Sudhir Karkhanis

Drama

3  

Sudhir Karkhanis

Drama

सामाजिक मिसळ

सामाजिक मिसळ

9 mins
82


"या ताई." लक्ष्मी कोळिणीनं रेखाताईंचं अगदी तोंडभर हसून स्वागत केलं. "ताई खूप दिवसांनी आलात. या. काय देऊ. कोलंबी फ्रेश आहे. बोंबिल फ्रेश आहेत."


रेखाताई आणि वसंतराव रहायला बोरिवली-पूर्वच्या डायमंड सोसायटीत. तसं गोराईपासून दूरच. पण तरीही रेखाताईंना रविवारी सकाळी गोराईच्या मच्छी मार्केटला फेरी मारायला फार आवडायचं. दोन महिने भारताबाहेर असल्यामुळे त्यांची ही मच्छीमार्केटची फेरी बऱ्याच दिवसात झाली नव्हती खरी.


मार्केटच्या बाहेर बसलेल्या ताज्या भाज्या, शहरातल्या इतर मार्केटमधे कुठे सहजपणे न मिळणारी गावठी मेथी, गोल वांगी, ही रेखाताईंची पहिली अॅट्रॅक्शन्स. ती खरेदी झाल्यानंतर मात्र आत जायचं आणि लक्ष्मी कोळिणीसमोर जाऊन उभं रहायचं. रेखा ताईंनी, मार्केटभर फेरी मारायचा, सगळीकडे मासळी हाताने दाबून बघायचा, किमती विचारायचा, परिपाठ ठेवलाच नव्हता. त्यांची एकच ठराविक कोळीण. लक्ष्मीकडे मासळीच्या किंमतीबद्दल घासाघीस नाही, ताजेपणा बद्दल शंका नाही. कोणी म्हणायचे, "अहो ती तुम्हाला फसवते." पण रेखा ताईंना काही ते पटायचं नाही.


वसंतराव रेखाताईंबरोबर नेहमीच असायचे. या मासळी बाजाराच्या फेरीत वसंतरावांचा भाग फक्त पिशव्या धरणे, रेखाताई सांगतील तेवढे पैसे देणे, इतपत मर्यादित असे. बऱ्याचदा वसंतरावांना त्यांचे मित्र, ओळखीपाळखीचे लोक भेटायचे आणि मग बायकांची मासळी खरेदी होईपर्यंत पुरुष मंडळींच्या गप्पा चालायच्या.


लक्ष्मी कोळिणीच्या शेजारी वसंतरावांना आज एक नवीनच तरुण कोळीण बसलेली दिसली. असेल विशीतली. तिच्या समोर एक सावळासा प्रौढ इसम उभा होता. अंगात रंगीबेरंगी बुशशर्ट आणि गळ्यातील जाडशी सोन्याची साखळी बघुन वसंतरावांनी खुणगाठ बांधली की हा इसम काही चाकरमान्या पांढरपेशा नसावा. मोठ्या सलगीने त्या तरुण कोळिणीशी तो काहीतरी बोलत होता. थोड्या वेळाने तो इसम निघून गेला आणि वसंतरावांनी उगीचच सुटकेचा निःश्वास सोडला.


इकडे रेखाताईंचे कोलंबी आणि बोंबिल लक्ष्मी कोळिणीने साफ केले होते. "पिशवी द्या तिला", असं रेखाताईंनी म्हटल्यावर तत्परतेने वसंतरावांनी पिशवी पुढे केली.


"सुरमई आहे का गं तुझ्याकडे?" रेखाताईंनी लक्ष्मीला विचारले.

"माझ्याकडे नाही पण इकडे पियुकडे आहे बघा". लक्ष्मी शेजारच्या तरुण कोळिणीकडे हात दाखवत म्हणाली. "ही पियू, म्हणजे प्रियंका, माझी भाची आहे. शिकतेय कालेजात. सुट्टी पडलीय, तेव्हा मीच घेऊन आले तिला, मला मदत करायला. आणि मघाशी बोलत होते तिच्याशी ते गोराडे, कोपऱ्यावरच्या समुद्र सेतू हॉटेलचे मालक. हिच्या मागे आहेत, त्यांच्या मुलासाठी."


या सगळ्या अनाहूत माहिती कडे दुर्लक्ष करून रेखाताई प्रियंका कोळिणीकडे वळल्या आणि तिने दाखवलेल्या सुरमईचं दाबून, कल्ले उघडून निरिक्षण करून लागल्या.


तेवढ्यात वसंतरावांना त्यांच्या परिचयाचे बारटक्के भेटले. मग सुरमईवरची आणि प्रियंकावरची नजर काढून वसंतरावांनी बारटक्केंशी शेअर्सच्या चढ उताराच्या गप्पा चालू केल्या. जाता जाता बारटक्के म्हणाले, "वसंतराव रोजा बॅन्क चांगली आहे. वर चाललाय शेअर. घेऊन टाका. रोजा बँक."

वसंतरावांनी त्यांना हसून निरोप दिला.


दोन मिनिटातच रेखाताईंकडून ऑर्डर आली, "पिशवी द्या तिला". वसंतरावांनी प्रियंकाकडे सुरमईच्या कापलेल्या तुकड्या टाकायला पिशवी दिली.


वसंतरावांना पिशवी परत करताना त्यांच्या नजरेला नजर भिडवत प्रियंका कोळीण म्हणाली, "रोजा बँक चांगली नाही सर. रोजा बँकेची पुढच्या आठवड्यात सो जा बँक होईल सर. घेऊ नका ते शेअर. गैरव्यवहार सापडलेत आर बी आय ला".


चकित होऊन वसंतराव म्हणाले, "तुला कसं माहीत ?"


"याच विषयात एम बी ए करते नं मी !" प्रियंका म्हणाली आणि तिथुन जाणाऱ्या गिऱ्हाइकाला उद्देशून पुढचं वाक्य, "दादा, सुरमई देऊ ?" वसंतरावांकडे पूर्ण दुर्लक्ष.


"सहाशे रुपये द्या". आज्ञा आली. वसंतरावांनी पैसे दिले आणि रेखाताईंबरोबर तिथुन ते बाहेर पडले. डोक्यात प्रियंकाबद्दल विचार येत होते पण रेखाताईंबरोबर चर्चा करायला हा विषय वसंतरावांना सुरक्षित वाटला नाही.


पुढचा आठवडा आला. रोजा बँक कोसळली. तिचे शेअर मातीमोल झाले. वसंतरावांना संकटातून सुटल्याचा आनंद झाला. गोराईच्या पुढच्या ट्रिपच्या वेळी लक्ष्मीच्या भाचीला थँक्स द्यायचं त्यानी मनोमन ठरवलं.


एक महिन्या नंतर एका रविवारी सकाळी रेखाताई आणि वसंतरावांची जोडी गोराई मच्छी मार्केट मधे आली. रेखाताई नेहमी प्रमाणे लक्ष्मी कोळिणीच्या समोर येऊन ठाकल्या. वसंतरावांनी निरिक्षिलं, शेजारची जागा रिकामी होती. मासळी निवडता निवडता रेखाताईनी लक्ष्मीला विचारलं, "तुझी भाची दिसत नाही आज ?"

"तिला बँकेत नोकरी लागली. ट्रेनिंगला पाठवलंय तिला." लक्ष्मी म्हणाली.

विषय तिथेच संपला. मासळी, भाजी खरेदी झाल्यावर दोघं घरी परतले.


असेच काही महिने गेले. धाकटा राजीव केमिकल इंजिनियरींगच्या तिसऱ्या वर्षापासून हॉस्टेलला रहायला गेला. जावई बापूंची पुण्याला बदली झाली आणि त्यामुळे मोठी मुलगी आणि सर्व फॅमिली पुण्याला निघून गेले. रेखाताईंच्या आणि वसंतरावांच्या गोराई मासळीबाजारच्या खेपा कमी झाल्या, बंदच झाल्या. लागेल तेव्हा जवळच्या कोल्ड स्टोरेज मधुन मासळी घेऊ लागले.


दिवस पुढे सरकले. राजीव केमिकल इंजिनियर झाला. इंजिनियरींग पास झाल्यानंतर, राजीवने दोन वर्षं, हीना सेंटस् मधे नोकरी केली. अत्तर, स्प्रे, आफ्टर शेव्ह अशा कॉस्मेटिक्स साठी लागणारे मूलभूत द्रव तयार करण्याचा अनुभव घेतला. मग त्याच्या मनात स्वतःचं स्वतंत्र युनिट काढण्याचे विचार यायला लागले. कंपनीनेही त्याला प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला हीना सेंटस् ला संलग्न आणि नंतर मार्केट वाढेल तशी हळूहळू पूर्ण स्वतंत्र कंपनी, अशा व्यावसायिक अटी. भांडवलाच्या तीस टक्के इक्विटी हीना घालणार आणि भांडवलाच्या सत्तर टक्के कर्ज मात्र राजीव ने आणायचं. हीच एक जरा ग्यानबाची मेख होती.


एवढं कर्ज आणायचं कुठुन आणि त्यासाठी अटी काय असतील ? स्वतंत्र व्यवसाय, बँकेचं कर्ज, या गोष्टींशी ना कधी वसंतरावांचा संबंध आला होता, ना कधी त्यांच्या जवळच्या नातलगांचा किंवा स्नेही मंडळींपैकी कुणाचा संबंध आला होता. सगळेचजण समाजाच्या उच्चभ्रू, पांढरपेशा, चाकरमान्या व्यवसायातले. वसंतरावांनी हात वर केले आणि राजीवला, आहे ती नोकरी पुढे चालू ठेवण्याचा सल्ला दिला.


मग एका दिवशी सकाळी राजीव वसंतरावांना म्हणाला, "बाबा माझा मित्र शशिकांत आहे नं, तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलाय बघा, आणि आता तिथेच नोकरी करतोय, त्याने एका बँकेचा रेफरन्स दिलाय. दहिसरला आहे ब्रँच. तिथल्या ऑफिसर आपल्याला चांगलं गाईड करतील म्हणतोय. जाऊया का आपण ?"


वसंतरावांनी होकार दिला. बाप लेक गेले दहिसरच्या बँकेत, इंन्डस्ट्रिअल लिएजन ऑफिसर प्रियंका खरडेना भेटायला. आत चिठ्ठी पाठवली. शशिकांतचा रेफरन्स लिहिला. ऑफिसर मॅडमनी लगेच त्याना आत बोलावलं. "होय, शशिकांत हॅज टॉकड् टु मी". मॅडम म्हणाल्या आणि सरळ कामालाच हात घातला.


पंधरा मिनिटं झाली, वीस मिनिटं झाली, तीस मिनिटं झाली. तब्बल एक तास राजीव आणि ऑफिसर मॅडममधे चर्चा चालली होती. राजीवचं प्रॉजेक्ट पूर्णपणे समजावून घेतल्यावर मुख्य कंपनीने घातलेल्या व्यावसायिक आणि व्यापारी अटींची चर्चा झाली. प्रश्न उपस्थित केले गेले, उत्तरे शोधली गेली. बोलण्यात मधून मधून शशिकांतचं नाव येत होतं. एक तासानंतर मॅडमनी चर्चा आवरती घेतली आणि मंडळींना आठवड्यानंतर यायला सांगितलं.


वसंतराव राहुन राहुन विचार करत होते, कि एवढा विस्तृत, सुखवस्तू कुटुंबांचा आपला गोतावळा, एवढे स्नेही संबंधी, पण कोणी कधी इंडस्ट्री काढली नाही, मग त्यासाठी बँकेची पायरी चढणं, कर्ज काढणं दूरच्या गोष्टी. समाजाच्या एका विशिष्ट पातळीवर विखुरलेली गोतावळ. नाही वरच्या स्तराशी संबंध, की नाही खालच्या स्तराशी. फक्त नाकासमोर चालणं माहिती. चाकोरीतून बाहेर येणायाचा प्रयत्न करणाऱ्या धाडसी तरुणांना विरोध होत नसला, तरी तसं मोठं सहाय्यही होत नाही.


आठवड्यानंतर वसंतराव आणि राजीव परत बँकेत गेले. आज ऑफिसर मॅडम थोड्या मोकळ्या असाव्यात. अर्धा तास चर्चा झाली. मॅडमनी राजीवला तीन सोपे पर्याय सुचवले. या पर्यायांपैकी जो काही फायदेशीर वाटेल, ज्याच्यामुळे प्रॉजेक्टच्या व्यावसायिक धारणेमधे कमीत कमी फेरफार करावे लागतील तो राजीवने स्वीकारावा असं त्यानी राजीवला सुचवलं. हे काम राजीवचं. इथपर्यंत मजल आल्यामुळे राजीव खूश झाला.


खरडे मॅडमनी चहा मागवला. वातावरण जरा रिलॅक्सड झालं.


चहा पिता पिता माधवरावानी खरडे मॅडमना मागच्या भेटीपासून मनाच्या खोलवर डाचत असलेली शंका बोलून दाखवली. "मॅडम पूर्वी आपण कधी भेटलो आहोत का? आपल्याला आधी बघितल्यासारखं वाटतंय."


मॅडम जरा हसल्या आणि म्हणाल्या, "तुम्हाला मी आठवत नसले तरी मला तुम्ही स्पष्ट आठवताय. रोजा बँकेचे शेअर घ्यायला निघाला होतात नं तुम्ही?"


रोजा बँक? मग वसंतरावांना हळूहळू आठवलं. ती बारटक्क्यानी दिलेली चुकीची टिप आणि नंतर त्या कोळिणीच्या भाचीने नजरेला नजर भिडवून दिलेला सल्ला, सगळं सगळं आठवलं.


"म्हणजे तू, तुम्ही गोराईच्या लक्ष्मी कोळिणीची भाची की काय !" डोळे विस्फारून वसंतराव उद्गारले.


खरडे मॅडम मंद स्मित करत होत्या. राजीव आ करून नुसतं ऐकत होता.


माधवरावानी चहा संपवला. कप खाली ठेवला. काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले, "लक्ष्मी भेटली नाही बरेच दिवसात, गोराई मार्केट मधे जात नाही नं हल्ली आम्ही."


"गोराईला गेलात तरी लक्ष्मी मावशी भेटायची नाही आता तिथे. माझ्या आईने आणि लक्ष्मी मावशीने भागिदारी मधे एक ट्रॉलर घेतलाय. मासळीचा ठोक व्यवहार करतात त्या. तिकडे वरसोव्याला ऑफिस केलंय त्यानी, खलाशी ठेवलेत, ऑफिस स्टाफ ठेवलाय नोकरीला." खरडे मॅडम म्हणाल्या.


"आणि तुमचे वडील ? ते नाहीत या बिजिनेस मधे?" वसंतरावांनी धीर करून विचारलं.


"नाही." मॅडम म्हणाल्या, "बाबा गोराडे साहेबांबरोबर समुद्र सेतू हॉटेलचे भागिदार आहेत. त्याना खूप काम असतं. गोराडेसाहेब म्हणजे माझे होणारे सासरे."


वसंतरावांच्या डोळ्यासमोर गोराई मार्केट मधे ओझरता पाहिलेला तो गळ्यात सोन्याची जाड साखळी घातलेला इसम उभा राहिला.


"आणि माझ्या होणाऱ्या सासू बाईंचा वरळीला डिस्को आहे." खरडे मॅडम पुढे सांगत होत्या.


वसंतरावांचं डोकं गरगरायला लागलं. पण एक महत्त्वाचा प्रश्न राहिलाच होता.

वसंतरावांनी विचारलं, "आणि तुमचे होणारे पति ?"


मॅडम एकदम हसल्या, "अहो, तो तर शशिकांत ! असं काय करता? त्याने सांगितलं नाही वाटतं तुम्हाला?"


हे तर वसंतरावांच्या कल्पनेबाहेर होतं.

नवरा केमिकल इंजिनियर, बायको बॅन्कर, सासरे हॉटेल वाले, सासू डिस्कोवाली, आणि या मुलीची आई ट्रॉलर मालकिण.

केवढी ही सामाजिक मिसळ.

हे आपल्या सामाजिक स्तरातलेच लोक म्हणायचे, की आपल्या सामाजिक स्तराच्या वरचे हे लोक, की खालचे म्हणायचे ? वसंतरावांना काहीच कळेना.


मीटिंग संपली. खरडे मॅडमना थँक्स देऊन बाप लेक घरी गेले.


पुढच्या एका वर्षात अनेक घडामोडी घडल्या.

कळत नकळत वसंतराव त्यात ओढले गेले. बरेच जुने विचार, आडाखे बदलले गेले.


राजीवने बँकेच्या बऱ्याच फेऱ्या केल्या. खरडे मॅडमशी आणि दुसऱ्या ऑफिसरांबरोबर मीटिंग झाल्या. खूप उहापोह झाला.


शशिकांतचा तिकडून फोनवर मिळालेला सल्ला आणि प्रियंका खरडे मॅडमची इथली खटपट, याना शेवटी यश मिळालं. राजीवचं बॅन्क लोन सँक्शन झालं. त्याचं स्वतःचं छोटं युनिट कार्यरत झालं. यशस्वी झालं. मुख्य कंपनीला संलग्न अतिशय उत्तम तऱ्हेने चालू लागलं.


आणखी सहा महिने गेले.


शशिकांत गोराडे अमेरिकेहून आला. प्रियंका खरडे आणि शशिकांत गोराडे यांचा दणक्यात विवाह झाला. विवाहाची बरीच फन्क्शन्स होती. राजीव सगळ्या समारंभांत गळ्यापर्यंत गुंतला होता. रिसेप्शनला राजीव बरोबर वसंतराव आणि रेखाताई गेले होते.


स्टेजवर नवपरिणीत वधूवर होते, त्यांचे आई वडील होते आणि प्रियंकाच्या बाजूलाच एक चुणचुणीत मुलगी उभी होती.


प्रियंकाने ओळख करून दिली. "ही माझी धाकटी बहीण अलका."


मुलीने वसंतराव रेखाताईंना नमस्कार केला आणि राजीव कडे हसून पाहून डोळे मिचकावले. वसंतरावांनी ते पाहिलं. त्यांच्या मनात धस्स झालं. पण ते काही बोलले नाहीत.


एक महिना होऊन गेला. राजीव खुशीत होता. फॅक्टरी युनिट फारच छान चाललं होतं आणि वाढवण्याचे विचार चालले होते.


आणि एका रविवारी राजीव अलकाला घेऊन घरी आला. रेखाताईंना थोडीशी कल्पना असावी, कारण एकतर वसंतरावांएवढ्या त्या धास्तावलेल्या दिसल्या नाहीत आणि दुसरं म्हणजे, चहा पाण्याची साधारण तयारी त्यानी आत करून ठेवली होती.


"हो, भेटलोत आम्ही हिला, प्रियंकाच्या लग्नात." रेखाताई राजीवला म्हणाल्या.


"काय करतात या?" वसंतरावांनी विचारलं.

"बाबा, ही टीव्ही सिरअल मधे काम करते, छोट्या मोठ्या. आणि मॉडेलिंग सुध्दा करते. बिझी असते खूप." राजीव म्हणाला.


जाताना अलकाने रेखाताई वसंतरावांना वाकून नमस्कार केला.

रेखाताई अलकावर खूश दिसल्या.


वसंतराव विचार करू लागले.

आपला मुलगा होतकरू इंडस्ट्रीयालिस्ट;

सूनबाई टीव्ही तारका; व्याही हॉटेल आणि बार मधे भागिदार; विहिणबाई मासळीच्या ठोक व्यापारात;

आणि आपण...

आपण कॉरपोरेट कंपनीतून निवृत्त एच आर मॅनेजर.


हे कसलं सामाजिक समीकरण ! ही तर सामाजिक मिसळ. शेव, कुरमुरे, कांदा उसळ यांचं मिश्रण.

मग आपलं स्थान काय या सामाजिक मिसळीत ? आपण शेव, कुरमुरे, कांदा की वरून चुरा करून टाकलेले पुरीचे तुकडे.


वसंतरावांना सामाजिक मिसळीचं समीकरण समजेना, पण एक खरं, शेवटी चव मात्र उत्तम. जिभेवर रेंगाळणारी.


दोन एक आठवडे गेले. वसंतरावांनी आणि रेखाताईंनी खरडे लोकांची भेट घेतली. हस्तमिलाप झाले.


"वर्ष सहा महिन्यात कार्य उरकायला पाहिजे." रेखाताई म्हणाल्या.

वसंतराव बँक बुकं उघडून बसले.


आणि मग एक दिवशी राजीव सांगत आला, "बाबा, पुढच्या महिन्यातला मुहूर्त धरायचाय."


वसंतराव आवाक् झाले. "अरे पंचवीस तीस दिवसात तयारी कशी होईल !" वसंतराव उद्गारले.


"बाबा काळजी नको त्याची." राजीव म्हणाला. "इट्स ऑल प्लॅन्ड. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचा हॉल आपल्याला मिळणार आहे. केटरर आणि डेकोरेटर तिथलाच. लग्न आणि रिसेप्शन तिथे होईल, आणि लग्नानंतर आपल्या नातेवाईकांना तिखटी पार्टी वरसोव्याला अलकाची आई अरेंज करणार आहे. ट्रॉलर मधलं फ्रेश फिश. आणि बाबा, संगीत आणि मेहंदी कार्यक्रम वरळीच्या डिस्को मधे. बाबा तुम्ही फक्त भटजी शोधा."


वसंतरावांनी मान डोलावली. सगळ्या समीकरणांना सोपी उत्तरं होती. जीवनाच्या गणितात ती सामावून गेली होती.


थोडं थांबून राजीव म्हणाला, "ऐका तरी बाबा, आमची प्रिन्सिपल कंपनी स्वित्झरलंडची दोन तिकिटं देणार आहे, हनिमूनसाठी गिफ्ट."


"अस्सं, छान छान" वसंतराव म्हणाले.


"हो नं. हे तर फारच छान झालंय बाबा. राजीव म्हणाला, "त्याच वेळी डॅव्हॉसला एक इन्टरनॅशनल कॉन्फरन्स आहे, ती मी अटेन्ड करीन आणि अलकाच्या पण स्वित्झरलंड मधल्या शूटिंगच्या तारखा त्याच सुमाराला लावल्यात."


वसंतरावांनी जो आ केला तो अजून मिटला नाही. आतापर्यंतची सगळी सामाजिक मिसळ त्यानी पचवली होती. सगळी कॉम्प्लेक्स समीकरणं व्यवस्थित सोडवली होती. पण मीटिंग आणि शुटिंगचं समीकरण त्याना हनिमूनच्या गणितात अजूनही बसवता आलेलं नाही


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama