Sudhir Karkhanis

Others

4.7  

Sudhir Karkhanis

Others

काहुर

काहुर

11 mins
955


"चला, मेडिटेशनची सुरुवात ओमकाराने करुया". बाकड्यावर बसलेल्या छोट्याशा ग्रुपला उद्देशून कमलाप्रसाद म्हणाले. कमलाप्रसादांनी स्वतः ओमकाराची पोज घेतली आणि बाकीच्या तिघांनी ताबडतोब त्यांचं अनुकरण केलं. ओमकाराचा गंभीर नाद भारत भूमीपासून हजारो किलो मीटर दूर असलेल्या त्या छोट्याश्या शेडमधे घुमू लागला.


कमलाप्रसाद, सुनिल मित्तल, संदीप नंदा आणि राजू देशपांडे, असा, म्हटलं तर जरा ओढुन ताणुनच एकत्र आलेला हा ग्रुप होता. भारतातल्या वेगवेगळ्या  ठिकाणांहून इतक्या दूर टेक्सासच्या एका शहरात ही मंडळी स्थाइक झाली होती आणि वीक एन्डला सकाळी लवकर उठून पार्क मधे फिरायला जाण्याच्या आरोग्यदाई सवईतून या चौघांची प्रथम ओळख आणि मग दाट मैत्री झाली होती. शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी साडे सातच्या सुमारास पार्क मधे ही चौकडी जमायची. तलावाला दोन चकरा मारायच्या आणि मग त्या काठच्या छोट्या शेडमधे आसनस्थ होऊन ओमकार नाद, मेडिटेशन, गायत्री मंत्र, मृत्युंजय मंत्र वगैरे यथाशक्ती उपासना आणि काही योग एक्सरसाईज करायचे असा त्यांचा रोजचा परिपाठ होता. मोहन किरमानी, कृष्णा शहा, केतन गांधी वगैरे मित्र अधुन मधून जाॅइन व्हायचे खरे पण या चौकडीचा वीक एन्ड नियमितपणा आणि त्यांची शिस्त बध्दता इतर कुणालाच झेपायची नाही.  


मेडिटेशन झालं, एक्सरसाइज झाले. शेवटी सूर्याला आणि भूमीला वंदन केल्यानंतर मंडळी दिलखुलासपणे गप्पा टप्पा करायला मोकळी झाली. सर्वांनाच सुट्टी असल्यामुळे ही मित्रमंडळी मोकाट सुटायची आणि या नंतरच्या अर्ध्या तासात त्या छोट्या शेडमधे हास्य विनोदाचे इतके उंच उंच फवारे उडायचे की शेजारच्या तलावातला कारंजाही कधी कधी स्तिमित व्हायचा. संदीप नंदाच्या एकेक भन्नाट असत्यकथा सुनिल मित्तलच्या सरकारी नोकरीतल्या सुरस सत्यकथांच्या तोडीस तोड असायच्या .


"संदीप भाई," मोजे-बूट पायात सरकवता सरकवता सुनिल मित्तल संदीप नंदाना  उद्देशून म्हणाले, "मागच्या रविवारी मुंबई च्या त्या लाचखाऊ कस्टम ऑफिसरची गोष्ट अर्धवटच राहिली होती ."

"अरे हो", म्हणून संदीप नंदानी पुढचा भाग सांगायला तोंड उघडलं आणि सगळेजण बाकावर बसून उत्सुकतेने त्यांच्या कडे मोहरे फिरवून बसले. गोष्ट सुरू झाली आणि रंगातही आली. कस्टम ऑफिसर आता रंगे हाथ पकडला जाणार, तेवढ्यात व्यत्यय आला. नेहमीच्या सवयी प्रमाणे आरडाओरडा करत कृष्णा शहा तेथे शेडमधे बाकाजवळ येऊन टपकले. एरवी त्याना दटावत हाताच्या इशाऱ्यानी सगळ्यानीच गप्प केलं असतं पण आज त्यांच्या बरोबर कोणी नवाच भारतीय इसम होता. तिऱ्हाइता समोर असभ्यता कशी दाखवायची ! संदीप नंदाची गोष्ट तिथेच थांबली.


कृष्णा शहा बसले. तो नवा देसी इसमही बसला. कृष्णा शहा नी ओळख करून दिली. "हे डाॅक्टर शरण. प्रोफेसर आहेत ते, रूरल इकाॅनाॅमिक्सचे".

सर्वांनी कौतुकाने माना डोलावल्या. हे काही औषधपाण्याचे डाॅक्टर नाहीत एवढे सर्व मंडळींच्या लक्षात आले.  " ईथल्या युनिव्हर्सिटी काॅलेज मधे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून तीन महिन्यासाठी आले आहेत." कृष्णा शहाने ओळख करून देण्याचे आपले कर्तव्य पुरे केले.


गप्पा टप्पा, हास्य विनोद परत सुरू झाले. पण त्यात तेवढा जोर नव्हता. नवखा मनुष्य ग्रुपमध्ये आल्याने सर्वांनाच जरा अवघडल्या सारखे वाटत होते. डाॅक्टर शरण सुध्दा नंदा संपतच्या आणि कृष्णा शहाच्या पाचकळ विनोदांना केवळ हलक्याशा स्मित हास्याने दाद देत होते. लवकरच मंडळी उठली. आपापल्या  घरच्या चहा काॅफी ची ओढ सगळ्यानाच मनोमन लागली होती.

हस्तांदोलनं झाली.


"तुम्हाला इन्टरेस्ट असेल तर या उद्या सकाळी साडे सातला, आमच्या बरोबर मेडिटेशन आणि योगिक एक्सरसाइज करायला". राजू देशपांडेनी डाॅक्टर शरणला औपचारिकपणे आमंत्रण दिले.

"साडे सातला का ? मी जरूर येईन". एका झटक्यात डाॅक्टर शरणनं निमंत्रण स्विकारलं.

राजू देशपांडेचा मराठी संशयात्मा या तडकाफडकी आमंत्रण स्वीकारण्याने जरा चमकलाच.

"अनोळखी माणसाला दूर ठेवायला पाहिजे होतं", अशी एक विचारांची पाल मनात चुकचुकून गेली.


पार्कच्या बाहेर पडल्यावर तीन गट तीन दिशांना लागले. राजू देशपांडे आणि संदीप नंदा एकमेकाचे शेजारी. बोलत बोलत, फुटपाथ वर चालत दोघं कॅन्यन रोडला वळले. मिलर क्रीकच्या वाटेला लागल्यावर उशिराने वाॅकला निघालेली ओळखीची मंडळी भेटायला लागली आणि त्यांना हॅलो करत, एकमेकांशी कॅजुअल गप्पा मारत दहा पंधरा मिनिटात दोघंही घरापर्यंत पोहोचले. संदीप नंदाला "बाय" करून  राजू देशपांडे घरात शिरला.


शनिवारचा दिवस. साडे नऊ ची वेळ. घरात बऱ्यापैकी उठाउठ झाली होती. वसुधा च्या बँकेला सुट्टी असल्यामुळे फॅमिलीसाठी सन्डे ब्रेकफास्ट बनवण्याच्या प्रयत्नात ती होती. जय आणि विजय मागच्या लाॅनवर बास्केटबॉल खेळत होते. राजू देशपांडेने टेबलवर झाकून ठेवलेला काॅफीचा ग्लास उचलला आणि गरम करायला मायक्रोमधे ठेवला. राजू घरात आल्याची चाहूल लागताच बास्केटबॉल तिथेच सोडून जय आणि विजय आत आले आणि "हे डॅड", करत सोफावर त्याच्या दोन्ही बाजूला बसले. मग दिवसाभराच्या अॅक्टिव्हिटिजचं प्लॅनिंग सुरू झालं.


दोघंही भाऊ अगदी मातृमुखी. विजय पेक्षा जय चांगला दिड एक वर्षांनी मोठा पण वागण्यातून जास्त बालिश. लाडे लाडे बोलणं वागणं अजूनही लहानासारखं. जयच्यावेळी, सातवा महिना लागता लागता वसुधा माहेरी गेली होती आणि लगेचच जय जन्मला होता. प्रिमॅच्युअर जन्मलेला असला तरी त्याच्यात सुदैवाने काही विकृती नव्हती. तरीपण सावधगिरी म्हणून बाळंतपणानंतर वसूधा चांगली सहा महिने माहेरी राहिली होती आणि तिथेच सगळं बिघडलं होतं. आजोळच्या लाडांनी थोड्या प्रमाणात हट्टी झालेल्या जयला चुचकारता चुचकारता नाकी नऊ यायचे. पुढे विजयचा जन्म झाल्यावर प्रकरण जास्तच नाजुक झालं. विजय खूपच शांत आणि समजुतदार होता. बऱ्याच प्रसंगी , रडणाऱ्या जय दादाला आपणहून आपलं खेळणं देऊन छोटु विजयने शांत केलं होतं. राजू देशपांडे स्वतः लहानपणापासून शांत स्वभावाचा होता. हट्ट करणे, आक्रस्ताळेपणा त्याला माहितच नव्हता. त्यामुळे जयच्या हट्टी स्वभावाचं त्याला आश्चर्य वाटायचं.  


असा हा जय लाडोबा त्याच्या डॅडीच्या उजवीकडे आणि विजय डावीकडे बसून दिवसाभराच्या आपापल्या अॅक्टिव्हिटी प्रोग्रॅम साठी कॅनव्हासिंग करत होते. वसुधा बशांनी भरलेला ट्रे घेऊन आली. भुकेल्या सैन्याला रसद मिळाली आणि मग हळूहळू तिढा आपोआपच सुटत गेला. मग रात्रीच्या डिनरबद्दल प्लॅनिंग सुरू झालं. देशपांडे कुटुंबाचा, महिन्यातल्या पहिल्या शनिवारी रात्री पटवर्धन कुटुंबाबरोबर एकत्र जेवण्याचा कार्यक्रम गेली कित्येक वर्षं अबाधित चालू होता. पटवर्धन कुटुंब जवळच इन्डिपेन्डन्स अॅव्हेन्यूवर रहायचे. राजू देशपांडे आणि अशोक पटवर्धन समव्यवसाइक असल्यामुळे जिगरी दोस्त होते आणि तसंच, किंबहुना जास्तच, वसुधा आणि वशिष्ठीची दृढ मैत्री होती. वसुधा आणि वशिष्ठी काॅलेज मधल्या मैत्रिणी. सोलापूरच्या काॅलेज मधून इकाॅनाॅमिक्स मेजर विषय घेऊन पदवी घेतल्यानंतर मुंबईला मॅनेजमेंटचा कोर्सही दोघींनी बरोबर केला होता.


 अशोक आणि वशिष्ठी पटवर्धन ची मुलं शलाका आणि किरण. अशोक आणि वशिष्ठी प्रमाणेच किरण गोरागोमटा आणि सगळ्यांबरोबर मिळुन मिसळून वागणारा होता. शलाका जरा सावळीच आणि स्वभावाने सुरुवातीला तरी जरा संकोची आणि अबोल. यामुळे त्या कुटुंबात शलाका जरा वेगळीच वाटायची. राजू देशपांडे अशोकला बऱ्याचदा विनोदाने म्हणत असे, "गड्या, आपली दोघांचीही पहिली अपत्ये जरा वेगळीच आहेत". अशोक नेहमीच त्यावर काहीतरी विनोदी उत्तर देऊन गोष्ट हसण्यावारी नेत असे.


"डॅड, आज इटालियन रेस्टॉरंट मधे जायचं ठरवलंय, आठवतंय ?" जय ने आठवण करून दिली. लगेच पटवर्धनांकडे फोन लावला गेला आणि संध्याकाळी ऑलिव गार्डन इटालियन रेस्टॉरंट मधे सर्वांनी जायचं पक्कं झालं.


शनिवार आनंदात पार पडला. कराटे क्लास, बास्केटबॉल कोचिंग, गणित स्पेशल कोचिंग वगैरे अॅक्टिविटीज साठी मुलांची ने आण करण्याची कामं इकडे राजू-वसुधा नी आणि तिकडे अशोक-वशिष्ठी नी इमाने इतबारे पार पाडली आणि मग स॔ध्याकाळी ऑलिव गार्डन रेस्टॉरंट मधे सगळ्यांचाच श्रम परिहार झाला.


रविवार उजाडला. सकाळी सव्वा सातला राजू देशपांडे घराबाहेर पडला. गेटच्या बाहेर संदीप नंदा वाट पहातच होता. झरझर चालत पंधरा मिनिटात दोघंही पार्क पर्यंत पोहोचले. तिकडे शेडमधे कमलाप्रसाद, सुनील मित्तल आणि डाॅक्टर शरण त्यांची वाट पहात होते. खरं तर शनिवारी सकाळी पार्क मधून निघाल्यानंतर डाॅक्टर शरण दोघांच्याही मनातून पूर्ण विसरला गेला होता. एकमेकाला हॅलो हॅलो करत सगळ्यांनी बूट मोजे काढले आणि आपापल्या जागा घेतल्या.  कमला प्रसादांच्या नेतृत्वाखाली पुढचा अर्धा तास योगिक एक्सरसाइज आणि मेडिटेशनमधे गेला. प्रसन्न मूडमधे सर्व जण उठले आणि आपापल्या चपला बूट सँडल्समधे पाय सरकवते झाले.


"शरण बाबू, छान सिन्क्रोनाइज केलंत सगळ्यांबरोबर तुम्ही". कमला प्रसादनी डाॅक्टर शरणला उत्स्फूर्तपणे सर्टिफिकेट दिलं. कोणी हसून, कोणी हस्तांदोलन करून, सर्वांनीच वेगवेगळ्या तऱ्हेने शरण बाबूचे कौतुक केले.


हलक्याफुलक्या गप्पा झाल्या आणि सर्व जण आपापल्या घरांकडे पांगले.

डाॅक्टर शरण आता ग्रुपमध्ये बऱ्यापैकी सामावून गेले होते. पुढच्या रविवारी सर्वांबरोबर उत्साहाने तेही सकाळी साडेसात ला पार्कमधे हजर झाले. काही योगिक एक्सरसाइजेस मधल्या होणाऱ्या चुकाही त्यानी दाखवून दिल्या.


"डाॅक्टर, इंडियात कुठे असता आपण?" संदीप नंदाने बाकावर बसता बसता चौकशी केली.

"मी मुळचा सोलापूरचा पण आता बंगलोर मधे स्थाइक झालोय." डाॅक्टर शरणने माहिती पुरवली.

सोलापूर म्हटल्यावर राजू देशपांडेने कान टंवकारले आणि क्षणभरच आपला सोलापूरशी असलेला ऋणानुबंध सांगण्याच्या मोह त्याला झाला. तेवढ्यात त्याच्यामधला जातिवंत मराठी माणूस जागा झाला आणि अर्धवट उघडलेलं तोंड त्याने गपकन् बंद केले.  


"राजू, तुझ्या मिसेस आणि अशोक पटवर्धन च्या मिसेस पण सोलापूर की कोल्हापूर च्या आहेत नं?" संदीप नंदा कुजबुजला.


"अं, हो नं". राजू देशपांडे नं अर्धवट उत्तर दिलं.


तिकडे कमला प्रसाद ची शरण बरोबर काही चर्चा चालू होती. त्यामुळे इकडे इतर कोणाचं लक्ष नव्हतं.


"इथे यू टी डी बरोबर किती महिन्यांचं काॅन्ट्रॅक्ट?"

संदीप ने थोड्या वेळाने परत चौकशी केली.

"तीन महिन्यांचं आहे सुरुवातीला. एक्सटेन्डेबल".

शरणने शांतपणे उत्तर दिलं.

"अरे वा, मग फॅमिली आणायचा विचार असेल तुमचा ", संदीप ने विचारलं.

हा प्रश्न डाॅक्टर शरणना बहुतेक अपेक्षित असणार.

एक हास्याचा फवारा सोडून ते म्हणाले, "नो, आय अॅम नाॅट मॅरीड".


डाॅक्टर शरण बरोबरच्या संभाषणाला मग एकदमच खीळ बसली.

तेवढ्यात सुनील मित्तल च्या घरून फोन आला. "घरी जाता जाता मंडळींना चहा प्यायला घेऊन या. सामोसे आणलेत मी एशियन फ्लेवर मधून."


सुनील मित्तल चं घर पार्क पासून पाच मिनिटांच्या अंतरावर होतं आणि एवढं प्रेमाचं आमंत्रण डावलणं शक्यच नव्हतं. सगळ्यांनी आनंदानी माना डोलावल्या.


सौ मित्तल सर्वांची वाटच पहात होत्या. बाहेरून आणलेल्या सामोश्यांबरोबर बऱ्याच होम मेड सप्लिमेंटरीसुध्दा होत्या, आणि एकामागोमाग एक त्या येतच गेल्या.


मित्तल दंपतीच्या अगत्याने सगळेच सुखावले होते. चहाचा दुसरा कप खाली ठेवता ठेवता संदीपने परत विषय काढलाच.


"डाॅक्टर, अनमॅरिड राहण्याचं काही विशेष कारण? नाही आपलं, तुमची हरकत नसेल तर विचारतो".


डाॅक्टर शरण जरा हसले. "अहो जुन्या गोष्टी या. कसली हरकत अन् कसलं काय !"

डाॅक्टर शरण सांगू लागले. "सोलापूर ला बाळी वेसला आमचं घर होतं आणि माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर दयानंद काॅलेज मधे मला लेक्चररची पोस्ट मिळाली. अॅग्रीकल्चरल इकाॅनाॅमिक्स मी शिकवत असे आणि घरात प्रायव्हेट क्लासही मी सुरू केला होता. माझी एक सिनियर क्लासमधली स्टुडंट होती, वसु तिचं नाव. आमची चांगलीच गट्टी जमली होती. वसुच्या बाबांना भेटायला मी त्यांच्या घरी गेलो. माझ्याशी ते चांगले बोलले वगैरे पण आमच्या दोघांच्या लग्नाला त्यांनी सपशेल नकार दिला. त्यांना म्हणे त्यांच्या जातीचाच जावई हवा होता. मग काय अगदीच निरुपाय झाला. वसु काही वडीलांची इच्छा मोडु शकली नाही आणि माझ्यातही एवढी बंडखोरी निभावण्याची ताकद नव्हती. शेवटी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मी नोकरी सोडली, सोलापूरला राम राम ठोकला आणि बंगलोरला काॅलेजमधे जाॅब घेतला. पी एच् डी केलं आणि करिअरला वाहून घेतलं. "

डाॅक्टर शरणनी एक सुस्कारा सोडला. मग हसुन म्हणाले , "आणखी एक सामोसा घेतो हं भाभी", आणि अख्खा सामोसा उचलून तोंडात कोंबला.


राजू देशपांडे अगदी कान देऊन ऐकत होता. डाॅक्टर शरणने त्याच्या सोलापूरच्या प्रेयसीचं नाव वसु म्हणून सांगितल तेव्हा त्याचे हातपाय गळुन गेले. एकदा वाटलं की काॅलर पकडुन शरणला हालवावं आणि विचारावं, "सगळं सगळं काय ते खरं सांग". 


धीर करून राजूनं चाचरत विचारलं, "वसुचं पूर्ण नाव काय होतं?"


तेवढ्यात सामोश्यांचा नवा ट्रे आला आणि त्याकडेच सगळ्यांचं लक्ष गेलं. राजूचा प्रश्न तसाच राहिला.   


साडे दहा वाजत आले होते. मित्तल कुटुंबाला धन्यवाद देऊन सगळे घरांकडे पांगले.

चालता चालता संदीप नंदाची बडबड चालू होती पण राजूच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. मुख्य प्राॅब्लेम म्हणजे वसु या नावाचा उलगडा झाला नव्हता. राजूची वसुधा आणि पटवर्धनाची वशिष्ठी, दोघीही सोलापूरच्या.  वसु म्हणजे वसुधा ही होऊ शकतं आणि वशिष्ठी ही होऊ शकतं.

दोघीही इकाॅनाॅमिक्सच्या विद्यार्थीनि आणि त्याच्या शहरातले डाॅक्टर शरण इकाॅनाॅमिक्स चे शिक्षक.

या वसुबरोबर शरणबाबूची गट्टी किती लेव्हलपर्यंत पोहोचली असेल, कुठच्या थराला गेली असेल  आणि ती गट्टी तुटताना एकएक गाठी कशा उकलत गेल्या असतील याचाच विचार करत राजू घरी येऊन पोहोचला.


रविवार असल्याने सगळं आरामात चाललं होतं. जय विजय लाॅन मोवर चालू करण्याच्या खटपटीत होते. राजूने त्याना मशिन सुरु करुन दिलं,पटकन् आंघोळ करुन घेतली आणि मग वसुधा बरोबर ग्रोसरी शाॅपिंग साठी जायला गाडी काढली.


सकाळीच वसुधाचा इंडिया काॅल झाला होता. त्यामुळे गाडीत राजूला ती बाबांच्या तब्येतीचा अपडेट देत होती.


मधेच राजूने विचारलं, "वसुधा, तुझ्या सोलापूरच्या काॅलेजचं नाव काय गं ?"

"माझं काॅलेज ? संगमेश्वर काॅलेज". वसुधा उत्तरली.

"आणि तिथे जवळच दयानंद काॅलेज आहे का ?" राजूचा पुढचा प्रश्न.

"जवळ काही नाही, आमचं संगमेश्वर काॅलेज इकडे सात रस्त्याला आणि दयानंद काॅलेज तिकडे अक्कलकोट रोडला". वसुधाने क्लारिफिकेशन दिलं.

"आणि तुमचं घर बाळी वेसला होतं का?" राजूचा पुढचा प्रश्न.

"अरे नाही रे बाबा, आमचं घर इकडे रेल्वे लाईन ला आणि बाळी वेस राहिली तिकडे गावात." वसुधाचं उत्तर .

सोलापूरच्या भुगोलाचं राजूला काहीच ज्ञान नव्हतं, पण या "इकडे ", "तिकडे" वरून दोन्ही काॅलेजं, घरं एकमेकांपासून काहीशा अंतरावर असावी एवढा बोध झाला.

" पण लहान शहरात अंतरं असून असून ती काय असणार? " एक काळा विचार राजूच्या मनात चमकून गेला.


ग्रोसरी झाली.  दोघं घरी आले. राजूच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. विचारांची भणभण , त्यामुळे मधेच होणारी छातीतली धडधड, अगदी सगळी बेचैनी आली होती.


सोमवार आला आणि बेचैनी जास्तच वाढली. डाॅक्टर शरणचा चेहरा सारखा डोळ्यासमोर यायला लागला. त्याच्या लकबींचं कुठे आपल्या जय च्या  लकबींशी साम्य दिसतंय की काय हे शोधता शोधता मनात आणखीच कोलाहल माजू लागला. डाॅक्टर शरणच्या बाकदार नाकाचं पटवर्धन च्या शलाका च्या नाकाशी काही साम्य असू शकेल का असेही काही विचार मनात यायला लागले.


शेवटी एकट्याने हे ओझं पेलवणं राजूचा अवघड वाटायला लागलं. पटवर्धन ला फोन करावा, त्याला सगळं सांगुन आणखी काही इन्व्हेस्टिगेशन करावं , डी एन् ए वगैरे टेस्ट कोठे होऊ शकतात हे पहावं असं राजूचा वाटायला लागलं आणि फोन कडे त्याचा हात गेला ही, पण आवरलं त्यानं स्वतःला.


शनिवार उजाडला. सकाळी आपली जड पावलं ओढत ओढत संदीप बरोबर राजू पार्क कडे चालू लागला. ते मेडिटेशन,योगिक एक्सरसाइज, डाॅक्टर शरण बरोबर तिथेच बसणं, सगळं सगळं नकोसं वाटायला लागलं.


एक्सरसाइज संपले. गप्पा टप्पा झाल्या. तलावाभोवती राऊंड मारून मंडळी घराकडे निघाली. 


तेवढ्यात कमला प्रसाद म्हणाले, "इंडियातून परवाच डॅडी आले आहेत. त्यांना जाता जाता हॅलो करून जा. नुकतेच आजारातून उठलेत ते, बरं वाटेल त्याना."


सर्वांनी मूक संमती दिली आणि बोलत बोलत कमला प्रसाद च्या घराकडे निघाले.

कमला प्रसाद चं घर जवळ आलं.


लांबूनच घरा समोरच्या लाॅनवर कमला प्रसाद चे डॅडी बसलेले दिसले. सौ प्रसाद सुध्दा जवळच बसल्या होत्या आणि सासरे बुवाना हवं नको पहात होत्या.


मंडळी येताना पाहून सौ प्रसाद नी डॅडीना हलकेच सुचना दिली आणि डॅडीनी ग्रुप कडे अंदाजानेच नजर वळवली.


तेवढ्यात डाॅक्टर शरणनी खिशातला फोन काढुन कानाला लावला आणि इनकमिंग काॅलवर ते बोलू लागले. बेल कोणीच ऐकली नव्हती पण मेडिटेशनच्या वेळी म्यूट केलेले सगळ्यांचेच फोन आठवण होईपर्यंत व्हायब्रेट वरच रहायचे, त्यातलाच बहुतेक हा प्रकार.


डाॅक्टर शरणने, "साॅरी सर, पार विसरलो होतो मी, आलोच पंधरा मिनिटात " असे म्हणून फोन परत खिशात ठेवला.


"कमला प्रसादजी, जायलाच हवं मला. पार विसरून गेलो होतो मी अॅपाॅइंटमेंट बद्दल. डॅडीना भेटीन मी उद्या. गुड डे फोक्स" . असं त्रोटकपणे बोलून डाॅक्टर शरण तिथूनच निघुन गेले.


मंडळी घरा जवळ पोहोचली. कमला प्रसाद ने सर्वांची ओळख करून दिली. हस्तांदोलनं झाली.

सौ प्रसाद सर्वांनाच आत चलण्याबद्दल आग्रह करत होत्या. डॅडींचाही आग्रह चालला होता.  पण आपापल्या घरची शनिवारची कामं सगळ्यांनाच डोळ्यासमोर दिसत होती. त्यामुळे मग बाहेरच्या बाहेरच सगळे जाण्यासाठी वळले.


"आणि हो त्या कोपऱ्यावर तुमच्या बरोबर आणखी एक गृहस्थ होते नं? " कमला प्रसाद चे डॅडी राजूला विचारत होते. "नीट दिसलं नाही खरं पण क्षणभर माझ्या बँकेच्या सोलापूरच्या ब्रॅन्च मधे रामशरण नावाचा एक थापाड्या मॅनेजर होता, त्याचा भास झाला. बऱ्याच लबाड्या केल्या त्यानी. तो आणि त्याची असिस्टंट वसुंधरा नायक, वसु म्हणायचे तिला. काढुन टाकलं मी दोघांनाही. गेले मग कुठेतरी. नंतर रामशरण कर्नाटकात कुणा स्वामीच्या आश्रमात कामाला राहिला, स्वामीजींच्या प्रभावाने तिथे सुधारला, पुढे बराच शिकला, मार्गाला लागला असं ऐकलं खरं. पण तो कुठला इथे यायला बसलाय म्हणा. एकासारखी एक दिसणारी माणसं असू शकतात, पण त्या गृहस्थाना ओझरतं पाहून रामशरणचा भास झाला खरा. एनि वे तुमच्या ग्रुप ला भेटून खूप बरं वाटल॔. या परत".


डॅडींच्या हळू बोलण्याकडे कोणाचंच फारसं लक्ष नव्हतं. राजू देशपांडेने मात्र डॅडींचा शब्दन् शब्द टिपला होता. राजूच्या मनांत हळू हळू प्रकाश पडू लागला. शरणच्या अविवाहित रहाण्याचं कारण काही असो. संदीप नंदाच्या प्रश्नांच्या भडिमाराला कंटाळून डाॅक्टर शरणने स्वैर आणि त्याच्या दृष्टीने निरुपद्रवी थाप मारलेली दिसत होती. पण तिचा काय परिणाम झाला होता, केवढा मोठा वडवानल पेटवला गेला होता याची त्याला तिळमात्र शंका नसणार. सुदैवच म्हणायचं की कमला प्रसादाचे डॅडी तिथे भेटले आणि त्याहून मोठं सुदैव म्हणजे शरणला ओझरतं पहाताच त्याचा पूर्वेतिहास डॅडींना आठवला आणि त्यांनी घडाघडा सांगूनही टाकला. डॅडींना मिठी मारण्याची झालेली अनावर इच्छा राजूने दाबली खरी पण त्यांचे दोन्ही हात धरून अगदी दुखेपर्यंत हलवले.


राजूच्या मनातल्या पेटलेल्या वणव्यावर वादळी पावसाच्या झडी पडुन वणवा शांत व्हावा असाच काहीसा प्रकार झाला.   वसुधा, वशिष्ठी, जय, शलाका  सगळ्यांना क्लीन चिट मिळाली.  राजूच्या मनातला तो संशयकल्लोळ आणि त्यातून उठलेलं ते काहूर , ती वावटळ, सगळं सगळं शांत झालं.   


Rate this content
Log in