Sudhir Karkhanis

Drama Others

4.6  

Sudhir Karkhanis

Drama Others

संशयित

संशयित

11 mins
593


मुंबईहुन पुण्याला एक्सप्रेस हायवेने जायचं. एक्सप्रेस हायवे संपल्यावर पुढे सातारारोड ने चांदणी चौकापर्यंत जाऊन मग उजवीकडे वळायचं. रस्त्याखालचा बोगदा वापरून सातारारोड ओलांडायचा. बावधन मागे टाकून आणखी थोडं पुढे जायचं आणि "लिटल स्टार गार्डन सोसायटी" असा मोठा फलक दिसला की मेन रोड सोडून उजवीकडे वळायचं, गेटमधून आत जायचं. आत आत जात रहायचं आणि पुढे डोंगराच्या कुशीत तुम्हाला दिसेल टुमदार बंगल्यांची वसाहत.

सुंदर, सुबक दुमजली बंगले. सगळे एकसारखे. सैन्यातून निवृत्त झालेल्या मराठी मातीतल्या ब्रिगेडियर, कर्नल लोकांचे बंगले. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे, अस्सल पांढरपेशा पीढीजात पुणेकरांचेही बंगले. दहा वीस वर्षांपूर्वी बहुतेक सर्वच पुणेकर, कोथरुड रस्त्याचा कचरा डेपो म्हणजे पुण्याची फायनल हद्द समजत होते, पण नंतर पुण्याच्या रोज दुपटी तिपटीच्या वेगाने होणाऱ्या वाढीपुढे सगळ्या सीमा धडाधड कोलमडून पडल्या. धाडसी वृत्तीचे पुणेकर बाहेर पडले आणि नंतर अगदी सदाशिव पेठेतल्या, रास्ता पेठेतल्या पुणेकरांनीही थोडं चाचरत का होईना, सिमोल्लंघन केले.


"ए" मालिकेमधल्या बंगल्यांच्या रांगेतला तिसरा बंगला बावडेकरांचा आणि चौथा ब्रिगेडियर काटदरेंचा. दोन्ही कुटुंबं फार पूर्वी पासून पुण्यात सोमवार पेठेतले रहिवासी. मधुसूदन बावडेकरांची सोमवारातच प्रिंटिंग प्रेस होती आणि ब्रिगेडियर अनिल काटदरे आर्मीतून नुकतेच रिटायर झाले होते. दोघंही एकमेकांचे शाळासोबती आणि जीवश्च कंठश्च मित्र. शांत निसर्गरम्य वातावरणात बांधल्या जाणाऱ्या प्रशस्त बंगल्यांच्या लिटल स्टार गार्डन सोसायटीबद्दलची माहिती कानावर आल्याबरोबर दोघांनीही तिथे शेजारी शेजारी बंगले बुक केले, आतल्या सुखसोई, सुशोभित फर्नीचर याकडे जातीने लक्ष घातलं आणि दोन वर्षात आपापल्या सोमवारातल्या जागा सोडून बंगल्यांवर रहायला गेले सुध्दा.


नवीन ठिकाणी रहायला गेल्यावर मधुसुदन बावडेकरांची आणि अनिल काटदरेंची, तसंच सौ लीलाताई बावडेकरांची आणि मंजूताई काटदरेंची एकमेकांशी गट्टी अधिकच वाढली. नाही म्हटलं तरी लिटल स्टार गार्डन सोसायटीचा परिसर तसा निर्जनच. त्यामुळे वसाहतीतले रहिवासी एकमेकाला धरुन असायचे. संध्याकाळी क्लब मधे सोसायटी मधल्या सर्व रहिवाशांची हजेरी असायचीच आणि प्रत्येकाचे वाढदिवस सगळे मिळून हौसेने साजरे करायचे, कोणी सोशल फंक्शनमधे गैरहजर असेल तर सगळे आवर्जून चौकशी करायचे आणि पुणे ट्रिप कार्यक्रम कार पूलिंगने करायचे.

ब्रिगेडियर काटदरेना दोन मुलं. संजीव आणि राजीव. दोन्ही मुलानी आर्मीमधे करिअर केली नाही आणि ब्रिगेडियर साहेबांनीही दोघांना कधी आग्रह केला नाही. दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर झाले आणि परदेशी निघून गेले.


बावडेकरांचीही अशीच काहीशी परिस्थिती होती. त्यामुळे बावडेकरांच्या बंगल्यात काय आणि ब्रिगेडियर साहेबांच्या बंगल्यात काय, दिवस रात्र तशी सामसूमच असायची.

ब्रिगेडियर काटदरेसाहेबांना वयोमानानुसार जिना चढायला त्रास होत असल्यामुळे त्यांचा वावर बंगल्याच्या तळमजल्यावरच असायचा. वरच्या मजल्यावरच्या दोन्ही खोल्या त्यांनी त्यांच्या परदेशाहून कधीकाळी येणाऱ्या दोन मुलांसाठी आणि त्यांच्या फॅमिलीं साठी सुसज्ज करून ठेवल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत तिथे कोणी रहायला आलं नव्हतं हे मात्र खरं.


 

एका महिन्यापूर्वी ब्रिगेडियर साहेबांना त्यांच्या पुतण्याचा गोव्याहून फोन आला.

"काका मी समीर बोलतोय, घरून, गोव्याहून. काका, तुम्ही कसे आहात, काकी कशा आहेत?" 

  

सर्वजण ठीक आहेत असं काकांकडून कळल्यावर समीर पुढे म्हणाला, "काका, माझे दोन मित्र आहेत, संतोष आणि राजेश. दोघंही अमेरिकेतच जन्मलेत. न्यूयॉर्कला रहातात. ते दोघंच हिच- हायकिंग करत जगप्रवासाला निघालेत. फिरायचं, देश बघायचे, वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करायचा असा त्यांचा विचार आहे म्हणतायत. काका, भारतामधे पुणे, दिल्ली आणि कोलकाता असे त्यांचे प्रवास टप्पे आहेत. पुढे जाणार आहेत बँकॉकला. तर काका, पुण्यात त्यांच्या रहाण्याची आणि फिरण्याची, माफक दरात पण खात्रीची सोय होऊ शकेल का?"   

ब्रिगेडियर साहेबांनी मंजुताईंशी थोडा विचार विनिमय केला, आणि मग दोघांची एकवाक्यता झाली, की "ही बिचारी आपल्या संजू राजूसारखी मुलं आहेत. करू त्याना जमेल ती मदत. राहतील इथे तीन दिवस, नाहीतरी रिकाम्याच पडल्यात वरच्या खोल्या दोन वर्षं. आपल्यालाही जरा सोबत मिळेल."


समीरला ब्रिगेडियर साहेबांनी कळवून टाकलं की मुलं त्यांच्या बंगल्यात तीन दिवस राहू शकतील आणि आपली गाडी, ड्रायव्हर त्याना प्रेक्षणीय स्थळं पहायला, फिरायला उपलब्ध असेल. 


समीरने काकांना तीन चारदा थँक्यू थँक्यू म्हणून फोन खाली ठेवला.

एका आठवड्यात पाहुणे मंडळी येणार होती. ब्रिगेडियर साहेबांनी बंगल्याचा पत्ता त्यांना व्यवस्थित कळवला आणि "वाट पहातोय तुमची", अशी पुस्ती जोडली.

एक प्रॉब्लेम आला. पाहुणे येण्याच्या एक दिवस आधी ब्रिगेडियर साहेबांना सरकार दरबारच्या महत्त्वाच्या कामांसाठी मुंबईला जायला लागलं. पण जाण्यापूर्वी मंजुताईना, दत्तू गड्याला आणि शंकर ड्रायव्हरला पाहुण्यांच्या सरबराईबद्दल सखोल सूचना द्यायला ब्रिगेडियरसाहेब विसरले नाहीत.


"आणि हो मंजू", ब्रिगेडियर साहेब मंजुताईना म्हणाले, "अडीच तीन दिवसासाठीच मुलं इथे असतील. त्याना फार कमी वेळ हातात आहे. दिवसभर बाहेर फिरतील. दुपारी बाहेर काहीतरी अरबट चरबट खाऊन आजारी पडू नयेत. हे माझं पुणे जिम क्लबचं कार्ड दे त्याना. पुणे जिम क्लबमधे चांगलं खात्रीचं स्वच्छ जेवण तरी मिळेल त्याना. आपल्या मुलांसारखीच आहेत. पुण्यात असताना, 'बी माय गेस्ट', म्हणाव त्यांना".


मंजुताईनी मान डोलावली आणि कार्ड घेतलं.


गुरुवारी दुपारी ब्रिगेडियर काटदरे साहेब मुंबईला गेले. रोज रात्री घरी फोन करून ब्रिगेडियर साहेब मंजुताईना दिवसभराची हालहवाल विचारत असत, योग्य सूचना देत असत.


पाहुणे आले. मंजुताईनाही काहीतरी उद्योग मिळाला. नवीन विषय, नवीन माहिती ऐकण्यात आली. पाहुण्या मुलांच्या आत्मविश्वासाने, आर्जवी, नम्र वागण्याने मंजुताई आणि सर्व नोकर मंडळी खुष दिसली.


इकडे मुंबईला, रविवार पासून पुढचे चार दिवस ब्रिगेडियर साहेबांच्या टीमच्या राज्यपालांच्या टीमबरोबर, खूप उशीरापर्यंत बैठकी चालल्या होत्या. एक मीटिंग संपली की लगेच विचार विनिमय आणि पुढच्या मीटिंगची तयारी. त्यामुळे मंजूताईना फोन करायला त्याना फुरसत मिळाली नाही. आणि मंजुताईंचाही फोन आला नाही.


शनिवारी सगळी बोलणी संपली आणि ब्रिगेडियर काटदरे समाधानाने पुण्याला परतले. टॅक्सी पुण्याजवळ आली. वाकड नाक्यावर ब्रिगेडियर साहेबांचे दोन सहकारी उतरले आणि रिक्षा घेऊन आपापल्या घरी गेले. ब्रिगेडियर काटदरे टॅक्सीमधे एकटेच पॅसेंजर. ब्रिगेडियर साहेबांनी मंजुताईना फोन लावला आणि बोलले, "हॅलो मंजू, मी पोहोचतोय अर्ध्या तासात. घरी सगळं ठीक आहे नं?"


मंजुताई म्हणाल्या, "अहो कसलं सगळं ठीक? काल सकाळी पोलीसची टीम आणि पांढऱ्या गणवेशातले काही ऑफिसर आपल्या बंगल्यावर आले आणि मला आणि आपल्या सर्व नोकरांना आतच अडकवून ठेवलंय. आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीत की कोणाला आत आम्हाला भेटायला येऊ देत नाहीत. पांढऱ्या गणवेशातला एक ऑफिसर बाहेर कोणालातरी सांगत होता की आम्ही संशयित आहोत आणि म्हणून अलिप्त ठेवलंय".


हे ऐकून ब्रिगेडियर साहेब खवळले आणि फोनमधे ओरडले, "संशयित ? कसला गुन्हा केल्याचा आरोप ठेवतायत तुमच्यावर ? मी आत्ताच्या आत्ता पोलीस कमिशनरना आणि कलेक्टरना फोन करतो आणि जाब विचारतो."


"कमिशनरच्या आणि कलेक्टरच्याच सहीची आहे आम्हाला पकडून ठेवायची ऑर्डर." मंजुताई म्हणाल्या. "अगदी नकोसं झालंय. रस्त्यावरून जाणारा एकही जण आपल्या बंगल्याकडे डोळे वर करून बघत नाही. लीलाताई आणि मधुभावजीसुध्दा माझा फोन उचलत नाहीत."


"बरं. बघतो मी". असे म्हणून ब्रिगेडियर साहेबांनी फोन खाली ठेवला. ब्रिगेडियर साहेब विचार करू लागले. पण खूप विचार करूनही मंजुताईचा आणि नोकरांचा काय गुन्हा असेल आणि त्याना नजर कैदेत का ठेवलं असावं याचा त्याना अंदाज बांधता येईना.


टॅक्सी पुढे जात होती. कोथरुड रोडचं जंक्शन आलं. टॅक्सी वळण घेऊन बावधनच्या दिशेने धावू लागली. टॅक्सी लिटल स्टार गार्डन सोसायटी च्या मेन गेट पाशी आली. सोसायटीचा सिक्युरिटी ऑफिसर गेटवरच उभा होता. ब्रिगेडियर साहेबांना पाहून त्याने सॅल्यूट ठोकला. ब्रिगेडियर साहेबांनी काच खाली केली. सिक्युरिटी ऑफिसर म्हणाला, "सर, क्लब हाऊस मधे कलेक्टर साहेब आणि पोलीस कमिशनर साहेब आपली वाट पहात आहेत, तिकडे आपण जाऊया."


ब्रिगेडियर साहेबांच्या उत्तरांची वाट न पाहता पुढचं दार उघडून सिक्युरिटी ऑफिसर टॅक्सीत ड्रायव्हर जवळ बसला आणि ड्रायव्हरला त्याने टॅक्सी क्लब हाऊसकडे घेण्याची सूचना दिली. टॅक्सी क्लब हाऊसला पोहोचली. ब्रिगेडियर साहेब उतरून तावातावाने आत गेले. कलेक्टर मोंडकर आणि पोलीस कमिशनर थोरात ब्रिगेडियर साहेबांना पाहून उभे राहिले. ब्रिगेडियर साहेब ओरडले, "मोंडकर, थोरात, हा काय प्रकार आहे? माझ्या मिसेसना आणि नोकरमंडळीना नजर कैदेत का डांबून ठेवलंय?"


कलेक्टर मोंडकर दिलगिरीच्या सुरात अगदी खालच्या पट्टीत म्हणाले, नजर कैदेत नाही सर, ते लोक सुरक्षा क्वारंटाईनमधे आहेत?"


" क्वारंटाईनमधे?" ब्रिगेडियर साहेब आश्चर्याने उद्गारले, "ते कशासाठी? त्याना कसलाही रोग झालेला नाही."


"सर, बसा इथे, मी स्पष्ट करतो" कमिशनर थोरात म्हणाले.


सर्वजण बाहेरच्या डेकवर टेबलाभोवती बसले. चहा मागवला गेला.


"सर, मागच्या आठवड्यात दुबईहून मुंबईला आलेल्या विमानातला एक प्रवासी मुंबईला उतरल्यावर दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मधे अॅडमिट झाला. तो करोना व्हायरसने आजारी असल्याचे निदान झालं. त्या रुग्णावर उपचार तर चालू केले गेलेच, पण त्याच बरोबर त्या विमानाने भारतात आलेल्या इतर उतारूंचा शोध घेण्याचं आणि त्यांच्यावर करोना रोग निदान चाचण्या करण्याचं काम सरकारने हाती घेतलं. यातले कोण निरोगी आहेत किंवा नाहीत हे सिद्ध होईपर्यंत सगळेच संशयित रूग्ण."


थोडा दम खाऊन कमिशनर थोरात म्हणाले, "त्या विमानातून आलेले तीनशे चारशे उतारू सर्व भारतभर पांगले होते. तरीसुद्धा सरकारी यंत्रणेने जेवढ्या वेगाने काम करता येईल तेवढ्या वेगाने काम केलं. त्या दरम्यान असं कळलं की त्या विमानातले श्री. संतोष आणि श्री. राजेश असे दोन संशयित रुग्ण पुण्याला आले आणि तीन दिवस तुमच्या कडे राहिले. आम्ही येथे पोहोचेपर्यंत तुमच्या कडून ते निघून गेले होते. त्यांचा मागोवा काढायला आम्हाला पुढे तीन चार दिवस लागले. सापडली ती दुक्कल दिल्ली मधे. हॉस्पिटल मधे ठेवलंय त्याना आणि चाचण्या चालू आहेत त्यांच्यावर. आज उद्या पर्यंत येईल रिझल्ट.  तुमच्या कुटुंबियांना, नोकरांना या संशयित करोना रुग्णांकडून संसर्ग पोहोचला असण्याची शक्यता लक्षात घेऊन सोसायटी मधल्या आणि शहरामधल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्हाला त्यांना जनसंपर्कापासून दूर म्हणजेच क्वारंटाईन करावं लागलं."


कमिशनर थोरातांच्या अशा व्यवस्थित समजावून सांगण्यामुळे ब्रिगेडियर साहेब जरा शांत झाले, विचार करु लागले.


ब्रिगेडियर साहेब आल्याचे कळल्यामुळे त्यांचे शेजारी श्री बावडेकर आणि सोसायटीमधले इतरही काही मित्र क्लबहाउसमधे त्यांच्या भोवती जमले होते.

बावडेकर म्हणाले, "बरं झालं कमिशनरसाहेब, तुम्ही एवढं सविस्तरपणे सांगितलं. आमच्या सुरक्षिततेबरोबरच आम्हाला मंजुताईंच्या सुरक्षिततेचीसुध्दा काळजी आहे. तुमच्या कडून ऑल क्लिअर चा मेसेज येईपर्यंत आम्ही त्यांना लांबून का होईना, धीर देऊ, सोबत देऊ." 

 

"त्या दोन संशयित रुग्णांना करोना व्हायरसची बाधा झाली असण्याची शक्यता कितपत आहे"? ब्रिगेडियर काटदरेनी विचारलं.


"ते आत्ता तरी सांगता येत नाही". कमिशनर थोरात म्हणाले. "आमच्या हातात बातमी आली की कळवू आम्ही ताबडतोब, सर. ऑल क्लिअर असेल तर आनंदच आहे, पण जर त्या दोन संशयित रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचं निश्चित झालं तर तुमच्या कुटुंबियांना चाचण्या साठी ताबडतोब सरकारी हॉस्पिटलात हलवावे लागेल."


हा तर फारच गंभीर इशारा होता.


ब्रिगेडियर काटदरेंचं डोकं विचारांनी भणभणायला लागलं.

सगळीच अनिश्चितता.

त्या संशयित रुग्णांवरच्या चाचणीचा निकाल हा स्टार्टिंग पॉईंट.

जर ते करोनाग्रस्त निघाले तर मंजूला सरकारी हॉस्पिटलात हलवावे लागेल.

आर्मी हॉस्पिटल मधे सोय होऊ शकते का, ते पहायला पाहिजे.

जर मंजूपण करोनाग्रस्त निघाली तर मग उपचार?

या रोगावर उपचार करणारे निष्णात डॉक्टर गाठायला लागतील.

हातात वेळ कितीसा मिळणार आहे कोण जाणे.

रक्त द्यावं लागलं तर मंजूच्या रक्त गटाप्रमाणे ब्लडबॅन्कला कळवून ठेवावं लागेल.

उपचाराना यश यायला किती दिवस लागतील कोण जाणे.

यश येईल नं ,पण उपचारांना!

आणि यश नाही आलं तर ... तर !

ब्रिगेडियरना पुढे विचार करवेना.

पण परत तोच विचार भेडसावायला लागला. खरंच, उपचारांना यश नाही मिळालं तर?

पॉइंट ऑफ नो रिटर्न ......!

मग आपल्या कडे कोण बघणार ?

जेवण खाण, औषध पाणी सगळं प्रेमाने कोण करणार ?

संमिश्र भावना.

अचानक ब्रिगेडियर साहेबांच्या नजरेसमोर डी- बावीस नंबरच्या बंगल्यात एकट्याने  राहणाऱ्या प्रिया राघवन् ची छबी आली.


ब्रिगेडियर साहेब चपापले. एकदम खजील झाले. विचारांच्या या शृंखलेत तरी प्रिया राघवनची आठवण यायला नको होती असं त्याना वाटलं. ब्रिगेडियर साहेबांनी इकडे तिकडे पाहिलं. जणू आपल्या मनातील विचार कोणाला कळतायत का याचा अजमास घेतला. आजुबाजुला सगळं सुरक्षित दिसलं. मित्रमंडळी आपापसात कुजबुजत होती. हलक्या आवाजात बोलत होती. कमिशनर थोरात आणि कलेक्टर मोंडकर जायला उठले. ब्रिगेडियर साहेबांशिवाय बाकी सर्व मंडळी उठली. कमिशनर साहेबांनी सहानुभूती पूर्वक ब्रिगेडियरना थोपटलं आणि साहेब लोक निघुन गेले.


बावडेकर ब्रिगेडियरसाहेबांच्या जवळ आले आणि म्हणाले, "अनिल, आज तू आमच्या घरी रहा. मंजुताईंशी लांबून का होईना संपर्क राहिल आणि संसर्गही टाळता येईल."


ब्रिगेडियर साहेबांनी जरा विचार केला. "नको मधू". ब्रिगेडियर म्हणाले, "त्यापेक्षा मी कोरेगाव पार्क मधल्या माझ्या क्लबला जातो. तिथे सिव्हिल सर्जन, आर्मी चे लोक भेटतील. काही इमर्जन्सी येणार असली तर प्राथमिक तयारी करून ठेवता येईल. जेवण तिथेच घेईन आणि फारच वेळ आली तर क्लबमधेच रूम घेईन रात्री साठी."

ब्रिगेडियर साहेबांनी घरी फोन लावला, मंजुताईना शक्य तेवढी हकीकत सांगितली, त्यांना धीर दिला, की त्या काही संशयित रुग्ण नाहीत पण सुरक्षा बंदीवासात आहेत आणि संध्याकाळ पर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ऑल क्लीअरचा संदेश येईल.


मंजुताईना, "टेक केअर", असे सांगून ब्रिगेडियर साहेबांनी फोन खाली ठेवला आणि क्लबच्या स्टुअर्डला त्यांच्यासाठी टॅक्सी बोलवायाला सांगितलं.


अर्ध्या तासात टॅक्सी आली. ब्रिगेडियर साहेब टॅक्सीत बसले आणि पुणे जिम क्लबमधे पोहोचले. त्यांची आर्मीची मित्रमंडळी एक एक करून जमा झाली. कोपऱ्यातल्या नेहमीच्या टेबलावर मंडळी बसली.


सुरूवातीला नेहमी प्रमाणे हास्यविनोद चालू झाले, पण लवकरच ब्रिगेडियर साहेबांचा गंभीर मूड सर्वांच्याच लक्षात आला. ब्रिगेडियर साहेबांनीही मग नमनाला घडाभर तेल न ओतता थोडक्यात पण स्पष्ट पणे आपला प्रॉब्लेम मित्रमंडळीनाही सांगितला. करोना व्हायरस आजाराचं गांभिर्य सगळ्यांनाच पूर्ण पणे ठाऊक असल्याने ब्रिगेडियर साहेबांबद्दल सर्वांनाच सहानुभूती वाटायला लागली.


विचारचक्रे सुरु झाली. विचारविनिमय सुरू झाला. ओळखी पाळखी, कॉन्टॅक्ट्स, सगळ्यांची उजळणी झाली. ब्रिगेडियर साहेबांच्या मदतीसाठी सगळेजण कंबर कसून ठाकले. समस्त इंन्डियन आर्मीची शक्ती आपल्या बरोबर आहे या विचाराने ब्रिगेडियर साहेबांनाही दिलासा मिळाला.

"धिस राउंड इज ऑन मी", असे म्हणून उभ्या असलेल्या वेटरला त्यानी योग्य त्या सूचना दिल्या.


"हाय गाईज", आवाज आला. सर्वांनी माना वर केल्या. कर्नल सीतारामन् टेबलाजवळ उभे होते.


"कसे आहात सगळे? कसं चाललंय?" कर्नल साहेबांनी विचारलं.

काही उत्तर देण्याची गरज नव्हती, अपेक्षाही नव्हती. सर्वांनी माना डोलावल्या.


"ही माझी कझिन, प्रिया राघवन". कर्नल साहेबांनी त्यांच्या बरोबर आलेल्या मध्यमवयीन महिलेची ओळख करून दिली.

प्रिया मॅडमनी सगळ्यांना "हॅलो", केलं.


ब्रिगेडियर काटदरे साहेबांकडे निर्देश करून प्रिया मॅडम म्हणाल्या, "मी ओळखते ब्रिगेडियर साहेबांना. आमच्या सोसायटीतच राहतात."

"ओ, जग किती लहान आहे". कर्नल सीतारामन् म्हणाले.


थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यानंतर कर्नल साहेबांनी सगळ्यांना "बाय" केलं आणि प्रिया राघवन् ला घेऊन पूलसाईड टेबलाच्या दिशेला चालू लागले.


ब्रिगेडियर साहेबांच्या मनात पाल चुकचुकली. मघाशी संभाव्य करोनाग्रस्त मंजूबद्दल विचार करताना त्यांना प्रिया राघवन् आठवली होती आणि दोन तासात समोर ती उभी ! विचित्र योगायोगच की हा !


अतिशय हडबडून गेलेल्या ब्रिगेडियर साहेबांनी ताबडतोब स्वतःसाठी एक लार्ज पेग, ऑन द रॉक मागवला.

मंडळींची चर्चा चालूच होती. ब्रिगेडियर साहेबांच्या मदतीसाठी एक इमर्जन्सी प्लॅन साकार होत होता. पोटात थोडं खाणं पिणं गेल्यामुळे ब्रिगेडियर साहेबही जरा शांत झाले होते.


रात्री नऊच्या सुमारास कमिशनर थोरातांचा फोन आला. "ब्रिगेडियर साहेब, गुड न्यूज आहे. त्या दोन्ही संशयित रूग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह रिझल्ट दाखवतायत. त्याना दोघांनाही करोना व्हायरसची बाधा झालेली नाही. त्यामुळे तुमच्या कुटुंबियाना आणि नोकरमाणसाना करोनाचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाही. त्यांचा सुरक्षा बंदीवास मी ताबडतोब उठवायला सांगतोय."


"थँक्यू कमिशनर," ब्रिगेडियर साहेब म्हणाले, "आणि त्या दोन संशयित रुग्णांच्या बंदिवासाचं काय ?"


"दिल्लीहून मेसेज आलाय". कमिशनर थोरात म्हणाले, "त्या संशयित रुग्णांनाही मुक्त करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. दोन तीन तासात त्यांचीही मुक्तता होईल."

ब्रिगेडियर साहेब खुश झाले. टेबलावर सर्वांना त्यांनी ही गुड न्यूज सांगितली.


"धिस राउंड इज ऑन मी", असे म्हणत उभ्या असलेल्या वेटरला त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या.


तासाभराने मंडळी उठली. बिलांवर सह्या खरडल्या आणि मंडळी डायनिंग हॉलच्या बाहेर आली.


क्लब मॅनेजर लाऊंजमध्येच उभा होता.  रिटायर्ड आर्मी ग्रुप ला त्याने सुहास्य वदनाने "गुड नाईट", केलं. मग थोडेसे मागे राहिलेल्या ब्रिगेडियर साहेबांकडे त्याचं लक्ष गेलं.


"हॅलो ब्रिगेडियर साहेब," मॅनेजर म्हणाला, "कशी झाली दिल्लीची ट्रिप ?"


ब्रिगेडियर साहेबांनी कोऱ्या चेहऱ्याने मॅनेजरकडे बघितलं.


"आणि हो ब्रिगेडियर साहेब", क्लब मॅनेजर पुढे म्हणाला, "ते दिल्लीचे अॅरिअर्स लवकर क्लिअर झाले तर बरं होईल. सव्वा दोन लाखांचं बिल आहे, क्लबमधे राहण्या-जेवणाचं आहे आणि क्लबच्या दुकानात स्कॉच बाटल्या, नेकलेस वगैरे खरेदीचंसुध्दा बिल आहे, पेमेंटला उशीर झाला तर उगीच इंटरेस्ट सुध्दा द्यावं लागेल."


"अरे फर्नांडिस, कुठचं बिल, कुठले अॅरिअर्स?" ब्रिगेडियर काटदरे क्लब मॅनेजरच्या अंगावर ओरडले. "मी दिल्लीला गेलोच नव्हतो तर कुठलं बिल?"


क्लब मॅनेजर बुचकळ्यात पडला. जवळच्या फाईलमधुन त्याने एक बिल काढलं. "हे बघा ब्रिगेडियर साहेब, या आठवड्यातलंच बिल आहे. दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी क्लबने पाठवलं आहे. आपल्या क्लबला संलग्न आहे तो क्लब. हा क्लब कार्ड नंबर पहा सर, आपलंच कार्ड आहे नं हे?"


ब्रिगेडियर साहेबांनी बिल हातात घेतलं आणि वाचलं. "थांबा जरा, माझ्या कार्डवर काय नंबर आहे ते पहातो", असे म्हणत ब्रिगेडियर साहेबांनी आपल्या पँटच्या बॅक पॉकेटमधून आपलं पाकिट काढलं आणि क्लब कार्ड शोधू लागले. सगळी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड मिळाली पण क्लब कार्ड काही मिळेना.


कुठे ठेवलंय बरं मी? ब्रिगेडियर साहेब विचारात पडले, आणि लवकरच ब्रिगेडियरना आठवलं. सगळं प्रकरण त्याना स्वच्छ दिसायला लागलं. ब्रिगेडियर साहेबांनी केलेल्या आदरातिथ्याचा, दिलेल्या सवलतींचा चक्क गैरफायदा उठवला गेला होता. उघड उघड फसवणूक. संशयाला जागाच नव्हती.


ब्रिगेडियर साहेबांनी झटक्यात पोलीस कमिशनर थोराताना फोन लावला, "हॅलो थोरात, त्या दोन संशयित रुग्णांना सोडलं का तुम्ही? पुन्हा पकडा त्याना, पण यावेळी संशयित

रुग्ण म्हणून नाही, तर संशयित गुन्हेगार म्हणून..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama