संस्कार भाग -२
संस्कार भाग -२
भाग -२
कंडक्टरने बेल मारली आणि एस्टी निघाली मुंबईच्या दिशेने.
सरु वेगाने मागे सरणाऱ्या खांबांवरील दिव्यांकडे बघत होती.रात्रीच्या त्या शांत आणि अंधाऱ्या रस्त्यावर बघण्यासारखे काहीच नव्हते. बोचऱ्या वाऱ्यामुळे बसच्या सगळ्या खिडक्या बंद केल्या होत्या.जे काही मोजके प्रवासी होते ते सारे डुलक्या घेत होते.शेजारच्या सीटवरील ज्ञाना तिच्यावर कलंडून केव्हाच गाढ झोपला होता.आपलं पोरगं बाराव्या वर्षीच पोरकं झालं.आता भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ते पांडुरंगालाच ठाऊक! विचारांच्या उलटसुलट आवर्तनात कधी डोळा लागला सरुला कळलंच नाही.
एस्टीच्या घंटीने सरुला जाग आली.नुकतेच फटफटू लागले होते.बसमध्ये गर्दी वाढली होती.पाठीवर बॅग लावून अंघोळ केल्याने ताजीतवानी दिसणारी माणसं बसमध्ये चढत होती.वातावरणात कसलातरी सूक्ष्म दुर्गंध सरुला जाणवत होता.रस्त्यावर गणवेश घालून शाळेला जाणारी मुलं दिसत होती.इतक्या सकाळी सकाळी एव्हढी गर्दी,एव्हढा गोंधळ! मुंबई आली की काय? सरुला मुंबईचं प्रथमदर्शन होतं होतं.इथे आपला निभाव कसा काय लागेल? सरुच्या चिंतेने परत डोकं वर काढलं.
कंडक्टर बसमध्ये नव्याने चढलेल्या माणसांना तिकीटं देऊन सरुजवळ आला. 'आक्का,तू त्या उमेशला नीट वळखतेस ना?'
'व्हय. ज्ञानाच्या बाबाचा मैतर हायती.गावाला आले की घरी यायचे आम्हास्नी भेटाया '.
'मंग ठीक हाय.आक्का तू काय बी काळजी करू नगंस.या मुंबईत काम करनारं कुनी बी उपाशी मरत न्हाई.'
'त्ये खरं पर मानसं कशी आसतील या इचारानं लय भ्या वाटतं.'
'आक्का, मानसं काय, चांगली वाईट समदीकडंच असत्यात.आपन वळखून -हायचं.'
कंडक्टरभाऊंचं बोलणं सरुला पटलं. आपल्या वीतभर गावातसुद्धा जीवावर उठलेला घेलाशेट होता आणि स्वतः चा जीव धोक्यात घालून आपल्याला वाचवणारे विजयभावोजी आणि रंजना होतेच की!
आजूबाजूच्या कोणाचंही लक्ष त्या दोघांच्या बोलण्याकडे नव्हतं. सारेजण मोबाइलमध्ये नजर रोखून बसले होते.सरुला त्यांच्या या वागण्याचं नवलच वाटलं.आजूबाजूच्या गडबडीनं ज्ञानाही चुळबुळू लागला होता.
शेवटचा स्टॉप आला आणि बघता बघता बस रिकामी झाली.बसमध्ये उरले फक्त कंडक्टर,सरु आणि ज्ञाना.पाच मिनिटातच बसच्या दारातून कोणीतरी डोकावले आणि सरुला हुश्श झाले.उमेशभावोजी होते ते!स रु आणि ज्ञानाला पाहून उमेश बसमध्ये चढला.सरु आणि ज्ञाना उठून उभे राहिले.
'भाऊ,हे उमेशभावोजी,'सरुने दोघांची ओळख करून दिली. त्यांनी एकमेकांना नमस्कार केला.
'उमेशभाऊ, आक्का आणि छोट्याला तुमच्याकडे सोपवली.आता खऱ्या अर्थानं माझी ड्यूटी संपली.'कंडक्टर आपली पैशांची पेटी घेऊन खाली उतरला.सरु इतकी भांबावली होती की त्याचे आभार मानायचेही तिला सुचले नाही.
'काय झाली का झोप? उमेशकाकाला ओळखलंस की नाही?' डोळे चोळत इकडे तिकडे मिटीमिटी बघणाऱ्या ज्ञानाला उमेशने हसत हसत विचारले आणि सरुने धरलेल्या पिशव्या हातात घेऊन बसमधून उतरला.सरु ज्ञानाचा हात घट्ट पकडून बसमधून उतरली. ती गर्दी,तो कोलाहल पाहून तिचा जीव दडपला.आपला निभाव इथे कसा लागेल या विचाराने तिला सूक्ष्म कंप सुटला.
'समता नगर,'रिक्षात बसत उमेशने ड्रायव्हरला सांगितले आणि रिक्षा त्या दिशेने धावू लागली.
क्रमशः
