Sudhir Karkhanis

Others

3  

Sudhir Karkhanis

Others

मॅनेजमेंट गुरु

मॅनेजमेंट गुरु

8 mins
843


जानेवारी महिन्यातली हलकीशी थंडी.

रवी ऑफिसला निघाला होता. वाट ओळखीची, अगदी पायाखालची.

त्या छोट्याश्या घाट रस्त्याचं शेवटचं वळण रवीने भर्रकन घेतलं आणि उताराची पुढची वाट धरली. एरवी सकाळी काॅलनीतून निघून या डोंगरी रस्त्याने खाली उतरताना रवी हमखास या वळणावर थांबत असे आणि समोर पसरलेला देखावा मनात साठवून घेत असे. तिकडे डावीकडे डोंगरांची उंच भिंत, त्यात मधेच उंचावरून खाली सरळ रेषेत येणारी वीजकेंद्राची पाईपलाईन, इकडे उजवीकडे सपाटीवरून सरळ मुंबईकडे जाणारा राजमार्ग आणि मधे हे सकाळच्या धुक्याचं ब्लँकेट पांघरून पहुडलेलं खोपोली गाव. रवीला रोज या देखाव्यात काहीतरी नवी नवलाई आढळून यायची.


पण आजचा दिवस अपवादात्मक होता.


रवीचं मन दुसऱ्याच विचारांच्या ओझ्याखाली दबून गेलं होतं. उद्या घरी सत्यनारायणाची पूजा ठरवली होती आणि रवीच्या बायकोने म्हणजे स्वातीने रवीवर कामगिरी सोपवली होती, प्रसादासाठी मोतीचूर लाडवांची चांगल्या दुकानात ऑर्डर देण्याची. खरं तर खोपोली गावात चांगलं स्वीटस् चं दुकान कुठलं, याबद्दल फारसा प्रश्न नव्हता. बालाजी स्वीटस् हेच गावातलं एकमेव, वरच्या दर्जाचं म्हणता येईल असं हलवायाचं दुकान होतं. प्रश्न होता तो स्वातीने आवर्जून सांगितलेल्या स्पेसिफिकेशनचा. लाडू साजुक तुपातलेच हवेत आणि त्या व्यतिरिक्त दुसरा कसलाही वास त्याना येऊ नये. स्वातीने वारंवार बजावून सांगितल्यामुळे साजूक तुपाचा घमघमाट आत्तापासूनच रवीच्या नाकात घुमायला लागला होता.


तीन महिन्यापूर्वीच रवी आणि स्वाती मुंबईहुन खोपोलीला शिफ्ट झाले होते. त्या दोघा पक्क्या मुंबईकरांना सुरुवातीला हा मोठा फरक पचवणं अवघड वाटलं होतं, पण हळूहळू खोपोलीच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणाने दोघांनाही जिंकून घेतलं होतं. डोंगरी रस्ता चढून गेल्यावर एका पठारी जागेत टुमदार बंगल्यांची आणि छोटेखानी घरांची असलेली कंपनीची काॅलनी, माफक दरात इलेक्ट्रिसिटी, पाणी, तसंच केबल टी व्ही, जिम, रिक्रिएशन क्लब वगैरे शहरी सुखसोयी उपलब्ध असल्याने दोघांनाही तिथे रुळायला जास्त वेळ लागला नाही.


स्टार इंजिनियरींग फॅक्टरी खाली डोंगराच्या पायथ्याला सपाटीवर होती, गावाच्या एका टोकाला. एक विशिष्ट प्रकारची टेक्सटाइल मशीनं त्या फॅक्टरीत बनवली जात असत. बाहेरून ऑर्डर देऊन तयार पार्ट आणले जात आणि फॅक्टरीत जोडणी होऊन एकेका मशिनची उभारणी होत असे.


स्टार इंजिनियरींग मधे रवीची ह्युमन रिलेशन मॅनेजर, एच आर मॅनेजर म्हणून नेमणूक झाली होती. कामावर रूजु झाल्यावर पहिले काही दिवस कंपनीतलं शांत आणि खटके तंटे नसलेलं वातावरण पाहुन रवीला खूप बरं वाटलं होतं. पण थोडं खोलात गेल्यावर, सर्व थरातल्या नोकर वर्गाशी, ऑफिसर्सशी औपचारिक, अनौपचारिक चर्चा केल्यानंतर रवीला लक्षात आलं की असेच दडपून ठेवलेले प्राॅब्लेम बरेच आहेत. रवीला त्या सगळ्या प्राॅब्लेम्सचा एक एक करून अभ्यास करायचा होता आणि मग टेक्स्टबूक मधे दिल्याप्रमाणे त्यांची प्रमेये सोडवायची होती. 


पण ते सगळं नंतर. आजच्या दिवसाचा कार्यक्रम ठरला होता. लंच ब्रेक झाला की लवकर जेवण आटपायचं आणि ब्रिजचा डाव टाकायला न थांबता सरळ बालाजी स्वीट्सकडे जाऊन उद्याच्या साजुक तुपातल्या मोतीचूर लाडवांची ऑर्डर द्यायची. हे काम फोनवर होण्यासारखं नव्हतं. समक्ष बोलूनच नीट समजावून सांगणं रवीला योग्य वाटत होतं.


रवी फॅक्टरीत पोहोचला. त्याने स्टॅन्डवर स्कुटर लावली. हेल्मेट काढून हातात घेतलं. बॅग नीटपणे खांद्याला अडकवली आणि उजवीकडच्या रस्त्याने तो अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींगकडे चालू लागला. डावीकडे थोड्या अंतरावर फॅक्टरीची इमारत दिसत होती. फॅक्टरी मधून ठोकाठोकीचे, ग्राइंडिंग-मशिनिंगचे, मेटल कटिंगचे असे विविध आवाज येत होते. नेहमी प्रमाणे पहिली शिफ्ट सकाळी आठलाच सुरू झाली होती.


रवी ऑफिसमधे पोहोचला. आपल्या क्युबिकल मधे जाऊन बॅग, हेल्मेट जागेवर ठेवले. दोन क्युबिकल पुढे चीफ इंजिनियर जोशीची जागा होती. रवीने पाहिलं, जोशी आपल्या टेबलापाशी बसला होता. खिडकीतून बाहेर शून्यात पहात होता. जोशीच्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं पसरलेलं दिसत होतं. लहान मोठ्या अडचणी फॅक्टरीच्या कामात नेहमीच असायच्या. पण त्यातूनही, रवीला माहित होतं की जोशीपुढे सगळ्यात मोठी काळजी उत्पादनाची होती. वास्तविक पाहता दिवसाला दहा टेक्सटाइल मशिन्स बनवण्याची फॅक्टरीची उत्पादन क्षमता होती, पण दिवसाला जेमतेम सहा मशिन्सच्या वर उत्पादन होत नसे.


रवीने पाहिलं होतं की उत्पादन वाढविण्यासाठी जोशी ने बरेच प्रयत्न केले होते.  कामगारांसाठी त्याने स्वतः ट्रेनिंग क्लास घेतले होते. कामगारांच्या छोट्या मोठ्या बॅचेसना बाहेर ट्रेनिंग साठी पाठवलं होतं. श्रमाची कामं सोपी करण्यासाठी जरूर तेथे अद्ययावत मशिन टूल्स बसवली होती. पण उत्पादनात फारशी वाढ झाली नव्हती.  


विचारपुस करण्यासाठी जोशीच्या टेबलाजवळ रवी पोहोचला. रवी आलेला लक्षात आल्यावर जोशीने आपली शून्यातली नजर काढली. रवीकडे पाहून जोशी जरासे शुष्क हसला.


"आलास का रवी, बरं झालं. मोठा प्राॅब्लेम आलाय बघ. अरे आज भल्या सकाळीच मुंबईहून फोन आला. एम डी साहेब स्वतः बोलत होते. जरा रागातच होते. दिवसाला दहा मशिन्सच्या जागी जेमतेम सहा मशिन्स रोज बनतात म्हणून माझ्यावरच साहेब घसरले. आता काही करून उत्पादन वाढलं पाहिजे, नाहीतर माझी कंबख्ती."


जरासा श्वास घऊन जोशी पुढे म्हणाला. "उत्पादन वाढविण्यासाठी मी काय काय प्रयत्न केलेत ते मी सांगितलं त्यांना. मग नरमले जरा. आता त्यांनीच सुचवलंय की वाढीव उत्पादनासाठी कामगारांना बोनस ऑफर करा म्हणून."


रवी ऐकत होता. बरोबर आहे. वाढत्या कामासाठी जास्त पैसे किंवा बोनस रक्कम देणे हा एक स्टॅन्डर्ड उपाय गणला गेला आहेच. रवीला त्याच्या क्रमिक पुस्तकातली शिकवण आठवली.


"रवी, मी पडलो टेक्निकल माणूस. कामगारांबरोबर पैशांची बोलणी करणं मला काही जमणार नाही. तुला हे छान जमू शकेल. आपण असं करू. आज लंच टाईमच्या जरा आधी आपण दोघं वर्कशॉप मधे जाऊया. तिथे गेल्यावर मी कामगारांना एकत्र बोलावीन, सगळ्यांना नाही, लीडर लोकांना. मग त्याना उत्पादन वाढविण्याबद्दल तांत्रिक गोष्टी मी सांगेन आणि त्या पुढे, वाढीव उत्पादनावर माझ्या कडून मिळू शकणाऱ्या बोनस बद्दल तू बोल". जोशी म्हणाला.


रवीला जोशीने सांगितलेला प्लॅन ठीक वाटला आणि तो होकारार्थी मान डोलावणार तेवढ्यात त्याला आठवलं, आज लंच टाईम मधे तर बालाजी स्वीटस् कडे जाउन मोतीचूर लाडवांची ऑर्डर द्यायची होती. हे तर सगळ्यात महत्वाचं टाॅप प्रायाॅरिटी काम.


"आज लंच टाईम मध्ये मला नाही जमणार". रवीने सांगून टाकलं.


जोशीने थोडा विचार केला आणि पर्याय सुचवला.

"मग असं करू, दहा वाजायच्या त्यांच्या माॅर्निंग ब्रेकफास्ट टाईमच्या पंधरा मिनिटं आधी जाऊया. जमेल नं?"


रवीने ताबडतोब होकार दिला.


"साडेनऊ वाजत आलेत", जोशी घड्याळाकडे पहात म्हणाला. "वर्कशॉप पर्यंत जायला पाच सात मिनिटं लागतीलच. चल निघुया."


जोशीने ड्रावर लाॅक केला आणि दोघंही ताबडतोब वर्कशाॅपकडे निघाले. वाटेत कॅन्टिन समोरून जातांना किचनमधून येणारे तेलाच्या तळणाचे वास बेचैन करत होते. मान वळवून बघितलं तर आत एक आचारी गोलगोल बटाटे वडे वळताना दिसला. लांबून अगदी लाडू वाटत होते. रवीला आठवण झाली की बालाजी स्वीटस् ला बजावून सांगायचंय, मोतीचूर लाडवाना साजूक तुपाशिवाय बाकी कसलाही वास नसावा.


दुक्कल वर्कशॉप मधे पोहोचली. जोशीने फोन करून, माणसांकरवी निरोप पाठवून प्रत्येक विभागातले चार पाच लोक वर्कशॉपच्या प्रवेशदालनात बोलावले. सगळेजण जमल्यावर जोशी बोलू लागला. उत्पादनाच्या आजच्या स्थितीबद्दल जोशीने आढावा घेतला आणि त्यामधे वाढ करण्याच्या निकडीबद्दल सर्वांना जाणीव करून दिली. सुमारे पाच एक मिनिटं जोशीचं चिरक्या आवाजात भाषण चाललं होतं. बहुतेक कामगार भाषणाकडे फारसं लक्ष न देता हातातल्या घड्याळाकडे पहात होते. एका सुरात चाललेल्या त्या भाषणामुळे रवीचे विचारही भरकटायला लागले.


तेवढ्यात जोशीने रवीला हळुच कोपराने ढोसलं आणि मानेनेच खूण केली. गडबडीने रवीने स्वतःला सावरलं आणि आपल्या भरघोस आवाजात सुरुवात केली. "मित्रानो, जोशी साहेब बोललेत त्याप्रमाणे उत्पादनात वाढ करायला पाहिजे. आपला सर्वांचा या प्रयत्नाला हातभार लागला पाहिजे. उत्पादनात वाढ झाली तर जोशीसाहेब सर्वांना लाडू देणार आहेत."


समोर उभ्या असलेल्या कामगार वर्गात एकदम शांतता पसरली. सगळेजण चकित होऊन दोघा अधिकारी मंडळीकडे पाहू लागले.


"लाडू!!!!"


रवीने जीभ चावली. त्याच्या भरकटलेल्या मनाने चुकुन डोक्यातले विचार जिव्हेवर आणून सोडले आणि "बोनस" च्या ऐवजी रवी "लाडू" म्हणून बसला.


रविने स्वतःला सावरलं आणि तो चुकीची दुरुस्ती करणार तेवढ्यात वर्कशॉप मधे घंटा वाजली. सर्वांचे चेहरे उजळले. डोळे भिंतीवरच्या घड्याळाकडे गेले आणि "नास्ता आला", "ब्रेकफास्टची गाडी आली", असे म्हणत, अबाउट टर्न करून सगळेच लगबगीने निघून गेले.


"ब्रेकफास्ट ची गाडी आली की ब्रह्मदेवही या लोकांना थांबवू शकत नाही. अगदीच फज्जा झाला." मान हलवत जोशी म्हणाला आणि मोठ्या ढांगा टाकत वर्कशॉप मधल्या त्याच्या केबीन कडे निघुन गेला.


जोशीच्या एकंदर अविर्भावावरून त्याची नाराजी रवीला स्पष्ट दिसत होती. खरोखर सगळाच फज्जा झाला होता. कामगारांना बोनस मिळेल म्हणून सांगण्याऐवजी मनात सकाळपासून भिरभिरणारे विचार तोंडावाटे बाहेर आले होते. जोशी रागावला होता. या घोटाळ्याची बातमी वर पर्यंत गेली तर कदाचित कायमची सुट्टी मिळणे ही शक्य होतं.


अत्यंत खजील अवस्थेत पाय ओढत रवी ऑफिसकडे चालू लागला. लंच ब्रेक पर्यंतचा वेळ रुटिन कामं करण्यात रवीने काढला. जोशी तिकडे वर्कशॉप मधेच असावा. जेवणही त्याने बहुतेक तिथेच घेतलं. इकडे ऑफिसमध्ये आपल्या टेबलवरच रवी जेवला आणि स्कुटर घेऊन पटकन बालाजी स्वीटस् ची ट्रिप केली. स्वातीने बजावून सांगितल्याप्रमाणे मोतीचूर लाडवाच्या सर्व स्पेसिफिकेशनस् रवीने बालाजी च्या मनावर बिंबवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला आणि काम झाल्यावर तो ऑफिसमध्ये परत आला.


संध्याकाळी जरा लवकरच रवी ऑफिसमधुन बाहेर पडला. निघण्यापुर्वी प्लँट मॅनेजर भिसे साहेबांना रवी भेटला. उद्या घरी सत्यनारायणाची पूजा ठरवली असल्यामुळे पूजा झाल्यावर लंच ब्रेक नंतर ऑफिस ला येण्याची सवलत मिळावी अशी रवीने साहेबांना विनंति केली. भिसे साहेब स्वतः धार्मिक प्रवृत्ती चे गृहस्थ होते, त्यामुळे आनंदाने त्यानी रवीला तशी सवलत दिली.


दुसरा दिवस उजाडला. रवीच्या घरी पूजेचे गुरुजी सकाळी आठ वाजता हजर झाले. बालाजी स्वीट कडून स्वातीला हवे तसे मोतीचूराचे लाडू आले. पूजा व्यवस्थित पार पडली. नैवेद्य, आरती वगैरे झाल्यावर गुरुजींबरोबरच जेवून रवी बाहेर पडला आणि स्कूटरवर टांग मारून ऑफिसला निघाला. फॅक्टरी च्या गेटवर वाॅचमनने सलाम ठोकून लगबगीने गेट उघडुन दिलं. रवीला हायसं वाटलं.


रवीने स्कुटर स्टँडला लावली. हेल्मेट काढलं आणि खांद्यावर बॅग टाकून चालू लागणार तेवढ्यात तो थबकला. फॅक्टरीच्या बाजूने ठोकाठोकीचे, घासण्या कापण्याचे आवाज येत होतेच पण त्याबरोबरच सिनेमातल्या किंवा टीव्ही मधल्या सारखे एका सुरात कोणी कोरस गीत गात असल्यासारखाही आवाज येत होता. रवीला फारच आश्चर्य वाटलं. असा आवाज वर्कशॉप मधून कधीच आलेला नव्हता. रवीने हेल्मेट आणि बॅग तिथेच टाकले आणि काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी जवळ जवळ धावतच तो वर्कशॉपच्या प्रवेश दालनाशी पोहोचला.


रवीने आता डोकावून पाहिलं. मशीनस् बनवण्याचा प्रत्येक विभागातला कार्यभाग व्यवस्थित चालू होता, जरा जास्तच वेगाने चालू होता; आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काम करताना एक सुरात सर्व जण गात होते,


हाथ जल्दी चलायेंगे,

जोशी साब लड्डू देगे.


थोड्या वेळाने दुसरं गाणं सुरू झालं,


मशीन बनवा रे, बनवा रे

लाडू बक्षीस घेऊ रे, घेऊ रे


हा प्रकार रवीला नवीनच होता. काल घेतलेल्या मीटिंग नंतर प्रकरण चिघळलंय की काही चांगली गोष्ट झालेली आहे हे त्याला कळेना. ऑफिसमध्ये जास्त उलगडा होईल म्हणून रवी तिथून परत फिरला, स्टँड पाशी येऊन हेल्मेट आणि बॅग उचलले आणि झराझर पावलं टाकत तो ऑफिसजवळ पोहोचला. जोशीचा मोठ्या मोठ्याने बोलण्याचा आवाज रवीला बाहेरही ऐकू येत होता. जराशा साशंक मनानेच रवी ऑफिसमध्ये शिरला. जोशीने रवीला पाहिलं आणि धावतच तो रवीजवळ आला.


रवीचे दोन्ही हातांनी खांदे पकडून हसत हसत जोशी रवीला म्हणाला, "आलास रवी ? कमाल केलीस गड्या. अगदी भन्नाट आयडिया. आऊट ऑफ बाॅक्स थिंकिंग म्हणतात ते हेच. अरे जादू केली तुझ्या लाडू देण्याच्या चॅलेंजने. अरे सगळ्या कामगारांनी अगदी मनावर घेऊन काम केलं आज, अगदी ब्रेकफास्ट टाईम मधे पण. कँटीन बाॅयने प्रत्येक विभागात चहा- नास्ता काढून ठेवला आणि मग पाळी पाळीने कामगारांनी जाऊन घेतला. मशीन बनवण्याचं काम फारसा व्यत्यय न येता चालूच राहिलं."


जोशी बोलत होता आणि रवी आश्चर्याने डोळे विस्फारून ऐकत होता.


"बरं का रवी", जोशी पुढे सांगत होता. "आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आजचं मशीनस् चं उत्पादन किती माहिती आहे का ? एरवी सहाच्या वर व्हायचं नाही, पण आज आत्ता पर्यंत दहा मशिन तर टेस्ट वगैरे होऊन पूर्ण झालीच आहेत आणि शिवाय आणखी दोन अॅसेम्ब्ली लाईनवर आहेत. संध्याकाळ पर्यंत तीही पूर्ण तयार होतील. एकुण बारा मशिन आज तयार होतील. बारा. विक्रमी उत्पादन".


जोशीने उड्या मारायचंच तेव्हढं बाकी ठेवलं होतं.  


"फारच छान!" रवी उद्गारला.


"आता कबूल केल्या प्रमाणे उद्या सगळ्यांना लाडू वाटायला पाहिजेत." जोशी म्हणाला. "मी सांगितलंय आपल्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजरला, उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत इथे पोचते व्हायला हवेत पाचशे लाडू. करतो काहीतरी, म्हणाला तो."


रवी आपल्या टेबलावर जाऊन विचार करू लागला. त्याने आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासात लाडूप्रयोग कोठेही उल्लेखलेला नव्हता. धाक दपटशा, बोनस रुपाने पैशाची लालूच, सगळं सगळं पुस्तकात होतं. पण लाडू प्रयोग ! नो.


जोशी म्हणतो तसं हे आऊट ऑफ बाॅक्स म्हणजे भन्नाट कल्पनेचं यश आहे.


काम करून लाडू मिळवण्याची कल्पना कामगारवर्गाला आवडली होती. पुढे युनियनने मॅनेजमेंटशी बोलणी करून लाडूंबरोबर रोख बोनस रक्कम ही सामावून घेतली. कामगार खुष आणि वाढीव उत्पादनामुळे कंपनीची मॅनेजमेंटही खुष.


जोशीच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली. त्याचबरोबर या यशोगाथे मागील भन्नाट कल्पनेचा जनक म्हणून रवीचाही हेड ऑफिस पर्यंत बराच बोलबाला झाला.


या एका प्रसंगातून रवी खूपच शिकला. नंतरच्या काही महिन्यांत पुस्तकी ज्ञान वापरण्याऐवजी वरकरणी टाकाऊ, कुचकामी वाटणाऱ्या भन्नाट कल्पना राबवून अगदी जुने जुने महिनेन महिने भिजत पडलेले वादग्रस्त प्रश्न रवीने यशस्वी रीतीने सोडवले, अगदी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे.


रवीला बढती मिळाली.

रवीची मुंबईला हेड ऑफिसमध्ये बदली झाली.


रवी चा रविराज झाला.

प्राॅब्लेम साॅल्व्हिंग सेमिनार, सिनियर मॅनेजर लोकांसाठी वर्कशॉप, वगैरे घेऊ लागला.


"रविराज, दी इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु" च्या यशस्वी करियरची सुरुवात ही अशी झाली.


----x----


Rate this content
Log in