साक्षात्कार
साक्षात्कार


"केसोळी गाव, बरंका, अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. पुढे पठार आणि नंतर खोल दरी. तिथेच पुढे हा धबधबा आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे अगदी. आपल्या हायकिंग ट्रिपला झकास." साठे उत्साहाने बोलत होता.
दिवसभर सतत कामाचा पाठपुरावा करत असलेल्या मेन्टेनन्स मॅनेजरना लंच ब्रेकमधेच तेव्हढा एकत्र बसून गप्पा टप्पा मारायचा चान्स मिळत असे. पण गेला महिनाभर कंपनीत वार्षिक ओवरहाॅल चालू होतं. कामाच्या रामरगाड्यात गळ्यापर्यंत गुंतलेलं असताना गप्पा टप्पा तर राहोच पण कधी कधी लंचसाठी ब्रेक घेणंही या मॅनेजर मंडळीना दुरापास्त व्हायचं. आत्ता कुठे त्या चक्रातून जरा सुटका झाली होती. श्वास घ्यायला फुरसत मिळाली होती. आणि त्यामुळेच जेव्हा साठेने हायकिंग ट्रिपला जाण्याचा विषय काढला तेव्हा या सळसळणाऱ्या रक्ताच्या सर्वच मंडळींनी कान टवकारले होते.
"अरे पण या केसोळीला जायचं कसं ?" संजीव पत्कीने विचारलं.
"आसनगावपर्यंत लोकलनी जायचं. दीड तासाचा प्रवास आहे. मग पुढे डोंगरातल्या पायवाटेने रमतगमत जायचं. तासाभरात पोहोचू केसोळीला." साठे सांगू लागला. "जेऊया तिथे. पोटभर निसर्ग दर्शनाचा आनंद लुटुया आणि अंधार पडायच्या आत डोंगर उतरूया. सातला गाडी आहे आसनगाव वरून ".
"साठे, अगदी पूर्ण अभ्यास केलेला दिसतोय". संजीव म्हणाला.
"अरे माझा ड्रायव्हर रामचंद्र तिकडच्याच कुठल्यातरी गावातला आहे. त्यानेच माहिती पुरवली सगळी." साठेने कबुली दिली.
"पण,अरे, म्हणजे अगदीच थोडा वेळ असणार आपण तिथे." मोहन राव उद्गारला, "इतकं निसर्गरम्य ठिकाण असेल, तर एखादा दिवस राहू या की तिथे".
" छे, छे. रहाण्या बिहिण्याचा विचार नका आणू मनात," साठेने खोडून काढलं. "तिथे काहीच सोय नाही ".
एक साठे सोडला तर ग्रुप मधल्या इतर मंडळींची ग्रामीण जीवनाशी तोंडओळख यथा तथाच होती. पूर्ण जन्म मेट्रो सिटी मधे काढलेल्या या मंडळींची, ग्रामीण भाग म्हणजे भरपूर सृष्टी सौंदर्य, शुद्ध हवा आणि 'अवे फ्राॅम इट ऑल' एवढीच सोईस्कर कल्पना होती.
"तिथे जास्त वेळ काढणं शक्य नसेल तर निदान खूपसे चांगले चांगले फोटो तरी काढू या." संजीवने सूचना केली. " कॅमेरा बरोबर घ्या चांगला. मोबाइलची फोटो कला अपुरी पडते बऱ्याच बाबतीत. "
संजीवची सूचना सगळ्यानाच पटली.
नंतरच्या दोन चार दिवसात लंच ब्रेक मधे हायकिंग ट्रिप बद्दल आणखी चर्चा झाली. निष्णात इंजिनियर मंडळीनी आपापल्या परीने डीटेलिंग केलं. रविवार तारीख पंधरा चा दिवस नक्की ठरला. कोणी काय आणायचं याची वाटणी झाली. बरेच दिवस कपाटाच्या खाली किंवा एका कोपऱ्यात सारून दिलेले हायकिंग शूज, काठ्या बाहेर आले. बॅक पॅकस् वरची धूळ झटकली गेली. डोंगर चढण्याचा स्टॅमिना आजमावण्यासाठी काही जणांनी सकाळी जाॅगिंग आणि व्यायाम सुरु केले. सगळ्याच टीम मेम्बरस् ना तयारी परफेक्ट व्हायला हवी असं वाटत होतं, नव्हे ती एक ईर्षाच होती.
"कॅमेरॅचं जमलं का?" संजीवने पुन्हा आठवण करून दिली.
सगळेच जण एकमेकांची तोंडं बघायला लागले. सेल फोन फोटोग्राफीच्या दिवसात कॅमेरा ही संस्था पूर्ण अस्तंगत जणू झाली होती.
"अरे साठे, मागच्याच महिन्यात युनिट ओवरहालिंगचं रेकाॅर्ड ठेवण्यासाठी तुम्ही मेकॅनिकल वाल्यांनी नवा कॅमेरा घेतलाय नं?" मोहन रावने आठवण करून दिली.
"हो, घेतलाय. पण त्याचा काय इथे संबंध ?" साठेचं तिरसट प्रत्युत्तर.
"अरे मेकॅनिकलचा विभाग प्रमुख म्हणून तुझ्याच नावावर इश्श्यू केला असणार. एका रविवारचाच प्रश्न आहे. सोमवारी परत आणणार आहोत आपण" . मोहन रावचा युक्तिवाद.
दिलीप साठेला ही कल्पना तेवढी पसंत नव्हती. "अरे सत्तेचाळीस हजाराचा एसेलार कॅमेरा आहे तो. काही झालं तर भरपाई करावी लागेल".
पण शेवटी सर्वाग्रहाला मान देऊन कॅमेरा सोबत घेतला गेला होता आणि मंडळी हायकिंग ला निघाली होती.
सह्याद्रीचाच एक भाग असलेल्या नरसोबाच्या डोंगराने आपलं वेगळेपण राखून ठेवलं होतं. निसर्गाने सौंदर्याची अफाट देणगी त्या परिसराला दिली होती. शहरीकरणाचे वायू त्या दुर्गम कोपऱ्यात अजुन पोहोचले असोत वा नसोत, स्थानिक लोकांना कशाचंच काही वैषम्य वाटलेलं दिसत नव्हतं.
थोड्या कुतुहलाने पण दुरूनच हाताचा कवडसा करून एक नजर फिरवण्याव्यतिरिक्त या शहरी वाटसरूंकडे कोणी फारसं लक्ष दिलं नव्हतं, कोणी अनाहूत विचारपूस करायला आलं नव्हतं, ना कुणी अन्नाची किंवा कशाचीही भीक मागायला हात पसरला होता. तुम्ही बरे, आम्ही बरे,अशी विचारसरणी वाटली.
आणि त्या दूरच्या कोपऱ्यातही अख्ख्या देशाला एकत्र जोडणारा, मन अचंबित करून सोडणारा एक दुवा आपल्या शहरी पाहुण्यांना सापडला होता. नरसोबाच्या डोंगराच्या पठाराच्या मध्यभागी, नयनमनोहर धबधब्यापासून एका हाकेच्या अंतरावर, झाडाच्या वाकड्या तिकड्या तीन काटक्या जमिनीत खुपसून सात आठ पोरं तन्मयतेने क्रिकेटचा खेळ खेळत होती. म्हटलं तर क्रिकेट, म्हटलं तर बॅट-बाॅल. दोन्ही एकमेकांचे सख्खे कजिन ब्रदर
"विटि दांडू पासून क्रिकेट कडे उत्क्रांती झालेली दिसते". जरा छद्मीपणे किंवा एका त्रयस्थ पातळीवरून मोहन रावने उद्गार काढले.
"कसली रे उत्क्रांती? पोरं आहेत की वानरं, हे ही कळत नाही." संजीव पत्कीचा चेष्टेचा सूर.
"असंस्कृत समाजाला सुसंस्कृतीचं ठिगळ". संदीप जावडेकरने आणखी तारे तोडले.
खेळणाऱ्या मुलांना मात्र बॅट बाॅल आणि काटक्या रूपी स्टम्प्स याव्यतिरिक्तं कुठेही लक्ष द्यायला वेळ नव्हता.
पाहुण्यांना समोरच एक प्रशस्त वृक्ष दिसत होता. तिथे गर्द सावलीत मुक्काम ठोकायला सर्वांचीच मूक संमती पुरेशी होती.
"काय दाट सावली आहे या झाडाची !" मोहन रावने उद्गार काढले
"औदुंबर वृक्ष आहे हा. साक्षात्कार होतात याच्याखाली बसलं तर". साठेने माहिती पुरवली. सगळेच मनमोकळेपणे हसले.
जेवणानंतरची विश्रांती आटोपून इकडेतिकडे पहात, रमतगमत, काठ्या आपटत, बुटानी खडे लाथाडत मंडळी पुढे पठाराच्या कडेपर्यंत पोहोचली, आणि एका बेसावध क्षणी साठेचा पाय घसरला. पार तोल गेला. भक्कम आधाराच्या शोधात साठेचे हात हवेत उडाले. पाण्याची बाटली, बॅग पॅक, कॅमेरा सगळ्या गोष्टी चार दिशांना उधळल्या गेल्या. साठेने जमिनीवर जोरात बसकण मारली आणि त्या उतारावर आणि ओलसर गवतावर घसपटत साठे पाच सेकंदांच्या आत, पठाराच्या अगदी कडेवर येऊन पोहोचला.
काही घटना अशा निमिषार्धात घडतात की त्यांच्या आवेगावर कुठल्याही प्रकारे लगाम घालणं शक्य होत नाही. आरडाओरडा करत, उतारावर घसपटत चाललेल्या साठेकडे सगळेचजण जागेवरच खिळून, स्तंभित होऊन पहात राहिले. तेवढ्यात कसाबसा एका झाडाचा आधार घेऊन साठेने आपली घसरंपट्टी थांबवली खरी, पण पुढे जाऊन त्याच्यापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याची कोणाचीही हिम्मत होईना. काय करावे ते सुचेना.
आणि पुढच्याच एका मिनिटात क्रिकेट खेळणारी वानरसेना तिथे हजर झाली. साठेच्या उघड्या पडलेल्या बॅक पॅक मधुन डोकावणारा दोर एकाने काढून आपल्या कंबरेला बांधला. दोराचे दुसरे टोक मुलांनी साठेकडे फेकले, आणि मग पुढच्या पाचच मिनीटात सावकाशपणे ओढत साठेला सुखरूप ठिकाणी आणून बसवले.
सगळ्यांच्याच जिवात जीव आला. इतस्तत: पसरलेल्या वस्तू सर्वांनी जेमतेम बॅगांमधे भरल्या. साठेला वाॅटरबॅग मधुन पाणी ओतून प्यायला दिलं आणि त्याला कुठे गंभीर जखम झाली नसल्याची खात्री करून घेतली. मदत करणारी मुलं आता थोडी लांब सरकली आणि पाहुण्यांना आणखी काही मदत लागेल का याचा अंदाज घेऊ लागली. साठे जरासा लंगडत होता. त्याला संभाळत खाली जायला जास्त वेळ लागणार हे उघड होतं. त्यामुळे तिथे वेळ घालवण्यात काही अर्थच नव्हता. गडबडीने पाहुणे मंडळींनी बॅगा गळ्यात अडकवल्या आणि निसर्गरम्य दृश्यांकडे पाठ फिरवून सावध पणे डोंगर उतरायला सुरुवात केली.
गाडीत बसल्यावर सगळ्यानीच हुश्श्य केलं आणि आपापल्या परीने, जमेल त्या पद्धतीने, देवाचे आभार मानले. साठेही जरा सावरला होता. त्याच्या तोंडून शब्द फुटायला लागले होते. कसलीशी आठवण होऊन साठेने आपली बॅक पॅक जवळ ओढली आणि प्रथम एका हाताने आणि नंतर दोन्ही हात आत घालून तो बॅगेचे सगळे खण चाचपून बघायला लागला. सर्वचजण साठेकडे पहात होते. साठे काय शोधतोय ते सगळ्यांच्याच ध्यानात यायला लागलं होतं. लवकरच साठेची शंका खरी ठरली. बॅगेतले हात बाहेर काढून हताशपणे साठे म्हणाला, "कॅमेरा दिसत नाही माझ्या बॅगेत. कुणाच्या बॅगेत आलाय का पहा जरा !"
सर्वांनी आपापल्या बॅगा चाचपल्या. कॅमेरा कोणाच्याच बॅगेत नव्हता. सुखरूप परत चालल्याच्या आनंदाला परत विरजण पडलं.
घरी पोचल्यावर, रात्री, विलक्षण थकव्यामुळे दिलीप साठे गाढ झोपला खरा, पण दुसऱ्या दिवशी डोळे उघडल्यापासूनच कॅमेऱ्याची आठवण त्याला सतावायला लागली.
अंग थोडं ठेचाळल्यासारखं झालं होतं पण जास्त दुखत नव्हतं. चहा, आंघोळ आटोपून साठे ऑफिसला जायला तयार झाला. ड्रायव्हर रामचंद्र आला. गाडी काढली. आज रोजच्यापेक्षा तब्बल दहा मिनिटे उशीर झाला होता. गाडी हायवेला लागल्यावर रामचंद्रने चौकशी केली, "साहेब कशी झाली ट्रिप तुमची ?"
"बरी झाली ". त्रोटक उत्तर. विषय तिथेच संपला.
लंच टेबलवर आल्यावर कुजबुजत साठेनं विचारलं, "काय रे, मी पडलो तेव्हा कॅमेरा दरीत फेकला गेला असेल का ?"
"शक्यच नाही. दरी जराशी लांबच होती. " संजीव पत्की लगेच म्हणाला.
"मला वाटतं, हातातून उडुन तिथल्याच गवतात कॅमरा पडला असणार". मोहन रावचा तर्क.
"तसं असेल तर दोन शक्यता आहेत." साठेने चर्चेचे समालोचन केले. "एक तर तिथे गवतात अजूनही पडला असेल किंवा त्या बॅट बाॅल खेळणाऱ्या पोरांपैकी कुणी हडपला असेल."
समालोचन तर्कशुद्ध असल्यामुळे सर्वांनीच माना डोलावल्या.
"तिकडे कोणालातरी काॅन्टॅक्ट केल्या शिवाय खरं काय ते कळणार नाही." मोहनचं म्हणणं.
"अरॆ पण कसं आणि कोणाला काॅन्टॅक्ट करणार ?" संजीवने मुद्दा काढला. "त्या खेळणाऱ्या मुलांनी आपल्याला मदत केली पण आपण त्यांची नावंही विचारली नाहीत की धड आभारही मानले नाहीत. "
"सत्तेचाळीस हजारांचा फटका बसतोय नं त्यामुळे". साठे विव्हळला.
लंच ब्रेक संपला आणि मंडळी आपापल्या कामाला गेली.
संध्याकाळी घरी जाताना, ट्रॅफिक मुळे गाडी अगदी सावकाश चालली होती. रामचंद्र ड्रायव्हर गप्पांच्या मूडमध्ये होता.
"साहेब, आमचा मुलुख आवडला की नाही आपल्याला? केसोळीच्या दोन कोस पुढे आहे आमचं पिरंगुळं गाव. तिथपर्यंत नसाल गेलात आपण". रामचंद्र आदबशीरपणे विचारत होता.
साठेच्या मनात आशा पालवली. "केसोळीला कोणाची ओळख आहे का रे रामचंद्र?"
"आता कुठली हो कुणाची ओळख? खूप वर्षं झाली मला गाव सोडल्याला. त्या वेळी आमची टीम चँपियन होती. " रामचंद्र सांगत होता. " क्रिकेटचं फार वेड तिथं सगळ्याना. केसोळी, पिरंगुळं आणि चाकोती, तिन्ही गावात अटीतटीच्या क्रिकेट मॅच व्हायच्या आणि चँपियन टीम नुसता दंगा धुडगुस घालायची. फार धमाल उडवायचे आम्ही ".
रामचंद्र जुन्या आठवणींनी रंगात आला होता,पण साठेला त्यात फारसं स्वारस्य नव्हतं. बॅट बाॅल खेळणाऱ्या त्या चमूला टीम म्हणण्याची कल्पनाही साठेला वेडगळपणाची वाटत होती.
दिलीप साठे घरी आला. हात पाय धुतले आणि विषण्णपणे बसला. कपातला चहा निवून गेला. बिस्कीटांचा तुकडाही मोडला गेला नाही. एकूण प्रकरणाचा सुखांतिकेत शेवट होण्याचं कुठलंही चिह्न साठेला दिसेना. हरवलेल्या कॅमेऱ्याची भरपाई तर करून द्यायलाच लागणार होती, आणि तीही काही बोभाटा होण्याच्या आत, अगदी पंधरा दिवसात.
कसे उभे करायचे सत्तेचाळीस हजार ! फ्लॅट साठी बिल्डर ला देण्याच्या सव्वा लाखाच्या मासिक हप्त्याची तरदूत तर झाली होती. त्यातलेच तूर्त काढावेत, की बॅन्केच्या फ्लेक्सी अकाऊंट मधून ओव्हर ड्राॅ करावे, की कार्ड पेमेंट करून आजचे मरण उद्यावर ढकलावे ? काही निर्णय होईना.
जेवतानाही मनात तेच विचार. भात भाजी चिवडली, थोडी खाल्ली. रेखाच्या काही प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, काहीना तिरसटपणे उत्तरं दिली. अशी अस्वस्थ संध्याकाळ कशीबशी पार पडली. रात्र तळमळतच गेली. सगळीकडूनच कोंडमारा.
दुसऱ्या दिवशी लंच टाईम मधे पुन: अनौपचारिक बैठक भरली. साठेला कशाहीप्रकारे मदत करण्याची सर्वांचीच तयारी होती, पण योग्य दिशा सापडत नव्हती.
संजीव पत्कीने घसा खाकरला. "मला वाटतं, त्या बॅट बाॅल खेळणाऱ्या मुलांपैकीच कोणाकडे तरी कॅमेरा असणार. आपल्याला तो मुलगा शोधुन काढावा लागेल आणि मग काहीतरी बारगेन निगोशिएट करायला लागेल."
"स्पष्ट सांग जरा, संजीव" . साठे म्हणाला.
"असं पहा", संजीव स्पष्ट करून सांगू लागला. "आपल्याला त्या मुलांना धाक दपटशा देऊन तर काही उपयोग नाही. मधाचं बोटंच लावावं लागेल. त्याना पटवून द्यायचं, की कॅमेरा ही काही रोजच्या उपयोगातली गोष्ट नाही. त्याचबरोबर त्याना एखाद्या चांगल्या उपयोगी गोष्टीची लालुच दाखवायची. जास्त महागड्या नाही, साधारण किमतीच्या. अशी एक विन विन सिच्युएशन तयार करायची की त्यानी आपली ऑफर स्वीकारायलाच पाहिजे. " संजीवचं मॅनेजमेंट सोल्यूशन.
एक दोन मिनिटं विचार केल्यावर सगळ्यानाच वाटलं, की हाच एक रामबाण उपाय होऊ शकेल.
मग चर्चा सुरु झाली. परवडणाऱ्या किंमतीत कोणत्या उपयुक्त गोष्टी येऊ शकतील, याची.
मोहन रावने लगेच सुचवले, "पाचशे जीबी चा लेटेस्ट पेन ड्राईव्ह पाहिला मी परवा. आठशे सत्तर किंमत आहे. त्याचबरोबर एक ऑफ-लाईन बॅटरी -चार्जरही इन्क्लूडेड आहे. सर्व मिळून हजार पर्यंत जाईल."
संजीव पत्की म्हणाला "आठशे वीसला एक लेटेस्ट ज्यूसर मिक्सर पाहिला मी. सायट्रस फ्रुट ची पण अॅटॅचमेंट आहे त्याला. "
साठेला आठवलं, "लाइफस्टाईल मधे एक छत्तीस पीसेस चा कटलरी सेट आणि सहा मेलामिन प्लेट्स असं काॅम्बिनेशन पाहिलं मी नउशे सत्तावीस ला. गुड बारगेन."
चर्चा चालली होती. प्राॅब्लेमच्या गाडीला, चार सशक्त हात त्यांच्या परीने, सोल्युशनच्या दिशेने ढकलत होते.
चर्चेतून अगदी काही ठोक निष्पत्ती त्यावेळी तरी होऊ शकली नाही. पण आपण योग्य दिशेनं पावलं टाकतोय या विचारानेच अर्धं दडपण उतरलं.
संध्याकाळी संजीव पत्की आणि साठे एकत्र घरी परतत होते. रामचंद्र गाडी चालवत होता.
संजीव म्हणत होता, "दिलीप, आपण असं करू. या रविवारी आपण केसोळीला जाऊ. आणि जसं दुपारी ठरवलं होतं, त्याप्रमाणे आपल्या बरोबर एक कटलरी काॅम्बो, एक ज्यूसर, एक नवा पेन ड्राईव्ह आणि चार्जर सेट अशा दोन चार वस्तू घेऊन जाऊ. एक हजार पर्यंत बजेट ठेवायचं. सत्तेचाळीस हजाराचा कॅमेरा सोडवून घ्यायचाय. आणि हो, परतीच्या बोलीने आणू सगळ्या गोष्टी. फाॅरेन सारखं इथेही चालतं हल्ली, आठवड्याच्या आत परत करू. "
साधक बाधक चर्चा झाली. संजीवचं घर आलं. संजीव उतरून गेला.
"साहेब रविवारी परत केसोळीला जाणार का तुम्ही?" रामचंद्राने चाचपडले. "काही हरवलंय का मागच्या ट्रिपमधे ?"
मनाच्या त्या विमनस्क अवस्थेत साठेने रामचंद्राला त्रोटकपणे आपला प्राॅब्लेम सांगितला. "आलं लक्षात ," अशा अर्थाची रामचंद्राने मान डोलावली.
साठेचं घर आलं. खाली उतरून रामचंद्राने नेहमीप्रमाणे गाडीचा दरवाजा उघडला. रामचंद्राने अदबीने साठेला विचारलं, "साहेब रविवारी मी येऊ तुमच्या बरोबर केसोळीला ? कित्येक वर्षांत गावाकडे गेलो नाही मी, आणि साहेब काही सामान वगैरे उचलायचं असेल तर मदत करीन ना मी."
"ठीक आहे". साठेने मोघमपणे उत्तर दिलं.
रविवार आला आणि परत एकदा हायकिंग क्लबचे मेम्बर आणि रामचंद्र ड्रायव्हर, भल्या सकाळी केसोळीला निघाले.
आता काय, वाट पायाखालची झाली होती आणि त्यामुळे चालण्यात, बोलण्यात आणि एकंदर प्रवासात सरावाचा सहजपणा आला होता. तरीसुद्धा डोंगर चढून केसोळीला पोहोचेपर्यंत शहरी मंडळींची चांगलीच दमछाक झाली होती.
रामचंद्राचं गावरान पाणी त्यातल्या त्यात वेगळं दिसतच होतं. आणखी दोन चारदा डोंगर चढायचा दम असल्याइतपत फ्रेश तो दिसत होता.
केसोळी गाव जवळ आलं. ओळखीचा औदुंबर वृक्ष समोर दिसू लागला. औदुंबराच्या छायेत सर्वांनी बसकण मारली, सामानाच्या पिशव्या, बॅक पॅक खाली ठेवले आणि सगळेच जण घटा घटा पाणी प्यायले. जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, तसंच, ज्यूसर, मेलामिन डिशेस असं बरंचसं वजन वर पर्यंत वाहून आणलं गेलं होतं. सकाळची तुटपुंजी न्याहरी केव्हाच भूतकाळाचा भाग झाली होती. सगळ्यांच्याच पोटातले कावळे मोठ्याने ओरडून शरिराच्या थकव्याची ग्वाही देत होते.
दिलीप साठेने विचारांना वाचा फोडली. "इथपर्यंत आलो तर खरे, पण पुढचा अॅक्शन प्लॅन काय ? खेळणाऱ्या मुलांशी निगोशिएट करायच॔य , पण इथे तर कोणीच दिसतात नाही. . मुलं काय, माणसं काय, एखादं कुत्रंसुध्दा आसमंतात दिसत नाही. "
"साहेब तुम्ही विश्रांती घ्या जरा. जेवण पण करून घ्या, मी बघतो जरा गावात". असे म्हणून, आपली पिशवी उचलून रामचंद्र समोर दूरवर दिसणाऱ्या कौलारु घरांच्या दिशेने चालू लागला.
डबे उघडले गेले. भाज्या, उसळी बरोबरच सांबाराचा मसालेदार वास आणि साजुक तुपातल्या शिऱ्याचा वास, एकात एक मिसळून हातात हात अडकवून औदुंबराच्या झाडाभोवती फेर मारू लागले. मांडी ठोकून सगळी मंडळी बसली आणि पुढच्या अर्ध्या- पाऊण तासात, फक्त भुरके मारून जेवण्याचा आवाज तिथल्या नीरव शांततेचा भंग करत होता.
तोंडाला लावलेली पाण्याची बाटली संजीव ने खाली ठेवली. तोंड नॅपकिनला पुसत संजीव म्हणाला, "चला आपणही गावाकडे जाऊ या का? जरा दोन चार ठिकाणी विचारावं लागेल, पण काहीतरी सुगावा लागेल."
"सगळेचजण एकत्र राहूया. चोरांची रिअक्शन काय होईल ते सांगता येत नाही. " मोहन रावने सूचना केली.
सगळेच जण चरकले. गावकऱ्यांबरोबरची बोलणी हाणामारी पर्यंत जाऊ शकतील ही कल्पना मोहनच्या सूचनेतून डोकावत होती. उचललेल्या पिशव्या, बॅगा परत खाली ठेवल्या गेल्या.
पाण्याच्या बाटल्या काढून परत मंडळी ढसाढसा पाणी प्यायली.
"अरे, तो बघा रामचंद्र येतोय". साठेने गावाकडे बोट दाखवलं.
"हातात काळं काय आहे त्याच्या ? " संजीव डोळे बारीक करून निरखून पहात होता.
अर्ध्या पाव मिनीटात रामचंद्र जवळ आला.
"साहेब हा घ्या तुमचा कॅमेरा. बरोबर आहे नं" ? रामचंद्राने साठेसाहेबांच्या हातात कॅमेरा ठेवला.
"काय, कॅमेरा मिळाला? कुठे होता ? कोणाकडे होता ? कसा मिळाला तुला ? " रामचंद्रावर प्रश्नांना भडिमार झाला. या भडिमाराने रामचंद्र गांगरल्यासारखा झाला.
साठेने कॅमेरा हातात घेतला, वरून खालुन पारखून पाहिला आणि आपलाच असल्याची खात्री करून घेतली.
"रामचंद्र, जेऊन घे आधी ". साठे म्हणाला.
"जेवलो साहेब गावातच. इथला सरपंच माझ्या जुन्या ओळखीचा निघाला. मी गेलो तर जेवायला बसत होता. मलाही मग हात धरून जेवायला बसवलं". रामचंद्रने सांगितलं.
"आणि हा कॅमेरा ! तो कुठे मिळाला तुला ?" साठे ने विचारले.
"अहो साहेब, ज्या पोरानं तुम्हाला वर ओढून काढलं नं, त्यालाच तुमचा कॅमेरा सापडला होता. त्याने त्याच्या कॅप्टनकडे दिला. तुमचं नाव, पत्ता काहीच माहिती नव्हतं. ते तरी तुम्हाला कुठे शोधणार ? तुम्ही परत याल तेव्हा देऊ म्हणून ठेवून दिला. तुम्ही मला जे काही सांगितलं त्यावरून मला अंदाज आला होता की असंच काहीतरी झालं असेल म्हणून." रामचंद्र सांगत होता.
रामचंद्राने बाटली उघडून पाण्याचा एक घोट घेतला आणि तो पुढे सांगू लागला. "सरपंचाकडे बसलो, थोडं खाऊन हात धुतल्यासरशी कॅप्टनला बोलावलं तिथंच. दोन मिनिटांत आणून दिला कॅमेरा त्यानं". रामचंद्रने समग्र माहिती पुरवली.
"पण असाच दिला कॅमेरा त्यानं ? काही मागितलं नाही त्याच्या बदल्यात ?" संजीवने विचारलं.
"अहो साहेब, कसलं बदल्यात घेऊन बसलात ? योग्य माणसाला त्याची वस्तू परत मिळाली याचाच आनंद झालाय त्याना. आणि साहेब तुमच्याकडून, आभार मानायला म्हणून, मी त्या पोराला आणि टीमच्या कॅप्टनला सचिनचे दोन मोठे पोस्टर्स दिले, भिंतीवर लावायला. असे खूष झालेत सगळे, साहेब, तुमच्यावर ! तिकडे बघा, अख्खी टीम उभी आहे गावाच्या बाहेर. संकोच वाटतोय त्याना जवळ यायला". रामचंद्र सांगत होता.
गावाच्या दिशेला सगळ्यानी नजर फिरवली, आणि खरोखरच, रामचंद्र सांगत होता त्याप्रमाणे अर्ध्या चड्डीतली, फाटके, मळके शर्ट घातलेली आठ दहा मुलं रांगेत उभी होती आणि पाहुण्यांकडे पाहात जोरजोराने हात हलवत होती.
पाहुणे मंडळी मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिली.
एकंदर परिस्थिती नीट समजून घेण्यातली आपली असमर्थता, परिस्थिती हाताळण्यातला असंमजसपणा, साध्या ग्रामस्थांना राक्षसांचे बेगडी मुखवटे लावण्याचा खोटा अट्टाहास, या कशाचाच जे दृश्य समोर दिसत होते त्याच्याशी मेळ बसेना. औदुंबराच्या छायेत हा एक नवाच साक्षात्कार शहरी पाहुण्यांना होत होता.
"साहेब, तेवढे चाळीस रूपये द्याल ना, दोन पोस्टरचे". रामचंद्र हळुच साठेला सुचवत होता.
----X----