Pratibha Tarabadkar

Crime

4  

Pratibha Tarabadkar

Crime

सेल्फी भाग -३

सेल्फी भाग -३

3 mins
317


पाण्याचा पडदा दूर झाल्यावर सनीला जाणवले की रॉकी एकटाच खडकावर बसला आहे.सारा दिसत नाहीये.मग सारा गेली कुठे? तिला तर पोहोता येत नाही.रॉकी बधीर होऊन बसला आहे...साराचं काही बरं वाईट....?

   सनीने रॉकीला हाका मारल्या पण समुद्राच्या लाटांच्या गर्जनेत त्याच्या हाका रॉकीपर्यंत पोहोचत नसाव्यात.सनीने समुद्रात शिरुन त्या खडकापर्यंत जायचे ठरवले.आपला कॅमेरा सांभाळत सनी कसाबसा रॉकीपर्यंत पोहोचला.रॉकी विषण्णपणे त्या खडकावर निश्चल बसून राहिला होता.

  'रॉकी,'सनीने रॉकीला गदागदा हलविले पण रॉकी अनोळखी नजरेने त्याच्याकडे बघत होता.

   'सारा.... सारा कुठेय?'

  ' सारा......सारा गेली ', रॉकी समुद्राकडे बोट दाखवत होता.

   'अरे अशी कशी गेली?'

  'अं 'रॉकी खुळ्यासारखा त्याच्याकडे बघत राहिला आणि अचानक समुद्रात उडी मारायची अॅक्शन करू लागला.सनीने त्याला घट्ट धरून ठेवले.आणि हात पकडून कसेबसे किनाऱ्यावर आणले.किनारा आल्यावर रॉकीने जमिनीवर अंग टाकले आणि तो गडाबडा लोळू लागला.किनाऱ्यावर जे मोजके लोक उपस्थित होते ते त्याच्याभोवती गोळा झाले आणि काय झालं याची चौकशी करू लागले.सनीने रॉकीबरोबर सारा नावाची मुलगी होती ती समुद्रात वाहून गेली हे सांगितल्यावर सारेजण हळहळले आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला.

    थोड्या वेळाने सनीने रॉकीला हात देऊन उठवले व त्याला घेऊन तो पोलीस स्टेशनकडे जाऊ लागला.रॉकीने आपला भार सनीच्या खांद्यावर टाकला आणि विनमस्क भाव चेहऱ्यावर ठेवून चालू लागला.मनातल्या मनात त्याने स्वतःची पाठ थोपटली.काय अॅक्टींग केलीये आपण!साराला पाण्यात ढकलून आपणच मनाला धक्का बसल्याचं नाटक करतोय! सिनेमात ट्राय करायला हरकत नाही.

     पोलीस स्टेशनमध्ये इ.पवार आपल्या हाताखालच्या माणसांना सूचना देण्यात मग्न होते.रॉकीला धरुन सनी पोलीस स्टेशनमध्ये शिरला.दोघांनीही बाकावर बसकण मारली.

    'काय तक्रार आहे?'हवालदार माने सनीवर खेकसले.आधीच कामाचा ताण आणि वरुन ही कटकट...

    'साहेब,हा माझा दोस्त रॉकी,याची गर्लफ्रेंड सारा समुद्रात वाहून गेली ',सनी एका दमात म्हणाला.

   इ.पवार गर् कन वळले.'काय झालं म्हणालास?'

    'साहेब याची गर्लफ्रेंड सारा समुद्रात वाहून गेली '.

   इ.पवारांनी त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच रॉकीच्या सन्नकिनी कानाखाली वाजवली.रॉकी भेलकांडला.

    'भो...नो,इतके वेळा सांगतो, सावधानतेचा इशारा देतो की समुद्र खवळला आहे, धोका आहे तर जाऊ नका तरी गेलात मरायला?'इ.पवार गरजले.

    'साहेब हा रॉकी आणि त्याची गर्लफ्रेंड सारा दोघेही 'किटकॅट'वर रील्स टाकतात.आज रॉकी साराला प्रपोज करणार होता म्हणून समुद्रावर गेलो होतो. मी त्यांचा व्हिडिओ शूट करत होतो.'सनी धीर करून म्हणाला. त्यासरशी खाडकन् त्याच्याही गालावर इ.पवारांची बोटं उमटली.

    'रील्स बनवताहेत मा.... त्यापेक्षा सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करा,पोलीसात दाखल होऊन समाजाचं रक्षण करा...आचरट रील्स करताहेत साले!'

    'साहेब,साराचा शोध....'

    'इतक्या खवळलेल्या समुद्रात काय पाणबुड्यांना पाठवून तिचा शोध घेऊ? समुद्र शांत झाल्याशिवाय त्या पोरीचा शोध घेणं शक्य नाही.चव्हाण,यांची तक्रार लिहून घ्या.'इ.पवारांनी समारोप केला.

    सनी आणि रॉकी पोलीस स्टेशनबाहेर पडले.पोलीसांनी सहानुभूतीऐवजी कान उपटले होते त्यामुळे दोघेही गोंधळून गेले.

     'रॉकी,तू माझ्या रूमवर चल.एकटा राहू नकोस.'सनीने आग्रह करून रॉकीला आपल्या रूमवर नेले.

  खरंतर रॉकीला आज भरपूर दारू पिऊन सारापासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करायचा होता.....

    एव्हाना सारा समुद्रात वाहून गेली ही बातमी 'द अॅडव्हेंचर्स'मध्ये पसरली होती.सर्वांचे रॉकीला फोन येऊ लागले.तेच तेच सांगून रॉकी खरंतर कंटाळला होता पण उत्तरं देणं भाग होतं.

   सूझी साराची सगळ्यात जवळची मैत्रीण, तिला साराच्या घरच्यांना ही बातमी सांगायचे काम सोपवले गेले.

    तीन दिवसांत रॉकी कामावर रुजू झाला.तिथेही ही बातमी कळली होतीच त्यामुळे थोडे दिवस रॉकीच्या कामाचा बोजा कमी करण्याचा वरिष्ठांनी निर्णय घेतला.

     रॉकी हल्ली फूड पार्सल नेताना वाटेत बांद्रा बॅंड स्टॅण्ड लागले तर समुद्राकडे अजिबात बघत नसे. साराला आपण पाण्यात ढकलून मारले ही गोष्ट त्याच्या अंतर्मनात बोचत होतीच.

   पापं केली तर अंतर्मन तुम्हाला कधीही माफ करत नाही याची जाणीव रॉकीला होऊ लागली होती.

   साराचे मम्मी पप्पा मुंबईला आले.त्यांना आपल्या मुलीच्या वियोगाचा जबरदस्त धक्का बसला होता.'साराला लग्न कर, लग्न कर म्हणून आम्ही मागे लागलो होतो, तिच्या लग्नाची स्वप्नं पहात होतो पण कसचं काय.....'साराच्या मम्मी पप्पांचा आक्रोश ऐकवत नव्हता.सनीकडचा व्हिडिओ, फोटो त्यांनी पाहिले.रॉकी आपला जावई होणार होता हे त्यांना कळले पण आता काय उपयोग?ते आपल्या गावी परत गेले.साराची बॉडी त्या खवळलेल्या समुद्रात मिळणं शक्यच नव्हतं.

    रॉकी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला.रोजची पार्सल डिलिव्हरी, रात्री थोडी दारू बिरू....

    आणि त्याला ते भयंकर स्वप्न पडावयास सुरुवात झाली.

    खोलीत पाण्याचा लोंढा शिरला आहे, नाकातोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरतो आहे आणि एक कवटी पाण्यातून अचानक बाहेर येते आणि दात विचकून आपल्याकडे बघून खदाखदा हसतेय......हीsssहीssहीss


क्रमश


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime