवजी केस कापून पोनिटेल बांधत होत्याच ना!मग त्यांचे बोलणे,वागणे आपल्याला का बरं खुपतं? कारण समाजमाध्यमांचा नकारात्मक मारा आणि सर्वात मुख्य म्हणजे दोन पिढ्यांतील अंतर. म्हणजे नवीन पिढी बिघडलेली नसून त्यांच्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनात फरक आहे.

    आता माझी तरुणांकडे बघण्याची दृष्टीच बदलली आहे. मिरवणुकीत गळ्यात अवजड ढोल बेभानपणे वाजवणारी फेटेवाली मुलं मुली आशादायक वाटतात तर ९ वारी साडी,नाकात नथ घालून बाईक चालवणाऱ्या मुली आपल्या परंपरा जोपासून त्यांची पाठराखण करणाऱ्या वाटतात.

 एकंदरीत भारतीय युवाशक्तीचं चित्र आशादायी वाटतंय


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational