Sudhir Karkhanis

Drama Others

4.5  

Sudhir Karkhanis

Drama Others

चौकोनी कुटुंब

चौकोनी कुटुंब

14 mins
1.0K


"डॅडी, आजीलापण न्यायचं नं आपल्या बरोबर महाबळेश्वरला"?  चेतन ने डॅडीला विचारलं. 

डॅडीने मम्मी ची नजर चुकवत छोट्या चेतनला आश्वासन दिलं. "हो तर, नक्कीच ".

चेतन उड्या मारत बाहेर गेला आणि डॅडीही पुढचा संभाव्य वाद टाळण्यासाठी की काय, साईडबोर्ड वरचे पाण्याचे दोन रिकामे ग्लास उचलून "भरून आणतो" असं पुटपुटत बेडरूम च्या बाहेर पडला. 

जरा आश्चर्याचीच गोष्ट होती खरी, पण बोरीवलीच्या त्या चार बेडरूमच्या घरात चार वेगळी वेगळी विश्वं नांदत होती.  

डॅडीचं, म्हणजे राजेश केतकरचं बहुतेक सर्व   विश्व त्याच्या राज मिश्रधातू फॅक्टरी व्यवसायाने व्यापलं होतं. त्यातून जे काही उरेल त्यातला अर्धा वाटा पत्नी निशाचाआणिअर्धा चेतनचा. 

मम्मी म्हणजे निशा केतकर, तिच्या अपेक्स साॅफ्टवेअरच्या व्यवसायात जवळ जवळ पूर्ण पणे दंग. पती राजेश आणि छोट्या चेतनला सुध्दा तिच्या विश्वात हमखास प्रवेश हवा असेल तर तिच्या काॅम्प्यूटरच्या किंवा सेल फोनच्या महाद्वाराचीच घंटा त्यांना घणघणायला लागत असे.

बागडणाऱ्या छोट्या चेतनच्या जगात होती त्याची शाळा, टीचर, बालमित्र. आणि हो, त्याची आजी सुध्दा. आजीला म्हणजे कमलाताईंना त्या जगात अगदी भरपूर ऐसपैस जागा होती. आणि प्राधान्य होतं.

चेतनच्या आजीच्या, म्हणजे कमलाताईंच्या विश्वाने तर रूळच बदलले होते. आणि त्यांच्या या वर्तमानकालीन विश्वात सगळ्यात मोठा हिस्सा छोट्या चेतनचा होता. 

कुटुंबात घटक चार पण त्या कुटुंबाला चौकोनीपणा नक्कीच नव्हता. सैलसे एकत्र जोडलेले त्रिकोण.

राजेशच्या आई बाबांची कर्मभूमी वाई. पण राजेश अगदी लहानपणापासूनच शिक्षणासाठी पुण्या मुंबईला त्याच्या मामाकडे राहिलेला होता. मामाने अगदी सख्या मुलासारखं त्याला वाढवलं होतं. अगदी सुट्टीत सुध्दा राजेशला वाईला पाठवण्याऐवजी त्याच्या आई बाबांनाच मामा आपल्याकडे बोलावून घेत असे. त्यामुळे वाईशी राजेशचा संबंध तसा कमीच होता आणि नंतर परदेशी गेल्यावर तर विचारायला नको.

निशा मूळ बडोद्याची. त्यातून गेली दहा वर्षे साॅफ्टवेअर व्यवसायात घालवल्यामुळे वाई पेक्षा दिल्ली, कोलकत्ता, लंडन तिला जास्त जवळचं वाटत होतं.

आपापल्या परीने, कुटुंबातल्या तीन व्यक्तींची, म्हणजे  राजेश, निशा आणि चेतन यांची आयुष्ये फास्ट ट्रॅकवर चालली होती.  आणि कमलाताईंचा ट्रॅक फास्ट आहे की स्लो आहे, हे बघायची कोणाला सवडही नव्हती. सगळ्याच गाड्या वेगवेगळ्या रूळांवर. प्रत्येकाची स्टेशनं वेगळी आणि लाल, हिरव्या बावट्यांच्या वेळा वेगवेगळ्या. 

पण फास्ट ट्रॅकवर सतत धावून कधीतरी दमछाक होणारच. जीवनातल्या अडथळ्यांच्या शर्यतीत कधीतरी "टाईम प्लीज" म्हणावंसं वाटणारच. यात पहिला गडी बाद झाला तो राजेश.  या सगळ्या उलट सुलट धावपळीच्या व्यापांमधून एक ब्रेक घ्यायची, चार दिवस आराम करण्याची शक्कल राजेशने काढली आणि निशानेही ताबडतोब त्याला दुजोरा दिला. 

मग निशाने आपल्या त्रिकोणी जगाच्या हाॅलिडे गेट-आवे साठी सुबक प्लॅन तयार केला.  पण सासू बाईंचं, म्हणजे कमलाताईंचं काय ?  मुंबईतल्या एवढ्या मोठ्या घरात चार दिवस एकट्याना ठेवायचं ? शेवटी जरा अनिच्छेने का होईना, त्रिकोणाचा झाला होता चौकोन. 

निशाने नेटवर संशोधन करून महाबळेश्वरच्या एका बऱ्यापैकी हाॅटेलात दोन डबल रूम बुक केल्या होत्या. एक राजेश आणि स्वतःसाठीसाठी आणि दुसरी चेतन आणि त्याच्या आजी साठी. 

आणि लाॅन्ग वीकेंडचा मुहुर्त साधून मंडळी एका सकाळी महाबळेश्वरला निघाली. मोबाईल वरच्या वाटाड्याचा नकाशा म्हणजे खात्रीलायक आधार. तो जवळ असल्यावर वाट चुकण्याची भीतीच नव्हती. दुपारपर्यंत मंडळी महाबळेश्वरला पोहोचली.

आज महाबळेश्वर मधली पहिली सायंकाळ. 

महाबळेश्वर च्या थंड आणि प्रदुषण मुक्त हवेने उल्हासित वाटत होतं. समोर बाॅम्बे पाॅईंट वरून सुर्यास्ताची अवर्णनीय शोभा दिसत होती. राजेशला रिलॅक्स्ड वाटत होतं, निशासुध्दा सुर्यास्ताची मजा लुटत होती.  

"चेतन, जास्त पुढे नको जाऊस". राजेशने आवाज चढवला.

"अहो त्यानाही सांगा. कडमडल्या तर हाड मोडून बसतील" . निशा म्हणाली. 

"अगं दोघांनाही लागू आहेत माझ्या इन्सट्र्क्शन्स". राजेशने सारवासारव केली. 


थोडं इकडे तिकडे फिरुन मंडळी हाॅटेलवर परत आली. हाॅटेलचा मालक राजदीप रिसेप्शन लाऊंजमध्येच बसलेला होता. केतकर कुटुंब आत आलं तसा मालक ताडकन उठुन उभा राहीला आणि अदबीने नमस्कार केला. राजेशला आणि निशाला बरं वाटलं. 

मंडळी डायनिंग हाॅल मधे जेवून बाहेर आली. हाॅटेलमालक लाऊंजमध्येच होता. लगबगीने तो समोर आला आणि राजेशला एका बाजूला बोलावून तो म्हणाला, "सर, वरच्या मजल्यावर आमच्या सुपर डीलक्स रूम्स् आहेत. तिथे आपण शिफ्ट व्हाल का? .... नाही एक्सट्रा चार्ज अजिबात नाही. याच रेट मध्ये सर."


ाजेशने आनंदाने ऑफर स्वीकारली. 

"मला वाटतं माझा मागच्या महिन्यातल्या मेटॅलर्जी जर्नल मधला लेख आणि फोटो यांनी बघितला असावा". वर शिफ्ट होता होता राजेश बोलला.    

नव्या रूम्स् नांवाप्रमाणेच सुपर डीलक्स होत्या. सजावटही उत्तम दर्जाची होती. 

"माय हिरो". नवऱ्याकडे कौतुकाने पहात निशा म्हणाली. 

दुसऱ्या दिवसाची सकाळ. नव्या रूम्सच्या खिडकीतून बाजुलाच असलेल्या खोल दरीचे आणि त्यामधे भरलेल्या कापसासारख्या ढगांच्या बिछायतीचे विहंगम दृष्य पहात राजेश, आणि  निशा गरम गरम चहाचे चहा घुटके घेत होते. निशाला हे सगळं दृष्य पाहता पाहता स्वित्झर्लंडच्या कुठल्यातरी अशाच दृश्याची आठवण झाली आणि मग जरा तुलनात्मक चर्चा झाली खरी, पण डाव्या उजव्याचा निर्णय लागू शकला नाही. 

"चेतन आणि आई अजून उठलेले दिसत नाहीत. मी पाहून येतो . ब्रेकफास्टही मागवायचा आहे", असे म्हणत राजेश शेजारच्या खोलीत डोकावून आला.

"अगं आई नाही दिसत आहे खोलीत". राजेश परत येऊन जरा काळजीच्या सुरात निशाला म्हणाला. 

निशा खिडकीतून खाली पहात होती. "अहो त्या बघा शाल पांघरून खाली फुलबागेत फिरतायत, आणि तो माळीही अदबीने त्यांना काहीतरी सांगतोय. या तुमच्या आई आहेत हे यालापण कळलेलं दिसतंय." 

तेवढ्यात कमलाताईंनी हसून त्या माळ्याचा निरोप घेतला आणि त्या वर यायला निघाल्या. 

"अहो, त्याना सांगा, उगीचच सकाळच्या थंडीत नका फिरू म्हणावं. तापबीप आला तर निस्तरायचं कोणी "? निशा म्हणाली.

"हो, बरोबर आहे तुझं ". राजेश म्हणाला आणि तो विषय तेवढ्यावर थांबला. 

कमलाताई वर आल्या. आंघोळी, ब्रेकफास्ट वगैरे उरकून  मंडळी बाहेर पडली.  

"डॅडी मला घोड्यावर बसायचंय". चेतनने  मागणी केली.

विस्तीर्ण तलावालगतच्या पटांगणाजवळ मंडळी उभी होती. 

एक घोडेवाला त्याचा घोडा घेऊन जवळ आला. सर्वांना आदबशीरपणे नमस्कार करून त्याने राजेशला विचारलं, "साहेब, रपेट करायची आहे का"?

"मला नाही, पण या छोट्याला फिरवायचंय. जमेल का ?" 

"होय साहेब" घोडेवाल्याने उत्तर दिले.

चेतन आजीचा हात धरून उभा होता. 

"काय रे नाव तुझं"? कमलाताईंनी घोडेवाल्याला विचारलं.

"मी बाबू शेलार". परत नमस्कार. 

"हं. संभाळून ने बाबू याला". कमलाताई म्हणाल्या. 

"हो, हो , अगदी काळजी करू नका". परत तीच नम्रता.

निशा हळुच राजेशच्या कानात पुटपुटली.

"इथे काय सौजन्य सप्ताह वगैरे चालू आहे की काय ?"  

राजेशने एकदा हसुन तिला दाद दिली, आणि घोडेवाल्याकडे वळुन, "संभाळुन ने रे छोट्याला", असं सांगितलं. 

तिघांनीही चेतनला टा टा केला. 

"चला तिकडे बाकावर बसूया" राजेशने सुचवलं.

"त्यापेक्षा या हँडिक्रॅफ्ट बघुया जरा" समोरच्या बाजूला ओळीने उभ्या असलेल्या दुकानांकडे निशाने बोट दाखवलं आणि रस्ता ओलांडला.

"आई तू बस इथे बाकावर. येतोच आम्ही ". असं म्हणून राजेशही तिकडेच गेला.

राजेश आणि निशा आजुबाजुला फिरत होते, रस्त्यावर शाॅपिंग करत होते. कमलाताई शांतपणे बाकावर बसल्या होत्या. 

अर्धा तास घोडदौड करून झाल्यावर चेतन आणि घोडेवाला परत आले. त्याना परतलेलं बघुन राजेश आणि निशासुध्दा परत आले. 

"किती झाले रे?" राजेशने विचारलं. 

"पन्नास रुपये साहेब " घोडेवाला म्हणाला.

राजेश चमकला. तिथे रेट तर शंभर रुपये लिहिला होता आणि हा अर्धेच मागतोय ! फारसा विचार न करता राजेशने पन्नास रुपयाची नोट काढून दिली. 

हिल स्टेशनचे लोक आदबशीर, हाॅटेलचा मालक आदबशीर. सगळी कशी, 'राजा माणसं' . अगदी 'दिल खोलके' देणारी. राजेश आणि निशा महाबळेश्वरवर खूष होते. 

"डॅडी, वाॅटरफाॅल बघायला जायचं" ? तिसऱ्या दिवशी सकाळी चेतन विचारत होता.

"आज आपण गोकर्ण महाबळेश्वरला जाऊया बाळ. तिकडे खूप जुन्या काळचं देऊळ आहे आणि पाच नद्यांचा उगम पण तिथूनच होतो." हाॅटेल रूम मधल्या टेबलाच्या  खणातलं महाबळेश्वर गाईड चाळता चाळता राजेश म्हणाला. 

राजेशने हाॅटेलच्या फ्रन्ट डेस्क कडे गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याच्या रस्त्याची नीट चौकशी केली आणि मंडळी निघाली. 

गोकर्ण महाबळेश्वरला देवळाच्या जवळ आल्यावर राजेशला तिथली पार्किंग साठी ऐसपैस जागा आणि गर्द सावली बघुन बरं वाटलं. देवळाच्या वाटेवर दुतर्फा लावलेली हँडिक्रॅफ्टची दुकानं पाहून निशा खुष झाली. 

राजेशने गाडी नीट सावलीत पार्क केली. सर्वजण खाली उतरले. छोटा चेतन उड्या मारायला लागला. निशाने चेतनचा हात धरला आणि ती देवळाच्या दिशेने पहात म्हणाली, "बऱ्याच पायऱ्या दिसतायत वर देवळाकडे जायला ".

राजेश म्हणाला, "अरे हो. खरंच की. आई, तुला कठीण पडेल एवढं वर चढायला आणि उतरायला. इथेच सावलीत बसायचंय का बाकावर तुला! छान गार वाटतंय इथेही. "


"होय बाबा, इथेच बसते मी." कमलाताई बाकावर विसावत म्हणाल्या.

एक वयस्करसा दिसणारा, पार्किंग लाॅट अॅटेंडंट पार्किंग स्लिप फाडत तिथे आला. जवळ आल्यावर सर्वांना नमस्कार करून राजेशला त्याने स्लिप दिली. राजेश पैसे देता देता त्याला म्हणाला, "आम्ही देवळात जाऊन येतोय, आई बसतील तोपर्यंत इथे बाकावर. चालेल नं".

मनुष्य जरा हसला आणि म्हणाला, "अगदी काही काळजी करू नका, केतकर साहेब ".

'केतकर साहेब? ' याला माझं नाव कसं माहिती? की हाॅटेलवाल्यानी पुढे कळवलंय फोन करून याना मी येत असल्याचं ? राजेश विचार करु लागला. पण राजेशला काही स्पष्टीकरण विचारण्याची संधी मिळण्याआधीच अटेंडंट नवीन आलेल्या दुसऱ्या गाडीकडे निघून गेला आणि तो विषय तसाच राहिला. 

राजेश, निशा आणि चेतन असं त्रिकोणी कुटुंब देवळाच्या पायऱ्यांकडे चालू लागलं आणि कमलाताई बाकाला मागे टेकून रिलॅक्स झाल्या. डोळे मिटले. 

मनात आठवणींच्या लाटां मागून लाटा येत होत्या, कमलाताई त्यांना निग्रहाने बांध घालत होत्या. खरं तर आयुष्यातलं ते पर्व संपलं होतं, वाई मधल्या माणसांची नाती, तो जिव्हाळा, हा भूतकाळ होता आणि मुंबई करांशी अजून खेळ जमत नव्हता.

कमलाताईनी डोळे मिटून घेतले. मधुन अधुन वाऱ्याच्या झुळुका येत होत्या. छान वाटत होतं. तेवढ्यात एक अलिशान गाडी पार्किंग लाॅट मधे येऊन थांबली . कमलाताईंनी डोळे किलकिले केले. माणसं गाडीतून उतरली. चार जणांचं कुटुंब होतं. मजेत, गप्पा मारत मंडळी  देवळाकडे चालली होती. 

"केतकर बाई ?" कोणी तरी जवळच उद्गारलं. कमलाताईंनी आपलं नाव ऐकल्यावर डोळे उघडले. त्या सावरून बसल्या. 

त्या ग्रुपमधलाच एक उंचसा, थोड्या विरळ केसांचा मध्यमवयस्क गृहस्थ कमलाताईंच्या समोर उभा होता. 

कमलाताई उभ्या राहिल्या. चष्मा सारखा करत त्या म्हणाल्या, "अं ! ओळखलं नाही मी".

गृहस्थ हसला. "बाई, मी दीपक देशमूख. तात्यासाहेबांचा दिपू".

कमलाताई दिलखुलासपणे हसल्या. वाईला तात्यासाहेब देशमुख केतकरांचे शेजारी. दोन कुटुंबांचा अतिशय घरोबा. तात्यासाहेबांच्या प्रेरणेनेच केतकरांनी वाईला नूतन हायस्कूलचे रोपटे लावले आणि पुढे त्याचा वृक्ष झाला.

तात्यासाहेबांचा दीपक राजेश पेक्षा सात आठ वर्षांनी मोठा. दीपक लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार आणि बाईंचा अतिशय लाडका शिष्य. पुढे काॅलेज शिक्षणासाठी दीपक बाहेर गेला, तात्यासाहेब कोल्हापूरला गेले आणि मग केतकर कुटुंबाचा देशमुख कुटुंबाशी काही संबंध राहिला नव्हता. 

एकदा ओळख पेटल्यावर कमलाताईही जरा मोकळ्या झाल्या . दीपक ने आपल्या बायकोची, मुलाची, बाईंशी ओळख करून दिली. गप्पा रंगल्या. 

राजेश, निशा आणि चेतन देवदर्शन करून आले. निशाने लांबूनच कमलाताईंबरोबरचा लोकांचा घोळका बघितला आणि ती राजेशला म्हणाली, "आता यांनी कोण मित्र मंडळी जमवलीत इथे ?"

राजेशने जरा निरखून पाहिलं. राजेश चपापला. "अगं हे तर इंडस्ट्रियालिस्ट डी पी देशमुख दिसतायत. पण आई बरोबर काय गप्पा मारतायत सगळे ? "

कमलाताईंनी राजेशला जवळ आलेलं पाहिलं. कमलाताईंनी ओळखी करून दिल्या. 

इतक्यात पार्किंग लॉट अटेंडंट दीपक ला जवळ दिसला. "अरे श्रीधर, कसा आहेस? ". दीपक ने हाक मारली आणि त्याला बोलावलं. अटेंडंट जवळ आल्यावर दीपकने त्याला हाताला धरून ओढलं आणि विचारलं , "अरे बघितलंस का कोण आलंय?"

श्रीधर म्हणाला, "हो, मी बघितलं बाईंना. खरं तर कालच मला बाबू शेलाराने फोन करून बाई महाबळेश्वरला आल्याचं सांगितलं होतं. आपल्या राजदीपच्याच हाॅटेलात उतरल्यात म्हणाला. "

राजेश च्या आणि निशा च्या डोक्यांत ट्यूब लाइट पेटली. गेल्या तीन दिवसांतल्या बऱ्याचशा घटनांचा संगतवार उलगडा व्हायला लागला होता. 


दीपक सांगू लागला , "बरं का राजेश, मी बाईंच्या हाताखाली वाईला नूतन हायस्कूल मधे शिकलो, बोर्डाला पहिल्या दहात आलो. पण या श्रीधरची आणि बाबूची गोष्ट वेगळी आहे. बाईंच्या सद्भावना मंडळाने त्यांच्या कुटुंबाला वेळीच हात दिला होता आणि त्यामुळेच ही अशी सावरलेली कुटुंबं आज महाबळेश्वरात मानाने रहात आहेत."

दीपक पुढे म्हणाला, "आम्ही येतो दहा मिनिटांत देवदर्शन करून. थांबाल नं तुम्ही? गप्पा मारत बसू नंतर".

राजेश ने होकारार्थी मान हलवली. दहा मिनिटे काय, डी पी देशमुखांशी गप्पा मारण्यासाठी दहा  तास सुध्दा थांबायची राजेशची तयारी होती. राजेश आणि निशा दोघंही कमलाताईंबरोबर तिथेच बाकावर बसले. का कोण जाणे, सर्वांनाच जरा अवघडल्यासारखं झालं होतं. 

पंधरा वीस मिनिटांनी दीपक आणि त्याचे कुटुंबीय देवदर्शन करून परत आले.

"चला, तिथे स्वागत हाॅटेलकडेआरामात बसूया" दीपक म्हणाला. 

आता स्वागत हाॅटेलमधे एका गोलाकार टेबलाभोवती मंडळी बसली होती. दीपकने सर्वांसाठी जूसची ऑर्डर दिली होती आणि आरामात जूसचे घुटके घेता घेता दीपक राजेशला विचारत होता. "हं, तर राजेश, मला सांग आता तुझ्या या मिश्र धातू प्रक्लपाबद्दल".

राजेश या संधीची वाटच पहात होता. आपल्या नव्या प्राॅजेक्टची पूर्ण माहिती राजेशने दीपकला दिली. दीपकही मन लावून ऐकत होता, मधे मधे प्रश्न विचारत होता, अशा तऱ्हेने एक तास केव्हाच निघून गेला.

शेवटी दीपकने मान डोलावली. "वा:, प्राॅडक्ट तर छान आहे. आमच्या डेअरी मशिनरी मधे आम्हाला अशाच धातूचं सिलिंडर पाहिजे आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे  किंमतही माफक आहे. पण याच्यावर आधी सर्व प्रकारच्या चाचण्या करायला हव्यात आणि तज्ञांकडुन सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. करून घेऊ आपण सगळं ते. 

पण त्याच्या आधी मला एका महत्त्वाच्या कामाबद्दल बोलायचंय." असं म्हणून दीपक कमलाताईंकडे वळला. 

"बरं का बाई, आमच्या वसईच्या फॅक्टरीत आम्ही तिथलेच जवळपासचे कामगार कामावर ठेवलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या सेवेसाठी आम्हाला सद्भावना सारखी एक संस्था स्थापन करायची आहे. बाई मदत कराल नं मला या कामात?" दीपकने कमलाताईना विचारलं. 

"तुझ्या मनात नक्की काय करायचा विचार आहे ते तरी सांग!" कमलाताईनी दीपकला विचारलं .

दीपक बोलू लागला.  त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी दिसू लागली. "असं पहा बाई, आमच्या कारखान्यात आजूबाजूचे कामगार कामाला येतात. आमच्याकडे त्याना चांगलं ट्रेनिंग मिळतं, कँटीनमध्ये सकस आहार मिळतो. पण त्यांच्या कुटुंबियांचं काय ? मुलांना शिक्षण, वडील माणसांना औषधपाणी, गृहिणींसाठी लहान सहान गृहोद्योग असे उपक्रम मला तिथे हाती घ्यायचे आहेत. बाई, एक प्रति सद्भावना संस्था तिथे उभी करायची आहे. "

कमलाताई ऐकत होत्या. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या. "दीपक तुझी कल्पना फारच सुंदर आहे. पण हे सगळं व्यवस्थितपणे करायला आणि सुरळीत चालवायला तुला व्यावसायिक लोकांची गरज आहे. मी तिथे काय करणार ?"

दीपकने समजावले, "बाई, खरं आहे ते. हे खटलं चालवायला व्यावसायिक संच तर असणारच. पण बाई, हे काम करतांना मानवी मूल्ये कटाक्षाने पाळावी लागणार, आणि यासाठी त्या सर्वांवर करडी नजर ठेवायला अनुभवी, संयमी आणि प्रेमळ व्यक्ती पाहिजे आहे." 

थोडं थांबून दीपक म्हणाला, "बाई , कराल नं मदत आम्हाला. व्हाल ना या नव्या सद्भावना च्या विश्वस्त ?"

"पण आईला जमेल का, तुम्ही म्हणताय ते काम करायला, एवढी मोठी जबाबदारी घ्यायला? " राजेशने जराशा साशंकतेनेच विचारले. 

"अरे राजेश, तुझ्या मिश्र धातूच्या प्राॅडक्टवर चाचण्या कराव्या लागणार आपल्याला पण राजेश, तुमची आई म्हणजे खणखणीत बंदा रुपया आहे, बंदा रुपया." दीपक बोलला आणि खळखळून हसला.

कमलाताई खाली पहात होत्या. त्या विचारात गढल्या होत्या. दीपक कमलाताईं कडे आशेने पहात होता. सर्वचजण कमलाताईंकडे पहात होते. त्या गोल टेबलाभोवती बसलेल्या व्यक्तींच्या मनात वेगळ्या वेगळ्या विचारांचा कल्लोळ माजला होता. पण कमलाताईंच्या विचारांची साखळी कोणीही तोडली नाही.

थोड्या वेळाने कमलाताईनी मान वर केली. दीपक कडे वळून त्या म्हणाल्या, "असं पहा दीपक, हे काम काही मला अवघड नाही. मात्र, काम करणारी टीम सक्षम असली पाहिजे आणि त्यांनी सकारात्मक साथ दिली पाहिजे."

दीपकला आनंद झाला. "बाई, मला वाटलंच होतं की तुम्ही मला साथ देणार. अगदी पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला. "


"चला, या आनंदाच्या प्रसंगी जूसची आणखी एक फेरी होऊन द्या. " दीपक कमलाताईंने आणि नंतर राजेशला जोरजोराने हस्तांदोलन करत म्हणाला. 

शेजारून एक मंजूळ आवाज आला, "सासुबाई".

कमलाताईंनी हा आवाज पूर्वी कधी ऐकला नव्हता. कोणीतरी आपल्याला उद्देशून बोलतंय हे कळायला त्याना अर्ध्या एक मिनिटाचा अवधी लागला. पण मग मात्र निशाकडे वळून कमलाताई म्हणाल्या, "काय म्हणतेस निशा ?"

" नाही, सासुबाई, मी काय म्हणतेय," पुन्हा तोच मंजूळ आवाज. "तुमच्या प्राॅजेक्टसाठी काही साॅफ्टवेअरची गरज पडली तर सांगा हं मला. अपेक्स साॅफ्टवेअर आपलं घरचंच आहे."

कमलाताई हसल्या. त्रिकोणी कुटुंबांचे आता चौकोनातच नव्हे तर लवकरच पंचकोनात, षट्कोनात रूपांतर होणार या कल्पनेने मनोमन सुखावल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama