याची देही याची डोळा
याची देही याची डोळा
पितृपक्ष आला की जुन्या परंपरांची यथेच्छ टवाळी करणे,कावळ्यांचे फोटो आणि त्यावर विनोद करणे अगदी सर्रासपणे केले जाते.पण आज जे लिहीत आहे ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.
साधारण पंधरा वर्षांपूर्वी माझ्या सासऱ्यांचे वृद्धापकाळाने गावी निधन झाले.त्यांचे मरणोत्तर विधी गावातील अतिशय प्रशस्त आणि रमणीय घाटावर करण्यात आले.अर्थात तो घाट जरी रमणीय असला तरी तेथे चालणाऱ्या विधींमुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कोणीही येत नाही.
घाटावर अनेक मोठमोठे वृक्ष आहेत.वड,पिंपळ,चिंच इ.चे ! वृक्षांवर अनेक पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता.चिमण्या,कबुतरे,साळुंक्या फांद्यांवर बसलेले होते पण यापैकी एकही पक्षी खाली घाटावर उतरलेला नव्हता.इतके पक्षी होते पण कावळा मात्र दिसत नव्हता.
विधी करणाऱ्या गुरुजींनी भांड्यात पाणी घेऊन नदीच्या दिशेने पाणी शिंपडत मंत्र पुटपुटला आणि काय आश्चर्य, दोन कावळे नदीवरून उडत उडत घाटावर आले.माझ्या सासऱ्यांच्या पिंडाला चोच मारली आणि जवळील बोळक्यातील पाण्यात चोच बुडवून उष्टावून ते बोळके पायाने ढकलले.
शेजारीच एका आजींचे विधी चालले होते पण कावळे झाडावरून उतरायला तयार नव्हते.तासभर चुचकारुन झालं पण कावळे आपले ढिम्मच! शेवटी गुरुजींनी विचारले की आजींची कुठली इच्छा अपूर्ण राहिली आहे का? तेव्हा त्यामधील एक स्त्री म्हणाली, माझ्या आईला जिलबी खायची इच्छा झाली होती पण ती आणण्यापूर्वीच तिचं निधन झालं.ताबडतोब गुरुजींनी एका मुलाला जिलबी आणण्यास पिटाळले.थोड्याच वेळात जिलबी आली.गुरुजींनी ती पिंडावर ठेवताच काय आश्चर्य,कावळा फांदीवरून उतरला आणि त्याने जिलबीवर झडप घातली.
वाचकहो, तुम्हाला शंका येईल की ही गोष्ट सत्य आहे का पण हे सर्व मी याची देही याची डोळा पाहिले आणि अनुभवले आहे.
काही जण काहीही म्हणोत बापडे पण आपले पूर्वज बुद्धिमान होते हे मानायलाच हवं.