डाव मांडला
डाव मांडला
"उद्या लवकर उठायचंय. नवी मुंबईला जायचंय मला सेमिनारला आणि पहिलं सेशन माझंच आहे". रवि कोचावरुन उठता उठता निलिमाला म्हणाला.
निलिमा वाट्सअपमधुन डोकं वर काढायला तयार नव्हती. "तू जा झोप. इथे आमचं इंटरेस्टिंग चॅट चाललंय. तेवढं संपलं की येईन मी झोपायला. "निलिमाने रविची बोळवण केली. जरा तणतणच रविने बाथरुमचं दार आपटलं.
निलिमाचा हा व्हाॅटसअप ग्रुप तसा नवीनच होता. निलिमा म्हणजे निलू, आणि तिच्या बरोबर सुलू, शुभा, विद्या. असा चार मैत्रिणींचा हा ग्रुप. रविला एवढी तुटक तुटक इन्फाॅर्मेशन मिळाली होती की या चौघींचा नाशिकच्या शाळेत आठवी नववीत असताना ग्रुप बनला होता. शाळेत जरा कुप्रसिध्दच असावा, खट्याळपणामुळे. नंतर दोघींच्या वडिलांच्या नाशिकहून बदल्या झाल्या आणि ग्रुप कायमचा मोडला. त्यानंतर खूप वर्षांनी, म्हणजे सुमारे दोन वर्षापूर्वी परत चौघीजणी ऑन लाईन भेटल्या होत्या आणि चॅटिंग ग्रुप जमला होता.
रविच्या दार आपटण्याचा परिणाम बहुतेक झाला असावा. निलूने चॅटिंग आवरतं घेतलं आणि मग थोड्याच वेळात घरातले दिवे मालवले गेले. झोपाझोप झाली. दुसऱ्या दिवशी दोघेही नेहमी पेक्षा तासभर लवकरच उठले. रविला नवी मुंबईत सेमिनारला नऊ वाजे पर्यंत पोहोचायचं होतं. टाय, सूट वगैरे जामानिमा करून ब्रेकफास्ट टेबलवर सकाळी सात वाजता रवि हजर झाला.
टोस्ट ला बटर लावता लावता निलिमाने विचारलं, "काय विषय आहे तुझ्या सेशनचा आजच्या सेमिनार मधे?"
रवि हसला. "प्रदुषणरहित आणि सुरक्षित कामासाठी कामगारांची कार्यकर्तव्ये." रवि म्हणाला. "विषय वेगळा वाटतोय पण खरं म्हणजे ओल्ड वाइन इन न्यू बाॅटल चा प्रकार आहे. रिफायनरीच्या अनुषंगानेच बोलणार मी. पण आजचे भाग घेणारे प्रतिनिधी विशेषकरून ह्युमन रिलेशन मॅनेजर आहेत ठिकठिकाणचे. जास्त तांत्रिक बोललं तर डोक्यावरून जाईल त्यांच्या आणि मग झोपून जातील सगळे".
निलिमाने हसून रविला दाद दिली.
रविचे आणि निलीमाचे व्यवसाय अतिशय वेगळे. कामाची ठिकाणं वेगळी. पण निलिमा नेहमी रविकडे त्याच्या रिफायनरीच्या कामाबद्दल विचारपूस करत असे आणि रवि निलिमाकडे तिच्या फिजिओ थेरापिच्या कामाबद्दल आस्थेने चौकशी करत असे. दोघांमधे त्यानी कधीच कुठल्याही प्रकारचा आडपडदा ठेवला नव्हता, कोणतंही सिक्रेट ठेवलं नव्हतं आणि याच गुरुकिल्लीमुळे की काय त्या घरात सौख्य, शांतता नांदत होते.
सेमिनारच्या आयोजकांनी, मराठे साहेबांनी पाठवलेली टॅक्सी आली आणि साडेसात पर्यंत रवि निघाला. कांदिवलीहून नवी मुंबई ला जायला सकाळच्या वेळी सव्वा दीड तास तरी लागतोच. नऊ वाजेपर्यंत रवि पोहोचला, मराठे साहेबांनी यथोचित स्वागत केलं आणि इतरांशी ओळख करून दिली.
सेमिनार छानच झाला. कामगारांच्या सुरक्षेबद्दल आणि प्रदुषणापासून मुक्तता करण्याबद्दलची चर्चा खूपच रंगली आणि अखेरीस संध्याकाळी सहा वाजता सेमिनार ची सांगता झाली. आयोजक मराठे साहेब रविजवळ आले. "थॅक्स देशपांडे, फारच रंगवलीत चर्चा तुम्ही. या विषयात तुम्ही तज्ञ आहात याबद्दल शंकाच नाही." मराठे म्हणाले.
मराठेंच्या मागे एक तिशीच्या आसपास वयाची महिला उभी होती. रविने सेशन चालू असताना मागच्या बाजूला तिला बसलेली पाहिली होती, मात्र प्रश्नोत्तरात तिने फारसा भाग घेतला नव्हता.
"या मिसेस मशाळकर. ह्युमन रिसोर्स कन्सल्टन्ट आहेत या गुजरात मधे. आपल्या कार्यक्रमासाठी मुद्दाम आल्यात. इथे बोरीवली वेस्टला त्यांच्या नातेवाईकांकडे उतरल्यात."
"नाईस टु मीट यू सर. माय प्लेझर" मिसेस मशाळकर म्हणाल्या. "सर तुमचं सेशन फार छान झालं. टेक्निकल कुशलता, व्यापारी नफा आणि सुरक्षित कार्य पध्दती यात तुम्ही सुंदर समन्वय दाखवलात".
रविने मान कलती करून काॅम्प्लिमेंट्स स्वीकारले.
"सर मी टॅक्सी बोलावली आहे माझ्यासाठी. तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता, सर. मलाही कंपनी होईल. मला बोरीवली वेस्टला जायचंय. त्याच्या आधी मी कांदिवलीला तुम्हाला तुमच्या घरी सोडून पुढे जाईन.
"ठीक आहे", रवि म्हणाला. अडीच तासाचा कंटाळवाण्या ट्रॅफिक मधून करायचा प्रवास समोर उभा होता.
मराठेंचा निरोप घेऊन दोघे खाली उतरले. साडे सहा वाजत आले होते. काळोख पडला होता आणि रिमझिम पाऊसही सुरु झाला होता. मिसेस मशाळकरानी बोलावलेली टॅक्सी आली होती. रविने कोट काढला, पुढच्या सीटवर टाकला, टाय सैल केली, दोघंही टॅक्सी मधे बसले.
नवी मुंबई च्या विस्तृत रस्त्यांवरून टॅक्सी हायवेच्या दिशेने धाऊ लागली. दुतर्फा दुकानेही लखलखलेली होती पण पावसामुळे गर्दी विरळच होती.
"हायवेला लागण्यापूर्वी काही स्नॅक्स कुठे मिळतायत का बघायला पाहिजे. लंच होऊन झाले पाच सहा तास आणि मुंबई अजून दोन अडीच तास लांब आहे. भुकेचे संदेश येतायत पोटातून. आत्ता दुर्लक्षित केले तर अॅसिडिटी व्हायची !" मशाळकर मॅडम म्हणाल्या.
रविला बोलायचं होतं, " पण त्यात आणि वीस पंचवीस मिनिटं जातील नं!" पण तो नाही बोलला.
रविने ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितली. समोरच दिसलेल्या उडप्याच्या हाॅटेल मधे तिघांसाठी मेदुवडा डाळवडा इडली चटणी पार्सलची ऑर्डर दिली. निलिमाला फोन करून सांगितलं की ट्रॅफिक फार आहे, पोहोचायला साडे आठ नऊ वाजतील.
पार्सलं तयार होऊन, बिल चुकतं करून परत गाडीत येऊन बसे पर्यंत वीस मिनिटं गेलीच होती. पाऊस पडत होता. ड्रायव्हरचं इडली वड्याचं पुडकं त्याच्या हातात देऊन रविने एक पुडकं मशाळकर मॅडमच्या हातात दिलं. गरम गरम वड्यांचा खमंग वासाने मॅडमना खुश केलं. रविला थँक्स देऊन त्यांनी लगबगीने पुडकं उघडलं आणि पदार्थांचा मस्त समाचार घ्यायला सुरुवात केली.
ड्रायव्हरचा जठराग्नी शांत व्हायला आणखी दहा मिनिटं द्यायला लागली आणि मग धो धो पडणाऱ्या पावसात टॅक्सी एकदाची हायवेला लागली.
कधी रिमझिम, कधी मुसळधार पडणाऱ्या पावसात वाहनांची वाहतूक अगदी संथ चालली होती. पुडक्यांमधले पदार्थ संपल्यावर रिकामी वेष्टनं मशाळकर मॅडमनी खिडकीची काच खाली करून बिनदिक्कत बाहेर टाकून दिली, टिश्शू पेपरला हात पुसले.
"थँक यू रवि सर. यू आर माय लाईफ सेव्हर. आता कसं सगळं शांत वाटतंय. कसलीही अनिश्चितता मला नाही सहन होत सर, टेन्शन येतं. मग थंडीच भरायला लागते मला, अगदी हुडहुडी. आणि मग निपचित पडून रहावसं वाटतं." मशाळकर मॅडम म्हणाल्या. " सेमिनार संपल्यावर मराठेंनी हाय टी ठेवायला पाहिजे होता नाही का? काहीच सोय केली नाही त्यानी. सेमीनार संपला, आता घरी जा. आपल्या सारख्या लांबून आलेल्या लोकांची, निदान तुमच्या सारख्या व्ही आय पी ची सोय तरी नीट बघायला नको?".
रवि या सगळ्याच मतप्रदर्शनाशी सहमत नव्हता पण भिडस्तपणे त्याने मान डोलावली.
रविने मोबाईल हातात घेतला आणि व्हाटस्अप वरचे मेसेज पाहून लागला. सेमिनारवर मतप्रदर्शनं यायला लागली होती. सर्वांनीच रविची अगदी तोंड भरून स्तुती केली होती. रवि खुष झाला. त्याची छाती सव्वा इंच फुगली. हा सेमिनार तर जिंकला, आता आपण जग जिंकू अशा भावनेने मनोमन सुखावला.
मशाळकर मॅडमनी पर्स उघडून लिपस्टिक बाहेर काढली. छोट्या आरशात बघून, आय "अॅम ए मेस, आय अॅम ए मेस", म्हणत लिपस्टिक टच अप केली, पफ काढून तोंडावरून फिरवला, एक लहान स्प्रे काढून अंगावर शिंतोडे उडवले आणि मग परत सर्व साहित्य पर्स मधे ठेवून दिलं.
"ही मोठी टॅक्सी मिळाली म्हणून बरं झालं. नाही तर अगदीच कलकत्याची अंधारकोठडी झाली असती." मशाळकर मॅडम म्हणाल्या.
रवि हसला.
एरवी रविने ही तुलना कशी चुकीची आहे हे हिरीरीने दाखवून दिलं असतं, पण आताच्या त्याच्या उल्हसित मूड मधे तो कुठल्याही विनोदाला किंवा विनोदाच्या प्रयत्नाला दाद द्यायला तयार होता.
गप्पांचे फुटाणे तडतडू लागले. विनोदी प्रसंगांच्या आठवणी बाहेर निघून लागल्या. एक मजेचं, आनंदाचं वातावरण गाडीत पसरून राहिलं. एक तास असाच गेला. कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक स्वरूपाचे विषय, विवादास्पद विषय बोलण्यात नाही आले.
रविने घड्याळात पाहिलं. आठ वाजत आले होते. पाऊस थांबला होता पण विजांचा कडकडाट आता सुरु झाला होता. रविने बाहेर पाहिलं. टॅक्सी इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होती, विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडचं वळण जवळ आलं होतं.
टॅक्सी लिंक रोडला वळली आणि एकदमच थांबली.
"काय झालं ड्रायव्हर, गाडी का थांबवली?" रविने विचारलं.
"काही समजत नाही. इंजिनच अचानक बंद पडलयं." ड्रायव्हर म्हणाला. "त्या समोरच्या शेडमधे कोणी मेकॅनिक आहे का पहातो", असे म्हणून ड्रायव्हर छत्री उघडत गाडीबाहेर उतरला.
पाच सात मिनिटं अशीच गेली. बाहेर काळोख. हलकासा रिमझिम पाऊस. मधुनच होणारा विजांचा लखलखाट, बाजूच्या डबक्यातल्या बेडकांचं ओरडणं, हायवेच्या ट्रॅफिकचा घरघरणारा आवाज, सगळंच विचित्र काॅम्बिनेशन.
रविला बोलणं सुचेना की वाॅटसअपकडे बघणं सुचेना.
एवढ्यात मशाळकर मॅडम कुजबूजल्या. "सर, प्लीज हेल्प मी, आय अॅम व्हेरी टेन्स. मला अनईझी वाटतंय".
रविने मॅडमकडे पाहिलं. मॅडम थरथरत होत्या. "सर मला थंडी वाजतेय, तुमचा कोट देता का प्लीज?"
"जरूर, थांबा एक मिनिट. " रवि म्हणाला.
कोट पुढच्या पॅसेंजर सीटवर होता. रवि कोट उचलून घ्यायला डावीकडे पुढे वाकला. तेवढ्यात मॅडम थरथर कापत उजवीकडे रविच्या बाजूला सरकल्या आणि त्यानी रविचा डावा हात पकडला.
"सर फार थंडी वाजतेय, काहीतरी करा", मशाळकर मॅडम विव्हळल्या. रविला धड उठता येईना की बसता येईना. तो डावीकडे वळला आणि आपले डावे - उजवे हात मशाळकर मॅडमच्या भोवती लपेटून रविने त्याना आपल्या कवेत घेतले. थरथरणाऱ्या मशाळकर मॅडमना थोपटून थोपटून रवि शांत करु लागला. उब आणि दिलासा मिळाल्याने की काय, मशाळकर मॅडम हळूहळू शांत झाल्या.
बाहेर विजांचा लखलखाट चालूच होता. ड्रायव्हर, मेकॅनिक कोणाचीही चाहूल लागत नव्हती. दोन चार मिनिटं अशीच गेली. रविला बिलगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन त्याच्या मिठीत डोळे बंद करून मशाळकर मॅडम शांत पहुडल्या होत्या.
सावकाश पणे रवि बाजूला झाला. मशाळकर मॅडमचे डोके त्याने मागे टेकले, पुढे वाकून आपला कोट पुढच्या सीटवरून उचलला आणि मशाळकर मॅडमच्या अंगावर घातला. रवि कोट जरा सारखा करत होता तेवढ्यात बाहेर माणसांची चाहूल लागली. ड्रायव्हर मेकॅनिकला घेऊन आलेला दिसला.
गाडीचं बाॅनेट उघडून मेकॅनिकने काही तरी खाटखूट केली. मग ड्रायव्हर गाडीत त्याच्या सीटवर येऊन बसला आणि मेकॅनिकच्या आदेशां प्रमाणे त्याने स्टार्टर मारला. गाडी स्टार्ट झाली. ड्रायव्हरने मेकॅनिकला पैसे दिले. तो निघून गेला. ड्रायव्हरने गाडी सुरु केली. गाडी मार्गाला लागली.
दिवसभरचा सेमिनारचा ताण, रात्रीच्या गर्द काळोखात, पावसात, संथ चालणाऱ्या ट्रॅफिक मधला तासन् तास चाललेला प्रवास आणि नंतर हा सगळा प्रकार. रवि अगदी थकून गेला होता. मागे डोकं टेकल्या टेकल्या रविला एकदम गाढ झोप लागली.
"सर, सर, उठा. घर आलं तुमचं. उतरताय नं?" मशाळकर मॅडम रविला हलवून उठवत होत्या.
रवि खडबडून जागा झाला. टॅक्सी रविच्या कांदिवलीच्या सोसायटीच्या पोर्च मधे उभी होती.
रविने बॅग उचलली. त्याने टॅक्सीचं दार उघडायला हँडलवर हात ठेवला.
"हा तुमचा कोट, सर ". रविचा कोट त्याच्या हातात देत मशाळकर मॅडम म्हणाल्या. "आणि थँक्यू सर."
"रवि कसाबसा टॅक्सीतून उतरला. "थँक्यू, व्हेरी मच. गुड नाईट ." असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत, रविने एक हात जेमतेम हलवल्यासारखं केलं आणि तो लिफ्ट कडे वळला.
रवि वर पोहोचला. निलिमाने दार उघडलं. रात्रीचे साडेनऊ वाजले होते. रविने बॅग एकीकडे टाकली, कोट टाय दुसरीकडे टाकले, बूट मोजे काढले आणि सरळ बाथरुममधे गेला.
रवि स्वच्छ होऊन बाहेर आल्यावर निलिमाने त्याला विचारलं, "रवि, जेवतोस नं?"
"अं, नको", रवि म्हणाला. "झोप फार आली आहे . दमायला झालंय. इट वाॅज ए लाॅन्ग डे. जेवण नको. झोपतो मी आता."
बेडरूम मधे जाऊन रवि झोपुन गेला.
निलिमाची सुध्दा फिजिओथेरापीची दोन मोठी सेशन्स झाली होती. तिनेही थोडं जेवून घेतलं आणि आवराआवरी करून, मोबाईल सेटस् चार्जिंगला लाऊन, पाठोपाठ तीही झोपायला गेली.
पोटात कावळे ओरडायला लागल्याने रात्री दोन अडीचला रविला जाग आली. चार पाच तास चांगली झोप झाली होती. किचनमधे जाऊन रविने स्नॅक्सची सोय बघितली. एका डिशमधे बिस्किटे, टोस्ट आणि एक गरम दुधाचा ग्लास घेऊन रवि बाहेर आला आणि डायनिंग टेबलवर बसून आरामात सगळं रिचवलं. अंतरात्मा शांत केला.
रविने चार्जरवरुन आपला मोबाईल काढला, व्हाॅटसअप उघडलं. सेमिनार बद्दल आणखी काही कौतुकाचे अभिप्राय येत होते. सगळे नवे मेसेज रविने वाचले. चूळ भरून, ब्रश करुन रवि परत झोपायला गेला. रात्रीचे तीन वाजले होते. अंगावर पांघरूण घेउन रवि निद्रा देवीची आराधना करू लागला. सेमिनारचे विचार मनात येऊ लागले. मराठेंनी करुन दिलेली ओळख, सेशन्स संपल्यावर उत्स्फूर्तपणे झालेला टाळ्यांचा गजर, व्हॅलिडेक्टरी सेशनमधे चीफ गेस्टनी केलेलं कौतुक, सगळ्या आठवणी परत परत चघळूनही त्यांचा मधाळपणा कमी होत नव्हता.
विचारांची गाडी सेमिनारच्या समारोपावर आणि परतीच्या प्रवासावर येऊन ठेपली.
मराठेंचा निरोप घेऊन निघाल्यावर तो काळोख्या, पावसाळी रात्रीतला टॅक्सीचा प्रवास, टॅक्सीचं बंद पडणं, मशाळकर मॅडमचं अचानक उपटलेलं आजारपण, ... सगळं सगळं रविला आठवलं आणि मग मात्र रविचा आनंदी, समाधानी, रिलॅक्स्ड मूड पूर्ण नाहीसा. एक प्रकारच्या अस्वस्थतेने, अनामिक हुरहुरीने त्याला ग्रासलं. रवि बराच वेळ विविध विचारचक्रांत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तळमळत होता. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला.
रविवारची सकाळ झाली होती. रविला उठायला जरा उशीर झाला. निलिमा आधीच उठली होती. टेबलावर रिकामी बशी आणि दुधाचा रिकामा ग्लास तिने पाहिला होता. निलिमा चहाच्या तयारीला लागली.
रवि उठून बाहेर आला. निलिमाने दिलेला गरम चहाचा कप त्याने तोंडाला लावला. एक कप चहा पोटात गेल्यावर रविला तरतरीत आली. कालच्या परतीच्या प्रवासाबद्दलची बेचैनी काढून टाकण्यासाठी निलिमाशी चर्चा करणं त्याला आवश्यक वाटलं. आणि मग कुठलाही आडपडदा न ठेवता घडलेला सर्व प्रकार रविने निलिमाला सांगून टाकला. त्याला स्वतःला जरी त्यामुळे हलकं वाटायला लागलं तरी त्या प्रसंगातले बोचरे कंगोरे त्याला टोचतच राहिले.
निलिमाने शांतपणे सर्व ऐकून घेतलं. अगदी तोंडावरची माशीही न हलवता ऐकून घेतलं.
"रवि, या मशाळकर बाईला तू आधी कधी भेटला होतास का ? नाही, म्हणजे, तुझ्या कामाच्या संदर्भात, दुसऱ्या कुठल्या सेमिनार मधे किंवा .... एखाद्या पार्टीमधे?" निलिमाने विचारलं.
रवि चमकला. दोन कप गरम चहा प्यायल्यानंतर तो पूर्ण सावध होता. निलिमा बारिक डोळे करून त्याच्याकडे पहात होती.
"नाही बुवा, अजिबात नाही ". रविने निर्व्याज चेहऱ्याने खरं तेच सांगितलं. "मराठेंनी सेमिनार संपल्यावर ओळख करून दिली, तीच पहिली भेट."
"मग रवि, तू झोपलेला असतानाही सोसायटीच्या बी विंगच्या पोर्च मधे कसं तिने तुला बरोबर आणुन सोडलं? एवढा अॅक्युरेट पत्ता तिला कधी आणि कोणी सांगितला?" निलिमाने विचारलं.
"सेमिनारच्या पत्रकात मिळाला असेल पत्ता". रविने गुळमुळीत उत्तर दिलं.
निलिमा विचार करत होती.
"आपल्या फिजिओ थेरापि व्यवसायात आपण आपल्याला प्रमाणा बाहेर जास्त गुंतवून तर घेतलं नाही ना?
रविमधे आणि आपल्या मधे, दोघात आडपडदा आपण कधीच ठेवला नव्हता, असं आपण समजतो, पण ते खरं आहे का?
रविने सांगितलेली गोष्ट म्हणजे पूर्ण सत्य असेल की अर्ध सत्य आहे ? पण जर अर्ध सत्य असेल तर पूर्ण सत्य काय आहे?
आपण एवढा कौटुंबिक सुरक्षिततेचा टेंभा मिरवतो, आपल्याकडे इन्शुरन्स आहे, दारावर व्हिडिओ माॅनिटर आहे, मोलकरणीचा पोलिस क्लिअरन्स आहे, पण अभेद्य कौटुंबिक सुरक्षा कवच द्यायला हे पुरेसं आहे का ?"
थोड्या वेळाने निलिमाने स्वतःला सावरलं. विचारांचा रोख, विचारांचा ओघ आवरता घेतला.
दिवसभराची कामं सुरू झाली. मनात विचारचक्रं चालूच होती.
दुपारी जेवताना निलिमा रविला म्हणाली,
"रवि, दोन शक्यता आहेत? एक तर मशाळकर बाईचं दुखणं जेन्युईन असेल किंवा ते एक ढोंग असेल. जर जेन्युईन असेल तर तिला मदत केल्याबद्दल आभार मानायला ती तुला फोन करेल. जर ढोंग असेल, काही सेट अप चा प्रयत्न असेल तर पुढच्या मागणीसाठी ती तुला फोन करेलच. दोन्ही शक्यता संभवतात. आपल्याला तूर्त काहीच करायचं नाही. फोनची वाट बघायची. फोन नाहीच आला तर शिकलेला धडा ध्यानात ठेवयाचा. भविष्यात सावध रहायचं."
किल्मिषं झटकली गेली. मनं साफ झाली. येईल त्या संकटाचा सामना करायला एकजूटीने मोर्चे बांधणी झाली.
सोमवारी रवि ऑफिसला गेला. सकाळी मीटिंग्जच्या वेळी त्याने मोबाईल आॅफ ठेवला. मात्र दुपारी मोबाईल अगदी आवर्जून आॅन ठेवला आणि दर वेळी बेल वाजली की तो ताबडतोब फोन उचलून घेत असे.
दुपारी तीन वाजता एका "अज्ञात नंबरवरून" फोन आला. मोटर कार इन्शुरन्स बद्दल मार्केटिंगचा फोन होता.
"आमच्या अॅडमिन डिपार्टमेंटशी बोला". असे सांगून रविने फोन बंद केला.
अर्ध्या तासांने परत दुसराच "अज्ञात नंबर". यावेळी ज्ञाती संवर्धन मंडळाच्या कडून. देणगी देण्यासाठी.
"नंतर बघु" असं म्हणून रविने फोन बंद केला.
सोमवारची दुपार, संध्याकाळ पार पडली.
मंगळवारी दुपारी दोन वाजता "अज्ञात नंबरवरून " फोन आला.
"सर, मी बोलतेय, ओळखलं का?" मशाळकर मॅडमचा आवाज. "सर काल आपल्या ज्ञाती संवर्धन मंडळाच्या मुलीनी तुम्हाला फोन केला होता, देणगी बद्दल. सर आपलं ज्ञाती संवर्धन मंडळ होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी निधी जमवतंय. तुमच्या कडून मोठी अपेक्षा आहे सर".
"मॅडम नंतर बघू, कामात आहे मी सध्या". संभाषण लवकर संपवण्यासाठी रवि बोलला.
"बरं, ते राहु द्या सर," मशाळकर मॅडम म्हणाल्या, "परवाच्या सेमिनार चे काही फोटो आहेत माझ्याकडे. तुमच्याकडे मोबाईल वर पहायला पाठवते मी. तुमचा फोटो छानच आलाय सर. तुम्ही बघुन घ्या आणि तुमच्या कडुन क्लिअर असेल तर आपण मराठेना पाठवू, नाही तर तुम्हीही तुमच्या फेसबुक पेजवर पोस्ट करु शकाल. संध्याकाळ पर्यंत पाठवते मी सर. मग उद्या बोलू. आणि सर, ते ज्ञाती संवर्धन मंडळाच्या देणगीचंही लक्षात ठेवलं तर बरं होईल. ठेवू मी फोन? गुड डे सर."
रविने सुटकेचा सुस्कारा सोडला. किती आर्जवपूर्वक बोलत होत्या मशाळकर मॅडम. निलिमालाही त्याने फोन करून कळवलं की मशाळकर मॅडमच्या मनात काही काळंबेरं दिसत नाही आहे. तिच्या मंडळाला हजार एक रुपयांची देणगी देऊन टाकू. खूष होईल बिचारी.
"हं", निलिमा म्हणाली आणि तिने फोन खाली ठेवला.
संध्याकाळचे सात वाजले होते. रवि नुकताच घरी आला होता. निलिमा त्याच्या एक दीड तास आधी. दोघंही हाॅल मधे बसले होते. चहा घेत होते. दिवसभराच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. रविच्या मते मशाळकर मॅडम आता इतिहास जमा झाल्या होत्या आणि चहाच्या कपातलं वादळ आता शांत झालं, असं समजायला पाहिजे होतं.
बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या रविच्या मोबाईल मधून टिंग टिंग आवाज यायला लागले.
"कोणीतरी फोटो लावतोय वाटतं." रवि म्हणाला.
काही मिनिटातच आवाज थांबले. रविने हात लांब करून मोबाईल उचलला.
"अज्ञात नंबर?" अज्ञात नंबरने पाठवलेल्या व्हाटस्अप मेसेज बरोबर फोटोग्राफ संलग्न केले होते. जास्त विचार न करता रविने फोटोग्राफ उघडले.
सहा फोटो होते. बाॅम्बशेल.
एका फोटोत रवि कोणा अज्ञात महिलेला कवेत घेऊन बसलेला दिसत होता. तर दुसऱ्या फोटोत रवि अज्ञात महिलेला हळुवारपणे थोपटताना दिसत होता. एका फोटोत सेमिनार चं पत्रक सहज समोर ठेवलेलं, जणू प्रसंगाचे ठिकाण व वेळ समजण्यासाठी. सर्व फोटोत रविचा चेहरा ओळखू येण्याइतपत स्पष्ट दिसत होता पण महिलेचा चेहरा रविच्या बाहूंमागे नाहीतर खांद्दयामागे बऱ्याच प्रमाणात लपलेला होता.
रवि जसा एक एक फोटो पहात गेला तसा त्याचा चेहरा भकास होत गेला. शेवटी रविच्या हातातून मोबाईल गळून पडला.
निलिमाने मोबाईल उचलला. निर्विकार चेहऱ्याने एक एक करून फोटो पाहिले. मोबाईल खाली ठेवून दिला.
निलिमा विचार करू लागली. फोटो तर आलेत, आता पुढे काय ?
रवि विचार करण्याच्या परिस्थितीत नव्हता.
"हा एक पध्दतशीरपणे रचलेला व्युह आहे यात शंकाच नाही, रवि. ही डावाची सुरुवात आहे. आपल्याला या खेळात शिकार केलेलं आहे आणि शिकारी मचाणावर बसलेला आहे. आपल्याला त्याला पाडायचंय खाली रवि, हिंमत सोडून कसं चालेल?" निलिमा म्हणाली.
रवि डोळे बंद करून मान मागे टाकून जीव गेल्यासारखा पडला होता. मान हलवून निलिमाला साथ द्यायचीही त्याला शक्ती नव्हती.
रवि उठला. सरळ बेडरूम मधे जाऊन झोपला. निलिमाने परत मोबाईल हातात घेतला. सगळे फोटो परत ती बारकाईने पाहू लागली. रविचे असले फोटो पहाण्याची तिला सवय नव्हती. कष्टाने तिने मन शांत ठेवलं. रविवर कोणी तरी निशाणा साधला आहे आणि आपल्याला त्याची ढाल बनायचं आहे एवढंच मर्यादित साध्य तिने समोर ठेवलं.
त्या फोटोंमधे निलिमाला काहीतरी खटकत होतं. टॅक्सीच्या मागच्या सीटवर चाललेल्या या प्रकाराचे फोटो टॅक्सीच्या खिडकीतून कोणी तरी काढले होते. रविला जो विजांचा लखलखाट वाटला तो थोडा बहुत कॅमेराचा फ्लॅशही असू शकेल. फोटो घ्यायचं काम ड्रायव्हरशिवाय दुसरं कोण करणार! फोटो थोड्या फार प्रमाणात एडिट केल्यासारखेही वाटत होते जेणेकरून चेहऱ्यांवरचे अंधार -उजेड कृत्रिम पणे कमी जास्त केल्यासारखे वाटत होते. नीट निरखून पाहिलं तर बरीच विसंगती नजरेला येत होती, पण निरखून पहात बसणार कोण! हे फोटो जर सोशल मिडियावर गेले तर वरवर पाहूनच लोकांनी आपापली निकालपत्र जाहीर पणे दिली असती.
निलिमाने ते फोटो परत एकदा निरखून पाहिले आणि मशाळकर मॅडममधे तिला जरा ओळखीचा भास झाला. शंका तर आली आहे, आता उद्या पुढे बघू असे म्हणत निलिमाने रविचा मोबाईल बाजूला ठेवला.
आठच वाजले होते. स्वतःच्या मोबाईल वर निलिमाने व्हाटस्अप उघडलं. तिचा फेवरिट चॅटींग ग्रुप आधीच हजर होता. गप्पा मारत होता. सुलू आणि विद्याच्या दागिन्यांबद्दल, विशेषकरून डायमंड नेकलेस बद्दल गप्पा चालल्या होत्या.
"हा आपला प्रांत नाही," असे म्हणून निलिमाने त्यांचा निरोप घेतला.
निलिमाने जेवणाची तयारी केली. रविला उठवलं. दोघंही जेवायला बसले. रवि मान खाली घालून जेवण चिवडत होता. आपल्या बिन खरकट्या डाव्या हाताने रविच्या हातावर थोपटत निलिमा रविला म्हणाली, "जेव रवि, धीर धर जरा".
"कसला धीर धरायचा? " रवि निरुत्साहाने म्हणाला. "हे फोटो सोशल मिडियावर आले तर तोंड दाखवायला जागा रहाणार नाही. रिफायनरीतून काढून टाकतील, क्लबची मेंबरशिप जाईल, कोणी मित्र जवळ करणार नाहीत. काय वीस पंचवीस हजार त्या मॅडम मागतील ते देऊन टाकावं झालं".
"निघेल काही मार्ग, उद्या बघू. " निलिमा म्हणाली.
"नाहीतर असं वाटतं मला," रवि बोलत होता, "एक पैसाही देऊ नये तिला. मुंबई सोडू या. जुन्नरला आपला किशाभाऊ राहतो,माझा आते भाऊ, त्याच्याबरोबर शेती करावी. ट्रॅक्टर घ्यायचा, सगळं शेत मेकनाइज करायचं. रूरल लाइफ एन्जाॅय करायचं."
निलिमाच्या डोळ्यांसमोर दुपारची, शेतात भाजी भाकरी घेऊन जाण्याची ड्यूटी उभी राहिली आणि अंगावर शहारे आले. गावात रहायला गेल्यावर फिजिओथेरापी प्रॅक्टिसला फारसा वाव नसणार हेही तिच्या लक्षात आले.
अशाच खिन्न, विचित्र वातावरणात जेवणं झाली. थोडा वेळ टी व्ही समोर बसून रवि झोपायला गेला. मेसेजेस पाहून, दिवसभराच्या कामाचे रिपोर्ट फाईल करून निलिमाही झोपायला गेली.
दुसऱ्या दिवशी दुपारी ज्ञाती संवर्धन मंडळाकडून फोन आला. त्यादिवसाच्याच मुलीचा आवाज. "थँक्यू व्हेरी मच सर, मंडळाला पाच लाखांची देणगी देऊन प्रमोटर होण्याचं कबूल केल्या बद्दल."
"काय, मी, मी,... एवढी रक्कम!".रवि चाचरत म्हणाला.
"हो सर, रक्कम मोठी आहे, मोठ्या मनाने तुम्ही पाच लाख द्यायचं कबूल केलंय म्हणूनच थँक्स." मंडळाची मुलगी निर्लज्जपणे तोंडभर हसून म्हणाली. "आणि सर, शनिवार पर्यंत चेक तयार ठेवायला जमेल नं? शनिवारी लंचला दुपारी एच वाजता बोरिवली च्या स्टार परेड रेस्टॉरंटमधे आमच्या मॅडम भेटतील तुम्हाला. त्यावेळी तुम्ही चेक द्यायचाय, सर, त्याना."
वयाच्या पस्तिशीत पाच लाख रुपये ही मोठी रक्कम वाटणं स्वाभाविक होतं, आणि एवढी रक्कम कुणाला फुकाफुकी देण्याच्या विचाराने रवि निराश होऊन गेला."
जुन्नरला किशाभाऊला रविने फोन लावला. रविला एकदमच मुद्दयाला हात घालता येइना. इकडचं तिकडचं काहीतरी बोलून रविने फोन खाली ठेवला.
संध्याकाळी घरी गेल्यावर निलिमाला त्या पाच लाखांच्या मागणीबद्दल रविने सांगितलं. निलिमाने शांतपणे सगळं ऐकून घेतलं.
"रवि, हे प्रकरण पाच लाखांनी मिटणार नाही. ती बया जन्मभर तुला छळत राहिल, पैसे उकळत राहिल. तू भेट तिला शनिवारी रेस्टॉरंट मधे, चेक आणलाय, जेवण झाल्यावर देतो म्हणून सांग. बघुया आपण, मला एक उपाय सुचतोय. शनिवारीच कळेल तुला". निलिमा म्हणाली.
हिला काय उपाय सुचलाय ते रविच्या लक्षात येईना. पोलिसात जाण्यात काही अर्थ नव्हता, कारण ज्ञाती संवर्धन मंडळ नावाची पोकळ का होईना, संस्था असणार हे नक्कीच आणि रविने राजीखुषीने संस्थेचा प्रमोटर होण्याचं कबूल केलंय हे त्यांचं म्हणणंही खोडून काढणं अवघड होतं.
उरलेला आठवडा रखडत रखडत चालला होता. ऑफिसमध्ये, क्लब मध्ये प्रत्येकाशी बोलताना, हास्य विनोद करताना रविच्या मनात विचार येत होते, की उद्या हे फोटो व्हायरल झाले तर माझ्याबरोबर ही माणसं अशीच वागतील का? हास्य विनोद करतील का? जुन्नरला गेलो तरी हे सगळं प्रकरण आपल्या पाठोपाठ तिथेही येईल काय ! की तिथेही आपण दुरुन येताना दिसलो तरी लोक मुलीबाळींना लपवून ठेवतील ? या नाचक्कीपासून दूर पळायला जगाच्या पाठीवर कुठे जागा असेल का !
तिकडे निलिमानेही आपली चक्रं फिरवायला सुरुवात केली होती. नाशिकला बरेच टेलिफोन काॅलस् करुन, जुन्या मैत्रीला, जुन्या ओळखींना उजाळा देत बरीच मोलाची माहिती तिने मिळवली होती आणि जुन्नरला जाण्याचा पर्याय राबवावा लागणार नाही, इतपत आता तिला आत्मविश्वास आला होता.
शनिवार आला. रवि दुपारी बरोबर एक वाजता स्टार परेड रेस्टॉरंट मधे पोहोचला. मशाळकर मॅडम आधीच येऊन एका बाजूच्या निवांत टेबलवर बसल्या होत्या. वरकरणी हसत रवि मॅडमच्या समोर बसला.
"या सर, आणलात चेक ?" मॅडमनी मुद्यालाच हात घातला.
"आणलाय चेक मॅडम. पण जेवून तर घेऊ या. अशा हाॅटेलमधे आलोच आहोत तर बसू या अमळ". रवि म्हणाला.
मॅडम अनिच्छेने बसल्या. ऑर्डर दिली. पंधरा मिनिटानी वेटरने सर्विस सुरू केली.
फारसं काही बोलण्यासारखं नव्हतं, न बोलता दोघंही जेऊ लागले.
"हॅलो सुलू" आवाज आला. मशाळकर मॅडमनी आवाजाच्या दिशेने वर पाहिलं. रविनेही वर पाहिलं. निलिमा टेबलाजवळच उभी होती. जरा वेगळी, जुन्या पद्धतीची केशरचना तिने केली होती.
मशाळकर मॅडमनी पाच दहा सेकंद निलिमाकडे रोखून बघितलं आणि त्याना ओळख पटली.
"कोण निलू ! किती वर्षांनंतर भेटतोय। आपण, तश्शीच्या तश्शीच राहिली आहेस की गं!" मशाळकर मॅडम उद्गारल्या.
"कमालीचा योगायोग, इथे असं अचानक भेट होण्याचा. किती वर्षांनंतर असं समोरा समोर भेटतोय, किती गोष्टी कॅचअप करायच्यात आपल्याला. आणि चॅटींग करताना तू सांगितलं नाहीस मला, की तू बोरिवलीत राहतेस म्हणून". निलिमा म्हणाली.
"नो, नो, जस्ट व्हिजिटिंग. बिझनेस मीटिंग आहे ही". मशाळकर मॅडम म्हणाल्या. मनात विचारचक्र फिरत होती, आता या निलूला कटवायचं कसं!
"जेवण संपलेलं दिसतंय. डेसर्टसाठी मला जाॅइन व्हायला आवडेल". निलिमा म्हणाली.
मशाळकर मॅडमनी विरोध दर्शवायला तोंड उघडलं, तेवढ्यात निलिमा म्हणाली, "काय रे रवि, चालेल नं, मग सरक जरा तिकडे".
मशाळकर मॅडमकडे वळून निलिमा म्हणाली, "समजलं का सुलू, मी मिसेस रवि. ही कसली बिझनेस मीटिंग आहे, ते सगळं मला माहिती आहे."
मशाळकर मॅडमना थोडा धक्का बसला पण लगेच त्यांनी आपल्याला सावरलं.
"माहिती आहे नं, निलू, मग मला काही बोलायला नको. रवि सर, तुमचा मंडळाच्या प्रमोटरशिपचा चेक द्या आणि ही मीटिंग संपवू या." मशाळकर मॅडम म्हणाल्या.
"सुलू, चेक वगैरे काही आणला नाही रविने". निलिमा म्हणाली.
"अस्सं मग तुम्ही चुकीचा पर्याय निवडलाय. या मार्गाने गेलात तर रवि सरांचाच नाही, तर अख्ख्या कुटुंबाचा विनाश आहे". मशाळकर मॅडम रागाने म्हणाल्या.
"विनाश कोणाचा आहे ते नंतर पाहू सुलु. एक जुनी गोष्ट सांगते तुला. ऐक जरा".
निलिमा म्हणाली, "पंधरा वर्षांपूर्वी नाशिकच्या एम एच स्कूलच्या ऑफिसमध्ये रामभाऊ कुलकर्णी नावाचे क्लार्क होते. महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार सर्व वर्गांचा फी भरण्याचा दिवस असायचा. जमा केलेली फी सगळे क्लास टीचर रामभाऊंकडे आणून द्यायचे. अशाच एका फी भरणा शुक्रवारी असं घडलं की, या भरणा केलेल्या रकमेतले एक हजार रुपये नाहीसे झाले. रामभाऊ म्हणाले चोरी झाली, पण पुरावा काहीच नव्हता. शाळेने चौकशी समिती नेमली. चौकशीत माहिती बाहेर आली की मधल्या सुट्टीत कूलरचं गार पाणी पिण्याच्या निमित्ताने सुलभा रेगे नावाची विद्यार्थिनी आॅफिसमध्ये आली होती. चौकशी समिती सुलभा रेगेची जबानी घेऊ शकली नाही कारण दुसऱ्याच दिवशी आपल्या आजारी आत्याकडे सुलभा धारवाडला निघून गेली आणि नंतर शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली. चौकशी समितीला जास्त वेळ दिला गेला नाही. रामभाऊंवर पैसे लंपास केल्याचा आळ आला. शरमेने रामभाऊनी आत्महत्या केली. त्यांची बायको तापाने वारली. मुलगा मुकुंद वाईट मार्गाला लागला. त्याने बरेच वाईट उद्योग केले. नंतर स्मग्लिंगमधे त्याने खूप पैसा मिळवला. माझे वडील पोलिसात होते. त्यांच्या मध्यस्थीने नंतर अॅम्नेस्टी स्कीममध्ये सरकारला शरण गेला. थोडी सजा भोगून बाहेर आला आणि नंतर हाॅटेल व्यवसायात शिरला. आणि सुलू, हे आपण बसलोय ते हाॅटेलही मुकुंद दादाचंच आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुलभा रेगे परत नाशिकला आलीच नाही. ती आत्याकडे धारवाडलाच राहिली, आणि बरंका रवि, तीच सुलभा रेगे उर्फ सुलू आत्ता आपल्यासमोर मशाळकर मॅडम म्हणून बसली आहे. रामभाऊंच्या आत्महत्येनंतर ती चोरीची केस नाशिक पोलिसांकडे गेली. वरवर चौकशी झाली. एक हजार रुपयांचा अपहार कदाचित पोलिसाना क्षुल्लक वाटला असेल. शाळेच्या चौकशी समितीने सहा महिन्यांनंतर आपला अहवाल दिला. त्यात त्यांनी लिहिलं होतं की परिस्थिजन्य पुराव्यावरुन सुलभा रेगेला पैशांचा अपहार करण्याची संधी होती. रामभाऊंच्या कुटुंबीयांची आणि त्याना ओळखणाऱ्या जवळच्या मित्रांची तर सुलभा रेगे दोषी असल्याबद्दल खात्रीच आहे. रेगे कुटुंब धारवाडलाच स्थलांतरित झालं. त्यामुळे कोणाचाही त्यांच्याशी संपर्क राहिला नाही. पण मुकुंद दादा अजुनही सुलभा रेगेच्या शोधात आहे, कारण त्याच्या कुटुंबाची वाताहत व्हायला सुलभाच कारणीभूत आहे, असं तो समजतो. इथले सगळे गुंड हाताशी आहेत त्याच्या. "
निलिमाने इकडे तिकडे पाहिलं आणि उभ्या असलेल्या वेटर ला जवळ बोलावलं. आपला मोबाईल त्याच्या हातात देत ती म्हणाली, "अहो जरा ग्रुप फोटो घ्या आमचा". आणि वेटरने त्या त्रिकुटाचा पटकन फोटो घेऊन टाकला. वेटर ला "थँक्यू " म्हणून निलिमाने आपला मोबाईल परत घेतला.
"सुलू, टॅक्सी मध्ये घेतलेल्या फोटोंमधे तू तुझा चेहरा चांगल्यापैकी लपवला होतास . पण तुझी ही त्रिकोणी कानाची पाळी मला ओळखीची वाटली आणि कानावरुन दोन केसांच्या बटा सोडायची तुझी जुनी स्टाईल. तुझी ओळख पटायला त्यामुळे अवघड गेलं नाही मला. आमची शिकार करू पहाणारा शिकारी कोण आहे, हा डाव कोणी मांडलेला आहे, हे समजायला हवं होतं मला. त्या पंधरा वर्षांपूर्वीच्या चोरीबद्दल पुराव्यानिशी माहिती मी आत्ता तुझ्या या फोटोसकट जर मुकुंददादाला दिली तर तू बोरिवलीतून बाहेर जिवंत जाऊ शकणार नाहीस". निलिमा म्हणाली.
मशाळकर मॅडम उर्फ सुलूचा चेहरा पांढरा फटक पडला होता.
"निलू, रवि सर तुझे मिस्टर आहेत हे माहिती नव्हतं मला. आय अॅम व्हेरी साॅरी. नको सांगू तू काही मुकुंद दादाना. मी सरांचे सगळे फोटो डिलीट करते. विश्वास ठेव माझ्यावर." मशाळकर मॅडम म्हणाल्या.
"सुलू, तुझा मोबाईल ठेवून घेणार आहे मी. आणखी कुठेही रविचे फोटो असतील तर ते डिलीट झाले पाहिजेत. आणि हे लोकांना फसवायचे, कचाट्यात पकडायचे उद्योग ताबडतोब थांबले पाहिजेत. अशा कुठल्याही कारस्थानात तुझा हात असल्याचं माझ्या कानावर जरी आलं तरी ताबडतोब तुझा फोटो मुकुंद दादाकडे जाईल. लक्षात ठेव आता तू शिकारी नाहीस, स्वतः उभारलेल्या पिंजऱ्यात तूच अडकली आहेस. आणि हो, आजच्या या जेवणाचं बिल तूच द्यायचं आहेस.
सुलू उर्फ मशाळकर मॅडमने लवकरच तिथून पाय काढता घेतला.
घटना इतक्या वेगाने घडत गेल्या की संकट आता टळलंय, यावर रविचा प्रथम विश्वासच बसेना. न राहवून निलिमाचा हात रविने घट्ट हातात धरला. जीवनातला तोच एक त्याचा एकमेव भक्कम आधार होता.
"नाशिकहून एवढी सलग बित्तंबातमी कशी मिळवलीस तू दोन दिवसात?" रविने आश्चर्याने निलिमाला विचारले.
"काॅन्टॅक्टस्". निलिमा म्हणाली. "अरे, जुन्नरला जसा तुझा किशाभाऊ आहे नं, तशी माझी नाशिकला काशीताई आहे."
आणि दोन आठवड्यांनंतर प्रथमच दोघंही खळखळून हसले.
---*---