Pratibha Tarabadkar

Drama

3  

Pratibha Tarabadkar

Drama

अजि आणि माजी भाग - ३

अजि आणि माजी भाग - ३

4 mins
205


अजि आणि माजी भाग -३


  आई आल्यापासून नम्रता वेळेवर उठून अंघोळ, पूजा आटोपत असे.लग्नाला इतकी वर्षं झाली तरी मनावर आईचा धाक अजून अस्पष्टपणे होताच!

  सोनूला रोजच्या प्रमाणे आर्जवी स्वरात उठवून झाले.'आई,आज तू स्वयंपाक करू नकोस.आपण हॉटेलमध्ये लंच करू.'सोनूने फर्मान काढले.नम्रता तिला अगं, अगं करेपर्यंत सोनूने आईच्या मोबाईलमध्ये सर्च करायला सुरुवातही केली.

  'आई मी फूडकोर्ट मध्ये तिघांचं टेबल बुक करते आहे.दुपारी एक वाजता लंच घ्यायला जाऊ.'आणि ती अंघोळीला गेली.शुभाआजी काही वेळ गप्प गप्प होती.मग तिने नम्रताला विचारले,'तुला पटलं सोनूचं वागणं?'

  'नाही ना,पण काय करू,ऐकतच नाही ती!'

  'कारण तिला माहित आहे,आई एखादेवेळी रागवेल पण थोडा हट्ट केला की गुपचुप शरण येईल.नम्रता, मुलांना लहानपणापासूनच नकाराची सवय लावावी लागते.नाही म्हणजे नाही असा ठामपणा दाखवला की मुलांना समजतं की हट्ट पुरवला जाणार नाही.मग ते हळूहळू नकार पचवायला शिकतात.मुलांशी मित्रत्वाने वागावं वगैरे सगळं काही ठीक आहे पण जेव्हा त्यांची जडणघडण होत असते तेव्हा योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव होणं अतिशय आवश्यक असतं.सतत मुलांना नजरेच्या धाकात ठेवू नये पण फार सैल ही सोडू नये.'नम्रताने निमूटपणे मान हलवली.'आई पुढच्या वेळी मी नक्की लक्षात ठेवेन पण आता सोनूने टेबल बुक केलंय तर जाणं भाग आहे ना.'

   नम्रताने ओला बुक केली आणि तिघीजणी फूड कोर्ट ला पोहोचल्या.एकदम पॉश हॉटेल दिसत होते ते.सोनू सराईतपणे आपले बुक केलेले टेबल शोधून बसली आणि मेन्यू कार्ड मन लावून वाचू लागली.

'मला फक्त डाल खिचडी. मसालेदार पदार्थांनी हल्ली त्रास होतो.'शुभाआजीने जाहीर केले आणि मोबाईल काढून ती त्या हॉटेलचे फोटो काढू लागली.

  'आई,हॉटेलचे फोटो का काढतेयस?'नम्रताने आश्चर्याने विचारले.

   'अगं ती नीलू आहे ना,माझी मैत्रीण, ती उठसूठ फोटो टाकत असते व्हॉट्स ॲप वर.आज इकडे गेलो, तिकडे गेलो...सारखी भाव खात असते म्हणून तिला पाठवते हे फोटो '.

   'ओ आजी तुम्ही अजून या वयात सुद्धा एकमेकींना जेलस करता?'सोनूने डोळे विस्फारले.

  'मग, या वयात म्हणजे?मी काय म्हातारी झालेय का?'शुभाआजीने सोनूकडे बघून डोळे मिचकावले.

   'अरे देवा, हे काय?सेल्फी म्हणून मी समोरच्या वेटरचा फोटो काढून त्या निलीटलीला पाठवला की काय?'शुभाआजी ओरडली.'काही हरकत नाही,तो हॅंडसम हंक मला आवडला म्हणून त्याचा फोटो पाठवला असं लिहीते तिला ', असं म्हणत शुभाआजी मोबाईलवर बोटं फिरवू लागली.

  'कमाल आहे आजी तुझी , सेल्फी म्हणून सरळ समोरच्या वेटरचा फोटो घेतलास?'

  'कमाल ती नाही सोनू, कमाल याची वाटायला हवी की पन्नाशी ओलांडल्यावर प्रथमच मोबाईलशी परिचय होऊनही ते नवीन यंत्र समजावून घेऊन हॅंडल करणे.जन्मल्यापासून कॉंप्युटर, मोबाईल हाताळणाऱ्या तुम्हाला कळणार नाही हे आत्मसात करायला आम्हाला किती धडपड करावी लागली ते!'

   नम्रताने पण मनोमन कबूल केलं,आई बाबांना किती जिद्दीने शिकावं लागलं ते!त्यांची धडपड तिने स्वतः पाहिली होती.

   'आजी, तुझ्या लहानपणीच्या गमतीजमती सांग ना ',सोनू आजीच्या खनपटीस बसली.'अगं , त्या काय अरेबियन नाईटस् आहेत का?'

   'हो आज्जी, मला त्या अरेबियन नाईटस्च वाटतात.कित्ती मज्जा होती ना! तुमच्या कडे सुट्टीत खूपजण यायची ना मग प्रत्येकाला बेड कसा पुरवायचे तुम्ही लोकं ', सोनूचं तुटकंफुटकं मराठी ऐकून आजीने कपाळाला हात लावला.

    'कसले आलेत बेड डोंबलाचे!घरात ढीगभर माणसांना कुठून पुरवणार या सुखसोयी? आमच्या कडे ठरलं होतं, दिवाळीच्या सुट्टीत एका लाईनीत गाद्या घालायच्या कारण थंडी असायची आणि!उन्हाळ्यात भलीमोठी सतरंजी 

 अंथरायची.सगळे एका लाईनीत झोपायचे.पण खरं सांगू, खूप मजा यायची गं तेव्हा.कोण श्रीमंत आणि कोण गरीब असे संदर्भच कधी आले नाहीत.सब घोडे बारा टक्के!दिवसभर हुंदडल्यावरही रात्री लवकर झोप यायची नाही.भुतांच्या गोष्टी, गाण्याच्या भेंड्या...नुसती मज्जाच मज्जा!'

   'किती लकी होतीस ना गं आज्जी तू !'

  'हो ना, हल्ली हम दो,हमारा एक मुळे असे नातेवाईक,काका,मामा,आत्या, मावशी वगैरे नातीच नाहीत.'शुभाआजीने नम्रताकडे तिरका कटाक्ष टाकत टोमणा मारला.नम्रताने आईकडे दुर्लक्ष केले.आईला काय माहिती,एकच सांभाळताना कसे नाके न ऊ येतात ते!'

  शुभाआजी उद्या जाणार,बघता बघता चार दिवस कसे उडून गेले जणू!सोनूचा मोबाईलचा टाईम असल्याने ती तिच्या खोलीत गडप झाली होती.

   'आई, मी बोलू की नको मला कळत नाहीये...बोलू का?'

'अगं नम्रता आता आईला कसली घाबरतेस? तूसुद्धा एका मुलीची आई आहेस,विसरू नकोस,'आई हसत हसत म्हणाली.

  'आई, आमच्या लहानपणी तू किती कडक होतीस, मी आणि दादा तर तुला डेंजर म्हणायचो पण आता फारच बदलली आहेस.सोनूशी मनमोकळ्या गप्पा मारतेस, गमतीजमती सांगतेस मग आमच्या वेळी एव्हढी स्ट्रीक्ट का होतीस?'

   आई थोडावेळ गप्प बसली.शब्दांची जुळवाजुळव करत असावी कदाचित.

  'नम्रता, मी तुमची आई होते त्यामुळे मनावर सतत दडपण असायचं,आपण मुलांना नीट शिस्त लावतोय ना, मुलं अभ्यास व्यवस्थित करतील ना,त्यांचा भविष्यकाळ कसा असेल वगैरे वगैरे.पण जसजसं वय वाढतं, अनेक प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं , टप्पे टोणपे खावे लागतात तसतसा माणूस प्रगल्भ होत जातो.आपण ज्याची काळजी करत बसतो ते एव्हढं काळजी करण्याजोगं नव्हतंच याची जाणीव होते आणि त्या टप्प्यावर जीवनातल्या आनंदाचं महत्व कळायला लागतं.माझंपण काहीसं असंच झालं असावं कदाचित.त्यामुळे मी तुला अधिक आनंदी, अधिक मोकळी वाटत असेन.तू जेव्हा तो टप्पा गाठशील तेव्हाच तुला मी काय म्हणतेय ते समजेल.बरं आता रात्र बरीच झालीय, उद्या सकाळी लवकर निघायचंय बससाठी.सोनू पण मला सोडायला येणार आहे असं तिने मला प्रॉमिस केलंय.जा बघून ये ती काय करतेय ते! मुलांना वेगळी खोली असली तरी ती काय करताहेत यावर लक्ष ठेवायला हवं',

शुभाआजी परत मूळ पदावर आली होती.सतर्क,सावध! अगदी माझ्या लहानपणी होती तशीच! नम्रता खुद्कन हसली आणि सोनूच्या खोलीकडे वळली.


समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama