Pratibha Tarabadkar

Abstract

4  

Pratibha Tarabadkar

Abstract

आजी आणि माजी भाग -१

आजी आणि माजी भाग -१

2 mins
434


नुकतंच जेवण करून, आवराआवर करून नम्रता मोबाईल मध्ये डोकावत होती तेव्हढ्यात तिचा फोन वाजला.

   'अगं नम्रता, मी उद्या सकाळी तुझ्या कडे येतेय.'नम्रताची आई शुभा बोलत होती.

   'ये ना,एकटीच येते आहेस?बाबा नाही येणार?'

   'नाही गं,ते त्यांच्या मित्रांबरोबर चार दिवस ट्रीपला जाणार आहेत मग म्हटलं, आपणसुद्धा लेकीकडे जाऊन राहू.तुझ्या दादा वहिनीला तेव्हढंच औटघटकेचं स्वातंत्र्य! नम्रताला आईच्या चातुर्याचं कौतुक वाटलं.

   'मी तुला बसस्टँडला घ्यायला येते ', असं म्हणून नम्रताने फोन ठेवला आणि आपला मोर्चा सोनू कडे वळवला.

 सोनू पोटावर पडून मोबाईल बघत होती.कोरोनात online school मुळे सोनूला मोबाईल घेऊन द्यावा लागला होता. तेव्हापासून दिवसातून तासभर मोबाईल बघायची सोनूला परवानगी द्यावी लागली होती.

   'सोनू, आताच शुभाआजीचा फोन आला होता.ती उद्या सकाळी आपल्याकडे येणार आहे तीनचार दिवस रहायला.'

   'ओह शीट',सोनूने तोंड वाकडे केले.

    'इतकं तोंड वाकडं करायला काय झालं गं?'नम्रताने सोनूच्या पाठीत धपाटा घातला.

  'मग? मागच्या वेळी बाबांची आई,शीलाआजी आली होती तिने किती बोअर मारलं होतं, सारखं सोनू डोंट डू धिस,सोनू डोंट डू दॅट, सारख्या सूचना...'शीलाआजीबद्दल सोनूच्या तक्रारी ऐकताना नम्रताला थोड्या गुदगुल्याच झाल्या.शेवटी सासू सुनेचं नातं होतं ते! कितीही सुशिक्षित म्हटलं तरी नातं थोडीच बदलणारे?पण वरकरणी खोटं खोटं रागवत तिने सोनूला अलगद चापटी मारली.'आजीला असं म्हणतात का?'

    ' तूच म्हणत असतेस ना सारखी,बाबा कामासाठी यूएस ला गेल्यापासून किती एकटं एकटं वाटतंय म्हणून!'

   'आणि शुभाआजीसमोर ही अशी वीतभर चड्डी घालून बसू नकोस बाई नाहीतर तासभर लेक्चर ऐकावं लागेल मला तुझ्या शुभाआजीचं.'

  आपल्या समोर गुरगुरणारी आपली आई तिच्या आईला कशी टरकते हे लक्षात येऊन सोनू खुदूखुदू हसली.

  'फॉर युवर काईंड इन्फर्मेशन मॉम,धिस ईज नॉट वीतभर चड्डी,ईट ईज कॉल्ड शॉर्ट्स!'

  'तेच ते, काही म्हटलं तरी आकारात बदल होणार आहे का?नीट अंगभर कपडे घालत जा आणि माझ्या आईसमोर असं काही वाह्यातासारखं बडबडू नकोस.'नम्रताच्या सूचना संपतच नव्हत्या आणि तिची उडलेली भंबेरी सोनू एंजॉय करत होती.

   तशी शुभाआजी तिची आवडती आजी होती.गोष्टी रंगवून सांगण्याची शुभाआजीची हातोटी होती,दोघींचं छानपैकी गुळपीठ होतं पण सोनू वयात आली आणि नम्रता,सोनूची आई फारच संवेदनशील झाली.सोनूने कसं वागावं याबद्दल ती फारच जागरूक झाली आणि डोळ्यात तेल घालून आपल्या लेकीवर लक्ष ठेवू लागली . आपल्या आईसमोर ही नुकतीच वयात आलेली लेक कशी वागेल याबद्दल ती साशंक होती.

   शुभाआजीला बसस्टँडवरुन नम्रताने पिकप केलं आणि शुभाआजीने लेक आणि नातीच्या घरी प्रवेश केला.

 

क्रमशः 


   


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract