संस्कार भाग -३
संस्कार भाग -३
रिक्षा समता नगरच्या दिशेने धावू लागली.रस्त्यात हीss गर्दी होती.जणू माणसांचा समुद्रच.जिकडे पहावे तिकडे माणसं!त्यात बायकाही खांद्याला पर्स लावून कुठेतरी पळत चालल्या होत्या.रिक्षा, मोठमोठ्या बसेस,दोन चाकी सगळा कालवा चालला होता.विस्फारल्या नजरेने सरु आणि ज्ञाना हे दृश्य पहात होते.
रिक्षा थांबली आणि दोघे भानावर आले.समोर एक मोठी पाटी बांबूच्या आधाराने उभी होती.'समता नगर' बाजूला भलामोठा उकीरड्याचा ढीग होता.तीन चार भटकी कुत्री आणि दोन तीन बाया त्या ढिगाऱ्यापाशी उभ्या होत्या.
उमेशने रिक्षाचे पैसे दिले आणि दोघांना चला असा इशारा केला.दोघे हातात पिशवी घट्ट पकडून उमेशच्या मागून चालू लागले.समोरासमोर दोन लांबलचक चाळी उभ्या होत्या.इतक्या जवळ की या चाळीतल्या बाईने चहाचा कप समोरच्या चाळीत नुसता हात पुढे करून द्यावा. तिघे मधल्या चिंचोळ्या पट्टीतून चालत उमेशच्या घरी पोचले.
'या सरुबाई आणि ज्ञाना किती मोट्टा झालास रं!आन् उंचबी झालाय!' शोभीनं, उमेशच्या बायकोनं दोघांचं स्वागत केले.' बसा च्या ठिवते म्हणत ती आत गेली.वीतभर न्हाणीमध्ये सरु आणि ज्ञानाने हात पाय खंगाळले.आता त्यांना या सगळ्याची सवय करून घ्यावी लागणार होती.
'सरुबाई माला डूटीवर जावं लागतं हॉस्पिटलात तवा म्या समद्यांचा सैंपाक करून ठिवला आहे.मला आता निघाया होवं.आल्यावं निवांत बोलू ',शोभीनं उमेश,ज्ञाना आणि सरुपुढे चहा, पोहे ठेवत म्हटले.सरुनं आ वासला.'आनि पोरीला कुटं ठिवतीस मंग?'
'आमच्या बाजूवाल्या मावशी सांभाळत्यात तिला.आगदी मायेनं करत्यात तिचं.हां पण फुकट न्हाई बरं का,पैकं देते मी त्यांना म्हैन्याचं ',असं शोभा म्हणेपर्यंत तिची मुलगी शीतल उठली.
'रिकाम्या हातानं आले बग.पोरीला काय बी आनलं न्हाय,'सरु चुटपुटली.
'अवं,तुमी जीवानिशी आलात ह्येच खूप झालं.न्हाईतर त्यो घेलाशेट तुमाला....'
'शोभे किती वटावटा करतीस,जायाचं हाय न्हवं डूटीवर?'उमेशने शोभीचं बोलणं अर्ध्यावर तोडले.शोभी चपापली आणि पटापट काम उरकायला लागली.
काय म्हणत होती शोभी? तो घेलाशेट मला काय करणार होता? सरु विचारात गुरफटली.
'वैनी,तुमी आणि ज्ञाना आवरुन, जेवून बिनघोर झोप काढा.रात्रीचं जागरण झालं आहे. संध्याकाळी मी आणि शोभा परत येऊ तेव्हा बोलू.मी आता कामावर जातो.'उमेश गेला.सरुने दाराला आतून कडी लावली.
'आये,आपण घरला कदी जायाचं? माला मुंबई अजाबात आवडली न्हाई.समदीकडे मान्संच मान्सं. काकाचं घर बी किती ल्हान हाय.भाईर खेळाया जागाच न्हाई ',ज्ञानाची किरकिर सुरू झाली.
'ज्ञाना,माज्या लेकरा,आरं आपलं गाव सोडून उगाच आलोय का आपन मुंबईला?'सरु ज्ञानाची समजूत काढत म्हणाली.
संध्याकाळी दार वाजले.सरुने उघडले तर शोभी छोट्या शीतलला कडेवर घेऊन उभी होती. शीतलला उचलून घेत सरुने तिचा पापा घेतला.'लैच गोड दिसतिया ', शीतलला कुरवाळत सरु मायेनं म्हणाली.
'नुस्ती दिसायला गोड,मस्ती इचारा तिची!'शोभी कृतक् कोपाने म्हणाली आणि आत शिरली.
'सरुबाई,ह्ये काय हो,घर एकदम आवरुन ठिवलंया ',शोभी आजूबाजूला नजर फिरवत म्हणाली.
'आगं बसून बसून लैच कट्टाळा आला म्हनलं काय तरी करावं '
'आनि सैंपाक पन करून ठिवलात?'कशाला एव्हढं केलंत सरुबाय,आता तुमचं भावोजी आलं की मला ओरडत्याल.'
दमलेल्या शोभीला जरा निवांतपणा वाटला.तितक्यात उमेशही आला.
'आगं आज सरुवैनीआल्यात आणि त्यांना कामाला लावतीस व्हय ', म्हणून शोभीला बोलला.
जेवण झाल्यावर ज्ञाना शीतल बरोबर खेळत बसला. शोभी,उमेश आणि सरु बोलत बसले. सरुच्या मनात ठुसठुसणारा प्रश्न सरुने विचारला.
'काय गं शोभे, घेलाशेट काय करनार हुता आमाला?'
'आवं काय सांगू वैनी, तुमाला त्यो वेसवेच्या कोठ्यावर विकनार होता आन् ज्ञानाला वेठबिगार म्हनून श्येतावर ठिवनार हुता.'
'काय?',सरुच्या भोवती घर गरगर फिरू लागले. उमेश बायकोला चूप बसण्यासाठी खाणाखुणा करीत होता पण शोभाच्या तोंडून शब्द निघून गेले होते.आता खरं काय घडलं ते विस्ताराने सांगणं भाग होतं.
'सरुवैनी, त्या घेलाशेटचा घरगडी आहे ना बुधा,त्याने चोरुन ऐकलं होतं.घेलाशेटच्या मुनिमाने दलालाशी बोलून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तो दलाल येणार होता हे कळल्यावर घरचं सामान घेण्याच्या निमित्ताने बुधानं विजयच्या दुकानात येऊन ती बातमी विजयला सांगितली त्याबरोबर विजयने मला फोन केला आणि मी आणि विजयने तुम्हाला रातोरात गुपचुप मुंबईला आणायचे ठरवले.आता इथं तुमच्या जोगं काम बघायचं आणि ज्ञानाला शाळेत घालायचं असा विचार आहे.'
सरु स्फुंदून स्फुंदून रडू लागली.तिने उमेशचे पाय धरले.
'अहो काय करताय वैनी तुमी?',उमेशने चटकन् पाय मागे घेतले.'मी माझं कर्तव्यच केलं.पुंडलिक आमचा जवळचा मित्र,त्याच्या बायको, मुलाची नीट काळजी घ्यायला नको?'
'तुमाला वाटलं भावोजी आमची काळजी घ्यावी म्हनून,पन ज्ञानाच्या बापाला न्हाई वाटलं जीव देताना, आपल्या मागं आपल्या बायको पोराचं काय हुईल म्हनून?'सरु कडाडली. आपल्या आईचा आवाज वाढलेला ऐकून ज्ञाना शीतलशी खेळणं सोडून आई काय म्हणतेय ते ऐकू लागला.
'जीव देनं सोपं असतं हो भावोजी,कठीन असतं ते संकटाशी लढनं,न भेता त्याच्याशी चार हात करनं ',सरु आवेशाने गर्जत होती.ज्ञाना थक्क होऊन आईचे हे रणरागिणीचे रूप बघत होता.इतके दिवस कधी उंच आवाजातही न बोलणाऱ्या आपल्या आईविषयी त्याला आदर वाटला.आपल्या बापासारखी कच खाऊन जीव न देता आयुष्यात संघर्ष करायला तयार असणाऱ्या आपल्या आईचा हा संस्कार आपल्यात बाणवण्याचा निश्चय नकळतपणे ज्ञानात रुजला.
'सरुवैनी एक काम मी तुमच्यासाठी शोधलंय.बघा तुम्हाला पटतंय का !'
'कंचंभी काम असंना म्या करायला तैय्यार हाय.'
उमेश कामाचं स्वरूप सरुला सांगायला लागला.
