Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Dipali Writes

Drama Crime Others


4  

Dipali Writes

Drama Crime Others


अघटित

अघटित

4 mins 501 4 mins 501

अजय आज खूपच घाईत होता. एक खूप महत्वाची केस सोडवण्याच्या अगदी जवळ आला होता तो. अतिशय हुशार गुप्तहेर होता अजय. पण ही केस काही केल्या तो अजून सोडवू शकला नव्हता. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कुणीतरी ड्रग्स पुरवत असल्याची त्याला माहिती मिळाली होती आणि त्या ड्रग्स पुरवणाऱ्या माणसाला शोधून काढण्याची कामगिरी पोलीस खात्याने अजयकडे सोपविली होती. आज परत एकदा एका विद्यार्थ्याला तो माणूस एका विद्यार्थ्याला भेटणार असल्याची खबर त्याला मिळाली होती. त्यामुळेच तिथे लवकर पोचण्याची घाई झाली होती त्याला. तो पटापट आवरून घराबाहेर पडणार तोच संयुक्ता, त्याची १४ वर्षांची मुलगी धावत त्याच्याकडे येत म्हणाली,

“डॅडा, मला काही पैसे हवे आहेत. पालाडीयम मॉलला मस्त सेल लागला आहे. मला खूप शॉपिंग करायची आहे. प्लीज, दे ना लवकर पैसे.”


संयुक्ता देखील खूपच घाईत होती. अजयने लगेच तिला पैसे दिले. संयुक्ता खूष होऊन नाचतच तिच्या खोलीत निघून गेली आणि अजय घराबाहेर पडला. त्याला खबर मिळाली होती तसा तो बरोब्बर ३:०० वाजता त्या पत्त्यावर जाऊन पोहोचला आणि दूर एका कोपऱ्यात जाऊन गाडीतच बसून सगळीकडे बघत होता. त्याला फार वाट बघावी लागली नाही. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर त्याला तो कॉलेजमधील विद्यार्थी दिसला. अजयने लगेच त्याच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला. 


तो विद्यार्थी एका विशिष्ट दिशेने बघत होता. तेवढ्यात त्याच दिशेने एक हिरवं जॅकेट आणि निळी जीन्स घातलेला एक माणूस त्याच्याकडे चालत आला. अजय जिथे थांबला होता तिथून तो माणूस पाठमोरा दिसत होता त्यामुळे त्या माणसाचं चेहरा कॅमेरामध्ये आला नाही. अजयने लगेच गाडी सुरु केली आणि त्या विद्यार्थ्याच्या दिशेने जाऊ लागला. पण अतिशय जलद गतीने त्या विद्यार्थ्याच्या हातात एक पाकीट ठेवून तो माणूस लगेच पसार झाला. अजयने लगेच त्याचा पाठलाग सुरु केला. तिथे खूप गर्दी असल्याने अजयला गाडीतून त्या माणसाचा पाठलाग करता येईना. त्यामुळे त्या माणसावर लक्ष ठेवत त्याने एका जागी गाडी उभी केली. पोलिसांना फोन करून तो त्या माणसाच्या मागावर असल्याची माहिती दिली. पण तेवढ्यात तो माणूस त्याच्या नजरेआड झाला. अजय धावतच तो माणूस गेला त्या दिशेने गेला आणि इकडे तिकडे बघत त्याला शोधू लागला. पण तो माणूस त्याला काही दिसेना. 


अजय त्याच दिशेने चालत,मधेच धावत त्या माणसाला शोधू लागला. धावत धावत तो पालाडीयम मॉलपाशी आला. अतिशय हताश होऊन तो त्या मॉलच्या पायऱ्यांवरच बसला. एव्हाना ३:३० वाजले होते. आजही त्याच्या हातून तो माणूस निसटल्याने त्याला अतिशय राग येत होता. तो उठून जाणार तेवढ्यात त्याच्या मागून एक माणूस पायऱ्या उतरून जाऊ लागला. तेच हिरवं जॅकेट आणि निळी जीन्स! 

‘सापडला! आता कुठे जातोस ते बघतोच..लाल टोपी घातली म्हणून मी ओळखणार नाही असे वाटले काय तुला !’ 


असं म्हणत अजय परत त्या माणसाच्या मागे मागे जाऊ लागला. त्याने लगेच पोलिसांना फोन करून लोकेशन कळवलं. तो माणूस आता अगदी निवांतपणे चालत होता. जणू काही त्याने काही केलेच नाही आणि त्याला कुणी पाहिलेच नाही. तो एका गल्लीमध्ये शिरला. पाचच मिनिटांत पोलीस तिथे पोचले आणि त्यांनी त्या माणसाला त्याच गल्लीत पकडले. त्या माणसाला काही कळेचना. तो अतिशय गोंधळलेला दिसत होता.

‘इतक्या चांगल्या घरातली दिसणारी माणसं इतकं वाईट काम कसं काय करू शकतात!’ 


पोलिसांनी त्याला पकडताच अजय तसाच मागच्या पावली तिथून निघाला. फोनवर पोलिसांशी बोलत बोलत तो गाडीकडे जाऊ लागला. 

तो माणूस काही केल्या त्याचा गुन्हा मान्य करत नव्हता. तो पूर्ण दिवस मॉलमध्येच असल्याचं सांगत होता. पण अजय अतिशय आत्मविश्वासाने पोलिसांना हाच तो असल्याचे सांगत होता. का? कुणास ठाऊक? पण या माणसाचा गयावया करणारा चेहरा अजयच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. 

‘करावं कशाला असलं काम!’

अजय स्वतःशीच पुटपुटत केस सॉल्व केल्याच्या आनंदात घरी पोचला. संयुक्ता नुकतीच घरी पोचली होती आणि अतिशय आनंदात होती. 

“डॅडाssssss...गेस कर आज काय झालं..!!”

अजयला काही कळेना..पण संयुक्ताचा आनंद बघून त्याची उत्सुकता फारच वाढली. 

“अगं सांग ना लवकर .. काय झालं ?”

अजयदेखील तिच्या आनंदात सामील होत म्हणाला. 

“आज पालाडीयमला रणवीर कपूर आला होता...माझा फेव्हरेट हिरो….”

संयुक्ता आनंदाने किंचाळत होती. 

“हे बघ मी त्याचा व्हिडीओ काढला आहे.”


ती अजयचा हात धरून सोफ्यावर बसली आणि उत्साहात त्याला तिच्या मोबाईलवर व्हिडीओ दाखवू लागली. अजयदेखील खूप उत्साहात व्हिडीओ बघू लागला. आणि बघता बघता त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. डोळे विस्फारले गेले. संयुक्ताचा आवाज त्याला ऐकू येईनासा झाला. 

“एक मिनिट, एक मिनिट...मागे कर व्हिडीओ..”

“काय झालं डॅडा? असा घाबरल्यासारखा का दिसतो आहेस?”

“काही नाही..मोबाईल दे मला दोन मिनिट..”


संयुक्तपणे गोंधळलेल्या चेहऱ्याने अजयच्या हातात तिचा मोबाईल दिला. अजय सोफ्यावरून उठला. मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत बघत दाराच्या दिशेने चालू लागला. एका ठिकाणी त्याने व्हिडिओ थांबवला आणि परत एकदा त्याचे डोळे मोठे झाले. रणवीर कपूरच्या मागेच त्याने मघाशी पकडून दिलेला माणूस उभा होता. मॉलच्या घड्याळात ३ वाजून ५ मिनिटे झाल्याचं दिसत होतं. अगदी सारखे कपडे असल्याने अजयचा गोंधळ झाला होता आणि त्याने एका निर्दोष माणसाला पकडून दिले होते.


Rate this content
Log in

More marathi story from Dipali Writes

Similar marathi story from Drama