Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Dipali Tare

Fantasy Thriller


4  

Dipali Tare

Fantasy Thriller


अकल्पित

अकल्पित

7 mins 226 7 mins 226

पहाटेच्या छान, किंचित गार वाऱ्याच्या झुळकेने अर्चनाच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तिला जरा ताजंतवानं वाटू लागलं. आदल्या रात्री तिची झोप झाली नव्हती. 

रोज पहाटे सगळं आवरून तिच्या घराजवळच्या टेकडीवर फिरायची सवय होती. गावाबाहेर असलेल्या टेकड्यांजवळच ती राहत असलेली ती सोसायटी होती. तिने मुद्दामच थोडे जास्त पैसे भरून त्या टेकड्यांचा छान view दिसेल असा फ्लॅट निवडला होता. तिचा ऑनलाईन बिझनेस फारच छान सुरु असल्याने तिला हे शक्यही होतं. तिच्या नवऱ्याची समीरची साईटदेखील तिथून फार काही दूर नव्हती. अर्चनाला रात्रीचे आकाश बघायला खूप आवडायचे. म्हणूनच तिला गावाबाहेर घर हवं होतं. हे घरदेखील तिने म्हणूनच पसंत केलं होतं. पण हल्ली तिच्या सोसायटीमधून माणसं अचानक बेपत्ता होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे तिने फारसं बाहेर पडणं कमीच केलं होतं. ती घरूनच तिचं काम करत होती. समीरदेखील शक्यतोवर घरूनच काम करायचा. 

आदल्या रात्री समीर झोपल्यावर ती तिच्या दुर्बिणीतून रात्रीचं निरभ्र, ताऱ्यांनी गजबजलेलं आकाश बराच वेळ बघत बसली होती. दुसऱ्या दिवशी सुटीच असल्याने तिने रात्री उशिरापर्यंत आकाश निरीक्षण करण्याचं ठरवलं होतं. आज त्यासाठी वेळसुद्धा योग्यच होती. आज अमावस्या असल्याने चंद्राच्या प्रकाशाचा अडसर नसणार होता. तिला तिच्या ताऱ्यांशी मनसोक्त गप्पा मारता येणार होत्या म्हणून ती खूप खूष होती. 

पण आज तिचा हा आनंद लवकरच भीतीमधे बदलणार होता याची तिला किंचितही कल्पना नव्हती. बराच वेळ खिडकीपाशी बसलेली असल्याने तिला जरा थंडी वाजू लागली. तिने सहज घड्याळात बघितले तर रात्रीचे २:३० वाजले होते. 

‘बापरे, बराच उशीर झालाय. आता झोपलंच पाहिजे.’

असं मनातल्या मनात म्हणत ती दुर्बीण उचलून ठेवणार एवढ्यात तिला दूर टेकडीवर अचानक काहीतरी चमकल्याचा भास झाला. ती चपापलीच. एवढ्या रात्री इतक्या निर्जन स्थळी कोण काय बरं करत असेल? तिथे तर दिवसादेखील फारसं कुणी जात नाही! मला भास होतो आहे का?

तिने परत दुर्बीण खिडकीपाशी उभी केली आणि त्यातून त्या दिशेने बघू लागली. आता तो प्रकाश दिसत नव्हता. नेमकं कुठे बघावं हे तिच्या लक्षात येत नव्हतं म्हणून ती साधारण अंदाज घेत होती. 

अचानक तिला तिथल्या एका झुडुपामागे थोडी हालचाल झाल्यासारखी वाटली म्हणून तिने तिथे दुर्बीण झूम केली. तिला तिथे जे काही दिसलं ते बघून तिचे डोळे विस्फारले गेले. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती बघत होती तिथे तिला एका सुटकेसच्या उंचीची एक तबकडी दिसत होती. त्या तबकडीच्या मध्यभागी एक उंच अँटेना होता आणि त्यावर एक लाल रंगाचा गोळा होता. ते काय आहे ते तिला कळेपर्यंत त्या तबकडीच्या मागून एक फूटभर उंचीची एक मानवसदृश आकृती चालत पुढे आली. 

अर्चनाला खूप आश्चर्य वाटलं. ती भान हरपून त्या आकृतीकडे बघत होती. त्या आकृतीच्या चालण्यात एक विचित्रच लय होती. मघाशी अर्चनाला वाजणारी थंडी कुठल्या कुठे पळून गेली. उलट आता तिला भीतीने घाम येऊ लागला होता. धावत जाऊन समीरला उठवावेसे खूप वाटले तिला. पण तिथून उठण्याचे तिच्या जीवावर आले होते. दुर्बिणीवर मोबाइलसारखे रेकॉर्ड करता आले असते तर किती बरे झाले असते असे तिला वाटून गेले. 

इकडे ती आकृती अतिशय जलद गतीने हालचाली करत होती. सारखं त्या तबकडीच्या मागे पुढे चालत तिचं काहीतरी सुरु होतं. बहुदा तिथली माती उकरुन आत काहीतरी ठेवत असावी. अर्चनाने दुर्बीण पूर्ण झूम केली तरीही तिला त्या आकृतीचा चेहरा काही नीट दिसत नव्हता. पण ती आकृती नेमकी कशी आहे याचा तिला अंदाज नक्कीच आला होता. त्या आकृतीचं शरीर फिकट निळ्या रंगाचं होतं आणि त्यातून अगदी मंद असा निळसर प्रकाश बाहेर पडत होता. स्वयंप्रकाशित असल्यासारखा. हळूहळू अर्चनाला ती आक्रुुती स्पष्ट दिसू लागली. त्या  आकृतीने काळे होते. त्या आकृतीला कान, नाक, ओठ काहीच नव्हतं. पण डोक्यावर दोन अँटिनासारखं काहीतरी होतं.त्यातून मधूनच विजेचा प्रवाह वाहत असल्यासारखं काहीतरी दिसत होतं. अर्चना त्या आकृतीचं निरीक्षण करत असतानाच त्या आकृतीने गर्र्कन मान वळवून अर्चनाकडे रोखून पाहिलं. तशी अर्चना एकदम घाबरून मागच्या मागे पडली. नशीब, खाली जाडसर कार्पेट होतं म्हणून फार आवाज झाला नाही. नाहीतर समीरला जाग आली असती.    

अर्चनाने पट्कन स्वतःला सावरलं. तिला आपण स्वप्नात असल्यासारखं वाटू लागलं. ती प्रचंड घाबरली होती. तिच्या घशाला कोरड पडली म्हणून तिने शेजारची पाण्याची बाटली उचलून घटाघटा पाणी प्यायलं आणि परत दुर्बिणीला डोळे लावून बसली. पण आता तिला ती तबकडी किंवा ती आकृती कुठेही दिसत नव्हती. 

‘खरंच भास झाला की काय आपल्याला? कुठे गेली ती आकृती? ती तबकडी? एका क्षणात कशी दिसेनाशी झाली? किती भयंकर नजर होती ती.’

तिने थोडावेळ वाट पाहिली. थोडं आजूबाजूला देखील बघितलं पण कुठेही काहीही दिसलं नाही तिला. अचानक तिला त्या झुडुपाच्या मागे एका कोपऱ्यात त्या तबकडीवरचा लाल गोळा दिसल्यासारखा वाटला पण अंधार खूप असल्याने नीट काय ते कळलं नाही.शेवटी तिने पलंगावर जाऊन आडवं होण्याचं ठरवलं. झोप तर येणार नव्हतीच. ती पलंगावर जाऊन आडवी झाली. तिने डोळे बंद केले तरीही ती भेदक, आसुरी नजर तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हती. तिने मनाशीच ठरवलं की सकाळ होताच उठून त्या टेकडीवर जाऊन बघून यायचं. हा विचार डोक्यात आल्यावर तिला जरा बरं वाटलं. म्हणूनच सकाळ होताच ती समीरला न उठवताच घराबाहेर पडली होती.     

रात्रभर झोप न झाल्याने तिला जरा थकवा जाणवत होता पण आदल्या रात्री बघितलेली ती विचित्र घटना तिला स्वस्थ बसू देत नव्हती. 

‘ती आकृती अजून असेल का तिथे? ती तबकडी तरी? त्याचे काही ठसे तरी दिसतील का आपल्याला? आपण तिथे एकटेच जातोय. काही होणार तर नाही ना आपल्याला? आपल्याशिवाय आणखी कुणी पाहिलं असेल का त्या आकृतीला?’ 

असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते. शेवटी ती एकदाची त्या टेकडीपाशी आली. ती हळूहळू कानोसा घेत त्या टेकडीच्या माथ्यावर आली. इथून तिच्या घराची ती खिडकी दिसायची. ती त्या खिडकीकडे बघत अंदाज घेऊ लागली की तिला काल रात्री नेमकी कुठे ती तबकडी दिसली होती. पुढे पुढे चालत जात असताना तिला ते झुडूप दिसलं. आता मात्र तिला खूप भीती वाटू लागली. ती घरापासून तशी लांबच आली होती. 

‘मी समीरला सांगून यायला हवं होतं का? चुकलंच आपलं! उगाच आलो इकडे. या झुडुपामागे अजूनही ती तबकडी आणि ती आकृती असेल तर? मुर्खासारखा फोनदेखील विसरले घरीच...’

असा विचार करत असतानाच त्या झुडुपामागे सळसळ झाली. अर्चना जाम घाबरली. ती जोरात किंचाळली आणि मागे वळून पळू लागली. 

“मॅडम…?? ओ मॅडम..??”

तो आवाज ऐकून अर्चना जागच्या जागी थबकली. घाबरतच तिने मागे वळून पाहिलं. त्या झुडुपामागून एक उंच, गोरापान तरुण बाहेर आला. त्याच्या पेहरावावरून तो चांगल्या घरातला वाटत होता. पण त्याने घातलेली ती उंच लाल टोपी फारच विचित्र होती. तो अर्चनाकडेच बघत होता. अर्चना घामाने पूर्ण भिजली होती. 

“कोण तुम्ही? आणि इथे काय करताय?”

“मॅडम, अहो मी पण तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होतो.”

तो तरुण पुढे येत म्हणाला. 

“मी रोज इथे फिरायला येते. पण तुम्ही कोण? तुम्हाला आधी कधी पाहिलं नाही मी.”

“मी? मी स्वप्नील. त्या तिकडे ती सोसायटी दिसतेय ना..तिथे राहायला आलोय मागच्याच आठवड्यात.”

“ओह्ह.. मी देखील त्याच सोसायटीमध्ये राहते.”

अर्चना आता जरा सावरली होती. 

“तुम्ही पण इथे फिरायला आला होतात का?”

“ नाही..थोडं वेगळं काम होतं.”

“काम? इथे?”

“हो….”

स्वप्निलच्या चेहेऱ्यावरून तो काहीतरी लपवतोय हे अर्चनाच्या लक्षात आलं. ती त्याच्याकडे रोखून बघू लागली. तिच्या डोक्यात भयंकर विचार येऊ लागले. 

‘हाच तर लोकांना पळवत नसेल ना? कुठल्या टोळीचा सदस्य तर नसेल? बापरे..इथे याच्या टोळीची इतर माणसे असतील तर? मी निघतेच इथून. पण..पण...कालची ती आकृती..!! तिचं काय? तिचा शोध तर घ्यायलाच हवा. पण हा इथे काय करतोय? तेही कळायलाच हवं ना..’ 

“बापरे..किती विचार करता तुम्ही..!! ओके. सांगतो. पण तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही.”

“तुम्ही सांगा प्लीज.”

अर्चनाला आता धीर धरवत नव्हता. कधी हा इथून जातोय आणि मी त्या झुडुपामागे जाऊन बघतेय असं तिला वाटू लागलं. 

“सांगतो..खरं तर मी काल रात्री इथे एक तबकडी पाहिली. म्हणून सकाळ होताच इथे येऊन बघायचं ठरवलं.”

अर्चनाला खूपच आश्चर्य वाटलं. 

“तुम्ही...तुम्हाला पण दिसली ती तबकडी..??..आणि...आणि ती आकृती..??”

अर्चना बोलताना खूप अडखळली. 

“म्हणजे..?? तुम्ही पाहिली तर ती..??”

स्वप्नीलने अर्चनाच्या डोळ्यांत बघत म्हटले. 

“हो..आणि मीदेखील त्यासाठीच त्या झुडुपाकडे जात होते.”

“ओह्ह..पण मला तिथे काहीच दिसले नाही. आणि मला असं वाटतं की तुम्हीदेखील तिकडे जाऊ नका.”

“हम्म..पण मी एकदा जाऊन बघतेच. त्याशिवाय मला चैनच पडणार नाही.” 

स्वप्निलच्या उत्तराची वाट न बघताच अर्चना घाईघाईने त्या झुडुपाकडे जाऊ लागली. 

“अर्चना थांब. तिकडे जाऊ नकोस.”

अर्चना तोवर त्या झुडुपापाशी पोहोचली होती. ती अचानक थबकली. तिच्या डोळ्यांत भीती दाटून आली. तोंडातून आवाज निघेना.  तिच्यासमोर एक खूप मोठं मैदान पसरलं होतं आणि त्या मैदानात जमिनीतून वर आलेले काही लाल गोळे दिसत होते. हा असलाच लाल गोळा तिने काल रात्री त्या तबकडीवर बघितला होता. अर्चनाची भीतीने गाळण उडाली.

 ‘बापरे, हे सगळं काय आहे? इतक्या तबकड्या? कधी आल्या असतील या? काल तर एकच पाहिली आपण? म्हणजे रोज अश्या तबकड्या येताहेत कि काय? याचा अर्थ...ती आकृती पण...जितक्या तबकड्या..तितक्या आकृत्या…? ओह माय गॉड... आणि हा स्वप्नील तर इथूनच बाहेर आला...याला कसं दिसलं नाही हे सगळं? वर मलाच थांब म्हणाला..तिकडे जाऊ नको म्हणाला..एक मिनिट...याला तर मी माझं नाव सांगितलंच नव्हतं. मग याला कळलं तरी कसं?’

अतिशय घाबरून अर्चनाने मागे वळून पाहिलं तर स्वप्नील तिच्याकडे अतिशय आसुरी नजरेने तिच्याकडे बघत होता. त्याची ती नजर अर्चनाला ओळखीची वाटली. काल ती आकृती आपल्याकडे अश्याच नजरेने तर बघत होती. अर्चना मट्कन खालीच बसली. इकडे स्वप्नीलने त्याच्या डोक्यावरची ती टोपी काढली आणि अर्चनाला परत एक धक्का बसला. स्वप्निलच्या डोक्यावर तसेच दोन अँटीने होते जे तिने काल रात्री त्या आकृतीच्या डोक्यावर बघितले होते. अचानक त्यातून एक विद्युतप्रवाह प्रवाहित झाला आणि अर्चनाची शुद्ध हरपली.

इकडे समीर उठून ४ तास झाले तरी अर्चना घरी परतली नव्हती. 

‘इतका वेळ कसा लागला हिला? कधी असं करत नाही. फोनदेखील नेला नाही. कुठे गेली असेल?’

शेवटी दुपारनंतर समीर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवून आला. त्याला खूप भीती वाटत होती. अर्चना सुखरूप घरी परतेल ना? की सोसायटीतील इतर माणसांसारखंच...बापरे..नकोच ते विचार. काय करावं सुचत नसल्याने तो घरभर नुसताच फिरत होता. तोच त्याला आतल्या खोलीत खिडकीपाशी ठेवलेली ती दुर्बीण दिसली. 

‘अरेच्चा, अर्चनाने काल दुर्बीण जागेवर कशी नाही ठेवली? ती तर या दुर्बिणीला फारच जपते..मग काळ का नसेल ठेवली तिने दुर्बीण जागेवर? काय बरं बघत असेल ती?’

समीर त्या दुर्बिणीतून बघू लागला. दुर्बीण ज्या दिशेला होती तिथे त्याला एक झुडूप दिसलं बाकी तर काहीच नव्हतं. त्याने एक सुस्कारा सोडला आणि ती दुर्बीण जागेवर ठेऊन दिली. दोन तीन दिवस उलटले. समीर अर्चनाच्या अचानक बेपत्ता झाल्याने खूप निराश झाला होता. पोलिसांना देखील अजून पत्ता लागला नव्हता. ती कुठे गेली.. काय झालं.. कुणालाही काहीही कळत नव्हतं. शेवटी असह्य झाल्याने समीर तसाच घराबाहेर पडला आणि थोडं बरं वाटावं म्हणून टेकडीच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात त्याला दुर्बिणीतून पाहिलेलं ते झुडूप आठवलं. मग तो त्या झुडुपाच्या दिशेने चालू लागला. तोच त्याला कुणीतरी हाक मारली. 

"सर?"

"कोण?" 

"मी... स्वप्नील.."

जमिनीत आणखी एक लाल गोळा वाढलेला बघून 'स्वप्नील' चे डोळे चमकू लागले. गेल्या महिन्याभरात त्याच्या तावडीत अनेक ‘माणसे’ सापडली होती. त्या माणसांच्या शरीरातील सगळं रक्त काढून घेऊन तो त्याचा मृतदेह त्या तबकडीच्या टाकून ती तबकडी जमिनीत पुरत असे. हे काम तो रात्रीच्या अंधारात अतिशय जलद गतीने करत असल्याने कुणाच्याही ते लक्षात आले नव्हते. ते मानवी रक्त वापरून त्याच्या ग्रहावरील लोकांना मानवी रूप धारण करता येणार होतं आणि ते खऱ्या माणसांच्या नकळत त्यांच्यात वावरू शकणार होते. हळूहळू सगळी मानवजात नष्ट करण्याचा त्यांचा मनसुबा होता. 

‘स्वप्नील’ त्या लाल गोळ्यांकडे बघत असतानाच त्याच्या मागून कुणीतरी येत असल्याची त्याला चाहूल लागली आणि त्याच्या त्या आसुरी नजरेतील चमक आणखीनच वाढली.Rate this content
Log in

More marathi story from Dipali Tare

Similar marathi story from Fantasy