STORYMIRROR

Sudhir Karkhanis

Drama Others

4.7  

Sudhir Karkhanis

Drama Others

एका दगडात तीन पक्षी

एका दगडात तीन पक्षी

13 mins
1.3K


सकाळची आठ सव्वा आठची वेळ. भावे साहेब मेन्टेनन्स वर्कशॉप मधे एका वर्कबेंचला रेंगसून उभे होते. त्यांच्या आजूबाजूला कामगारांची, सुपरवायझर लोकांची नेहमीचीच सकाळची लगबग, गडबड चालू होती. काही कामगार लाॅकर रूम मधे कपडे बदलत होते, काहीजण आपल्या टूल बॅग तपासून पहात होते, काही फिटर्स आपल्या हेल्परला कामाविषयी सूचना देत होते तर काही जण काही-बाही गोष्टी शोधत इकडे तिकडे फिरत होते.  वरुन कंट्रोल रूम कडून डिफेक्ट नोट्स चा एकत्रित जुडगा आला होता आणि सर्वाना ज्यांच्या त्यांच्या कामाच्या विभागणी प्रमाणे डिफेक्ट नोट्सचं वाटप करून झालं होतं. फिटर ग्रुप्स आणि त्यांचे सुपरवायझर आपापल्या डिफेक्ट नोट्स वाचून कामाचा अंदाज घेत होते.  

पाच दहा मिनीटातच गलका कमी झाला. डिफेक्ट नोट वाल्या फिटर्सनी कामाचा अंदाज घेऊन मग त्यांच्या कामाला योग्य अशी स्पेशल टूल्स आपापल्या नावांवर इश्शयू करून घेतली. ज्यांची रूटीन कामं चालू होती त्यांनी एव्हाना खांद्यावर टूल बॅग टाकल्या होत्या . कामं सुरु करायची सगळ्यानाच आता घाई झाली होती. 

आपली वर्क बेंचला रेंगसलेली पोज टाकून भावे साहेब ताठ उभे राहिले. भावे साहेबांनी एकदा घसा खाकरला आणि एक हात वर करून सगळ्यांना जवळ बोलावलं. मंडळी थांबली. जवळ आली.  सगळ्या मंडळीनी भावे साहेबांभोवती अर्ध वर्तुळ केलं आणि ते काय सांगतायत अशा अपेक्षेने त्यांच्याकडे सर्वजण पाहू लागले.


"ऐका रे सगळे ", भावे साहेब म्हणाले, "आज 600 मेगावॅट यूनिट नंबर दोन चं कमिशनिंग आहे. आहे नं माहिती सर्वांना ? नवीन युनिट अजून प्राॅजेक्ट ग्रुपच्या ताब्यात आहे , पण कंट्रोल रूम तर सामायिकच आहे नं! आज चीफ इंजिनियर साहेब स्वत: कट्रोल रूम मधे असणार आहेत. त्यांच्या हस्तेच बरोबर साडे बारा वाजता युनिट कमिशनिंग आहे. कंपनीच्या दृष्टीने आणि आपल्या राज्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची घटना आहे. तेव्हा सगळ्या मेन्टेनन्स ग्रुपनी काळजीपूर्वक काम करायचं आहे. बिनमहत्वाची कामं नाही हातात घेतली तरी चालेल पण युनिट कमिशनिंग मधे कुठल्याही तऱ्हेची बाधा येता कामा नये. सांगून ठेवतो." 


सर्वाना कडक शब्दात सुनावणी देऊन भावे साहेब वर्कशॉप मधून निघाले. फोरमन गोविलकर बरोबर होतेच. बोलत बोलत दोघेही दरवाज्या पर्यंत पोहचले देखील. तेवढ्यात भावे साहेबांना काहीतरी आठवण झाली आणि जागीच थबकले. 

"गोविलकर, देवराम कोठे आहे?" भावे साहेब किंचाळले. 

"साहेब,  आज देवरामला टूल्स कॅबिनेटचा चार्ज देऊन वर्कशॉपमधेच ठेवलंय मी." भावे साहेबांना आपल्या शांत सुरात गोविलकर आश्वासन देते झाले. "त्याची नका काळजी करू तुम्ही. देवराम सेफ आहे".


"अहो गोविलकर, देवराम स्वत: नेहमीच सेफ असतो हो! आज देवराम पासून आपण सुरक्षित रहाणं खरं महत्त्वाचं आहे." भावे साहेब म्हणाले ."अगदी पूर्ण काळजी घ्या, आज वर्कशॉप मधून बाहेर पाऊल टाकायचं नाही म्हणून सांगा त्याला. "भावे साहेब देवरामला एवढे घाबरून असायला कारणं ही तशी बरीच होती.  देवराम तसा अनुभवी कामगार होता. आपल्या कामात बऱ्यापैकी वाकबगारही होता. पण धांदरटपणात त्याचा हात पंचक्रोशीत कुणी धरला नसता. एखाद्या मशिनचे पूर्ण सर्विसिंग करून बाॅक्स अप केल्यानंतर आतमधे पुसण्याचे फडके राहिल्याची आठवण होणे, मॅनहोल कवरचे सगळे चोवीस बोल्ट लावून टाइट केल्या नंतर त्या सगळ्यांमधे स्प्रिंग वाॅशर टाकण्या साठी परत उघडत बसणे, स्विचबोर्ड मेन्टेनन्स करताना भलताच स्विच आॅफ करून सगळीकडे अंधार पसरवणे वगैरे प्रकार देवरामने अनेकदा केलेले होते.

आता म्हणूनच आजच्या अतिमहत्वाच्या दिवशी आणि येणाऱ्या महत्त्वाच्या क्षणी भावेसाहेबाना देवरामच्या तडाख्यातून पावरहाउस सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावलं उचलणं जरूरीचं होतं. 


देवराम वर्कशॉपच्या चार भिंतीं मधे बंदिस्त आहे या शाश्वतीने भावे साहेब निश्चिंत झाले आणि मग स्वतःवर आणि जगावर खूष होऊन मान डोलावत भावे साहेब वरती आपल्या ऑफिसकडे चालू लागले. तिकडे कंट्रोल रूम मधे नवीन युनिटच्या कमिशनिंगची तयारी भन्नाट वेगाने चालली होती. ऑपरेशन ग्रूप नव्या युनिट चा ताबा घेणार होता आणि बाॅयरलवर, तसेच टर्बाइनवर, आणि मागच्या इन्सट्रुमेंटेशन पॅनेलला अजूनही चिकटून बसलेले इरेक्शन , कमिशनिंग ग्रुपचे इंजिनियर हुडकून काढून त्याना दिलेल्या कार्यमुभा क्लियर करून घेण्याचं अवघड काम त्यांनी सुरु केलं होतं.

  

गेले दोन चार वर्षे दिवस रात्र काम करून नवीन युनिट ला इरेक्शन ग्रुपने या तारुण्यावस्थेपर्यंत आणललं होतं. कमिशनिंग ग्रुपने नाना प्रकारचे परिक्षण, टेस्टिंग करून, इंन्सट्रुमेंटेशन सिस्टिमचं सेटिंग करून युनिटला हुश्शार केलं होतं. साहजिकच नव्या युनिटच्या प्रत्येक मशिनरीचा त्याना सर्वांना एकप्रकारचा लळा लागला होता आणि आता ऑपरेशन ग्रुप रूपी अक्रूर या युनिट ला त्यांच्यापासून ओरबाडून घेत होता.

 

मुलीला सासरी पाठवणं काय किंवा श्रीकृष्णाला अक्रुराने मथुरेला नेणं काय, जितकं अपरिहार्य आहे, तितकंच इरेक्शन आणि कमिशनिंग ग्रूप्सनी कमर्शिअल ऑपरेशन डे ला आपलं चंबूगबाळं आवरतं घेणं आवश्यक आणि अपरिहार्य आहे, हे सर्व जण जाणत होते. त्यामुळे मग एक एक करून मन घट्ट करून सर्वांनी आपापली कामं संपवली आणि सर्व कार्यमुभा क्लियर केल्या.


ऑपरेशन ग्रुपने  युनिटचा पूर्ण ताबा घेतला. बाॅयलर लाइट अप झाला. हळूहळू सक्त देखरेखीखाली प्रेशर, टेम्परेचर वर येऊ लागले. एच्पी आणि एल्पी बायपास उघडे असल्यामुळे उच्च दाबाच्या वाफेचा कानठळ्या बसवणारा आवाज सर्व परिसरात घुमुन राहिला. पाण्याचे, वाफेचे, ड्रेनिंगचे, बायपासचे असे वेगवेगळे  व्हाल्व   उघडण्याची, बंद करण्याची ऑपरेशन ग्रुपची शिस्तबध्द धावपळ सुरु झाली.

 

युनिट स्टार्टपचा रंगतदार आणि रोमहर्षक प्रोसेस सुरु झाला.

वर ऑफिसमध्ये इलेक्ट्रीकल मेन्टेनन्स चीफ भावे साहेब आणि मेकॅनिकल मेन्टेनन्स चीफ चाटी साहेब, डेप्युटी चीफ इंजिनियर देशपांडे साहेबांच्या केबिनमधे बसले होते. स्पेशल चहा आणि टोस्ट रिचवले गेले होते आणि आता तासा दोन तासात होणाऱ्या युनिट कमिशनिंगच्या सोहळ्याबद्दलच चर्चा चालली होती. 

"देशपांडे साहेब, चहा झकास होता हं", भावे म्हणाले, "तुमची नवी सेक्रेटरी दिसते झकास आणि चहा पण करते झकास. "



" अहो भावे, जरा जपुन बोला", देशपांडे साहेब दबलेल्या आवाजात बोलले. "अहो भिंतीलाही कानाला असतात. त्या इन्स्ट्रुमेंटेशनच्या चितळेचं प्रकरण विसरलात काय ? लिफ्ट मधे जरा कुठे सोबतच्या लेडी इंजिनियरला 'तू आज छान दिसतेस ' म्हणायला गेला काय , तिने लगेच तक्रार केली काय आणि त्याला तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला काय !"


चितळेचं नाव ऐकल्यावर चपराक बसल्या सारखे भावे साहेब चुप झाले.

वरून कंट्रोल रूम मधून फोन आला. देशपांडे साहेबांनी फोन उचलला, ऐकून घेतलं आणि फोन खाली ठेवला.


"चला. प्रेशर, टेम्परेचर ठीकपणे वर येतायत." देशपांडे साहेब म्हणाले, "कंट्रोल रूम मध्ये एक चक्कर मारून मग खाली पोर्चमधे जाऊया. साठे साहेब पोहोचतीलच अर्ध्या तासात ".


"चला". भावे साहेब म्हणाले. चहाचे कप बाजुला सारले गेले आणि त्रिकूट लिफ्टकडे चालू लागले. 

  

शिफ्ट चार्ज इंजिनियर गुप्ते आणि त्यांची टीम आपल्या कामात मग्न होते. आज राज्यात विजेचा तुटवडा असल्यामुळे युनिट नंबर एक वर फुल लोड होतं. फ्रिक्वेन्सी सुध्दा जेमतेमच होती. अशा अवस्थेत चालते युनिट संभाळून ब्रँड न्यू युनीट कमिशन करायचं, म्हणजे नाही म्हटलं तरी तारेवरची कसरतच होती. गुप्तेंनी साहेबांनी वरिष्ठांकडे पाहुन जरासं हसल्यासारखं केले आणि  ते परत आपल्या कामाला लागले.


"गुप्ते, " देशपांडे साहेब म्हणाले, "तुम्ही युनिट चालू करून रन अप करा, पण सिंक्रोनाइज करू नका बरं का. ते काम आपले चीफ इंजिनियर साहेब करणार आहेत."


"सर, माहिती आहे मला", गुप्ते म्हणाले, "पण चीफ इंजिनियर साहेबांनाही जास्त काही करायचं नाही. युनिट तर ऑटो कंट्रोल वरच आहे. स्पीड गवर्नर आणि व्होल्टेज रेग्युलेटर आपलं काम करतील, आणि मग साहेबांनी फक्त हे हिरवं बटण दाबून ऑटो सिंक्रोनायजर ऑन करायचा आहे. मग पाच मिनिटांत जाइल युनिट लाईनवर . तासाभरात दोनशे मेगावॅट लोडही मिळेल. मख्खन जैसा स्मूद हो जायेगा सब !"

देशपांडेसाहेबांनी मान डोलावून गुप्ते साहेबांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.  मग दहा मिनिटं कंट्रोल रूम मधे काढून सगळं काही ठीक चाललंय असं पाहून देशपांडे साहेब, भावे साहेब आणि चाटी साहेब खाली पोर्चकडे निघाले.

 

"आज काही बरा दिवस दिसत नाही नवीन युनिटच्या कमिशनिंगला". देशपांडे साहेब मान हलवत पुटपुटले. "ग्रिडची फ्रिक्वेन्सी अगदिच काठावर आहे. काही चूक झाली तर फट् म्हणता ब्रह्म हत्या व्हायची." पोर्चमधे पोहोचल्यावर देशपांडे साहेबांनी परत फोन लावला. चीफ इंजिनियर साहेब अगदी पाचच मिनिटांवर आहेत हे कळल्यावर मेन गेट ला योग्य त्या सूचनाही दिल्या.

 चीफ इंजिनियर साहेबांची गाडी आली. हस्तांदोलनं झाली. मागच्या दोन गाड्याही आल्या. नमस्कार चमत्कार पार पडल्यावर सर्व मंडळी दुसऱ्या मजल्यावरच्या काॅनफरन्स रूमकडे चालू लागली.  काॅनफरन्स रूम मधे चहापानाची जय्यत तयारी होती. खारे काजू, बदाम, काजू कतरी बशा भरभरून समोर आल्या. चहाचे कप किणकिणले. मंडळी सुखावली.

"पंधरा एक मिनीटात जाऊया कंट्रोल रूमला ". देशपांडे साहेब चीफ इंजिनियर साठे साहेबांना म्हणाले. "लोड डिस्पॅचरने सव्वा बाराचा टाईम दिलाय युनिट लाईनीवर आणायला. ग्रिड कंडिशन जरा क्रिटिकल आहे आज. शेजारच्या राज्यात काही प्राॅब्लेम आहे म्हणतात, त्यामुळे लो फ्रिक्वेन्सीची परिस्थिती निर्माण झाली आहे. " साठे साहेबांनी प्रसंगाचे गांभीर्य जाणून चेहरा लांब केला.


तिकडे खाली वर्कशॉप मधे फिटर शेळके अस्वस्थपणे येरझारा घालत होता. त्याच्या मामीला हाॅस्पीटल मधे अत्यवस्थ अवस्थेत हलवल्याची बातमी नुकतीच मोबाईल वरून त्याला मिळाली होती आणि त्याला एक क्षणही इथे वाया न घालवता मामीला भेटायला जायचं होतं.


"देवराम, ही एकच डिफेक्ट नोट आहे माझ्या कडे गड्या. दहा मिनिटांचंच काम आहे पण कोणीही फिटर स्पेअर नाही "  शेळके देवरामला म्हणाला. "करशील का हे छोटं काम?"


"काय काम तरी काय आहे ?" देवरामने विचारले.


"कंट्रोल रूमच्या पॅन्ट्रीमधे जे पावर पाॅइंट आहेत त्यांचा सप्लाय गेलाय. त्याचा स्विचबोर्ड तिथेच काॅरिडाॅर मधे आहे. त्यातला थर्मल रीले जळलेला आहे. तो बदलायला हवा. काम सोपं आहे. स्विचबोर्ड ऑफ करायचा, उघडायचा, रीले बदलायचा आणि मग सगळं पूर्ववत करायचं. दहा मिनिटांचं काम, जास्तीत जास्त. " शेळके काकुळतीला येऊन पुढे म्हणाला , "मला जायलाच पाहिजे ताबडतोब. आणि हो, देवराम, लंचला मी मच्छी फ्राय बुक केलं होतं, त्याचं हे टोकन तुला घे. कुपन दिलंय मी आधीच. त्याची काही काळजी नाही".

देवरामचं मन हेलावून गेलं. मच्छी फ्राय चा वास नाकावाटे मेंदूत शिरला. देवरामकडे टूल्स कॅबिनेट चा चार्ज होता खरा, पण आता तर सगळे जण कामावर गेलेले. आता टूल्स मागायला कोण येणार! आणि हो . मित्राला त्याच्या संकटकाळी मदत करायची नाही तर ती मैत्री कसली ?

 

"आण ती डिफेक्ट नोट इकडे आणि तू पळ. जा." देवराम ने उदारपणे शेळके ला जाण्याची मुभा दिली. ताबडतोब शेळके बाॅयलर सूटची बटणे काढत काढत कपडे बदलण्यासाठी लाॅकर रूम कडे पळाला. "हाफ डे अॅप्लीकेशन मी उद्या टाकतो असं गोविलकर साहेबांना सांग", शेळके म्हणाला.

कपडे बदलून शेळके दोन मिनिटात आला आणि जाता जाता

 वर्कशॉप च्या दारातच अडकला.


"आणि हो, देवराम, तिथे काॅरिडाॅरमधे दोन स्विचबोर्ड आहेत बरं का." शेळके दारातून ओरडला."डावीकडचा बोर्ड कंट्रोल रूमच्या लाईटस् चा आहे. त्याला हात नाही लावायचा, लक्षात ठेव, गोंधळ होईल नाहीतर. डावीकडचा. डावीकडचा."

देवराम ने कपडे बदलले. शेळके चा हेल्पर टूल बॅग घेऊन उभा होता. दोघं मिळून मागच्या सर्विस लिफ्ट नी वरती आले. कंट्रोल रूम कडे जाण्याच्या काॅरिडाॅर मधले लाइट स्विचबोर्डच्या प्राॅब्लेम मुळे आॅफ झाले होते. देवराम आणि त्याचा हेल्पर काॅरिडाॅरच्या दरवाज्याने आत आले. देवराम स्विचबोर्डच्या समोर उभा राहिला. 


"शेळके काहीसे बोलला होता. यातला एक स्विचबोर्ड पॅन्ट्रीच्या पावर पाॅइंट साठी  आणि एक कंट्रोल रूम लाइटसाठी." देवराम विचार करत होता. "टाॅर्च तर टूल बॅग मधे नाही, अंधारामुळे नेमप्लेट ही नीट दिसत नाही. हां, शेळके डावीकडचा, डावीकडचा म्हणत होता खरा, तेव्हा पॅन्ट्रीचा स्विचबोर्ड बहुतेक डावीकडचा असणार".असा विचार करून देवराम ने डावीकडचा स्विचबोर्ड आॅफ करण्यासाठी हात पुढे केला. 

इकडे, चहापान आणि अल्पोपहार आटपून मंडळी कंट्रोल रूममध्ये पोहोचली होती. गुप्ते चीफ इंजिनियर साहेबाना समजावून सांगत होते.


"सर मशिन फुल स्पीडला आलं आणि जनरेटर व्होल्टेज बिल्डअप झालं की हे बोर्डवरचं हिरवं बटन आपण दाबावं म्हणजे आॅटो सिंक्रोनायजर ऑन होईल आणि पाच मिनिटांत युनिट लाईनवर जाऊन लोड घ्यायला लागेल. पण सर," गुप्ते पुढे म्हणाले, " त्या हिरव्याच्या जवळच हे मशरूम सारखं लाल बटन आहे, त्याला मात्र हातात लावायचा नाही. ते इमर्जन्सी शट डाऊन बटन आहे. ते दाबलं तर बाॅयलर,  टर्बाईन, जनरेटर सगळं शट डाउन होईल. मग मात्र परत श्री गणेशा करावा लागेल ".साठे साहेबांनी मान डोलावली. एकदा गुप्तेंकडे बघुन सुहास्य केलं. कॅमेरावाल्याने तो क्षण बरोबर टिपला. साठे साहेबांच्या मनात आत्मविश्वासाची लहर उठली. 

लोड डिस्पॅचर कडून परवानगी आली. "शेजारच्या राज्यात पावर पोजिशन क्रिटिकल आहे. पंधरा मिनिटांच्या स्लाॅट मधे सिन्क्रोनायजिंग आटपा".


गुप्तेंनी त्वरित प्रोसेस सुरु केला. पाच मिनिटांनी गुप्तेनी साठे साहेबांना खूण केली. साठे साहेब पुढे सरसावले आणि बोर्ड वरचं हिरवं बटण दाबायला त्यांनी आपला उजवा हात पुढे केला. त्याच क्षणी देवरामने बाहेरच्या काॅरिडाॅर मधला डावीकडचा स्विचबोर्ड ऑफ केला.  कंट्रोल रूमचे लाईटस् विझले. कंट्रोल रूम अंधारली. जमलेल्या सर्वांच्या तोंडून "आह", असा मोठ्याने उद्गार आला. दुसऱ्या क्षणी इमर्जन्सी लाईटस् पेटले. भोंगा वाजायला लागला कंट्रोल रूम अर्धवट उजळली. आवाक् झालेले आॅपरेशन्स इंजिनियर भानावर आले. धावपळ करू लागले. 



एक दोन सेकंदात घडलेल्या या सर्व प्रकारामुळे साठे साहेब गांगरून गेले. मागे बघायला त्यांनी झटक्यात मान वळवली. त्या गडबडीत त्यांचा पुढे केलेला उजवा हात लाल बटणावर गेला आणि लाल बटण दाबलं गेलं.  मग तर कल्लोळ आणखीच वाढला. युनिट नंबर दोनला शट डाऊन ची आज्ञा मिळाली आणि दिलेल्या सेटिंगप्रमाणे सर्व यंत्रणेने इमाने इतबारे शट डाऊन प्रोसेस चालू केला. अॅनन्सिएशन सिस्टिमचे बरेचसे दिवे डोळे मिचकावयला लागले. माॅनिटर्स वर भराभरा संदेश यायला लागले. भोंगे वाजायला लागले. एकच गोंधळ उडाला. गुप्ते साहेबांचा अनुभव आणि ट्रेनिंग आता कामाला आलं. युनिट नंबर एक च्या आणि दोनच्या ऑपरेशन ग्रुपला ते भराभर मार्गदर्शन करू लागले.  

साठे साहेब किंकर्तव्यमूढ झाल्यासारखे उभे होते. त्याना बऱ्याच गोष्टी समजावून घ्यायच्या होत्या. साठे साहेबांच्या मनातली घालमेल देशपांडे साहेबांना उमगली. देशपांडे साहेबांनी चाटींना हळूच खूण केली. मग दोघांनी मिळून साठे साहेबांचा कबजा घेतला आणि सावकाशपणे त्याना कंट्रोल रूमच्या बाहेर काढले. साठे साहेबांना आपल्या केबिनमधे नेऊन बसवण्याची आणि सॅन्डविच वगैरे मागवण्याची सूचना चाटीना देऊन देशपांडे साहेब कंट्रोल रूममध्ये परतले . झाल्या प्रसंगाला दोन एक तास होऊन गेले. देशपांडे, भावे आणि चाटी, साठेसाहेबांसमवेत देशपांडे साहेबांच्या केबिनमधे बसले होते. सर्वचजण आता पूर्णपणे सावरले होते आणि आपापल्या मनात आपण स्वतः झाल्या प्रसंगाच्या दोषारोपण सत्रात कितपत गोवले जाऊ शकतो, याचा आढावा घेत होते.

साठे साहेब डोक्याला हात लावून बसले होते. कारण काहीही असो, नवीन युनिटचा शट डाऊन प्रोसेस त्यांच्याच हाताने चालू झाला होता. रिटायरमेंटच्या सहा महिने आधी एवढं मोठं लान्छन आयुष्यभरची सोन्यासारखी कारकीर्द मातीमोल करायला पुरेसं होतं.  नव्या युनिटच्या स्टार्ट-अपचा सोहळा लेखांकित करण्यासाठी आलेले पत्रकार अजून बाहेरच रेंगाळत होते. त्याना बातमीचा सुगावा लागला तर अनर्थ होणार होता. सगळं खापर आपल्या डोक्यावर फोडलं जाणार आणि आपल्या नावाला मोठा डाग लागणार. असल्या डागाळलेल्या चेहऱ्याच्या, डागाळलेल्या हाताच्या माणसाला रिटायरमेंटनंतर कोण कन्सल्टन्सीची कामं देणार आणि कोण राज्य स्तराच्या उच्चाधिकार समिती वर नेमणार. गॅस भरलेल्या फुग्याप्रमाणे ही स्वप्नं आपल्या आवाक्याबाहेर चालली आहेत असं चित्र साठे साहेबांना स्पष्ट दिसायला लागलं.

"देशपांडे, आयत्या वेळी दिवे घालवून टाकणारा कोण आहे तो बदमाश कामगार ? त्याला जन्मभर अद्दल घडेल अशी शिक्षा करा. एक चौकशी समिती नेमा आणि लवकरात लवकर त्याला नोकरी वरून बडतर्फ करून टाका. त्याची ग्रॅच्युईटी वगैरे काही असेल ते अडकवून ठेवा आणि कुठे नोकरी साठी सर्टिफिकेट मागेल तर बिलकुल देऊ नका ". साठे साहेब अगदी पोटतिडकीने देशपांडेना सूचना देत होते. "काय, नाव काय म्हणालात त्या हरामखोराचं?" साठे साहेब पुढे विचारते झाले.  

"नाव त्याचं देवराम, साहेब.  देवराम सावतेकर". देशपांडे साहेबांनी माहिती पुरवली. 

"सावतेकर ?" साठे साहेब जरा सावरून बसले." नामदार सावतेकरांचा तर कोणी नातलग नाही ना ?"



"तोच तर प्राॅब्लेम आहे साहेब . नामदार साहेबांचा चुलत भाऊ आहे तो. म्हणून तर आम्हाला त्याचे नव्याणव अपराध पोटात घालावे लागतात. " देशपांडे म्हणाले.

साठे साहेबांनी लक्षात आल्यासारखी मान हलवली.  जरा धीर येऊन देशपांडे पुढे म्हणाले, "आणि साहेब, मनाने तसा सरळ आहे आणि मदत करायला तत्पर असतो".

साठे साहेब आपल्याच विचारात गढले होते. नामदार सावतेकर म्हणजे साठे साहेबांचं एकुलतं एक आशास्थान होतं. सहा महिन्यांनी रिटायर झाल्यावर आयुष्यात जी भयानक पोकळी निर्माण होणार होती ती भरून काढण्यासाठी, झाली तर नामदार सावतेकरांचीच मदत त्यांना होणार होती. लहाणपणच्या तुटपुंज्या ओळखीच्या जोरावर साठेंनी नामदार सावतेकरांशी संधान जोडलं होतं,  एकदोनदा त्यांच्याबरोबर बैठकीत उठबस केली होती आणि हळुच आपल्या मतलबीची अर्जी दाखल केली होती. दोन महिन्यांपूर्वी नामदार साहेबांनी एका खुशीच्या क्षणी साठेंना आश्वासनही दिलं होतं, की राज्य ऊर्जा समितीवर एक खुर्ची त्यांच्यासाठी नक्की राखुन ठेवली जाईल.  

 

पण नंतर मात्र नामदार साहेब जरा थंडावले होते. मागच्याच आठवड्यात साठेंशी बोलता बोलता ते म्हणाले "काय सांगू राजकारणातले खाचे खोचे साठे तुम्हाला !

अहो परवाच्या अधिवेशनात आमच्या हितशत्रूंनी मुख्य मंत्र्यांचे कान फुंकलेले दिसतात आमच्या विरुद्ध.  काल फंक्शनला भेटले तर माझ्या कडे बघायला तयार नव्हते मुख्य मंत्री महाशय"!


नामदार साहेबांची स्वतःचीच व्यथा ऐकून साठेंना धसकाच बसला होता. "यांचंच बूड ठिकाणावर नसेल तर आपला तर प्रश्नच नाही", असे निराशाजनक विचार साठेंच्या मनात यायला लागले होते. आणि दुष्काळात तेरावा महिना आल्या सारखा त्यांच्या हातून नकळत का होईना हा युनिट शट डाऊनचा प्रमाद घडला होता. त्यातून, या भानगडीला कारणीभूत झालेला मनुष्य नामदार सावतेकरांचा भाऊ निघाला. गुंतागुंत वाढतच चालली होती आणि सुटकेचा काहीच मार्ग दिसत नव्हता. 

वातावरण फारच विषण्ण झालं होतं. देशपांडेसाहेबांनी सेक्रेटरीला बोलावलं आणि सगळ्यांसाठी चहा बिस्किटे आणायला सांगितलं.


केबिनच्या दरवाज्यावर टक टक आवाज आला आणि दरवाजा उघडून गुप्ते आत आले. 

"चला युनिट शट डाऊन अगदी सुरक्षितपणे झालं. कुठेही डॅमेज नाही. टर्बाईन सरळ टर्निंग गियर वर गेलं. अगदी मख्खन जैसा, सर." गुप्ते स्वतःवर , नव्या युनिटवर  आणि एकुण जगावर खुष होऊन उत्साहाने सांगत होते. आणि त्या उत्साहाचा संसर्ग हळूहळू इतरांनाही होऊ लागला होता. 


एक मोबाईल फोन तेवढ्यात किणकीणला.


"एक्सक्यूज मी सर", गुप्ते म्हणाले, त्यांनी आपला चेहरा थोडा फिरवला आणि खिशातला वाजणारा फोन त्यानी आपल्या कानाला लावला. फोनवरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकता ऐकता गुप्तेंचा चेहरा फुलत गेला आणि शेवटी, " ओके सर, हो सर, थॅक्यू सर", असं म्हणून त्यांनी फोन बंद करून खिशात ठेवला. 

गुप्तेंनी चेहरा वळवला. तीन चेहरे त्यांच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पहात होते.

"लोड डिस्पॅच कडून फोन होता. मगाशी नवीन यूनिटचं सिंक्रोनायजिंग वेळीच थांबवल्या बद्दल धन्यवाद देत होते". गुप्ते म्हणाले. 


"काय, धन्यवाद? कशाबद्दल? " तिघंही एकदमच विचारते झाले.


"सर, आपण युनिट लाईनवर आणत होतो त्याचवेळी शेजारच्या राज्यातलं मोठं युनिट डाऊन झालं आणि ग्रिड फ्रिक्वेन्सी आणखी घसरली. सुदैवाने दोन राज्यातली लिंक ओपन झाली आणि आपल्या राज्यातली जनरेटिंग युनिटस् त्या आपत्तीत ओढली गेली नाहीत. पण जर आपण त्या सुमारासच नवीन युनिट सिंक्रोनाइज करायचा प्रयत्न केला असता तर मात्र काय झालं असतं ते सांगता येत नाही. आता सगळी स्थिती पूर्ववत झाली आहे आणि आता आपल्या नव्या युनिटला रात्रीच्या साडे बाराची वेळ दिली आहे." गुप्तेनी एका दमात सगळी माहिती दिली. 


"चला, माझी शिफ्ट संपलीय सर, आता निघू का मी ?". गुप्ते पुढे विचारते झाले आणि सगळ्यांची मूक संमती प्रमाण मानून त्यांनी काढता पाय घेतला.

तीन आश्चर्यचकित चेहरे स्तंभित पणे एकमेकाकडे पहात राहिले.

"हा हा हा", साठे साहेबांनी हास्याचा मोठा फवारा सोडला. "द्या टाळी देशपांडे, सगळी प्रमेयं सुटलीत आता !" साठे साहेब उद्गारले. "आता बोलवा त्या पत्रकारांना आणि द्या मी सांगतो तशी बातमी "


"मथळा द्या,   'सावतेकरांमुळे राज्य वाचले', आणि पुढे लिहा म्हणावं, " साठे सांगत होते.


"आज सहाशे मेगावॅट शक्तीचे नवीन युनिट चीफ इंजिनियर साठेंच्या हस्ते राज्याला अर्पण करण्याचा आनंद सोहळा योजला होता. पण हीच आनंदाची घटिका राज्यासाठी काळ घटिका झाली असती. अनर्थाची सुरुवात शेजारच्या राज्यापासून झाली आणि आपल्या राज्यालाही जोरदार फटका बसला असता. फक्त एका जागृत इसमाच्या प्रसंगावधानाने राज्य मोठ्या आपत्ती पासून वाचले. अगदी अखेरच्या क्षणी इशारा करून सावतेकरांनी नव्या युनिटचा स्टार्टअप सोहळा थांबवला आणि राज्याला अंधाराच्या खाईत जाण्यापासून वाचविले. श्री देवराम सावतेकर हे नामदारअशोक सावतेकरांचे चुलत भाऊ आहेत. सावतेकरांच्या प्रसंगावधानाचे चीफ इंजिनियर साठेंनी तोंड भरून कौतुक केले आहे." 


"अरे वा: साहेब, आपण तर कमालच केली." देशपांडे म्हणाले, "एक तर युनिट शट डाऊनच्या झाल्या चुकीवर पूर्ण पांघरूण घातलंत, दुसरं म्हणजे सावतेकरांचं नाव पेपरमध्ये मोठे मथळे देऊन एका चांगल्या कामगिरीशी जोडून दिलंत आणि त्याना लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचवलंत आणि तिसरं म्हणजे या सगळ्या चांगल्या प्रसिध्दी च्या मागची सूत्रधार व्यक्ती कोण आहे हे नामदार साहेबांच्या निदर्शनाला आणवून आपल्या भविष्याची चिंता दूर केलीत."  

"द्या टाळी मग", साठे साहेब म्हणाले, "यालाच म्हणतात, एका दगडात तीन पक्षी ".



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama