Radhika Joshi

Crime

4  

Radhika Joshi

Crime

गन्स अँड रोझेस

गन्स अँड रोझेस

41 mins
424



प्रकरण १


सूर्यास्ताची वेळ.

मांडवी नदीच्या संथ जलाशयाला मावळतीच्या किरणांनी एक वेगळीच झिलाई चढली होती. आमची 'पॅरॅडाइज् क्रूझ' मोठ्या दिमाखात मार्गक्रमण करत होती. थोड्याच वेळात सूर्य अस्ताला गेला आणि क्रूझच्या असंख्य चमचमणाऱ्या दिव्यांनी पूर्ण आसमंत उजळून निघाला.

मी जेव्हा साधारण २५-२६ वर्षांपूर्वी माझी डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली होती तेव्हा माझा पहिला क्लायंट होता राकेश मेहरा. तेव्हा 'ऑल कार्गो' शिपिंग कंपनीत तो नुकताच कामाला लागला होता. त्याला एका स्मगलिंगच्या केसमध्ये अडकवण्यात आलं होतं. त्या केसमधून त्याची सहीसलामत सुटका केल्यानंतर तो माझ्या जवळपास प्रेमातच होता. आम्ही साधारण एकाच वयाचे असल्यामुळे अरे-तुरे करण्याएवढी आमची घट्ट मैत्री होती. अतिशय तल्लख बुद्धीच्या आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर पाच-सहा वर्षांपूर्वी तो या आलिशान क्रूझचा मालक बनला होता. तेव्हापासून तो प्रत्येक ख्रिसमसच्या वेळेस मला क्रूझवर येण्याचं आमंत्रण देत होता, अर्थातच त्याच्या खर्चाने.पण कामाच्या व्यापामुळे मला जायला जमत नव्हतं. या वेळेस मात्र त्याने माझ्या असिस्टंटशी,वरुणशी संधान साधून, दोघांनी पाच दिवसांचा प्लॅन ठरवून, आवश्यक ती सगळी बुकिंग्ज् करून मगच मला सांगितलं.खरंतर मलाही थोडा चेंज हवाच होता, त्यामुळे मी आढेवेढे घेतले नाहीत.

मी मूळचा कोकणातला, श्रीवर्धनचा. त्यामुळे समुद्राशी माझं लहानपणापासूनच सख्य. नंतर शिक्षणासाठी मुंबईला आलो, स्वतःची डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली आणि इथलाच झालो. मुंबईत असूनही बीचवर जाणं फारसं होत नाही, त्यामुळे क्रूझची कल्पना मला सुखावह वाटली.

ख्रिसमस असल्यामुळे क्रूझवर सगळीकडे इतक्या जल्लोषाचं वातावरण होतं की तुमची इच्छा असो वा नसो, ते तुम्हाला वेढून आपल्याबरोबर घेऊन जाणारंच. अश्या वातावरणात कोणी दुर्मुखलेला राहूच शकणार नाही. क्रूझवरचे बहुतेक सर्व प्रवासी डेकवर जमले होते. यंगस्टर्स खूप होते. शिवाय हनिमून कपल्सही होती. त्यामुळे हसण्या-खिदळण्याला ऊत आला होता. काहीजण जोरजोरात गाणी म्हणत होते. अर्थात त्यातला एखादाच सुरेल होता, बाकीचे सगळे गलत मेहमूद आणि करुण दाते होते. पण तो माहौलच असा होता की कदाचित मी सुद्धा माझ्या भन्नाट आवाजात गायला सुरुवात केली असती. एकूण काय तर नेहमीचे इनव्हेस्टीगेशनचे रुटीन सोडून या जल्लोषाचा मी मनमुराद आनंद लुटत होतो.

एवढ्यात, "हाय वरुण! व्हॉट अ प्लेझंट सरप्राईझ!" अशी मागून हाक आली.

आमच्या बरोबरच बाकीच्यांच्याही माना आवाजाच्या दिशेने वळल्या आणि कोणीतरी रिमोटने पॉझचं बटन दाबावं, तसे सगळे स्पेलबाऊंड झाले. स्वर्गीय सौंदर्य यापेक्षा तिचं वर्णन करायला दुसरे शब्द माझ्याकडे नव्हते. तिच्या बरोबर जो होता, कदाचित तिचा नवरा असावा, तो सुद्धा तिच्या तोडीस तोड होता. त्याची उंची, फिजिक आणि चेहऱ्याचे कट्स एखाद्या ग्रीक पुतळ्याप्रमाणे होते.

तिला बघताच वरुणनेही तिला प्रतिसाद दिला, "हाय रोमा!" एव्हाना दोघेही आमच्या जवळ येऊन पोहोचले होते. वरुणने तिची रीतसर ओळख करून दिली.

"ही रोमा सरदेसाई. सुप्रसिद्ध बिझनेसमॅन महेश सरदेसाई यांची एकुलती एक कन्या, आणि हा मिहिर.

मध्येच त्याचं वाक्य तोडत रोमा माझ्याकडे निर्देश करून म्हणाली, "आणि हे 'द फेमस डिटेक्टिव्ह' गौतम अभ्यंकर!" तिच्या या काहीश्या नाटकी आविर्भावांचं मला हसू आलं. ती पुढे म्हणाली, "सर, तुम्हाला कोण ओळखत नाही? प्रत्यक्ष भेटीचा योग आज आला."

मी तिला म्हणालो, "माझ्या भेटीचा योग शक्यतो कोणाला येऊ नये अशीच माझी इच्छा असते."

या बोलण्यावर ती मोत्यांची उधळण करत अशी काही हसली की क्षणभर मलासुद्धा तिच्या नवऱ्याचा हेवा वाटला.

ती पुढे बोलायला लागली, "मी आणि वरुण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे क्लासमेट्स. नंतर मी बाबांच्या इच्छेखातर एम.बी.ए. करण्यासाठी लंडनला गेले. तिथून आल्यावर थोड्याच दिवसात माझे बाबा गेले आणि आमच्या टेक्स्टाईल मिल्सचा सगळा अवाढव्य पसारा मला बघावा लागला. माझे सख्खे धाकटे काका आहेत माझ्या मदतीला. पण बाबांच्या विलनुसार सगळ्याची ओनर मीच असल्यामुळे मला लक्ष घालावं लागत आहे. गेल्याच आठवड्यात आम्ही दोघे विवाहबद्ध झालो आणि माझ्या कामात मला मिहिरची साथ आता मिळत आहे. इथे आम्ही हनिमूनसाठी आलोय," हे सांगताना तिच्या डोळ्यात मला स्वतःच्या भावी आयुष्याची रंगीबेरंगी स्वप्नं फुललेली दिसत होती. मनपसंत जोडीदार, अमाप पैसा आणि आत्ताचं क्रूझवरचं जोशपूर्ण वातावरण. दोघांचे चेहरे आनंदाने आणि उत्साहाने डवरलेले दिसले नसते तरच नवल होतं.

आणि एकाएकी रोमाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. एखाद्या पुतळ्यासारखी ती जमिनीला खिळून उभी राहिली. तिच्या नजरेच्या रोखाने आम्ही पाहिलं आणि मिहिरचीही रोमासारखीच अवस्था झाली. पण लगेच भानावर येत त्याने रोमाचा दंड धरला आणि तिला जवळजवळ ओढतच तिथून घेऊन गेला. मी वरुणकडे पाहिलं तर आश्चर्य म्हणजे त्याचा चेहरासुद्धा गंभीर झाला होता. जिच्यामुळे सगळ्यांची ही अवस्था झाली होती ती तरुणी आमच्याजवळ आली आणि वरुणचे हात हातात घेऊन एकदम ओरडली, "हॅलो, वरुण! किती वर्षांनी भेेेटतोय आपण! आहेस कुठे तू? वरुणने तिला उसनं हसून प्रत्युत्तर दिलं आणि माझी तिच्याशी ओळख करून दिली. पण माझ्या ओळखीत तिला फारसं स्वारस्य दिसलं नाही. ती वरुणशीच गप्पा मारत राहिली.

तिचं नाव होतं इरा, आणि तीसुद्धा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सची वरुणची क्लासमेट होती. इराही दिसायला अतिशय देखणी होती पण रोमाच्या सौंदर्याचा मापदंड लावला तर मात्र तिच्या तुलनेत फिकीच वाटत होती.

ती थोड्याच वेळात आमचा निरोप घेऊन निघून गेली.

मी वरुणला गंमतीत म्हणालो, "वरुण, आज तुझ्या सगळ्या जुन्या सुंदर सुंदर मैत्रिणी भेटायचा योग दिसतोय. मजा आहे बुवा तुझी."

पण वरुण मात्र गंभीरपणे म्हणाला, "सर, इराचं क्रूझवर येणं हा मला चांगला संकेत वाटत नाही."

"म्हणजे? मी नाही समजलो."

"सर, माझे सोशल मीडियावरती जे काही ग्रुप्स आहेत त्यावर मला बऱ्याच बातम्या समजत असतात. हा मिहिर इराचा एक्स-बॉयफ्रेंड. दोघेही लग्न करण्याचे बेत आखत होते. रोमा आणि इरा शाळेपासूनच्या घट्ट मैत्रिणी आणि जे.जे.लाही त्यांनी एकत्र ऍडमिशन घेतली होती. मिहिर आणि इरा एकाच कॉलनीत राहत होते. तिथेच त्यांचं सूत जमलं. मिहिरचं शिक्षण नक्की किती याची मला कल्पना नाही, पण त्याच्या नोकरीचं बस्तान बसत नव्हतं. म्हणून इराने रोमाकडे त्याच्या नोकरीसाठी शब्द टाकला. इराला मदत करण्याच्या हेतूने रोमाने मिहिरची त्यांच्या एका मिलमध्ये सुपरवायझर म्हणून नेमणूक केली. आणि बघता बघता रोमा मिहिरच्या पर्सनॅलिटीवर भाळली. रोमाच्या तर काय कोणीही प्रेमात पडेल, त्यामुळे मिहिरसुद्धा इरावरचं आपलं प्रेम विसरला आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की रोमाने तडकाफडकी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच अमलातही आणला.

"ही रोमाची कॉलेजपासूनची सवय आहे; कुठलाही निर्णय घेतला की त्याचे प्रोज अँड कॉन्स न बघता लगेच त्यावर ॲक्शन घ्यायची. आम्ही तिला कॉलेजमध्ये 'मिस क्विक' म्हणूनही चिडवत होतो. बरेचदा या अशा सवयीचा तिला नंतर पश्चाताप व्हायचा पण तिने तिची ही सवय सोडली नाही. आता लग्नाच्या बाबतीतही तिने असाच आततायीपणा केलेला दिसतोय. शिवाय सख्खे काका सोडले तर रोमाला जवळचे नातेवाईक नाहीत. त्यामुळे कोणाची पर्वा करायचं कारणंच नव्हतं. इरा मात्र यामुळे प्रचंड संतापली. तिने दोघांवरही यथेच्छ तोंडसुख घेतलं, अकांडतांडव केलं पण उपयोग शून्य. दोघंही बधले नाहीत. एवढ्या प्रचंड संपत्तीची लावण्यवती मालकीण आपण होऊन फिदा झाल्यावर मिहीरला इराच्या प्रेमाची काय पर्वा!

कदाचित इराने काही गडबड करू नये म्हणूनही असेल, पण कुठलाही डामडौल न करता रजिस्टर लग्न त्यांनी केलं आणि म्हणूनच इराचं त्या दोघांच्या मागोमाग इथे क्रूझवर येणं मला चांगलंच खटकतंय. अगदी जिवाभावाच्या दोन व्यक्तींनी अशी फसवणूक केल्यामुळे ती नक्कीच बिथरली असणार."

"अच्छा! म्हणून मगाशी दोघांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता तर. ही तर अगदीच पिक्चरमध्ये शोभणारी सिच्युएशन झाली. खरं म्हणजे मिहिरसाठी रोमाकडे शब्द टाकताना तिने या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवायला हवी होती. मिहिरच्या पर्सनॅलिटीवर कोणीही सहज भाळू शकेल.

अर्थात रोमा आणि मिहिरकडून अक्षम्य चूक झाली आहे खरी. इराचा मात्र इथे येण्याचा उद्देश काय असावा? आपल्या अपराधाचे शल्य त्या दोघांना सतत बोचत राहण्यासाठी त्यांना मानसिक टॉर्चर करण्याचा का काही दगाफटका करण्याचा?"

"नाही सर, दगाफटका करण्याएवढी इरा क्रूर आणि निर्ढावलेली नाही.मी कॉलेजमध्ये असल्यापासून तिला ओळखतो. पापभिरु म्हणतात अशा कुटुंबातील मुलगी आहे ती. त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र तितकीशी चांगली नाही. पण इरा खूप क्रिएटिव्ह आहे. नुकताच तिला एका ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये चांगला जॉब मिळाला आहे असं तिने मगाशी मला सांगितलं. मला वाटतं, रागाच्या भरात ती असं काहीतरी वागत असेल. आपल्या वागण्यातला फोलपणा जाणवला की त्या दोघांचा नाद सोडून देईलही.पण बरोब्बर अशी इकडे आली कशी त्याचं आश्चर्य मला वाटतंय."

"वरुण,ही प्रेमभंग झालेली मंडळी काय आततायीपणा करतील आपण नाही सांगू शकत. आपल्याला जरा तिच्यावर नजर मात्र ठेवावी लागणार आहे. शक्य झालं तर मी तिच्याशी बोलेनही."

आमचं हे बोलणं चालू असतानाच वरुण एकदम ओरडला," सर, इन्सपेक्टर भोसले आले आहेत."

मी वळून पाहिलं, तर भोसले आमच्याकडे बघून हात हलवत आमच्या दिशेने हसतच येत होते.

"भोसले, तुम्ही? इन्फॉर्मल ड्रेसमध्ये मी तुम्हाला ओळखलंच नाही."

"काय करणार गौतमजी! तुम्ही सुट्टीवर गेल्यावर तिकडे मुंबईतले सगळे गुन्हेगारही आळसावलेले आहेत.काही कामच नव्हतं, म्हणून मी पण इकडे निघून आलो." खळखळून हसत मी त्यांना म्हणालो," जोक्स अपार्ट, कसली अर्जंट केस आली आहे?"

"यावेळेस पणजीच्या एका कुख्यात स्मगलरशी आपला सामना आहे. गोव्यातला माझा मित्र, इन्स्पेक्टर परेरा, तुम्हाला माहीतच आहे. त्याने काल मला फोन केला होता. पॅरॅडाईझ क्रूझवर हिऱ्यांचा सौदा करण्यासाठी तो येणार असल्याची हिंट परेराला मिळाली होती. अद्यापही त्याचं खरं नाव पोलिसांना समजू शकलेलं नाही. बेमालूम वेषांतर करण्यात त्याचा हात धरणारं कोणीही नाही. सात ते आठ भाषा तो सफाईदारपणे बोलू शकतो. त्याला ओळखण्याची एकच खूण म्हणजे त्याच्या उजव्या हाताला सहा बोटे आहेत. खरंतर माझ्या अखत्यारित ही केस येत नाही. पण तुम्ही इथेच आहात म्हटल्यावर मी परेराशी बोलून इथे येण्याचं ठरवलं."

"चला वरुण!आपली सुट्टी संपली."

मी निराशा झाल्याचा खोटा आविर्भाव करत म्हणालो आणि आम्ही सगळेच हसलो. भोसल्यांचीही राकेशने आमच्यासारखीच उत्तम बडदास्त ठेवली होती. या राजेशाही वातावरणात हवेत तरंगण्याचा फील आम्हाला येत होता. तरीही काहीतरी विपरीत घडणार असल्याचं इंट्युशन मला आता व्हायला लागलं होतं. जरा जास्तीच सतर्क बनून राहायला लागणार होतं.


प्रकरण दुसरं


दुसरा दिवस उजाडला. एकदम प्रसन्न वातावरण होतं. वार्‍याच्या मंद झुळूका अंगावर घेतच मी डेकवर उभा होतो. अजून बरेचसे प्रवासी निद्रिस्त होते त्यामुळे डेकवर फारशी गर्दी नव्हती. अचानक एका कोपऱ्यात मला रोमा बसलेली दिसली. बहुदा कसलंतरी स्केच काढत असावी. मी तिच्या जवळ गेलो.

उत्साहाने सळसळणारी, स्वप्नांचे पंख लावून विहरणारी हीच का ती कालची रोमा? असं वाटण्याएवढा बदल एका रात्रीत तिच्यात झाला होता. ती मला बघून केविलवाणं हसली. मी तिचं चित्र जवळ जाऊन बघितलं. अतिशय सुंदर निसर्गाचं रुप तिने चितारलं होतं. पण चित्रात सगळे मावळतीचे रंग होते. मला एकदम तिची दया आली. जिवलग मैत्रिणीच्या प्रियकराशी लग्न करण्याची अक्षम्य चूक तिच्या हातून नक्कीच झाली होती. पण त्याला सर्वस्वी तीच जबाबदार नव्हती.रोमाचं सौंदर्य आणि संपत्ती या दोन्ही पैकी नक्की कशाची मोहिनी मिहिरवर जास्ती पडली होती त्यालाच माहिती पण त्याने रोमाला प्रतिसाद देत इराचं प्रेम धुडकावून लावलं होतं. इराचंआत्ताच हे वागणं मात्र प्रचंड टॉर्चरिंग होतं. काहीही न बोलता नुसतं थंड नजरेने त्यांच्याकडे बघत त्या दोघांचा सतत पाठलाग करत राहणं हा एकप्रकारचा क्रूरपणा होता. मी काहीतरी हलकंफुलकं बोलून रोमाच्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. तिला पाहिल्यावर, हनिमूनला आलेल्या जोडप्याची अधीरता, स्वप्नवत अवस्था याचा कुठे मागमूसही दिसत नव्हता.

अचानक तिने बोलायला सुरुवात केली," सर आम्ही इथे येणार आहोत हे माझे काका सोडले तर कोणालाच माहिती नाही. आम्ही हनिमूनला स्विझर्लंडला चाललो आहोत असं सगळीकडे पसरवलं होतं.आमचं गोव्यात एक बिझनेस डील होणार आहे. पार्टनरशिप मध्ये अजून एक टेक्सटाईल मिल आम्ही सुरु करत आहोत. माझे काका त्यासाठी आज सकाळीच इकडे आले आहेत. माझं डीलसाठी हजर असणं खूपच गरजेचं आहे म्हणून काकांनी ही कल्पना सुचवली. हनिमूनसाठी वेगळीकडे गेल्याचं भासवून इथे क्रूझ पॅकेज घ्यायचं, बिझनेस डीलही होईल आणि इरालाही याचा पत्ता लागणार नाही असा आमचा प्लॅन होता.इराने आमच्या लग्नाच्या वेळेस जो सीन केला होता त्यावेळेस काकाही तिथे हजर होते. त्यामुळे त्यांनी सुचवलेला हा पर्याय मला आणि मिहिरला एकदम पसंत पडला. पण इराला इथे बघून मात्र आम्ही खरंच खूप हादरून गेलोय. त्यातच आम्ही जिथे जाऊ तिथे सतत तिचं सावलीसारखं बरोबर असणं! आय जस्ट कान्ट सिम्पली बेअर दॅट! तिची ती थंड नजर सतत आमचा पाठलाग करत असते.जणू सतत आमच्या चुकीची जाणीव ती आम्हाला करून देतेय असं वाटतं. विचार न करता तडकाफडकी निर्णय घेण्याच्या माझ्या या सवयीचा मला आता खरंच पश्‍चात्ताप होतो आहे. खरं तर मी मनाने अजिबात कमकुवत नाही. कायमच मी माझे निर्णय खंबीरपणे घेतलेले आहेत. पण हा मानसिक छळ मात्र माझ्या सहनशक्तीपलीकडचा आहे."

"हे बघ रोमा,इराची मनस्थिती बिघडणं स्वाभाविक नाही का? जिवलग मैत्रीण आणि प्रियकर दोघांनी विश्वासघात केल्यामुळे ती बिथरली आहे. पण ती हा असला वेडेपणा किती दिवस करणार आहे? टाईम इज द बेस्ट मेडिसिन. काही काळानंतर सगळं सुरळीत होईल. शिवाय एक गोष्ट तुझ्या लक्षात येते आहे का? तुमच्या दोघांच्या अस्वस्थतेमुळे तिचा हेतू शंभर टक्के सफल होतोय. तुम्ही जर अगदी नॉर्मल राहिलात तर तिच्या टॉर्चरिंगमधली सगळी हवाच निघून जाईल . एकदा तुमचं लग्न झालं आहे म्हटल्यावर कोणाचा अपराध, कोणाची चूक, कोण बरोबर या गोष्टींचा काथ्याकूट करण्यात काय अर्थ आहे?सो जस्ट इग्नोअर हर.

आणि खरं सांगू का? यू आर स्ट्रगलिंग टू

नॉर्मलाईज समथिंग व्हिच इज ऑलरेडी नॉर्मल. इराचा हा उद्वेग अगदी स्वाभाविक नाही का? तू तिच्या मनःस्थितीची कल्पना करून बघ ना. अर्थात ती तिचा संताप ज्या प्रकारे व्यक्त करतीये ती पद्धत सर्वथा अयोग्य आहे. मी तिच्याशीही बोलणार आहे. तिचा ह्या वागण्यामागचा विचार काय आहे हे मी पाहणार आहे. तू अजिबात काळजी करु नकोस. फक्त तुझ्या सुरक्षेच्या दृष्टीने माझ्या दोन प्रश्नांची खरीखरी उत्तरं देशील?हे विचारण्यामागचा माझा हेतू फक्त तुझी सुरक्षा एवढाच आहे.प्लिज डोन्ट माईंड. तुझ्या वडिलांच्या विलमध्ये काका आणि मिहिरचा शेअर किती?"

"सर,तुम्ही तर दोघांना एकदम व्हिलनच्या कॅटॅगरीतच टाकलंत. तरीही तुम्हाला सांगते.

माझ्या वडिलांनी ते हयात असतानाच माझ्या काकांना त्यांचा शेअर दिला होता. माझी काकू आता हयात नाही. काकांना एकच मुलगा, तेजस. त्याचा दुबईला कसल्यातरी

स्पेअरपार्ट्सचा बिझनेस आहे. खोऱ्याने पैसे मिळवतो तो. काका चांगले कोट्याधीश आहेत. शिवाय त्यांना अगदी गरज पडलीच तर ते केव्हाही हक्काने मला मदत मागू शकतात.मला स्वतःच्या मुलीसारखंच जपतात आणि कधीकधी रागावतात सुध्दा.

मिहीरबद्दल म्हणाल तर त्याचा हक्क सगळ्यावरच आहे ना.तो आता आमच्याच बिझनेसमध्ये लक्ष घालतो त्यामुळे होणारा प्रत्येक प्रॉफिट त्याचापण आहेच ना.विल मध्ये तसा कुठलाही क्लॉज नसला तरी पर्यायाने सगळंच त्याचंही आहेच.फ्रँकली स्पिकिंग,त्याला पैशाचा मोह अजिबात नाही.तो मनापासून फक्त माझ्यावर प्रेम करतो,माझ्या संपत्तीवर नाही.आत्ता सुध्दा ह्या इरा प्रकरणात तो मला इतकं जपतोय. सतत समजावतोय, माझी मनःस्थिती समजून घेतोय.पण मी माझ्या मनाला कशी समजावू?कदाचित काही दिवसांनंतर इरा आमचा नाद सोडूनही देईल.पण माझ्या मनात, जिवलग मैत्रिणीचा विश्वासघात केल्याचा जो गिल्ट आहे तो कसा काढू? त्यातून,इरा आणि मिहिरच्या प्रेमाविषयी मला कल्पना नव्हती अशातलाही भाग नाही.इराने मिहिरशी रीतसर ओळख करुन दिली नसली तरीही तिने वेळोवेळी त्यांच्या प्रेमाचे अपडेट्स मला दिलेत.पण मिहीर आमच्या फॅक्टरीत मॅनेजर म्हणून जॉईन झाल्यावर आम्ही दोघेही एकमेकांच्या कसे आणि कधी प्रेमात पडलो आम्हाला कळलंच नाही.माझ्या स्वभावानुसार त्याच्याशी धाडकन लग्न करून मी मोकळी झाले.आता मात्र मला,मी इराची अपराधी असल्याचं प्रचंड दडपण आलंय. ह्यातून काही मार्गही दिसत नाहीये.एवढं हेल्पलेस मला कधीही वाटलं नव्हतं."

"हे बघ रोमा,आता जे घडून गेलं त्यावर उलटसुलट विचार करण्यात काही अर्थ नाही.शिवाय सर्वस्वी तू ह्याला एकटी जबाबदार नाहीस.मिहिरही तुझ्या प्रेमात वहावत गेलाच ना?बाय द वे,आत्ता आहे कुठे तो?"

आज आमची बिझनेस मिटींग आहे ना नव्या पार्टनरबरोबर,त्यासाठी माझे काका पहाटेच आलेत.मिहीर त्यांच्याबरोबर त्यांच्या केबिनची व्यवस्था पाहायला गेलाय.अरे! हे काय, आलीच ती दोघं."

रोमाचे काका चांगलेच रुबाबदार होते.श्रीमंतीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. रोमाने आमची ओळख करुन दिल्यावर ते चटकन बोलले,"चला,माझी चिंता मिटली. इरा इथे आल्याचं मिहिरने मला सांगितल्यावर मी चांगलाच अस्वस्थ झालो होतो.पण तुम्ही इथे आहात म्हटल्यावर मी निर्धास्त झालो."

"मि. सरदेसाई, तुम्ही अजिबात काळजी करु नका.रोमालाही मी हेच समजावत होतो."

मिहीर मध्येच म्हणाला,"मी तर हीच रेकॉर्ड लावून लावून दमलो पण रोमाच्या चेहेऱ्यावर हसू फुटेल तर शपथ."

आत्ता रोमाचा चेहरा थोडा निवळल्यासारखा दिसला.मिहिरकडे तिने हसून बघितलं.

मिहीर तिच्याशी काहीतरी बोलणार एवढ्यात तिच्या काकांनी बिझनेस मिटिंगची आठवण करुन दिली.नव्याने होणारे पार्टनर थोड्याच वेळात येऊन पोचणार होते.रोमाला ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता हे तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट लक्षात येत होतं. पण नाईलाज होता.ती पाय ओढतंच त्या दोघांबरोबर आपल्या केबिन मध्ये गेली.मी डेकवरच थांबलो.मस्त वाऱ्याच्या झुळुकांमुळे एकदम प्रसन्न वाटत होतं.

"हॅलो सर,"

मी एकदम मागे वळून बघितलं.मागे इरा उभी होती.छान प्रफुल्लित दिसत होती.आत्ता तिच्याकडे बघताना असं अजिबात वाटत नव्हतं की ही मुलगी इतकी इरॅशनल वागत असेल.

"सर,मला माहित आहे,तुमचा माझ्याबद्दल वाईट ग्रह झालाय.पण तो ज्यांनी करुन दिलाय त्यांचं वागणं कुठल्या अँगलने समर्थनीय वाटतं?"

"इरा,तू स्वतःहून विषय काढलास म्हणून बोलतो,तू हा जो त्या दोघांचा पाठलाग आरंभला आहेस त्यात तुझा कोणताही फायदा नाही.केवळ त्या दोघांना मानसिक त्रास दिल्याचं तुला मानसिक समाधान.पण ह्याचा शेवट तुझ्या दृष्टीने चांगला नाही.

इट लीड्स यू नोव्हेअर!तुझ्यासारख्या वेल एज्युकेटेड मुलीने असं वागावं ह्याचं मला खरंच वैषम्य वाटतंय.माझा अगदी मनापासून तुला सल्ला आहे की हा वेडेपणा थांबव. वेळीच स्वतःला सावर."

सर,तुम्ही मलाच दोष देणार हे मला ठाऊकच होतं. ज्यांच्यावर पराकोटीचं प्रेम केलं अश्या दोन व्यक्तींनी मला फसवलंय. माझ्या

मनःस्थितीचा विचार कोणीच करणार नाही.मलाही कळतंय हा माझा वेडेपणा आहे, हे सगळं मिनिंगलेस आहे. कदाचित थोड्याच दिवसात मी हा पाठलाग थांबवीनसुध्दा कारण माझ्यासारखी सामान्य परिस्थितीतील मुलगी कुठवर त्यांना पुरी पडणार?पण हनिमूनसारख्या अविस्मरणीय प्रसंगाचा विचका केल्याचं समाधान मला नक्कीच आहे."

हे बोलताना उमटलेलं तिच्या चेहऱ्यावरचं विकृत हास्य चीड आणणारं होतं. तिची कुठल्याही उपायाने आत्ता समजूत पटणं शक्य नाही हे माझ्या लक्षात आलं. मी गप्प झालेला बघताच ती निघून गेली.एक प्रसन्न सकाळ मात्र झाकोळून गेली.

दिवसभर मी जरा अस्वस्थच होतो.संध्याकाळी वरुण आणि भोसल्यांबरोबर डेकवर गप्पा मारत बसलो असतानाच रोमा तिथे आली.तिच्या हातातली फाईल मला देत म्हणाली,"सर,हे आजच्या पार्टनरशिप डीडचं ऍग्रीमेंट आहे.त्याच्या प्रत्येक पानावर माझी सिग्नेचर जरुरी आहे."

ती ते मला का सांगते आहे हे मला कळलं नाही.माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती पुढे बोलायला लागली.

"सर,माझ्या वडिलांनी, मी जेव्हा आमच्या बिझनेसमध्ये लक्ष घालायला सुरवात केली तेव्हा पहिला महत्त्वाचा नियम सांगितला होता.तो म्हणजे,कुठलाही पेपर वाचल्याशिवाय त्यावर सही करायची नाही.पण आत्ता ह्या क्षणी हे ऍग्रीमेंट वाचण्याएवढी माझी मनःस्थिती चांगली नाही.आय हॅव डिफरन्ट थिंग्ज ऑन माय माईंड.खरंतर आपली फक्त दोन दिवसांची ओळख आहे तरीही का माहित नाही मला तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकावासा वाटतोय.तुम्ही जर हे ऍग्रीमेंट वाचून ओके म्हणालात तर मी न वाचताच ह्यावर सह्या करीन.दुसरं म्हणजे मिहिर आणि काकांना हे डीड मी तुम्हाला वाचायला देत आहे ह्याबद्दल बोलले नाहीये.उगाच त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल ना.प्लिज माझं एवढं काम तुम्ही कराल ना?"

मी लगेच संमती दर्शवल्यावर तिच्या चेहऱ्यावरची काळजी दूर झाली.

मी तिची आणि भोसल्यांची ओळख करुन दिली.वरुणशी थोडंसं बोलून ती तिथून गेली.

माझ्या अपेक्षेप्रमाणेच भोसल्यांच्या

चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं. मग मी आणि वरुणने त्यांना रोमाची इत्यंभूत माहिती सांगितली.

भोसले थोड्या मिश्किलपणे म्हणाले,"गौतमजी, तुम्ही केव्हापासून प्रेमाबिमाची नाजूक प्रकरणं हाताळायला लागलात?"

मी सुध्दा त्याच मूडमध्ये म्हणालो,"अशी नाजूक प्रकरणं न हाताळण्याएवढं माझं वय झालेलं नाही."

आम्ही सगळेच खळखळून हसलो.

मी पुढे म्हणालो,"का माहित नाही,पण रोमा आणि तिचा अवाढव्य बिझनेस, सक्षमपणे पेलण्याएवढा मिहीर केपेबल वाटत नाही.एक पर्सनॅलिटी सोडली तर तो अगदीच सामान्य वाटतो."

"सर,वरुण मध्येच म्हणाला,मी रोमाला पाच-सहा वर्षं तरी ओळखतोय. केवळ कोणाच्या दिसण्यावर भाळून थेट लग्न करण्याऐवढी ती पोरकट नाही.मग मिहीर बरोबर लग्न करण्याचा निर्णय तिने तडकाफडकी कसा घेतला कळतच नाही."

"हाच विचार माझ्याही मनात आला होता.तेव्हा असंही वाटलं,मिहिरनेच कदाचित अफाट संपत्तीचा मोह पडून तिला आपल्या जाळ्यात अडकवलं असेल. केवळ पैश्यांसाठी, वयाने खूप मोठा किंवा कसलंतरी व्यंग असलेला जोडीदार निवडलेल्या कितीतरी केसेस माझ्या प्रोफेशन मध्ये मी बघितल्या आहेत.इथे तर काय,वाजवीपेक्षा जास्त पैसा आणि वाजवीपेक्षा जास्ती रुपवान पत्नी मिळाल्यावर मिहिरचं नशीब फळफळणारंच.

बेट्याला स्वर्ग दोन बोटं उरला असेल."

"पण सर,इरा नेमकी इथे कशी काय टपकली असेल?रोमाच्या सांगण्यानुसार त्यांची ही ट्रिप काका सोडले तर कोणालाच माहित नव्हती."

"म्हणूनच,मला रोमाच्या काकांचा संशय आला होता.इरा त्यांना सामील तर नसेल असं मला वाटलं होतं. ती खात्री करुन घेण्यासाठी मी रोमाला त्यांचा प्रॉपर्टीमधला शेअर साधारण किती असू शकेल ते विचारलं होतं. पण रोमाच्या वडिलांनी ते स्वतः हयात असतानाच काकांना त्यांचा शेअर दिला होता.काका त्यामुळे कोट्याधीश बनले आहेत. शिवाय त्यांचा एकुलता एक मुलगा दुबईला असून त्याचाही बिझनेस फ्लरिश झालेला आहे.त्यामुळे काका अशी खेळी खेळतील असं नाही वाटत.इराशी पण मी सकाळी बोललो तेव्हा मला जाणवलं, विकृत समाधान मिळवण्याखेरीज तिचा दुसरा हेतू नसावा.तेवढी तिची झेपच नाही.तसं बघितलं तर संशयास्पद काहीच नाही तरीही मला काहीतरी खटकतंय. काय ते कळत मात्र नाहीये."

गौतमजी,खरंच काही नसेलही.तुमची सुट्टी तुम्ही, ह्या नसलेल्या केसचा विचार करण्यात का स्पॉइल करताय?"

"भोसले,तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.चला ,मस्तपैकी जेवूया आता.मला तर कडकडून भूक लागली आहे."

आम्ही तिघेही डिनरसाठी गेलो.रोमाचा आणि त्या स्मगलरचा विषय आम्ही कटाक्षाने टाळला.आमचं जेवण आणि गप्पा दोन्हीही झकास रंगल्या.त्याच चिअरफुल मूडमध्ये आम्ही आपापल्या केबीनमध्ये झोपायला गेलो.झोपण्यापूर्वी, रोमाने दिलेलं डीड मी वाचायला घेतलं. डीडचा टिपीकल फॉरमॅट होता.कुठेही आक्षेपार्ह काहीही नव्हतं.तरीही पुन्हा एकदा मी ते डीड काळजीपूर्वक वाचून काढलं.साधारण बारा-तेरा पानं होती.सातव्या पानावर आल्यावर सहज माझी नजर पान क्रमांक लिहिला होता त्यावर पडली.त्या नंबरच्या शेजारी एक बऱ्यापैकी मोठा काळा ठिपका होता.ते ऍग्रीमेंट प्रिंटआउट्सउच्या स्वरुपात होतं त्यामुळे तसा डॉट पानावर असण्याचं काही प्रयोजनच नव्हतं. शिवाय तो डॉट स्केचपेनने मुद्दामहून काढल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मी त्या पानावरचे क्लॉजेस पुन्हा पुन्हा वाचून काढले. छे!संशयास्पद काहीच जाणवलं नाही.पूर्ण ऍग्रीमेंट मी परत वाचलं. एकदम फ्लॉलेस होतं. कदाचित माझ्या व्यवसायामुळे मलाच प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहण्याची सवय लागली होती.माझी ही वृत्ती बदलायला हवी होती.पण ह्याच सवयीचा अनेक केसेसमध्ये मला उपयोग झाला होता.तो काळा ठिपका मात्र मला सतावू लागल्यावर मी ती फाईल बाजूला ठेवली आणि सरळ झोपायला गेलो.साधारण तीनच्या सुमारास माझी झोप चाळवली गेली.प्रयत्न करुनही जेव्हा परत झोपेचं चिन्ह दिसेना तेव्हा मी उठून माझ्या केबिनच्या बाहेर आलो आणि डेकवर जाऊन उभा राहिलो.

ह्यावेळेस डेकवर कोणी असण्याची शक्यता नव्हतीच.दिवसभर सतत गजबजून गेलेल्या डेकवर पूर्ण शांतता होती.उत्तररात्रीचं असं प्रशांत,आल्हाददायक वातावरण मला नेहमीच आवडतं. दिवसाच्या चोवीस तासातल्या ह्या वेळेस सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आसमंतात असते अशी माझी धारणा आहे.मुंबईला माझ्या घरी मी कधी कधी मुद्दाम अलार्म लावून ह्यावेळेस उठतो आणि बाल्कनीत जाऊन बसतो.माझ्या बऱ्याच केसेसची अडकलेली कोडी तिथे सुटल्याचा माझा अनुभव आहे.आत्तासुध्दा माझ्या शिस्तबद्ध मनाला तो काळा ठिपका खुपत होता.

खरंच त्यामध्ये संशय घेण्यासारखं काही आहे का?जर असेल तर काय आणि कुठे आहे?माझे विचार स्वैर धावत होते.एवढ्यात डेकच्या दुसऱ्या कोपऱ्यात मला चोरटी हालचाल जाणवली.तिथे बऱ्यापैकी उजेड असल्यामुळे जरा निरखून पाहिल्यावर मला रोमाचे काका कोणा तरुणाशी बोलत उभे असलेले दिसले.

त्याचं फेसिंग बरंचसं काकांसारखंच वाटत होतं. त्यांचा मुलगा,तेजस तर दुबईला होता. मग हा कोण? अश्या अवेळी दोघांचं काय खलबत चाललं होतं?

मला त्यांचं बोलणं ऐकू येणं तर शक्यच नव्हतं. तिथेच उभं राहणं पण मला प्रशस्त वाटेना.त्या दोघांचं कधीही माझ्याकडे लक्ष जाऊ शकत होतं. त्यामुळे मी दुसऱ्या बाजूने तिथून सटकलो आणि माझ्या केबिन मध्ये आलो.आता मात्र रोमाच्या काकांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला.कुठेतरी पाणी मुरत होतं. मी ऍग्रीमेंट ची कॉपी पुन्हा वाचायला सुरवात केली. छे!! कुठेही संशय घेण्यासारखं काहीही नव्हतं.सगळे क्लॉजेस बिनचूक आणि सुसूत्रपणे मांडले होते.

मी ते सात नंबरचं पान उघडलं.तो काळा ठिपका जणू मला खिजवत होता.सहज त्या पानावरुन हात फिरवत असताना एकाएकी ते पान मला बाकीच्या पानांपेक्षा जरा जाड असल्यासारखं जाणवलं.काहीतरी सापडल्याच्या उत्साहात मी बारकाईने त्याची पाहणी सुरु केली. ….आणि,येस… मला त्या पानाचा वरचा कोपरा किंचित निघाल्यासारखा वाटला. मी तिथे धरुन हलक्या हाताने ते पान ओढायला सुरुवात केली.आणि काही सेकंदातच वरचं पान निघून आलं. खालच्या पानावरचा मजकूर वाचून माझे डोळे विस्फारले.रोमाच्या सहीसाठी पानाचा खालचा भाग वगळून वरच्या भागात बेमालूमपणे दुसरं पान चिकटवलं होतं. वरच्या पानावर डीडचा नेहमीचा फॉरमॅट होता,जो वाचून रोमाने त्यावर निःशंकपणे सही केली असती आणि खालच्या पानावर रोमाच्या चुलतभावाच्या,तेजसच्या नावाने रोमाने केलेलं बक्षीसपत्र होतं. त्यावर रक्कम होती….फक्त सत्तर कोटी रुपये.

मी ते वाचून सुन्नच झालो.

एवढी अवाढव्य रक्कम रोमाला असं फसवून तिचे काका तेजसच्या नावावर कशासाठी करणार असतील?त्याचा तर दुबईमध्ये भरभराटीला आलेला बिझनेस आहे.मग त्याला एवढ्या पैश्यांची जरुरी का भासावी?म्हणजे आत्ता पाहिलेला तो तरुण तेजसच असावा.रोमाचे काका काहीतरी डाव खेळत होते हे नक्की.


प्रकरण तिसरे


ह्या सगळ्या गडबडीत सकाळचे सहा वाजून गेले होते.मी ताबडतोब जाऊन वरुणला आणि भोसल्यांना ही संपूर्ण गोष्ट सांगितली.ती दोघंही चक्रावून गेली.भोसले म्हणाले,"गौतमजी, हे काय आता नवीनच त्रांगडं? इराचा प्रॉब्लेम कमी होता म्हणून आता हा नवीन प्रॉब्लेम आलाय.बाकी,सत्तर कोटी ह्या रकमेचा उल्लेख एवढ्यात अजून कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय."

"मलाही काहीतरी वाचल्याचं अंधूक आठवतंय पण नक्की काय ते लक्षात नाही.रोमा आणि मिहिरला मनःस्ताप देण्याचा इराचा हेतू यशस्वी झाला असला तरी म्हणावा तसा तिचा न्यूसन्स झाला नाही.तिच्या काकांना कितीही पैसे मिळाले असले तरी त्यांना अजून हाव सुटणं ,ह्यातसुद्धा काही नवल नाही.

पण एवढी रक्कम स्वतःच्या नावावर न करता तेजसच्या नावावर करण्यामागे काय हेतू असावा?आज पहाटे काकांना गुपचूप भेटताना ज्याला मी पाहीलं तो तरुण तेजसच असला पाहिजे.दोघांच्या फेसिंगमध्ये पण खूप साम्य आहे.ह्याचा अर्थ तेजस सध्या दुबईत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याशिवाय का एवढया पैश्यांची गरज त्याला पडली असेल?"

"सर,तुम्ही म्हणाला होतात तशी इरा, रोमाच्या काकांना नक्कीच सामील आहे.इराला इथे बोलवून घेण्यामागे काकांचा नक्कीच डाव होता. इराला बघून बिघडलेल्या रोमाच्या मनःस्थितीचा अचूक फायदा करुन घेऊन सत्तर कोटी तेजसच्या नावावर करण्याचा त्यांचा हेतू असणार."

"देअर यू आर वरुण, एक्झॅक्टली हाच विचार माझ्या मनातही आला होता.क्रूझवर बिझनेस डील वगैरे मला पहिल्यापासून खटकत होतं. पण गर्भश्रीमंतांची एकेक फॅड्स म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण आता असं वाटतंय सत्तर कोटी हडपण्याच्या प्लॅनचा एक भाग म्हणून हनीमून स्पेशल क्रूझ ट्रिप काकांनी अरेंज केली होती. इरा, रोमा आणि मिहिरला मानसिक त्रास देण्याखेरीज दुसरं काहीच करु शकत नाही त्यामुळे कदाचित काकांच्या कटात ती आनंदाने सामील झाली असेल.अर्थात हा केवळ आपला अंदाज आहे.पण तिला ह्या ट्रिपचा सुगावा लागणं आदरवाईज शक्यच नाही.रोमाला मात्र लगेच ह्या प्रकाराची कल्पना द्यावी लागणार आहे.जरा काकांवरही नजर ठेवावी लागेल.काही भलतीच मूव्ह तर ते करत नाहीत ना ह्यावर लक्ष ठेवावंच लागेल."

रोमाला शक्यतो एकटी सोडू नकोस असं मिहिरलाही सांगावं लागेल.खरंतर ही मिहिरसाठी एकप्रकारची ऍसिड टेस्ट असणार आहे.अशा क्रूशल परिस्थितीत तो रोमाला कशाप्रकारे जपतो ह्यावर त्याच्या सक्षमतेचा अंदाज आपल्याला येईल."

"गौतमजी,तो कसाही असला तरी रोमाने आता त्याच्याबरोबर लग्न केलं आहे, म्हणजे प्रश्नच मिटला.मला तरी तो तितका तडफदार वाटला नाही."

"हं, खरंय तुमचं भोसले.रोमालाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार असं दिसतंय."

"सर,तिच्या जिवाला काही धोका नाही ना?काकांची मजल कुठपर्यंत जाईल काहीच अंदाज नाही."

"नाही वरुण, काका असं पाऊल नाही उचलणार.रोमा जोपर्यंत डॉक्युमेंटवर सही करत नाही तोपर्यंत नक्कीच सुरक्षित आहे.एकूणच तिच्या प्रॉपर्टीमध्ये ढवळाढवळ करण्याची काकांना कुठलीच ऍथॉरिटी नाही.रोमानंतर त्यांना सगळी प्रॉपर्टी मिळेल अशीही तरतूद रोमाच्या वडिलांच्या विलमध्ये नाही.त्यामुळे रोमाला आपल्या मार्गातून दूर करण्याचे विचार काकांच्या मनात येत असतील असं नाही वाटत.काहीतरी डावपेच लढवूनच ते गरज असेल तेव्हा तिच्याकडून, तिला अंधारात ठेवून पैसे उकळणार.अर्थात मी तिला आत्ता हा प्रकार सांगितल्यावर ती त्यांच्याशी जास्ती सावधगिरीने वागेलच."

आमची अशी बोलणी सुरु असतानाच क्रूझवर मात्र ,आज ट्रिपचा शेवटचा दिवस म्हणून सकाळपासूनच मनोरंजनात्मक शोज् होते त्याची गडबड सुरु होती.

पहिलाच शो ट्रम्पेटवादनाचा होता.मी कॉलेजमध्ये असताना ट्रम्पेट वाजवायला शिकलो होतो.मी होस्टेलवर रहात होतो तेव्हा माझा जो रुममेट होता त्याच्याकडे ट्रम्पेट होतं आणि तो छान वाजवायचाही.त्यानेच मला शिकवलं होतं. माझा व्यवसायात जरा जम बसल्यावर,थोडे पैसे साठल्यावर मी ट्रम्पेट विकत घेतलं होतं आणि वाजवण्यात बऱ्यापैकी प्रगती केली होती.पण माझ्याकडच्या केसेस जसजश्या वाढायला लागल्या तसतसा हा छंद पार मागे पडला.क्वचित कधीतरी मी आता ट्रम्पेट वाजवत होतो.पण त्यामुळेच आत्ताच्या शो मध्ये मला इंटरेस्ट होता.

आम्ही सगळं आवरुन डेकवर आलो.रोमा आणि मंडळी दिसत नव्हती.तिला सावध करायलाच हवं होतं. पण तात्पुरता तिचा विषय डोक्यातून बाजूला सारुन मी समोरच्या शो वर लक्ष केंद्रीत केलं. जो मुख्य वादक होता तो अफलातून वाजवत होता.सगळे बारकावे सही सही त्याच्या वादनात उतरले होते.'बॅड लायर' च्या ट्यूनने सगळा आसमंत भारुन गेला होता.मी अगदी पुढच्या रोमध्ये बसून ऐकत होतो.माझे

स्थळकाळाचे भान पार हरवून गेले होते.

ट्रम्पेटच्या वरच्या तीन पिस्टन व्हॉल्ववर त्याची तीन बोटं सफाईदारपणे हलत होती.फिंगर व्हॉल्व्हमध्ये करंगळी आणि अंगठा खालच्या बाजूला विसावला होता.

'अरे,हे काय?'मी चमकून परत एकदा बघितलं.तरीही विश्वास बसेना म्हणून पुन्हा बघितलं.

मी लगेच भोसल्यांना आणि वरुणला माझ्याबरोबर यायची खूण केली.माझी शंका मी त्यांना बोलून दाखवताच भोसल्यांच्या अंगात एकदम वीरश्री संचारली.दोन दिवस त्यांच्या रोजच्या रुटीनच्या तुलनेत अगदीच मिळमिळीत गेले होते.त्यामुळे गुन्हेगार पकडायचा म्हंटल्यावर ते एकदम खूषच झाले.

"गौतमजी,मी परेराला लगेच त्याच्या टीमला घेऊन इथे यायला सांगतो.आपल्याला खूप जलद हालचाल करावी लागणार आहे.यावेळेस तो सुटता कामा नये.तुमची मात्र कमाल आहे.एवढं मायन्यूट ऑब्झरव्हेशन!"

"थांबा,थांबा भोसले,एवढे एक्साईट होऊ नका.अजून आपल्याला खात्री नाही.परेराला मात्र लगेच इन्फॉर्म करा.वरुण, तुला सांगितलेल्या जागी पोझिशन घे.बाकी जास्ती एक्सप्लेन करायची गरजच नाही."

"यस्स सर!"

असं म्हणून वरुणही उत्साहात जायला निघाला.खरं सांगायचं तर ऍडव्हेंचर करायच्या कल्पनेने मलाही स्फुरण चढलं होतं. तीन-चार दिवस जरी राजेशाही वातावरणाचा आनंद आम्ही घेत असलो तरी आमच्या नेहमीच्या चॅलेंजिंग आणि थ्रिलिंग

रुटीनला आम्ही मिस् करत होतोच.

आम्ही शोच्या ठिकाणी पोचलो.अजूनही सुरेल वादनाचा अनुभव घेत सगळी मंडळी बसली होती.रोमा,मिहिर आणि काका आलेले होते.शेवटच्या रांगेत इरापण होती आणि एकटक ती रोमा आणि मिहिरकडेच बघत होती.

पाच-दहा मिनिटांतच परेरा आणि टीम सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन हजर झाली.तेवढ्या अवधीत मी पुन्हा खात्री करून घेतली.शंकेला जागाच नव्हती.एवढा योगायोग असेल यावर माझा विश्वास नव्हता.

सगळ्यांनी आपापल्या पोझिशन्स घेतल्या.मी पुढच्या रोमधल्या खुर्चीवर बसलो.बाकी कोणाला कसलाही संशय आला नाही.ट्रम्पेटवादक अगदी तल्लीन होऊन वाजवत होता.एकाक्षणी वाजवता वाजवता त्याने डोळे बंद केले.त्याक्षणी मी खूण केल्याबरोबर सगळे धावले.काही कळायच्या आत ट्रम्पेटवादकाला परेरांनी अरेस्ट केलं. त्याने डोळे उघडून बघताच सगळी परिस्थिती त्याच्या लक्षात आली.त्याने सुटकेसाठी निकराचा प्रयत्न केला.भोसले आणि परेरांच्या मजबूत पकडीतून तो सुटला पण वरुण तयारीतच होता.त्याने पायात पाय घालून त्याला खाली पाडलं. परेरांची माणसं लगेच धावली आणि त्याला पकडलं.

तो संतापाने नुसता धुमसत होता.हो….हाच तो कुविख्यात स्मगलर,ज्याला पकडण्यासाठी संपूर्ण देशभरातील पोलिसफोर्स जंग-जंग पछाडत होता आणि आज ह्या क्रूझवर अगदी अलगद ,त्यालाही कळायच्या आत पोलिसांच्या तावडीत सापडला होता.परेरांना हर्षवायू व्हायचा बाकी राहीला होता.ते पुन्हा-पुन्हा येऊन माझे आभार मानत होते.खरंतर त्याला पकडण्यात माझं फारसं कौशल्य मी वापरलं नव्हतं.केवळ ट्रम्पेटची रचना आणि वाजवण्याची पद्धत, मला माहीत होती.त्यामुळे ट्रम्पेट वादनात पाचही बोटं वापरली जातात हे मला ठाऊक होतं. त्या स्मगलरला सहा बोटं असल्यामुळे एक बोट रिकामंच राहिल्याचं माझ्या निदर्शनास आलं होतं. हे केवळ आणि केवळ आमचं 'लक' होतं.

दुसरी एक गोष्ट मला जाणवली होती,ती म्हणजे वाद्याचा आवाज जरा दबका येत होता.नीट ट्यून केलं नसेल तर तसं होऊ शकतं. पण त्या स्मगलरचा हेतू लक्षात घेता मी ट्रम्पेट नीट चेक करायचं ठरवलं.

मी ते हातात घेऊन बारकाईने पाहायला सुरुवात केली.हे बघताच तो स्मगलर,ज्याचं खरं नाव अजून आम्हाला समजलं नव्हतं, रागाने वेडापिसा होऊन सुटण्याची धडपड करायला लागला.ते बघून माझा संशय चांगलाच दुणावला. ….आणि,पिस्टन व्हॉल्व्हच्या तीन पोकळ्यांमध्ये रुमाल लपवलेले सापडले. मी ते अगदी काळजीपूर्वक बाहेर काढले आणि उघडून बघताच, लकाकणारे हिरे बघून बाकी सर्वांच्या तोंडून आश्चर्योदगार आणि त्या स्मगलरच्या तोंडून अर्वाच्य शिव्या बाहेर पडल्या. मी काही रत्नपारखी नसलो तरी त्या सगळ्या हिऱ्यांची किंमत कोटींच्या घरात सहजच गेली असती.परेरांनी पुढची सगळी सूत्रं भराभर हलवली.राकेशला मात्र क्रूझचा मालक या नात्याने पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर स्टेटमेंट द्यावं लागणार होतं. तो बिचारा भांबावून गेला होता.ही नुसती एक फॉर्मॅलिटी आहे असं आम्ही त्याला परत-परत सांगितल्यावर तो जायला तयार झाला.

क्रूझवरच्या बाकी लोकांचीही हे सर्व पाहून जरा तारांबळच उडली होती.असा अनुभव सहसा कोणाला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे सगळी मंडळी गप्प-गप्पच झाली होती.काही कॉलेजयुवक मात्र, एखाद्या पिक्चरमध्ये असतो तसा थ्रिलिंग सीन बघायला मिळाल्यासारखे एक्साईट झाले होते.रोमा आणि मिहीर तर खूपच इम्प्रेस झाले होते आणि माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते.खरंतर या सगळ्यात माझ्या तर्ककुशलतेचा कुठेही कस लागला नव्हता.पण हे सांगूनही त्यांना पटत नव्हतं.

रोमाच्या काकांनीही माझं अभिनंदन केलं आणि मला म्हणाले,"सर,इतके दिवस फक्त तुमच्या तर्कचातुर्याच्या गोष्टी ऐकून होतो,आज प्रत्यक्ष अनुभव घेतला.रिअली,यू आर जिनिअस!"

त्यांना बघूनच माझ्या नजरेसमोर ते डीड उभं राहिलं होतं आणि मस्तकात तिडीक गेली होती.त्यामुळे त्यांच्या स्तुतीचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही.ते पुढे म्हणाले,"एका छोट्या क्लूवरुन एवढया मोठ्या षडयंत्राचा सुगावा तुम्हाला लागला,कमाल आहे."

"हो,हे मात्र खरंय.मला छोटासा क्लू पुरतो.आता हेच बघाना,तुम्ही रचत असलेल्या षडयंत्राचा सुगावाही मला छोटया क्लूवरुनच मिळालाय."

सरदेसाई संतापून ओरडले,"काय बोलताय तुम्ही?कशाच्या संदर्भात बोलताय?हे बघा,एका प्रतिष्ठित व्यक्तीवर असे बिनबुडाचे आरोप तुम्ही करु शकत नाही."

रोमासुध्दा एकदम चकित होऊन म्हणाली,"सर,माझ्या काकांवर भलताच गंभीर आरोप तुम्ही करताय.आय ऍम सॉरी टू से,पण एवढा अधिकार तुम्हाला अजिबात नाही.कशाच्या आधारावर अशी बेजबाबदार विधानं तुम्ही करताय?"

रोमाची ही प्रतिक्रिया मला अपेक्षितच होती.काकांवरच्या तिच्या विश्वासाला निश्चितच जबरदस्त तडा जाणार होता.पण माझाही नाईलाज होता.बिचारी!तिच्या हनिमून ट्रिपचा पूर्ण विचका झाला होता.आधी हे इरा प्रकरण आणि त्यात हा दुसरा धक्का.मला तिच्याबद्दल एकदम सहानुभूती दाटून आली.मी जवळ जाऊन तिच्या केसांवर थोपटलं आणि तिला म्हणालो,"रोमा,मला ठाऊक आहे,तुझा अजिबात विश्वास बसणार नाही.पण माझ्याजवळ निश्चित असा पुरावा आहे म्हणूनच मी एवढा गंभीर आरोप केलाय."

असं म्हणून मी वरुणला खूण केल्याबरोबर तो ते डीड घेऊन आला.ते पाहिल्याबरोबर काकांच्या चेहऱ्याचा रंग उडाला.

"हे..हे डीड तुमच्याकडे कसं आलं?" ते एकदम ओरडलेच.

"मीच दिलं होतं त्यांना वाचायला.ते

डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचण्याएवढी माझी मनःस्थिती स्टेबल नव्हती आणि तुम्हाला माहितीये, मी नीट वाचल्याशिवाय कोणत्याही पेपरवर साइन करत नाही."

रोमाच्या ह्या खुलाश्यावर काका दुखावलेल्या स्वरात म्हणाले,"तुझा माझ्यावर विश्वास नाही?गौतमजी कितीही नावाजलेले डिटेक्टिव्ह असले तरीही ते आपल्यासाठी परकेच आहेत.आपलं डीड त्यांना वाचायला देणं मला नाही आवडलं रोमा."

मी त्यांच्यावर केलेल्या मगाचच्या आरोपाचा राग असा उफाळून आला होता.

मिहिरनेही रोमाच्या ह्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली.

मी मध्येच हस्तक्षेप करत काकांना म्हणालो,"मी तुमच्यावर केलेल्या आरोपाचा तुम्हाला पुरावा हवा होता ना, हे बघा,आता प्रत्यक्षच दाखवतो."

असं म्हणून मी डीडचं सातवं पान उघडलं.वरचा कागद मी साधारण चिकटवून ठेवला होता. वरच्या कागदावर जो मजकूर होता तो मी रोमाला दाखवला.ते नेहमीचे बिझनेस डीलचे क्लॉजेस होते.नंतर अलगद मी वरचा पेपर काढायला सुरुवात केली त्याबरोबर काका प्रचंड अस्वस्थ झालेले दिसले.त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकायला लागले.

मी वरचा कागद पूर्ण काढून टाकला आणि खालच्या पानावरचा मजकूर रोमाला वाचायला दिला.जसजशी रोमा तो मजकूर वाचत गेली तसतसे तिचे डोळे विस्फारले गेले.

"काका,हा काय प्रकार आहे?माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.तेजसच्या नावाने हे कसलं बक्षिसपत्र तुम्ही मला अंधारात ठेवून बनवलंय?तुम्हाला पैश्यांची गरज होती हे मला स्पष्टपणे का नाही सांगितलं?एवढी मोठी अमाउंट तुम्हाला किंवा तेजसला का हवी आहे? बोला काका काहीतरी."

रोमा चांगलीच अपसेट झाली होती.अर्थात ते स्वाभाविकच होतं. मिहिरसुध्दा अवाक होऊन काकांकडे बघत होता.

"हे बघ बेटा, मी तुला न सांगता हे बक्षीसपत्र बनवलं, हा माझा गुन्हा मला अगदी मान्य आहे.पण माझ्याकडे जेव्हा दुसरा पर्यायच उरला नाही तेव्हाच मी असा वाममार्ग निवडला.तुला मी माझी मुलगी मानतो.त्यामुळे तुझ्याशी अशी फसवेगिरी करताना मला खरंच खूप त्रास झाला. पण एवढे पैसे कशाला हवे आहेत ह्याचं स्पष्टीकरण मी नाही देऊ शकत.अगदी तुलाही नाही.तू कुठलाही पेपर काळजीपूर्वक वाचल्याशिवाय त्यावर सही करत नाहीस ही तुझी सवय मला चांगलीच माहितीये.त्यामुळे वरती दुसरा कागद चिकटवण्याची ट्रिक मी वापरली.शिवाय मला असंही वाटलं की ह्या क्रूझवर तुमची हनिमून टूर अरेंज केली की बिझनेसचे पेपर काळजीपूर्वक वाचण्याच्या मनःस्थितीत तू नसशील.डीडच्या रटाळ फॉरमॅटवर तर तू पटकन सह्या करशील म्हणून मी त्यात मध्येच माझा कागद घुसवला.त्यातून इराला अचानक इथे आलेलं बघून तू खूपच अस्वस्थ झालीस त्यामुळे तर मला वाटलं आता माझं काम अजून सोपं होईल.

"इराला इथे बोलवून घेण्याचा तुमचाच प्लॅन ना?"मी त्यांना विचारलं.

"छे, छे! अजिबातच नाही.रोमाच्या लग्नाच्या वेळेस तिने जो सीन केला होता त्यामुळे माझ्या ती लक्षात राहिली होती. आदरवाईज रोमाचं फ्रेंडसर्कल मला माहित नाही."

काका जर खरं बोलत असतील तर इरा इथे बरोब्बर कशी आली? अर्थात काकांवर आता किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच होता.

तेवढ्यात रोमा काकांना म्हणाली,"असं एवढं लपवण्यासारखं कोणतं कारण आहे?तेजसचा तर दुबईत मोठा बिझनेस आहे ना! पैसे त्याला हवेत की तुम्हाला? कितीही जेन्युईन कारण असलं तरी तुमच्यावरच्या माझ्या विश्वासाला तुम्ही तडा घालवलाय."

एकाएकी टाळ्यांचा आवाज ऐकू आल्यावर आम्ही मागे वळून पाहिलं तर इरा उभी होती.इतका वेळ आमचं तिच्याकडे लक्षच गेलं नव्हतं.

ती बोलायला लागली,"वा,वा! विश्वासाच्या गोष्टी कोण करते आहे तर जी स्वतः पराकोटीची विश्वासघातकी आहे.तुमची वाईट कर्मं

बूमरँगसारखी परत तुमच्याकडे येतातच.रोमा,काकांना काही बोलण्याआधी जरा स्वतःचं वागणं आठव. तुला मैत्रीण म्हणवून घेण्याची लाज वाटते मला."

"इनफ इरा,मध्येच मिहीर ओरडला.मगाचपासून तुझी मुक्ताफळं ऐकतोय.तुझ्यावर अन्याय झाला,मान्य आहे.आमच्या हातून घडला,तेही कबूल.पण आता ह्या गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे? रोमाला आणि मला समजायच्या आत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो."

"वा!अगदी निर्लज्जपणे कबुली देतो आहेस.तुमच्या दोघांच्या नादानपणाचं समर्थन बिलकुल करु नकोस.मीच मूर्ख! तुम्हां दोघांवर प्रचंड विश्वास टाकला.अलगद बाजूला केलंत मला.पण मी तुम्हाला सुखासुखी सोडणार नाही.सावलीसारखी तुमच्या मागावर राहून तुमचा मानसिक छळ करीन."

तोल सुटल्यासारखी इरा अद्वातद्वा बोलायला लागली.तिच्यासारख्या सुसंस्कृत मुलीच्या तोंडून अशी शिवराळ भाषा मला ऐकवेना.शेवटी मिहिरचाही संयम संपला आणि पुढे होऊन त्याने इराच्या कानशीलात भडकवली.क्षणभर ती सुन्न झाली पण हा अपमान सहन न होऊन पुढच्याच क्षणी तिने जवळच्या टेबलवरचा ग्लास उचलला आणि काही कळायच्या आत मिहिरच्या नेमक्या उजव्या हातावर जोरात मारला.त्याच्या हातातून रक्ताची धार वाहायला लागली.इतका वेळ शांत राहिलेली रोमा

घाईघाईने पुढे आली आणि इराला बाजूला ढकलून मिहिरकडे धावली.एव्हाना वरुण आणि भोसले पुढे झाले होते आणि त्यांनी इराला दोन्ही बाजूंनी पकडून तिथून बाजूला केलं. मिहिरच्या हातातून वाहणारं रक्त बघून इरा भानावर आली.आपण हे काय करुन बसलो हे बहुदा आत्ता तिच्या लक्षात आलं असावं आणि मग तिचा बांध फुटला आणि ती हमसाहमशी रडायला लागली.परेरांची दोन-तीन माणसं अजून क्रूझवर होती.भोसल्यांनी त्यांना लेडी कॉन्स्टेबलला पाठवून द्यायला सांगितलं. इरावर आता लक्ष ठेवावं लागणारच होतं. न जाणो पुन्हा व्हॉयलन्ट झाली तर! राकेशला मी डॉक्टरना बोलवून घ्यायला सांगितलं.पण मिहीर म्हणाला,"सर,त्याची काही जरुरी नाही.केबीनमध्ये फर्स्टएड किट आहे.ड्रेसिंग करतो आणि रक्त नाहीच थांबलं तर बोलवू डॉक्टरांना. मलाही ते पटलं. रोमा त्याला आधार देत तिथून घेऊन गेली.

काका बाजूच्या खुर्चीवर बधीर अवस्थेत बसले होते.ते अजून काही गडबड करतील असं वाटत नव्हतं. तरीही परेरांच्या एका माणसाला त्यांच्यावर नजर ठेवायला सांगून मी, भोसले आणि वरुण बरोबर डेकवरच रोमा आणि मिहिरसाठी थांबलो.तेवढ्यात राकेश समोरुन येताना दिसला.ह्या सगळ्या गोंधळात लंचची वेळ कधीच टळून गेली होती.म्हणून राकेश आम्हाला जेवणासाठी बोलवायला आला होता.त्याने सांगितल्यावर आम्हाला भुकेची जाणीव झाली. दहा-पंधरा मिनिटांत जेवून आलो असतो तरी चालण्यासारखं होतं. नंतर ह्या बाकीच्या मंडळींनासुध्दा जेवायला पाठवायला हवं होतं. मिहिरची जखम खूप खोल नाही ना ते बघायचं होतं. थोडक्यात काय!आत्ता पोटात काहीतरी ढकलायलाच पाहिजे,असा विचार

करुन आम्ही निघालो.अक्षरशः वीस मिनिटांत परत आलो तेव्हा मिहीर हाताला बँडेज बांधून आला होता आणि काकांपासून लांब अंतरावर असलेल्या खुर्चीवर डोळे मिटून बसून राहिला होता.आम्ही घाईघाईने त्याच्याजवळ गेलो.आमची चाहूल लागून त्याने डोळे उघडले.त्याचा चेहरा पार उतरला होता.मी पुढे होऊन त्याचा हात बघितला.बँडेजमुळे जखम दिसत नव्हती पण रक्त थांबलं होतं. त्यानेही तेच सांगितलं.मी त्याच्या पाठीवर थोपटत त्याला धीर देत म्हणालो,"मिहीर,डोन्ट वरी.सगळं ठीक होईल.सगळ्या गोष्टी अचानक समोर येऊन ठेपल्यात त्यामुळे आपण सगळेच जरा गोंधळून गेलो आहोत.इरा दोन-तीन दिवस शांत होती.आजच ती पण अचानक बिथरली. उद्या पहाटे आपण मुंबईला जायला निघू.एकदा तिकडे गेल्यावर मी रीतसर हे सगळं प्रकरण माझ्या ताब्यात घेणार आहे.तोपर्यंत काका आणि इरावर पोलीस लक्ष ठेवणार आहेत.इराला तर पोलिसांनी तिच्या केबिनमध्ये लॉक करुन ठेवलंय. बाहेर एका लेडी कॉन्स्टेबलला पहाऱ्यावर बसवलंय.तसंही तिचा मगाचचा आवेश पूर्ण खलास झालाय.उद्या निघेपर्यंत ती काही गडबड करेल असं नाही वाटत.तशी संधी तर तिला आता अजिबात नाही.तू फक्त रोमाला सांभाळ.एकापुढे एक आघात तिच्या मनावर होत आहेत.कितीही खंबीर माणूस असला, तरी तोही डगमगेल."

"खरंय तुमचं,सकाळपासून ज्या घटना घडत आहेत त्या इतक्या अनपेक्षित आहेत की सुसंगत विचार करणं मुश्कील झालंय."

एवढ्यात राकेश आमच्याजवळ आला. त्याच्या हातात औषधांच्या गोळ्या होत्या. त्या मिहिरच्या हातात देत तो म्हणाला,"माझं डॉक्टरांशी फोनवर बोलणं झालं. त्यांनी प्रिसक्राईब केलेल्या गोळ्या आहेत ह्या.आत्ता आणि रात्री जेवणानंतर घ्यायला सांगितल्या आहेत.गरज लागली तर ड्रेसिंगसाठी ते यायला तयार आहेत."

थोड्या वेळापूर्वी गोंधळून गेलेला राकेश आता पुन्हा फॉर्ममध्ये आलेला दिसत होता.

त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये,भराभर योग्य ऍक्शन घेत होता.हळूहळू सगळ्या गोष्टी नॉर्मलला येण्याच्या मार्गावर असतानाच एका अनपेक्षित एंट्रीमुळे परत आमची पळापळ सुरु झाली.

आज भल्या पहाटे काकांना गुपचूप भेटणारा तो तरुण,कदाचित तेजसच,तो अतिशय भेदरलेल्या अवस्थेत जवळजवळ पळतच काकांजवळ आला. त्याला पाहताच मी भोसल्यांना 'हाच तो' हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे वळलो तर ते एकदम उठले आणि 'वरुण'असं जोरात ओरडतच त्या तरुणाच्या दिशेने धावले. वरुणही लगेच धावला.भोसल्यांनी त्या तरुणाला पकडल्याचं पाहताच वरुणनेही त्याला दुसऱ्या बाजूने आपल्या मजबूत हातांनी पकडून ठेवलं. वरुणच्या बऱ्याच गुणांपैकी, एक वाखाणण्यासारखा गुण म्हणजे त्याला आपल्या आवाजाच्या टोनवरून कळतं की आता ताबडतोब काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे आणि तो लगेच ऍलर्ट होतो. काय,कुठे,कसं अश्या गोष्टी विचारण्यात तो वेळ वाया घालवत नाही.

भोसले आणि वरुण ह्या दोघांनी त्या तरुणाला पकडलेलं बघताच,इतका वेळ सुन्न बसून राहिलेले काका धडपडत उठले आणि त्यांच्या जवळ जात विचारायला लागले,"अरे,हा काय पोरखेळ आहे? तुम्ही तेजसला कशासाठी पकडलं आहे? जो दिसेल त्याच्यावर काहीतरी आरोप ठेवून त्याला पकडायचं तंत्र तुम्ही अवलंबलं आहे.पण मी ही मनमानी चालू देणार नाही.तेजसने कोणता गुन्हा केलाय?"

काकांचं असं अस्वस्थ होणं स्वाभाविकच होतं.

मलाही भोसल्यांच्या ह्या मूव्हचं आश्चर्य वाटत होतं. अर्थात ते चुकीचं पाऊल उचलणार नाहीत ह्याची खात्रीही होती.तो तरुण तेजसच होता हे मात्र कन्फर्म झालं.

"भोसले,हाच तो, काल रात्री काकांना गुपचूप डेकवर येऊन भेटणारा तरुण. ह्याच तेजसच्या नावाचं बक्षीसपत्र बनवलंय."

"काय म्हणता गौतमजी?हा तर, मुंबईचे 'शेठ चुनीलाल'ह्यांच्या ज्वेलरी शॉपवर पडलेल्या दरोड्यातला एक वॉन्टेड क्रिमिनल आहे.हा काही ह्याचा पहिलाच गुन्हा नाही.अनेक छोटेमोठे दरोडे,फोर्जरी,किडनॅपिंग सारख्या गुन्ह्यांमध्ये हा सामील आहे.चार जणांची ह्यांची टोळी आहे.चुनीलालच्या दुकानावरचा दरोडा मात्र आजवरची ह्या टोळीची सर्वात मोठी लूट.जवळपास सत्तर कोटींचे दागिने आणि हिरे ह्यांनी लुटले आहेत.ये..स्स! सत्तर कोटींचा उल्लेख कुठल्या संदर्भात ऐकला होता ते आत्ता आठवलं."

"हो,हो,हो,मलाही आठवलं भोसले.माय गॉड! म्हणजे हा दुबईला आहे असं सांगून मुंबईमध्येच असे गुन्हे करतोय?मि.सरदेसाई,तुम्हाला हया सगळ्याची कल्पना आहे?नक्कीच असणार म्हणा.त्याशिवाय रोमाला फसवून ते बक्षीसपत्र तुम्ही बनवलंच नसतं."

भोसले म्हणाले,"गौतमजी,गेल्या महिन्याभरात आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही त्यामुळे तुम्हाला हा चुनीलालचा किस्सा सांगायचा राहून गेला.नमुनेदार केस आहे ही.साधारण दहा-बारा दिवसांपूर्वी तेजस आणि त्याच्या गँगने जेव्हा चुनीलालच्या दुकानावर दरोडा घातला तेव्हा ते सगळा माल घेऊन पळून जात असताना दुकानाच्या गार्डबरोबर, दुकानाच्या बाहेर त्यांची झटापट झाली आणि तो जबर जखमी झाला.हे लोकं तेवढ्यात सटकले.त्यांनी ह्या दुकानाची सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केली असली तरी समोरच्या दुकानातल्या सीसीटीव्हीवर ह्या बाहेर घडलेल्या सर्व घटनेचं रेकॉर्डिंग झालंय.तेजस अश्या दरोडयांमध्ये सामील होत असला तरी आत्तापर्यंत त्यांच्या गँगने कोणाला शारिरीक दुखापत केली नव्हती.त्यामुळे यावेळेस तो हादरून गेला आणि इथेच त्याने मोठी चूक केली.आमच्याकडे येऊन स्वतःला सरेंडर करण्याऐवजी तो थेट चुनीलालला जाऊन भेटला.स्वतःच्या गुन्ह्याची त्यांच्याकडे कबुली देऊन मला या प्रकरणात अडकवू नका अशी त्यांना विनंती केली.चुनीलाल पक्का व्यापारी!खरंतर त्याच्या दुकानातल्या सगळ्या जडजवाहरांचा इन्शुअरन्स आहे.पण त्याने स्वतःचं हिशोबी डोकं चालवून तेजसकडे, चोरलेल्या दागिन्यांची किंमत म्हणून, सत्तर कोटींची मागणी केली.ह्या दरोड्यात तेजसचं नाव कुठेही येऊ न देण्याची ती किंमत होती.इन्शुअरन्स कंपनी आणि तेजस अश्या दोघांकडून पैसे मिळवण्याचा त्याचा प्लॅन होता.बरं, तेजस हे कोणाकडे बोलणं शक्यच नव्हतं.त्यामुळे दरोडा पडूनसुध्दा जबर फायदा झाला असता चुनीलालचा.गौतमजी,तुम्ही डीडचं सांगितलत त्यानुसार तेजस आणि सरदेसाईंचा,हीच रक्कम उभी करण्याचा प्लॅन ठरला असणार.तो प्लॅन क्रूझवर एक्झिक्यूट करायचं ह्यांनी ठरवलं असणार.काय! बरोबर ना मि. सरदेसाई?"

सरदेसाई म्लान आवाजात बोलले,"आता काय बोलणार मी! मुलावरच्या आंधळ्या प्रेमापायी हा गुन्हा करायला गेलो.तेजस दुबईला गेल्यावर ज्या कंपनीत जॉब करायला लागला तिथे त्याने काहीतरी फ्रॉड केला.अगदी छोटीशी अफरातफर होती आणि पहिलीच वेळ म्हणून त्या लोकांनी ह्याला चांगली समज देऊन कामावरुन काढून टाकलं.पुढे कुठेच काही जमेना म्हणून तो परत मुंबईला आला.पण ही गोष्ट मी रोमापासून लपवून ठेवली.एकतर ह्याचे प्रताप, स्वतःच कसे तिला सांगणार आणि दुसरं म्हणजे कदाचित तिच्या नजरेत, माझी क्रेडिबिलिटी मी गमावून बसेन अशी भीती मला वाटली.त्यामुळे तेजसचा दुबईत मोठा बिझनेस आहे अशीच तिची समजूत मी कायम ठेवली.तसंही तिच्यावर ही सगळीच बिझनेसची जबाबदारी येऊन पडल्यामुळे तिनेही खोलात जाऊन तेजसची चौकशी कधी केली नाही.कधीतरी व्हिडिओ कॉलवर दोघांचं बोलणं व्हायचं तेवढंच.इथे आल्यावरही तेजसचं वागणं काही सुधारलं नाही.माझ्या समजावण्याचा, रागाचा त्याच्यावर शून्य परिणाम होत होता.बऱ्याच गोष्टी तो माझ्यापर्यंत आणायचाच नाही.चुनीलालच्या केसमध्ये मात्र गळ्यापर्यंत अडकल्यावर त्याला माझी मदत मागण्याशिवाय पर्यायच नव्हता.माझे सगळे पैसे बॉण्ड्स,शेअर्स, डिपॉझिट्स यामध्ये मी गुंतवले आहेत.प्रिमॅच्युअर केले असते तर कदाचित बँकेने,मोठी रक्कम असल्यामुळे,काही ऑब्जेक्शन घेतले असते.बँकेने नसते घेतले तरी मला आमच्या चार्टर्ड अकाउंटंट्सची जी टीम आहे त्यांना एक्सप्लेनेशन द्यावं लागलंच असतं. ते मला टाळायचं होतं. रोमाने बक्षीसपत्र दिलं तर त्याचं कारण विचारण्याऐवढा अधिकार कोणालाच नाही.खरंतर हे सगळं माझ्या मनाविरुद्धच होतं पण दुसरा पर्यायच नव्हता.एकुलत्या एका मुलाला सुधारण्याची एक संधी तर मला द्यावीच लागणार होती."

"सरदेसाई!,भोसले मध्येच बोलले, मी इथे येण्याच्या दोन दिवस आधीची ह्या केसची खबरबात तुम्हाला नाही.त्या हल्ल्यात जो गार्ड जखमी झाला होता तो मरण पावला आहे.शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत."

"काय? तेजस एकदम ओरडला,ओ गॉड!"

त्याला चांगलाच धक्का बसला होता.

"ह्या घटनेची खबर कोणालाच नाही.तो गार्ड कोणी बडी असामी नसल्यामुळे मिडियाचं लक्ष जायचं कारणच नव्हतं.तसंही लोकं आता ह्या दरोड्याबद्दल विसरुन पण गेलेत.पण आता मात्र रीतसर केस स्टँड होईल.सगळी चौकशी कसून होईल.त्यामुळे सीसीटीव्हीच्या फूटेज मध्ये तेजसने हल्ला केलेला दिसत नसला तरी तो त्या गुन्ह्यात सामील होता हे स्पष्ट समजतंय.त्यामुळे आता चुनीलालला पैसे देऊन काहीच उपयोग नाही रादर,चुनीलालने ते घेतले तर, एक खून लपवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल करावा लागेल.सो,एवढा मोठा प्लॅन अमलात आणूनही तुमच्या हाती काहीही लागणार नाही."

सरदेसाई एकदम मटकन खुर्चीवर बसले.एवढी रिस्क घेऊन प्लॅन बनवला तो पूर्णपणे वाया गेला होता.

अचानक मला जाणीव झाली की ह्या सगळ्या गदारोळात रोमा कुठेच दिसली नव्हती.कुठे गेली ही असा विचार करतच मी मिहिरकडे तिची चौकशी केली.त्यावर तेजसच्या तोंडून, प्रचंड घाबरल्यासारखे काहीतरी आवाज आले.आम्ही सगळे त्याच्याकडे चमकून बघायला लागलो.काहीतरी विपरीत घडलं असल्याची जाणीव माझ्या अंतर्मनाला व्हायला लागली.मी तेजसला खोदूनखोदून विचारल्यावर कसंबसं त्याने फक्त केबीनच्या दिशेने बोट केलं. आम्ही अक्षरशः धावत रोमाच्या केबीनमध्ये पोचलो. आतलं दृष्य बघताच आमच्या पायाखालची जमीनच सरकली.वरुणने गपकन माझा हात पकडला.तो माझ्याबरोबर काम करायला लागून आता सात-आठ वर्षं होऊन गेली होती.असे प्रसंग आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले होते.तरीही ते दृष्य पाहून आम्ही नखशिखांत हादरलो.समोरच्या छोट्याश्या सोफ्यावर रोमा बसली होती…..फक्त निष्प्राण अवस्थेत. तिच्या सुंदर चेहऱ्यावर कमालीच्या अविश्वासाचे भाव होते. माझ्या पायातलं एकदम त्राणंच गेलं. जे बघतोय त्यावर विश्वास बसेना.मिहीर एकदम पुढे झेपावला आणि त्याने 'रोमा'अशी जोरदार हाक मारत रोमाच्या खांद्याला हलवताच तिचा अचेतन देह एकदम बाजूला कलंडला.तोपर्यंत सरदेसाईही धापा टाकत येऊन पोचले.आता मात्र मला स्वतःला सावरुन मिहीर आणि सरदेसाईंना सावरायला हवं होतं. जे झालं होतं ते आमच्या सगळ्यांसाठी अनाकलनीय होतं. कोणाला काही कळण्याच्या आत, होत्याचं नव्हतं होऊन गेलं होतं. मला माझ्या नेहमीच्या डिटेक्टिव्हच्या रोलमध्ये शिरुन सगळी परिस्थिती हँडल करणं भागच होतं. वरुणनेही स्वतःला लगेच सावरलं आणि तत्परतेने जाऊन मिहीर आणि सरदेसाईंसाठी सरबत घेऊन आला.आम्ही जरा जबरदस्तीनेच त्या दोघांना सरबत प्यायला लावलं.तेवढया अवधीत त्यांना पण जरा सावरायला वेळ मिळाला. दोघांचीही शोकाकुल अवस्था आम्हाला बघवत नव्हती.मी त्या दोघांच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना धीर देत त्यांच्या जवळ बसलो.

तोपर्यंत भोसल्यांनी परेराला इन्फॉर्म केलं आणि त्याच्या टीमला घेऊन इकडे यायला सांगितलं.वरुणने राकेशला सगळी कल्पना दिल्यावर तो धावतच आला.सकाळपासून इतक्या विचित्र गोष्टी घडत होत्या की तो फारच डिस्टर्ब झाला होता.शेवटी त्याच्या बिझनेसवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

परेरा आणि त्यांची टीम लगेच येऊन पोचली.पुढचे सगळे सोपस्कार जरी मुंबईला गेल्यावर करावे लागणार असले तरी रोमाचं पोस्टमॉर्टेम मात्र इथेच करुन अर्जंट रिपोर्ट मिळावा असं मी सुचवलं.म्हणजे तिच्या मृत्युचं कारण नक्की समजलं की त्या दृष्टीने तपास करणं सोपं गेलं असतं. परेरांनी भराभर सूत्र हलवली.पुढच्या काही मिनिटांतच त्यांनी रोमाची बॉडी हलवली होती. सरदेसाई आणि मिहीर सुन्न अवस्थेत वरुणबरोबर डेकवर बसले होते आणि मी केबिनमध्ये भोसल्यांबरोबर थांबलो होतो.

"गौतमजी,तेजस गुन्हेगार असेल का?तुमचा काय तर्क चालतोय?"

"नाही भोसले,मी तोच विचार करत होतो.तेजस ज्या पद्धतीने घाबरलेल्या स्थितीत डेकवर आला त्यावरुन तेव्हा त्याने रोमाची डेडबॉडी पाहिली असण्याची शक्यता जास्ती आहे.अर्थात ही गुन्हेगारांची ट्रिक आहेच,की खून करुन स्वतः पोलीसात वर्दी द्यायची.पण चुनीलालच्या केसमध्ये तो गार्ड नुसता जखमी झाला तरी तेजस परिणामाची पर्वा न करता चुनीलालला जाऊन भेटला.त्यावरुन तो खून करण्याएवढा,तेही स्वतःच्या चुलतबहिणीचा, निर्ढावलेला अजिबात वाटत नाही.शिवाय टाईम एलिमेंट अजिबात जुळत नाही.रोमा आणि मिहीर, मिहिरच्या हाताला ड्रेसिंग करायला गेले होते त्यानंतर जेव्हा मिहीर डेकवर आला तेव्हा फार-फारतर दहा मिनिटं रोमा एकटी केबिनमध्ये होती.लगेचच तेजस प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत डेकवर आला होता.रोमाच्या मृत चेहऱ्यावरचे अविश्वासाचे भाव पाहून मला वाटलं होतं की तेजसला बघून तिला प्रचंड आश्चर्य वाटलं असावं कारण तो दुबईला आहे अशी तिची समजूत होती.त्यामुळे, समोर बघतोय त्यावर विश्वास बसत नसल्यासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर होते.पण केवळ दहा मिनिटांत त्यांच्यात संभाषण होऊन, काहीतरी बोलाचाली होऊन, तेजसने तिचा खून केला असेल,ही अशक्य कोटीतील गोष्ट वाटते.सकृतदर्शनी तरी असं दिसतंय की कोणीतरी गळा आवळल्यामुळे तिचे प्राण गेलेत.आता पी.एम.रिपोर्टवरुन नक्की समजेलच.तेजस गळा आवळत असताना ती ओरडली असती,तिने काहीतरी प्रतिकार केला असता.अशी कुठलीही चिन्हं इथे दिसली नाहीत.शिवाय,दहा मिनिटांत एवढं घडणं,इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल.

माझं एक नेहमीचं तत्व आहे,कुठलाही गुन्हा घडतो,त्याचे दोन एलिमेंट्स असतात.ते म्हणजे,हेतू आणि संधी.तसंच बघितलं तर,संधी फक्त मिहिरला होती,जेव्हा ते ड्रेसिंगसाठी गेले होते तेव्हा.तो असं काहीतरी करेल ह्याची अजिबात कल्पना नसल्यामुळे रोमाने कुठलाच प्रतिकार केला नसेल.पण हेतूचं काय?रोमाचा खून करुन मिहिरला काय लाभ होणार? पैसा?तो तर त्याला तसाही मिळतोय.अमाप पैश्यांबरोबर रोमासारखी जीवनसाथी मिळालेली असताना तिचा खून करण्याचं काही प्रयोजनच नाही. फक्त पैश्यांसाठी लग्न करुन नंतर जोडीदाराचा काटा काढल्याच्या घटना आपण कितीतरी बघतो.पण ह्या केसमध्ये असं असण्याची शक्यता वाटत नाही.रोमासारखी पत्नी मिळत असेल तर सगळ्या संपत्तीवर पाणी सोडायलाही कोणीही तयार व्हावा इतकी ती अद्वितीय होती.तिच्या बरोबर तिचा अफाट पैसाही मिहिरला मिळत होता.रोमाने त्या बाबतीत पूर्ण सवलत त्याला दिली होती असं तिच्याच बोलण्यात आलं होतं. चारी बाजूंनी होणाऱ्या सुखाच्या वर्षावाखाली मिहीर गुदमरुन गेला असेल.असं असताना तिचा खून कशाला तो करेल?

सर्वात महत्वाचं म्हणजे रोमाच्या खुनाच्या काही वेळ आधीच, मिहिरच्या उजव्या हाताला मोठी जखम होऊन बरंच ब्लीडिंग झालेलं आपण सगळ्यांनीच पाहिलंय.जखम जास्ती खोल नसली तरी त्याच हातांनी लगेच एखाद्याचा गळा आवळणं अशक्य आहे.मिहीरला ड्रेसिंगसाठीही फार वेळ लागला नव्हता.हार्डली वीस-पंचवीस मिनिटांत तो पुन्हा डेकवर आला होता.जखम झालेल्या हाताने रोमाचा गळा दाबून खून करुन, स्वतःच स्वतःचं ड्रेसिंग करुन काही घडलंच नाही अश्या थाटात, इतक्या कमी वेळात पुन्हा इथे हजर होणं, मला तरी फिजिबल वाटत नाही."

"माल्कमच्या गँगपैकी कोणी असेल का?"

भोसल्यांनी शंका विचारली.

त्या स्मगलरचं खरं नाव, शेवटी आम्हाला समजलं होतं.

"शक्यता नाकारता येत नाही, पण रोमाचा खून करण्याचं त्याला काय कारण?ती जरी अफाट श्रीमंत असली तरी आत्ता तिच्याजवळ फारश्या मौल्यवान गोष्टी नव्हत्या. तिच्या सौंदर्यावर भाळून काही वाईट हेतूने तो तिच्याजवळ गेला असला तर झटापट झाल्याच्या खुणा तिथे दिसायला हव्या होत्या.त्या मिसिंग आहेत.वेळेचं गणितंही जुळत नाही. आपण जेव्हा रोमाचा मृतदेह पहिला तेव्हा ती बाहेर जाण्याच्या स्थितीत सोफ्यावर बसलेली आढळली,फक्त निष्प्राण अवस्थेत.तिचे केस सुध्दा विस्कटले नव्हते.तिच्या चेहऱ्यावर ना वेदना होती ना भीती.फक्त अशक्य कोटीतील घटना बघत असल्यासारखे अविश्वासाचे भाव होते.तिच्या गळ्यावर, जर पूर्ण ताकदीनिशी तो आवळल्याचे मार्क्स नसते तर काहीही अंदाज आपण बांधू शकलो नसतो.कदाचित खुनाची शंकाही आली नसती.

पण माझ्या नेहमीच्या अनुभवावरुन सांगतो,खुन्याने छोटासा तरी माग नक्कीच ठेवला असणार.अजून आपलं लक्ष तिकडे गेलं नाहीये."

"गौतमजी, तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या केबिनची तपासणी करा.तोपर्यंत मी तेजसची जबानी घेतो."

'ठीक आहे'अश्या अर्थाचा हात मी हलविला. भोसले केबिनच्या बाहेर गेल्यावर मी बारकाईने केबिनची पाहणी सुरु केली.नजरेतून कोणतीही गोष्ट सुटायला नको होती.

खरं सांगायचं तर मी स्वतःला खूप दूषणं देत होतो.रोमाच्या जीवाला असलेला धोका माझ्या लक्षात कसा आला नाही?अर्थात, तेव्हा तिला काही दगाफटका होईल अशी शक्यता अजिबात वाटत नसली तरी,इराचं अचानक झालेलं आगमन,काकांनी केलेला डीड मधला बदल,तेजसचा रहस्यमय वावर शिवाय माल्कमचं- त्या स्मगलरचं हिऱ्यांची देवाणघेवाण करण्यासाठी क्रूझवर येणं, ह्या सगळ्या एकत्र जुळून आलेल्या थोड्या विअर्ड गोष्टींची सांगड निदान मी तरी घालायला हवी होती.कमीतकमी रोमाच्या संरक्षणाची काळजी तरी घ्यायला हवी होती.मिहीर तेवढा सक्षम वाटत नाहीये हे मला जाणवलं होतं. तरी आपल्या बायकोची काळजी तो नक्की घेईल अश्या भ्रमात मी होतो.शिवाय हनिमूनसाठी आलेल्या कपल बरोबर सतत थांबणंही मला प्रशस्त वाटलं नाही.

अर्थात आता ह्या सगळ्या सबबी लंगड्या वाटत होत्या.एक आयुष्य पूर्ण उमलण्यापूर्वीच संपलं होतं.

मी केबिनची कसून तपासणी करत होतो.फारसं सामान तिथे नव्हतंच. ड्रेसिंग टेबलसमोरच्या सामानातल्या एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं. लालभडक रंगाची नेलपॉलिशची बॉटल होती ती. मला थोडं आश्चर्य वाटलं. रोमाला स्केच काढताना मी बघितलं होतं तेव्हा तिच्या लांबसडक निमुळत्या बोटांकडे माझं सहज लक्ष गेलं होतं. अगदी सोबर शेड होती तिच्या नेलपॉलिशची.एकूणच ह्या तीन-चार दिवसात तिची उच्च अभिरुची सहज समजून येत होती.त्यामुळेच एवढी भडक शेड बघून मला विचित्र वाटलं.मी ती बॉटल उचलून खिशात टाकली.विचार करता करता एक शंका मनात आली.त्यामुळे मी पार हादरुन गेलो.असं असू शकेल? छे,छे! भलत्याच मार्गाने माझे विचार धावत होते.रोमाच्या केसमध्ये खुनाचा हेतूच अस्पष्ट होता.त्यामुळे संशयाची सुई सगळ्यांकडे वळून पुन्हा जागच्याजागी स्थिरावत होती.पण कुठूनतरी सुरुवात करायलाच हवी होती.मी माझ्या संशयाचं निराकरण करुन घ्यायचं ठरवलं.

मी बाहेर आलो आणि भोसल्यांकडे ती बॉटल देऊन आतल्या द्रवपदार्थाचं केमिकल ऍनॅलिसिस ताबडतोब करुन रिपोर्ट द्यायला सांगितला. वरुणला आणि भोसल्यांना समजेना की हे मी कशासाठी करतो आहे.पण त्यांची उत्सुकता मी थोपवून धरली.मला तरी कुठे खात्री होती!सगळा संभ्रमच होता.भोसल्यांनी मात्र त्वरीत धावपळ करुन अर्ध्या तासात रिपोर्ट मिळण्याची व्यवस्था केली.डेकवर काका आणि मिहीर सुन्न अवस्थेत बसले होते.शेजारीच राकेशही अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता.शेवटी तो एक बिझनेसमन होता,त्यामुळे ह्या संपूर्ण घटनेचा आपल्या क्रेडीबिलिटीवर परिणाम होणार नाही ना ह्याची काळजी त्याला वाटणं स्वाभाविक होतं. रिपोर्ट मिळेपर्यंत मलाही काहीच हालचाल करता येणार नव्हती.मला बघताच राकेश घाईघाईने माझ्याजवळ येऊन मला काहीतरी विचारायला लागला,पण मी हातानेच त्याला थोपवत एक तासभर जरा धीर धरायला सांगितला. रोमाशी निगडीत लोकांपैकीच एकजण खुनी होता हे तर निश्चितच होतं. क्रूझवरचा दुसरा कोणी अपरिचित इतक्या अल्पावधीत तिचा खून करणं अशक्य होतं. त्यामुळे माझ्या तपासाचा परीघ खूपच लहान होता. मी तिथल्या एका खुर्चीवर बसलो आणि मला आलेली शंका कितपत व्यवहार्य आहे त्याचा विचार करायला लागलो.खुनाचा हेतू नीटसा लक्षात येत नव्हता,रादर पटतच नव्हता.त्यामुळे ठामपणे मी कोणावर आरोप करु शकत नव्हतो.तरीही मला एकप्रकारचा जुगार खेळून बघावा लागणारच होता.

भोसल्यांनी सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट खरंच अर्ध्या तासाच्या आतच मिळाला.मी अक्षरशः झडप घातली त्यावर.पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट अपेक्षित होता तसाच होता…गळा दाबल्यामुळे गुदमरुन मृत्यू.नेलपॉलिशच्या बॉटल मधल्या द्रवाचं केमिकल ऍनॅलिसिस जे करायला सांगितलं होतं त्याचा रिपोर्ट मी घाईघाईने वाचला.'माय गुडनेस'..म्हणजे मला जी शंका आली होती ती खरीच होती तर.

आता मात्र मला घाई करायला हवी होती.रोमाचा निष्पाप,सुंदर चेहरा माझ्या नजरेसमोरुन तरळून गेला.तिच्या खुन्याला पकडून दिल्यावरच माझी अपराधीपणाची भावना कदाचित थोडीशी कमी झाली असती.छे! हा अँगल आधी लक्षात कसा आला नाही माझ्या? अर्थात आत्ता पश्चात्ताप करत बसण्याची ही वेळ नव्हती.आत्ता ऍक्शन घेणं गरजेचं होतं.

मी ताबडतोब वरुण आणि भोसल्यांना रिपोर्ट दाखवून पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय असेल ते सांगितलं. मी जी शंका व्यक्त केली होती त्यावर रिपोर्ट पाहूनही, दोघांचाही विश्वास बसत नव्हता.त्यांचाच कशाला, माझीही कुठे खात्री पटली होती? पण खुन्याला पकडण्यासाठी ही चाल चालावी लागणारच होती,ती ही लगेच.

बाकीचे सगळेजण तर डेकवरच होते.मी इरालाही तिथे घेऊन यायला इ.परेरांना सांगितलं.थोड्याश्या नाट्यमय पद्धतीने खुनाची उकल करुन दाखवायला मला नेहमीच आवडते.त्याप्रमाणे मी बोलायला सुरुवात केली.

"पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनुसार रोमाचा गळा दाबून खून करण्यात आला आहे हे स्पष्ट झालंय.तिच्या जवळच्या लोकांपैकीच कोणीतरी तो केलाय हे तर नक्कीच आहे.तिने काहीच प्रतिकार केलेला नाही त्यावरुन हे सहज लक्षात येतंय.आता प्रश्न असा आहे,खून करण्यासाठी संधी आणि हेतू दोन्ही तितकेच महत्त्वाचे असतात,तेव्हा कोणाला स्ट्रॉंग मोटिव्ह आणि खून करायची संधी होती?ह्या केसमध्ये मोटिव्ह तितकासा स्ट्रॉंग नाही,अर्थातच माझ्या दृष्टिकोनातून म्हणतोय मी हे.त्यामुळे रोमाचा कोणी खून करु शकेल ही शक्यताच मला वाटली नाही आणि मी गाफील राहीलो. साध्या वाटणाऱ्या ह्या प्रेमाच्या त्रिकोणाला चौथा कोन असेल हे मला जाणवलंच नाही.सुट्टीच्या मूडचाही कदाचित प्रभाव असेल,पण मी नेहमीसारखा ऍलर्ट नव्हतो एवढं नक्की.पण आता मात्र मी माझ्या नेहमीच्या डिटेक्टिव्हच्या रोल मध्ये पूर्णपणे शिरलो आहे.त्यामुळे आता गुन्हेगार माझ्या तावडीतून निसटू शकणार नाही हे अगदी नक्की. मग त्यासाठी थोडी विचित्र कृती मला करावी लागली तरी बेहत्तर,ही अशी कृती….असं म्हणून मी मिहिरच्या हाताला गुंडाळलेलं बँडेज जोरात ओढलं.माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सैल बांधलेलं असल्यामुळे ते चटकन निघालं. बाकीच्यांना माझ्या ह्या कृतीचा अर्थबोध झाला नसला तरी मिहिरचं बँडेज निघाल्यावर दिसणारा त्याचा पूर्णपणे जखमविरहित हात बघून सगळेच चकित झाले.मिहीर तर चांगलाच गोंधळून गेला.पण लगेचच स्वतःला सावरुन चिडक्या स्वरात म्हणाला,"गौतमजी, हे अतिशय असभ्य वागणं आहे तुमचं.तुम्ही तुमच्या क्षेत्रात असाल ग्रेट, पण असं वागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?ह्याचा अर्थ काय?"

"मी तेच विचारतोय मिहीर तुला की ह्याचा अर्थ काय?तुझ्या हाताला आत्ता थोड्या वेळापूर्वी मोठी जखम झाली होती.कुठे आहे ती आता?एवढ्यात गायब कशी झाली?तुझ्या हाताला साधं खरचटलेलंही नाहीये.खरं सांग मिहीर,नाहीतर तुझी आता मात्र खैर नाही.

"ते…ती जखम..मी सांगितलं होतं ना तुम्हाला की जखम जास्ती डीप नाहीये."

"नसू दे ना,पण काही मार्क तर दिसायला हवा ना!आपण इरालाच विचारु, काय इरा?मार्क हातावर दिसेल का टेबलावर?

सरप्राईझिंगली,इरा एकदम शांत दिसत होती.कदाचित आता लपवाछपवी करण्यात काही अर्थ नाही हे तिला जाणवलं असावं.तरीही तिचं असं गप्प बसणं धोकादायक होतं. मी खुणेनीच वरुणला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं.

इराने ज्या टेबलावरचा ग्लास उचलून मिहिरच्या हातावर मारला होता त्या टेबलवर उमटलेला चरा मी सगळ्यांना दाखवला.इरानी फक्त मिहिरला मारण्याचं ऍक्टिंग केलं होतं. प्रत्यक्षात तिने ग्लासचा जोरात आघात केला होता तो टेबलवर.प्लॅस्टिकच्या त्या तकलादू टेबलवर त्याचं इंप्रेशन उमटलं होतं. ह्याचा अर्थ सरळ होता. रोमाचा खून मिहीर आणि इराने संगनमताने घडवून आणला होता.तशी संधी फक्त मिहिरलाच होती. फक्त हेतू जाणून घ्यायचा होता.आपण मृत्यूच्या छायेत वावरत आहोत अशी पुसटशी कल्पनासुद्धा रोमाला नसेल हे जाणवून मी शहारलो. किती गाढ,आंधळा विश्वास होता तिचा ह्या उलट्या काळजाच्या मिहिरवर.

रोमाचे काका आणि तेजस अविश्वासाच्या नजरेने माझ्याकडे बघत होते.दोघांनाही जबर धक्का बसलेला स्पष्ट दिसत होता.

"मिहीर,आत्ता मुकाट्याने स्वतःचा गुन्हा कबूल कर."

भोसले त्याला दरडावून म्हणाले.

मिहिरने एकवार इराकडे नजर टाकली आणि बोलायला सुरुवात केली.

"मी आणि इरा एकाच कॉलनीत राहायचो. त्यामुळे आमची मैत्री तर लहानपणापासून होतीच.पण कालांतराने आमचं प्रेमही चांगलंच बहरलं. आमची दोघांचीही आर्थिक परिस्थिती यथातथाच होती.माझी मॅनेजमेंटची डिग्री असूनही कुठेच चांगला जॉब मिळत नव्हता.इराचा जॉबही खास नव्हता.पैश्यांची कायम तंगीच असायची.हॉटेलमध्ये साधी कॉफी प्यावीशी वाटली तरी तेवढेही पैसे खिशात नसायचे.इराने जेव्हा रोमाकडे माझ्या जॉबसाठी शब्द टाकला आणि मी जेव्हा तिथे कामाला सुरुवात केली तेव्हा तिच्या बिझनेसचा अवाढव्य पसारा,करोडोंचा टर्नओव्हर पाहून मी अक्षरशः हैराण झालो.माझी पर्सनॅलिटी माझी ऍसेट आहे हे मी जाणून होतो आणि तीच एनकॅश करायची असं मी ठरवलं. रोमा अलगद माझ्या जाळ्यात अडकली आणि अगदी अल्पावधीतच माझ्या प्रेमात आकंठ बुडाली.ह्या सगळ्या साम्राज्याचा मी मालक होण्याची स्वप्नं बघू लागलो. इरानेही मला ह्यात साथ दिली.माझं इरावर कमालीचं प्रेम आहे,इतकं की रोमाचं अव्दितीय सौंदर्य मला मोहात पाडू शकलं नाही.दुसरी सर्वात जास्त महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे,मला रोमाच्या हाताखालचं बाहुलं होऊन राहायचं नव्हतं. अफाट संपत्ती असल्यामुळे,बट नॅचरल, रोमाचा स्वभाव डॉमिनेटिंग होता.कोणापुढे झुकायची किंवा दुसऱ्याच्या मतानुसार कधी वागायची तिच्यावर वेळच आली नव्हती.त्यामुळे तिच्याशी लग्न करुनसुद्धा माझ्या मर्जीनुसार मला तिच्या पैश्यांचा उपभोग घेता आलाच नसता.शिवाय इरा मला दुरावली असती ती गोष्ट वेगळीच.रोमाचा पैसा आणि इरा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र हव्या असतील तर रोमाला

मार्गातून दूर करावंच लागणार होतं.जेव्हा काकांनी क्रूझची आयडिया सुचवली तेव्हाच मी आणि इराने हा प्लॅन रचला. इराने आमच्या मागोमाग इथे यायचं,सतत आम्हाला मेंटल टॉर्चर करायचं आणि संधी मिळाली की मला दुखापत करण्याचं नाटक करायचं हा आमच्या प्लॅनचाच भाग होता. मी नेलपॉलीशच्या बॉटलमध्ये लाल रंग भरुन आणला होता.आम्ही वाद घालत असतानाच इराने ग्लास हातावर मारण्याची फक्त ऍक्शन केली.प्रत्यक्षात तिने टेबलवर ग्लास आपटला होता. तेवढ्यात मी दुसऱ्या हातात लपवलेल्या बॉटल मधला थोडा लाल रंग माझ्या हातावर ओतला.हाताला जखम झाल्याचं माझं नाटक तुम्हाला सगळ्यांना खरं वाटलं.काका, तेजस आणि त्या स्मगलरचा पॅरलल थ्रेडही आमच्या पथ्यावरंच पडला.रोमाचा गळा दाबताना मात्र मला कमालीचं वाईट वाटत होतं. पण आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला मार्गातून दूर करण्याशिवाय पर्यायच नव्हता.रोमाचा सततचा सहवास लाभला असतानाही तिच्या मोहापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मात्र मला खूप झगडावं लागलं.अगदी फुलप्रूफ प्लॅन आखला होता आम्ही.एकच मोठी चूक झाली,तीसुध्दा आमच्या बाजूने नाही, ती म्हणजे गौतमसर नको त्या क्षणी,नको तिथे येऊन टपकले.नाहीतर माझ्यावर कोणाला संशय आलाच नसता."

"एक चूक नाही मिहीर,लाल रंग भरलेली बॉटल फेकून न देण्याची दुसरी मोठी चूक होती.

मानवी स्वभाव एकरंगी कधीच नसतो.त्याला खूप छटा असतात.पण तुझ्या स्वभावाची ही छटा काही अगम्यच आहे.एकीकडे इरावर एवढं उदात्त वगैरे प्रेम करणारा दुसरीकडे अगदी सहजपणे एखादीचा गळा आवळू शकतो.ज्याच्यापुढे रोमाची मोहिनी निष्प्रभ ठरली,जो आपल्या प्रेमाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे तोच असा दुसऱ्या कोणाचा विश्वासघात करु शकतो? मी ह्या घटनेचा साक्षीदार होतो म्हणूनच केवळ ह्यावर विश्वास ठेवू शकतोय.मिहीर,यू आर लाइक अ डबल एज्ड स्वोर्ड.अशी माणसं फार घातकी असतात असा माझा अनुभव आहे आणि तू तसाच निघालास."

आमचं हे बोलणं चालू असतानाच इतका वेळ गुपचूप बसलेली इरा एकदम ताडकन उठली आणि काही कळायच्या आत लेडी काँस्टेबलच्या कमरेला लटकणारं पिस्तूल खेचून स्वतःच्या कानशीलावर टेकवून तिने चाप ओढला.तेवढ्यात वरुणने चपळाईने तिचा हात वर केला त्यामुळे उडालेली गोळी डेकच्या वरच्या लाकडी सिलिंगला लागून खाली पडली.सगळे अवाक होऊन बघत होते.मिहिरचा तर सगळा नूर उतरला होता.पुढचं सगळं अंधारलेलं भविष्य बहुदा त्याला नजरेसमोर दिसत असावं.इरा ह्या सगळ्याचा मानसिक ताण सहन न होऊन खाली कोसळली.काँस्टेबलनी तिला पुढे होऊन सावरलं. राकेशने तत्परतेने सरबताचा ग्लास आणून दिला.थोड्याच वेळात ती पुष्कळच सावरली.तरी तिच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडालेला होता.काका आणि तेजस बधीर झाले होते.काकांच्या तर सगळ्या भावविश्वाला एकदमच धक्का बसला होता.मुलीसारख्या मानलेल्या पुतणीचा दुर्दैवी अंत आणि पोटच्या मुलाला,त्याने केलेल्या गुन्ह्याची होणारी शिक्षा ह्यामुळे ते मुळापासून हादरुन गेले होते.आता पुढच्या रुटीन प्रोसिजरची जबाबदारी परेरा आणि भोसल्यांनी घेतली.इथल्या काही लीगल बाबी पूर्ण झाल्यावर मुंबईला गेल्यावर राहिलेल्या कायदेशीर गोष्टी नियमानुसार पार पडणार होत्याच पण मला त्यात अजिबात स्वारस्य नव्हतं.रोमाला मी वाचवू शकलो नाही हे शल्य मला कायम बोचत रहाणार होतं.दुसरी कोणती वेळ असती तर वरुणने मला नक्कीच समजावून माझ्या मनावरचं ओझं कमी करायचा प्रयत्न केला असता.पण आत्ता तो माझ्यापेक्षा जास्त अपसेट झाला होता.सध्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट राहिला नसला तरीही रोमा आणि इराही त्याच्या क्लासमेट्स होत्या. फक्त दोन दिवसांची रोमाची ओळख असून तिची अकाली एक्झिट मला एवढी चटका लावून गेली, तर चार-पाच वर्षं एकत्र कॉलेजमध्ये असल्यावर वरुणला त्याचा किती त्रास होत असेल!

आत्ता आम्ही दोघं काही न बोलता डेकवर उभे होते.गेले दीड-दोन तास चाललेल्या थरार-नाट्यावर पडदा पडला होता.मी वरुणच्या खांद्यावर हात ठेवून त्याला निःशब्द धीर द्यायचा प्रयास करत होतो.मन विषण्ण झालं होतं.'पैसा…पैसा!' मनात आलं,मोहाच्या या खोल गर्तेत घेऊन जाणाऱ्या निसरड्या वाटेवरुन वेळीच यू टर्न घेता आला तर…

समोर मांडवीचा विस्तीर्ण जलाशय पसरला होता.मानवाचं हे क्रौर्य बघून क्षणभरच त्या जलाशयावर तरंग उठले असतील.बाकी, वर्षानुवर्षं अशी अनेक भलीबुरी गुपितं आपल्या उदरात सामावून घेत मांडवी नदी तशीच वहात होती.संथपणे…….


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime