मॅनेजमेंट हॅट्रिक
मॅनेजमेंट हॅट्रिक
मॅनेजमेंट गुरु रविराज आपल्या अभ्यासिकेत बसले होते. समोर लॅपटॉप उघडलेला, हातात आय फोन. पावर पाॅइन्टवर प्रेझेंटेशन तयार करण्याचं काम जोरात सुरू होतं.
"मॅनेजमेंट गुरू ", "तज्ञ सल्लागार "!!
स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या हुशारीने आणि त्याहून जास्त म्हणजे, त्यांना नशीबाने योग्य वेळी हात दिल्याने रविराज यशस्वी झाले होते.
औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात रविराजांचा, "मानवी हितसंबंधांचे तज्ञ सल्लागार", "ह्युमन रिलेशन्स एक्सपर्ट कन्सल्टन्ट", म्हणून लौकिक होता. प्रत्येक शहरात छोटे मोठे औद्योगिक प्रकल्प, व्यावसायिक क्षेत्रे, यांची जशी जशी वाढ होऊ लागली तशी तशीच या सगळ्या संस्थां मधील नोकर वर्गाची संख्याही वाढू लागली. नोकरवर्ग आणि कंपन्यांचे व्यवस्थापक यामधे बारिक सारिक कारणांवरूनही खटके उडू लागले. सगळेच खटके, तंटे कायद्यावर बोट ठेवून सोडवणे नेहमीच शक्य नसायचं. अशा वेळी मॅनेजमेंट गुरू रविराजांकडे लोक धाव घेत असत.
भन्नाट कल्पना लढवून, म्हणजे आऊट ऑफ बाॅक्स थिंकिंग करून वेळोवेळी येणाऱ्या कामगारांच्या आणि इतर नोकरवर्गाच्या व्यवस्थापकीय समस्यांवर तोडगा सुचवणे, मानवी हितसंबंधांत उठणाऱ्या वादळांवर सोपे उपाय सुचवणे हा त्यांचा हातखंडा विषय झाला होता. कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी करण्याची त्याना जरूरच नव्हती. त्यांचं एन्गेजमेन्ट कॅलेंडर सदैव फुल असे. त्याचप्रमाणे, नावाजलेल्या कंपन्यांकडून, व्यावसायिक संस्थांकडून भाषणे देण्यासाठी, सेमिनार आणि पॅनेल डिस्कशन मधे सहभागी होण्यासाठी त्यांना नेहमी आमंत्रणे येत असत.
रविराज आमंत्रणे स्वीकारण्यात खूपच चोखंदळ असायचे; आणि तरीसुद्धा, तारखांची तडजोड करता करता त्यांच्या सेक्रेटरीला, सविताला नाकीनव येत असत.
अभ्यासिकेच्या दरवाजावर टकटक आवाज झाला. हातात आय पॅड घेऊन सविता आत आली.
"सर, खोपोलीच्या रोटरी क्लबकडून आमंत्रण आलंय, "कामगारांचे प्रश्न सोडवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती आणि त्यांच्या यशाचे मोजमाप", या विषयावर त्यांच्या साप्ताहिक सभेत भाषण देण्यासाठी".
"या विषयाशी रोटरी क्लबचा काय संबध", रविराजना कोडे पडले.
"सर, ही सभा खोपोलीच्या उद्योग समूहाच्या असोसिएशनने स्पाॅन्सर केली आहे. जोशी नावाचे अध्यक्ष आहेत त्या असोसिएशनचे आणि ते तिथल्या रोटरी क्लबचे सेक्रेटरी सुध्दा आहेत. त्यांच्याच सहीचं पत्रं आहे." सविताचे स्पष्टीकरण.
"खोपोलीचे जोशी ?" रविराजाना त्यांच्या करिअरचे सुरूवातीचे दिवस आठवले. खोपोलीच्या स्टार इंजिनियरींग कंपनीमधे दहा बारा वर्षांपूर्वी, रविराज म्हणजे त्यावेळच्या रवीच्या करीअरची सुरुवात झाली होती. चीफ इंजिनियर जोशींना नव्याने आलेल्या ह्यूमन रिलेशन मॅनेजर रवीने सुरुवातीला जरा चकवलंच होतं. कामगारांना बोनसच्या ऐवजी रवीने चुकुन लाडू देऊ केले होते, तरीही तो पहिलाच प्रश्न आश्चर्य कारक रीतीने सुटला होता. त्या पहिल्या यशा नंतर रवीचा आत्मविश्वास वाढला होता विचारांना दिशा मिळाली होती आणि बरेचसे मह्त्वाचे प्रश्न सोडवायला जोशींना त्याने खूपच मदत केली होती. काम करता करता दोघांची खूपच गट्टी जमली होती. पुढे रवीची बदली मुंबईला हेड ऑफिस मधे झाली. रवी यशाच्या आणि प्रसिद्धीच्या पायऱ्या भराभर चढत गेला. रवी चा रविराज झाला. मोठा मॅनेजमेंट गुरू झाला. आणि मग जुने संबंध कामाच्या रामरगाड्यात बॅकस्टेजला गेले.
"सविता, खोपोलीच्या स्टार इंजिनियरींग कंपनीशी काही संबंध आहे का या जोशींचा, पहा जरा", रविराजांनी सविता ला विचारलं.
"हो सर. हे जोशी साहेब खोपोलीच्या स्टार इंजिनियरींग चे जनरल मॅनेजर आहेत. त्यांच्याच लेटरहेडवर हे पत्र आलंय." सविताने माहिती पुरवली. "पुढच्या महिन्यात चार तारखेला संध्याकाळी सात वाजता मीटिंग आहे सर, आणि त्या नंतर डिनर. आणि सर, या मीटिंगमध्ये जोशी साहेब ठराव मांडणार आहेत म्हणे, आपल्याला खोपोलीच्या उद्योग समुहाचे एक्सपर्ट कन्सल्टन्ट म्हणून रिटेनर काॅन्ट्रॅक्ट देण्याचा."
मॅनेजमेंट गुरु रविराजांचे डोळे लकाकायला लागले. जरासा विचार केल्यासारखं करून त्यांनी खोपोली रोटरी क्लबला होकारार्थी उत्तर पाठवण्याची सविताला सुचना दिली. मीटिंग वगैरे संपल्यानंतर तिथल्या ऑफिशिअल डिनर ऐवजी जोशी बरोबर क्लबमधे बसून गप्पा मारायची आणि मग लेट डिनर घ्यायची कल्पना रविराजांच्या मनात उमलू लागली.
जुन्या आठवणींमधे जरा वेळ डुबक्या घेतल्यानंतर रविराजांचं मन जरा उल्हसित झालं आणि मग ते परत आपल्या कामाकडे वळले.
दारावर टकटक.
"सर, हे अहमदाबादच्या मॅनेजमेंट इन्सटिट्यूटचं आमंत्रण आलंय." सविता परत एकदा आत आली. आणि आय पॅडवरचं ई मेल दाखवत म्हणाली, "पुढच्या महिन्यात त्यानी एक व्याख्यान माला आयोजित केलेली आहे आणि तुम्हाला चार तारखेला त्या मालिकेत व्याख्यान देण्याचं आमंत्रण आहे.
"हे पहा ई मेल सर, प्रवास खर्च, मानधन वगैरे बरच काही लिहिलं आहे. आणि सर, असंही म्हटलंय की भाषणाला चांगलं रेटिंग मिळालं तर इन्स्टीट्यूटचे एक्सटर्नल फॅकल्टी म्हणून दोन वर्षांचं काॅन्ट्रॅक्ट होऊ शकेल. सर अहमदाबाद ची फॅकल्टी पोस्ट मिळणं हा मोठा सन्मान आहे नं !
"पण यांची तारीख नेमकी खोपोलीच्या मीटिंग च्या तारखेला पडतेय. खोपोलीला पाठवायचं ई मेल मी ड्राफ्ट केलंय, अजून पाठवलं नाही. काय करायचं ते सांगा." सविताने एका दमात सांगुन टाकलं आणि ती वाट पाहू लागली.
मॅनेजमेंट गुरू रविराज विचारात पडले. पण लगेच त्यांनी सविताला विचारलं, "किती वाजता आहे अहमदाबादचा कार्यक्रम? "
सविताने आय पॅडवर टिचकी मारली आणि त्यात बघुन सांगितलं, "सकाळी दहा ते बारा तुमच्या सेशनची वेळ दिली आहे सर. त्यानंतर, पण लंच ब्रेकच्या आधी बारा ते दीड दुसऱ्या कोणाचं तरी सेशन आहे. पण तुम्हाला लंचला थांबण्याचं आग्रहाचं निमंत्रण आहे सर".
"लंच वगैरे ला थांबण्याचं काही कारण नाही. आपला प्राॅब्लेम सुटलेला आहे. मी काय करीन, अहमदाबादच्या इन्स्टिट्यूट मधलं लेक्चर संपलं की सगळ्यांचा व्यवस्थित निरोप घेऊन सरळ टॅक्सी घेऊन विमान तळावर जाईन. दोन वाजता, मला वाटतं एक दिल्ली अहमदाबाद मुंबई फ्लाइट आहे. ती फ्लाइट घेतली की दुपारच्या तीन पर्यंत मुंबई. मग डायरेक्ट मुंबई विमानतळावरून टॅक्सी घ्यायची, की संध्याकाळी सहा पर्यंत आरामात खोपोली. सातच्या लेक्चर ला रोटरी क्लबमधे हजर. काय, आहे की नाही हा सर्व साधणारा प्रोग्रॅम?" रविराज स्वतःवरच खूश झाले.
सविताने मान डोलावली. तिलाही त्यात काही वावगं दिसलं नाही.
"ठीक आहे सर, त्याना होकारार्थी ई मेल पाठवून देते आणि नंतर प्रवासाची तिकिटं, बुकिंग वगैरे पहाते", असे म्हणून सविता बाहेर जायला निघाली.
"आणि हो, त्या खोपोलीच्या जोशी साहेबांना फोन करून मीटिंग नंतरच्या कार्यक्रमाचा जरा कानोसा घे, म्हणजे तिथे रात्री रहाण्याची सोय त्यांच्या विचाराने करता येईल." रविराजांनी सूचना दिली.
रविराजांना फारच आनंद झाला होता. विरोधी टीम चे सलामी चे दोन्ही फलंदाज आपल्या गोलंदाजीच्या कौशल्याने एकापाठोपाठ एक तंबूत पाठवल्यावर त्या गोलंदाजाला जसा आनंद होतो ना, तसाच. आणि या विकेटस् तर रविराजांच्या दृष्टीने फारच महत्वाच्या होत्या. अहमदाबादच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये एक्स्टर्नल फॅकल्टीची ऑफर येणं आणि खोपोलीच्या उद्योग समूहाच्या कन्सल्टन्सीची रिटेनरशिप मिळणं म्हणजे एक स्थिर स्वरूपाच्या आमदनीचा ओघ चालू होणं. या दोन्ही संधी बऱ्याचशा प्रमाणात आवाक्यात आल्या होत्या.
थोडा वेळ स्वतःची पाठ थोपटण्यात घालवल्यावर मॅनेजमेंट गुरू रविराज दोन्ही ठिकाणी देण्याच्या भाषणांवद्दल विचार करू लागले. पण त्या रुक्ष विषयात त्यांचं मन लागेना कारण खोपोलीच्या भाषणानंतरच्या रंगीन कार्यक्रमाचे विचारच त्यांच्या डोक्यात फिरायला लागले.
आता जरा सविताला काॅफी करायला सांगावी आणि मग परत कामाला लागावं असा विचार करून रविराजांनी घंटेच्या बटनाकडे हात नेला, तेवढ्यात दारावर टकटक वाजलं आणि सविता आत आली.
"सर, या पुढच्या महिन्याच्या चार तारखेसाठी आणखी एक आमंत्रण आलंय. ही चार तारीख खूपच पाॅप्युलर दिसतेय, सर." सविता म्हणाली.
"आणखी एक आलंय ? कोणाचं आमंत्रण आहे ?" जरासा त्रासिक चेहरा करून रविराजांनी प्रश्न केला.
"सर अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून आमंत्रण आहे. चार तारखेला त्यानी एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित केलाय. विषय आहे, "अवघड औद्योगिक प्रश्नांची सोपी उकल". व्हीडीओ काॅन्फरन्स आहे, सर. मुंबईला वरळीच्या स्टुडिओमधे व्हिडिओची सोय करणार आहेत. रात्री आठ वाजता ची वेळ दिली आहे चार तारखेला." सविता ने माहिती दिली.
"हे अवघड आहे." रविराज म्हणाले. "अगदी हेलिकॉप्टरने गेलो तरी खोपोलीचं लेक्चर संपवून रात्री आठला वरळी स्टूडिओला पोहोचणं शक्य नाही. त्यांना दिलगिरीचं पत्र पाठवून दे."
"सर, ते म्हणतायत की परिसंवाद जर चांगल्या रितीने पार पडला तर आपल्याला एक्स्टर्नल फॅकल्टी म्हणून तीन महिन्यांसाठी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मधे लेक्चरस् देण्यासाठी आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे." सविता ने सांगितले.
रविराज गोंधळात पडले. ही विकेट तर फारच मोलाची. कशी फिरकी गोलंदाजी करावी बरं ! थोडा वेळ डोळे मिटून रविराज विचार करत होते. सविता पहात होती. रविराजांच्या मेंदूत जोरात सुरु असलेल्या विचारयंत्राची टिकटिक तिलाही बाहेर ऐकू येत होती.
रविराजांनी एकदम डोळे उघडले. "सविता," रविराज जवळ जवळ ओरडलेच. "कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीनी दिलेली संध्याकाळी आठ वाजताची वेळ कुठल्या टाईम झोन मधली आहे ते पहा बरं जरा. आपला भारतीय टाईम झोन म्हणजे आय एस टी आहे की इंग्लंडचा जी एम टी आहे की आणखी काही दुसराच आहे ?"
सविताने आय पॅडला टिचकी मारून जागृत केलं. मग त्यात एक नजर टाकून सविता म्हणाली, "सर, दोन्ही नाही. यात पी एस टी लिहिलंय".
रविराजांनी मान डोलावली. "कॅलिफोर्नियाचा पॅसिफिक स्टॅन्डर्ड टाईम, पी एस् टी. आपल्या पेक्षा साडे बारा तास मागे आहे. याचा अर्थ असा की परिसंवाद त्यांच्या चार तारखेच्या रात्री आठला म्हणजे आपल्या पाच तारखेच्या सकाळच्या साडेआठला सुरू होणार आहे.
रविराजांनी एक चुटकी वाजवली, चला सगळेच प्राॅब्लेम सुटले. खोपोलीहून चार तारखेच्या रात्री दहाला निघालं तरी मुंबईला घरी रात्री बारा एक पर्यंत पोहोचता येईल, आणि मग छानशी झोप घेऊन सकाळी साडेआठला वरळी च्या त्यांच्या स्टूडिओमध्ये जाणं सहज शक्य होईल. वा, छान. ही विकेट पण पदरात पडली. अगदी हॅट्रिक.
"होकार दे त्याना". रविराजानी सविताला सांगितलं.
मॅनेजमेंट गुरु रविराज आता इन्टरनॅशनल गुरु होणार होते. रविराज खुशीत आले. स्वत:वर बेहद्द खुष झाले. तीन गुंतागुंतीची प्रमेये आपल्या बुद्धीकौशल्याने रविराजांनी सोडवली होती. त्यांना खुश झालेलं बघुन सवितालाही बरं वाटलं.
रविराजानी आपले दोन्ही हात मानेच्या मागे आपल्या एक्झिक्युटिव चेअर च्या बॅक रेस्ट मधे अडकवले आणि हसत हसत म्हणाले, "सविता काॅफी बनव छानशी. तुलाही घे एक कप. आणि हो, बिस्कीटं आण, ती आपण व्ही आय पी क्लायंट साठी ठेवतो ती. आजची हॅट्रिक यथोचित साजरी करायलाच हवी."
"यस सर" असे म्हणून सविता बाहेर गेली.
रविराज डोळे मिटून आरामात स्वस्थ बसले होते.
पाच मिनिटांनी दारावर परत टकटक झाली.
अरेच्चा एवढ्यात काॅफी झाली!!! अशा विचाराने रविराज थोडे चकित झाले.
सविता आत आली.
"सर घरून स्वाती मॅडमचा फोन आला होता", सविता म्हणाली.
"असं, काय म्हणतायत आमच्या अर्धांगिनी" रविराजांनी विचारलं.
"सर, त्यांनी तुम्हाला निरोप ठेवलाय की पुढच्या महिन्याच्या पाच तारखेला आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, चार तारखेच्या रात्री आपल्या मित्रमंडळीना जेवायला बोलावायचंय आणि पाच तारखेला आपण सकाळपासून गोराईच्या रिसाॅर्टला जाणार आहोत. तेव्हा, चार आणि पाच तारखेला कुठल्याही एन्गेजमेन्ट ठेऊ नका".
रविराज एकदम चमकले. तोंडावर कुणी तरी गार पाण्याचा हबका मारावा तसं त्यांना झालं. त्यांच्या खुशीचा उबदार फुगा फट्कन फुटून गेला.
कसली हॅट्रिक आणि कसलं काय .
हॅट्रिक बाजूलाच राहिली, आता हा अख्खा सामनाच पावसाने धुवून निघण्याची पाळी आली.
आता हा प्रश्न कसा सोडवायचा? मॅनेजमेंट गुरू रविराज विचार करू लागले.