Radhika Joshi

Crime

3  

Radhika Joshi

Crime

माणिकमोती

माणिकमोती

37 mins
220


(अगाथा ख्रिस्तींच्या ‘द मिस्ट्री ऑफ द ब्ल्यू ट्रेन’ वर आधारित)

प्रकरण पहिले

सुसाट वेगाने धावणारी एक्स्प्रेस….

  रेल्वेच्या डब्याच्या स्वतंत्र कंपार्टमेंटमध्ये हातातील लाखो रुपयांच्या जड जवाहर यांनी भरलेली बॅग आणि धोतर दोन्ही सावरत स्थानापन्न झालेले तुंदिलतनु शेठजी…. नागपुरी संत्र हातात असलेल्या अतिशय मादक, रहस्यमय तरुणीचं अचानक झालेलं आगमन.… रात्रीच्या गर्द काळोखात गाडीच्या धडधडाटात विरलेली शेठजींची आर्त किंकाळी…. त्यांच्या हातातील बॅग नाहीशी झालेली आणि त्यांच्या पांढऱ्याशुभ्र सिल्कच्या झब्ब्यावर लाल भडक नक्षी उमटलेली….

  आर.डी.चं भन्नाट म्युझिक, माझा फेवरेट हिरो राजेश खन्ना आणि अतिशय दुर्मिळ असलेला निवांत वेळ यांचा अपूर्व त्रिवेणी संगम झाल्यामुळे मी मस्तपैकी ‘द ट्रेन’ हा पिक्चर एन्जॉय करत होतो. एवढ्यात माझा मोबाईल वाजला. अजूनही मी हलक्याफुलक्या मूडमध्येच असल्याने ‘गुलाबी आँखें’ हे गाणं गुणगुणतच कोणाचा फोन आहे ते बघितलं. इन्स्पेक्टर भोसल्यांचा फोन होता. ते बघून माझ्या मनात विचार आला, ‘चला, संपला सगळा निवांतपणा!’ अर्थात माझी ही नाराजी क्षणभरंच टिकली, कारण गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांची उकल करणं हेच तर माझ्यासारख्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या आयुष्याचं टॉनिक होतं. तेच जर वजा केलं तर बाकी काय उरेल? फक्त एक बेचव, मिळमिळीत आयुष्य जे मला कदापिही रुचलं नसतं.

  पलीकडून भोसले बोलत होते, “गौतमजी, आपल्याला आत्ता लगेच लोणावळ्याला जायचं आहे. रसिकलाल अगरवालना तुम्ही ओळखत असालंच.”

  “हो, चांगलाच ओळखतो. हिऱ्यांचे व्यापारी म्हणून ते सुप्रसिद्ध आहेतंच, पण अतिशय दानशूर म्हणूनही त्यांची ख्याती आहे.”

  “अगदी बरोबर. त्यांच्याच एकुलत्या एका मुलीचा, निकिताचा, मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेसमध्ये खून झाला आहे. लोणावळा स्टेशनवर गाडी थांबली असताना ही बाब तिकीट चेकर च्या निदर्शनास आली.”

  “ओ गॉड! रसिकलालजीं सारख्या माणसाच्या बाबतीत फारच दुर्दैवी घटना घडली आहे. मी पंधरा मिनिटांत पोहोचतो पोलीस स्टेशनवर. तुम्ही तयार रहा.”

  “हो, मी निघण्याच्या तयारीतच आहे. वरुणलाही बरोबर घेऊन या,” असं म्हणून भोसल्यांनी फोन कट केला.

  मी वरुणला कॉल करून लगेच पोलीस स्टेशनवर यायला सांगितलं. हा माझा सहाय्यक कोणत्याही क्षणी बोलावलं तरी ऑन द टोज् असतो. तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की ‘द ट्रेन’ सारखं थरारनाट्य मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे.

  अर्ध्या तासाच्या आतच आमची गाडी लोणावळ्याच्या दिशेने धावायला लागली. नुकताच श्रावण महिना सुरु झाला होता, त्यामुळे ऊन-पावसाचा मनोहारी खेळ सुरु होता. त्या आधी झालेल्या मुसळधार पावसाने सगळा आसमंत हिरवागार बनवला होता. लॉंग विकएंड असल्यामुळे पिकनिकला चाललेली बरीच मंडळी दिसत होती. हवेतही सुखद गारवा होता. वातावरण खरंच रोमँटिक बनलेलं होतं. त्याचा परिणाम म्हणून मी नकळत शीळ वाजवायला लागलो. वरुण आणि भोसले माझ्याकडे काही तरी अशक्यप्राय गोष्ट घडल्यासारखे बघायला लागले.

  वरुणने मला जरा चाचरतच विचारले, “सर, ऑल ओके?”

‌  मी एकदम भानावर आलो. खरंच, आपली नेहमीची प्रोफाईल सोडून वागलं तर बाकीचे लोकं लगेच किती अस्वस्थ होतात ना! अनेक मुखवटे चढवूनंच तर आपण सगळे जगत असतो. आपला खरा चेहरा क्वचितच लोकांसमोर येतो. माझ्या नेहमीच्या डिटेक्टिव्हच्या रोलमध्ये मी आता घुसलो आणि भोसल्यांना काय घडलं ते विचारलं.

  भोसले सांगायला लागले, “निकिता ही रसिकलालजींची एकुलती एक मुलगी. आज सकाळच्या शताब्दी एक्सप्रेस ने ती पुण्याला चालली होती. ती मॉडेलिंग करत होती. मॉडेलिंगसाठी आवश्यक अशी फिगर आणि अतिशय सुंदर चेहरा दोन्ही लाभल्यामुळे मॉडेलिंगच्या क्षेत्रात तिला भलतीच डिमांड होती. वास्तविक रसिकलालजींना हे अजिबात मान्य नव्हतं. दोन-तीन वर्षांपूर्वी तिचं लग्न मोठे उद्योगपती, चंदनलाल मेहता यांच्या सुपुत्राशी, धीरजशी, झालं होतं. लग्नानंतर लगेचच रसिकलालजींच्या लक्षात आलं होतं की चंदनलालजींची आर्थिक परिस्थिती बडा घर पोकळ वासा अशी होती. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता. या विवंचनेमुळे चंदनलालना ह्रदयविकार जडला होता. त्यांची तब्येत खूपच खालावलेली होती. त्यातच धीरजही वाईट सवयींच्या आहारी गेलेला होता. कुठलाही काम धंदा न करता, वडिलांचा व्यवसाय सावरण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता, तो कर्जाचा डोंगर वाढवायला मात्र हातभार लावत होता. भारतभर नृत्याचे शो करणाऱ्या एका प्रसिद्ध नृत्यांगनेशी, मैथिलीशी त्याचं अफेअर चालू होतं. कुठलाही नवीन धक्का वडिलांना सहन होणार नाही हा डॉक्टरांचा इशारा ध्यानात ठेवून वडिलांच्या कानावर कुठल्याही गोष्टी पडणार नाहीत याची दक्षता मात्र तो घेत होता.

  “खरंतर, अशा माणसाशी निकिताचं लग्न कसं काय झालं हेच एक मोठं कोडं आहे. रसिकलालजीं सारखा निष्णात रत्नपारखी जावयाची पारख करताना कसा चुकला काही समजत नाही. आज निकिता पुण्याला एका ऍडच्या शूटसाठी चालली होती. पुण्याचे प्रसिद्ध गोडबोले ज्वेलर्स यांच्या ऍडचं शूटिंग होतं. शताब्दीच्या एक्झिक्युटिव क्लासचं स्वतंत्र कंपार्टमेंट तिने बुक केलं होतं. तिच्याबरोबर तिची पर्सनल मेकअप आर्टिस्ट पूजा शर्मा होती. रसिकलालजींच्या चार-चार आलिशान गाड्या निकिताच्या दिमतिला असताना ती रेल्वेने का प्रवास करत होती हेही समजायला मार्ग नाही. तिकीट चेकरच्या म्हणण्यानुसार निकिताने त्याला पनवेलच्या पुढे गाडी आल्यावर बोलावून घेतलं आणि सांगितलं की, ‘माझी मेकअप आर्टिस्ट पनवेललाच काही अर्जंट कामासाठी उतरली आहे. आता पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे मी खिडक्या लावून घेत आहे. त्यामुळे लोणावळ्याला गाडीचा हॉल्ट असतो तेव्हा गाडी थांबल्यावर दारावर प्लीज नॉक करा’. त्याप्रमाणे गाडी लोणावळ्याला पोहोचल्यावर त्याने कंपार्टमेंट च्या दारावर नॉक केलं. आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे, ‘मॅडम, मॅडम!’ अश्या हाकाही मारल्या. तरीही काहीच रिस्पॉन्स न मिळाल्याने त्याने स्टेशन मास्तरांच्या सांगण्यावरून पोलिसांना फोन केला. सगळ्यांनी मिळून कंपार्टमेंटचं दार बऱ्याच युक्त्या-प्रयुक्त्यांनी उघडलं. आतलं दृश्य अतिशय विदारक होतं. निकिताचा निर्घुणपणे खून करण्यात आलेला होता. तिचा मृतदेह बर्थ वरती वेडावाकडा पसरलेला होता. कोणीतरी जाड दोरी किंवा मफलर नी गळा आवळून तिचा खून केला होता. एवढ्यावरंच खून करणार्‍याचं समाधान झालेलं दिसत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर घाव घालून तिचा चेहरा विद्रूप केलेला होता. तिची एक छोटीशी बॅग तिच्या बर्थवरतीच लॉक केलेल्या अवस्थेत होती. तिची हँड बॅग किंवा पर्स असली तर ती मात्र कुठेच दिसली नाही. तिचा मोबाईल बर्थच्या खाली कोपऱ्यात सापडला पण तो पासवर्ड प्रोटेक्टेड आहे त्यामुळे तो अनलॉक केल्यानंतरच त्यातल्या डेटा वरून आपल्याला काही माहिती मिळू शकेल. रसिकलालजींच्या विनंतीवरून इथल्या पोलिसांनी आपल्याला या केसमध्ये इन्व्हॉल्व केलं आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे.”

  “भोसले, काळजी करू नका. हा गौतम अभ्यंकर, द प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, फुल्ली अँड फायनली तुमच्या सेवेला हजर आहे.”

  “तुम्ही असल्यावर मला कसलीच चिंता नसते गौतमजी. फक्त रसिकलालजींसारख्या असामींच्या मुलीची केस आहे, त्यामुळे थोडं दडपण मात्र आलंय.”

  “खरंय, काही गोष्टींवर रसिकजीच प्रकाश टाकू शकतील. त्यामुळे तपासासाठी एखादी दिशा आपल्याला सापडेल.”

‌  आम्ही हे बोलत असतानाच लोणावळा स्टेशन पाशी येऊन पोहोचलो. एरवी दिमाखात दौडणारी शताब्दी आज जणू स्वतःची शान हरवून स्टेशनवर उभी होती. वातावरणातील उदासी संसर्गजन्य होती. एक प्रकारचा खिन्नपणा नकळतच आम्हालाही जाणवू लागला. रेल्वेच्या कंपार्टमेंट समोर पोलिसांचा पहारा होता. समोर प्लॅटफॉर्मवर रेल्वे अधिकाऱ्यांची केबिन होती. तिथे रसिकलालजी बसले आहेत, असं भोसल्यांनी मला सांगितलं. पहिल्यांदा आम्ही कंपार्टमेंटमध्ये पाहणी करण्यासाठी शिरलो. आमच्यासाठी नित्याचीच बाब असली तरीही समोरच्या मृतदेहाच्या चेहऱ्याची केलेली विटंबना मला बघवेना. वरुण आणि भोसले यांची काही वेगळी स्थिती नव्हती.

  वरुण बोलायला लागला, “असा दुर्दैवी मृत्यू कोणाच्या वाट्याला येऊ नये. मी निकिताच्या ऍड्ज् बरेचदा बघतो. इतका सुंदर चेहरा विद्रूप करणारा खुनी विकृतही असला पाहिजे.”

  “वरुण, खुनी माणूस नॉर्मल असूच शकत नाही. मनाचा तोल गमावलेल्या माणसाच्या हातूनच अशी विघातक कृत्य होतात. रसिकलालजींवर मात्र मोठा आघात झाला आहे. चला, त्यांना आपण भेटूया. भोसले, निकिताच्या नवऱ्याला ही बातमी कळवलीत का?”

  “इन्स्पेक्टर सूर्यवंशी यांच्या अखत्यारीत ही केस आहे. त्यांनाच विचारू आपण. माझंही प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही,” असं म्हणून भोसले केबिनच्या दिशेने चालायला लागले. भोसल्यांनी माझी इन्स्पेक्टर सूर्यवंशींबरोबर ओळख करून दिली.

  सूर्यवंशी म्हणाले, “तुमची कीर्ती तर मी कधी पासून ऐकत आलो आहे. प्रत्यक्ष भेटीचा योग आज आला. रसिकशेठच्या विनंतीवरून ही केस इ.भोसले आणि तुमच्याकडे सुपूर्त करत आहे. आमच्या टीमने जी प्राथमिक पाहणी केली त्याचे डिटेल्स इन्स्पेक्टर भोसले यांना सांगितले आहेतच. तिकीट चेकर ची जबानीही त्यांना माहित आहे. धीरज ला, म्हणजे निकिताच्या नवऱ्याला, कॉन्टॅक्ट करायचा खूप प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. त्याच्या बंगल्यावर फोन करुन निरोप ठेवला आहे. पुढचे सगळे सोपस्कार आता मुंबईलाच होतील. आमचा लेखी रिपोर्ट तुम्हाला थोड्याच वेळात देतो. तोपर्यंत रसिकशेठ बरोबर तुम्ही बोलून घ्या.”

 _______

प्रकरण दुसरे

रसिकशेठ टिपिकल शेठजींसारखे अजिबात दिसत नव्हते.

  अतिशय पॉलिश्ड वागणं-बोलणं, वेल-बिल्ट आणि फारच देखणे होते ते. ह्या वयातही त्यांचा रुबाबदारपणा अजिबात कमी झाला नव्हता. या क्षणी मात्र ते उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते. डोळे मिटून बसलेले होते तरी त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना बोलकी होती. आमची चाहूल लागून त्यांनी डोळे उघडले. आम्हाला पाहताच त्यांच्या चर्येवर थोडे समाधान पसरले.

  मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा हात हातात घेऊन निःशब्द धीर देण्याचा प्रयत्न केला आणि बोलायला सुरुवात केली, “रसिकलालजी, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. यातून सावरायला तुम्हाला वेळ लागणार आहे, पण काही गोष्टींचा खुलासा करू शकलात तर खुन्याला लवकरात लवकर पकडता येईल. जर तुम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नसाल तरी काही हरकत नाही. आपण मुंबईला परत गेल्यावर भेटू. तुम्हाला कुठल्याही प्रकारे मनःस्ताप व्हावा अशी आमची मुळीच इच्छा नाही.”

  “नाही, नाही, तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारा. आय अँम ओके नाऊ. हे दुःख आता आयुष्यभराचंच आहे. विचारा तुम्ही.”

  “दोन महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा मला हवा आहे. पहिली गोष्ट गुन्ह्याशी निगडीत नाही पण महत्त्वाची आहे. ती म्हणजे निकिताचं लग्न तुम्ही फारशी चौकशी न करता जरा घाईगडबडीतंच धीरजशी कसं काय लावून दिलंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजंच नेमकी निकिता घरच्या आलिशान गाड्या सोडून रेल्वेने कशी काय प्रवास करत होती? ती शताब्दीने पुण्याला जाणार आहे हे कोणा कोणाला सांगितलं होतंत तुम्ही?”

  “नाही, निकिता रेल्वेने पुण्याला जाणार आहे हे कोणालाही माहित नव्हतं. माझा पर्सनल सेक्रेटरी विक्रम याने ऑनलाईन रिझर्वेशन केलं होतं. निकिता एका ऍडच्या शूटिंगसाठी पुण्याला निघाली होती. त्यामुळे तिची मेकअप आर्टिस्ट तिच्याबरोबर जाणार होती. आम्ही चौघं सोडलो तर या गोष्टीची कोणालाच कल्पना नव्हती, अगदी धीरज ला, निकिताच्या नवर्‍यालाही, नव्हती.”

  रसिकशेठ इथे थोडेसे घुटमळले, पण नंतर काहीतरी निश्चय केल्यासारखे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले आणि ते परत बोलायला लागले, “गौतमजी, मगाशी निकिताच्या लग्नाबद्दल तुम्ही विचारलंत. खरं सांगायचं तर, घाईगडबडीतंच तिचं लग्न झालं होतं. त्याला कारण होता मयूर इनामदार. हा मयूर निकिताच्या कॉलेजमध्ये होता. एखाद्या हॉलिवूड ॲक्टर सारखी पर्सनॅलिटी, शुगर-कोटेड बोलणं आणि भरपूर स्ट्रीट स्मार्टनेस यामुळे मुली पाहता पाहता त्याच्यावर फिदा होत. श्रीमंत मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्याचं भांडवल करून तो त्यांना ब्लॅकमेल करायचा. कोणी मुलीही स्वतःची बदनामी नको म्हणून मयूर विरुद्ध तक्रार करायच्या नाहीत. नवीन मैत्रिणीला गटवल्यावर मयूर जुन्या मैत्रिणीने त्याच्याशी कसा विश्वासघात केला याचे किस्से रंगवून तिला सांगायचा आणि स्वतःची बाजू सेफ करायचा. निकिताला त्याने आपल्या प्रेमपाशात अडकवलं नसतं तरंच नवल होतं. एवढी श्रीमंत आणि सुंदर मुलगी तो थोडीच सोडणार होता. मला त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागल्यावर मी माझ्या पद्धतीने मयूरची माहिती काढली. त्याला आई-वडील नव्हते. घरची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. मुलींना लुबाडण्याचा धंदा सुरु केल्यावर मात्र बऱ्यापैकी पैसा त्याच्याकडे जमला होता. एव्हाना मयूर आणि निकिता प्रेमात चांगलेच गुरफटले होते. प्रेमामधले धोकादायक टप्पे त्यांनी ओलांडण्यापूर्वीच मला निकिताला त्याच्या फसव्या मोहपाशातून बाहेर काढणं जरुरीचं होतं. त्याप्रमाणे मी तिला पहिल्यांदा प्रेमाने समजावून सांगितलं. अपेक्षेप्रमाणे तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही हे बघून मग मात्र मी धाकदपटशा दाखवून, थोडं इमोशनल ब्लॅकमेल करून तिला मयुरशी असलेलं नातं तोडायला भाग पाडलं. मनाविरुद्ध का होईना पण निकिताने माझं तेव्हा तरी ऐकलं. तिच्या आयुष्याला नवं वळण देण्यासाठी मी घाईघाईने तिच्या लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हा ती मॉडेलिंग क्षेत्रातही चांगलीच स्थिरावली होती. तिचं शिक्षण मात्र या सगळ्या गोंधळात अर्धवटंच राहिलं. धीरजचं स्थळ कोणीतरी मला सुचवल्यावर फार खोलात जाऊन चौकशी न करता वरवरच्या त्यांच्या खानदानी रुबाबाला खरे मानून मी निकिताचं धीरजशी लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर लगेचंच चंदनलालजींची परिस्थिती माझ्या लक्षात आली. माझ्या हाताने मी निकिताच्या आयुष्याला नवं वळण देण्याऐवजी तिला अशा चुकीच्या वळणावर नेऊन उभं केलं होतं की समोर कोणताच मार्ग दिसत नव्हता आणि परतीचा मार्गही धुक्यात हरवल्यासारखा झाला होता. मी स्वतःला खूप दूषणं दिली. स्वतःशीच चरफडलो. पण त्या वेळच्या परिस्थितीत जे मला सुचलं ते मी केलं होतं. एक गोष्ट मात्र मी ताबडतोब केली— माझ्या प्रॉपर्टीचा बराचसा शेअर लगेचंच निकिता च्या नावावर करून टाकला. निदान तिची फायनॅन्शियल पोझिशन तरी सेफ अँड साऊंड असावी असा विचार मी केला. चंदनलालजींचं थोड्याच दिवसात हृदयविकाराने निधन झालं आणि धीरजला तर आता रान मोकळं झालं. लग्नाच्या आधी त्याचे मैथिलीबरोबर संबंध होते. आता पुन्हा त्याचं तिच्याकडे जाणं येणं सुरु झालं. निकिता तर काय मनाने त्याच्यात कधीच गुंतली नव्हती. तिने फक्त माझ्या आग्रहाखातर त्याच्याशी लग्न केलं होतं. पण तरीही त्याची सगळीच चैन तिच्या पैशांवर चालली होती हे तिला अजिबात मान्य नव्हतं. त्यावरून त्या दोघांचे सतत वाद होत असत.”

  रसिकलालजी अखंड बोलत होते. आम्हीही कोणी त्यांची लिंक मध्येच तोडली नाही. जितकी जास्त माहिती ते देतील तितकी आमच्या तपासकामात प्रगती होणार होती.

  ते पुढे सांगायला लागले, “निकिताची या रोजच्या मानसिक त्रासातून सुटका करण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे धीरजचा आणि तिचा डिव्होर्स. मी मागच्या आठवड्यातच धीरजला माझ्या ऑफिसवर बोलावून घेतलं होतं. कुठलेही आढेवेढे न घेता त्याच्या पुढे दोन पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय म्हणजे त्याने आपले सगळे गैरव्यवहार ताबडतोब बंद करून माझ्या बिझनेसमध्ये यावे किंवा दुसरा पर्याय निकिताला घटस्फोट द्यावा. हे दोन्ही पर्याय त्याने धुडकावले. त्याच्यामते तो जर माझ्या बिझनेसमध्ये आला तर माझ्या हुकुमाचा ताबेदार होऊन त्याला राहावं लागलं असतं. डिव्होर्स ला नकार द्यायचं कारण त्याने सांगितलं नाही. तो एवढंच फक्त बोलला, ‘तुम्हाला वाटतं तसं सर्वस्वी माझी चूक नाही आहे. मैथिलीकडे पुन्हा मी जायला लागलो त्याला कारणीभूत निकिताच आहे. तुम्ही तिच्याशी या विषयावर जरा बोला,’ असं म्हणून तो सरळ तिथून निघून गेला.

  “अर्थातच त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही. दोनच दिवसांपूर्वी मी निकिताला भेटायला तिच्या घरी गेलो होतो. गाडीतून उतरत असतानाच एक तरुण बंगल्याच्या गेटमधून बाहेर जाताना मला ओझरता दिसला. त्याचं साईड फेसिंग मला ओळखीचं वाटलं. विचार करता करता मी एकदम चरकलो कारण तो तरुण मला मयूरसारखा वाटला. मी घाईघाईतच निकिताच्या घरात शिरलो. मला पाहताच ती सोफ्यावरून उठून ‘डॅडी!’ म्हणून मला बिलगली. मी जराश्या जरबेच्या स्वरात तिला विचारलं, ‘निकिता, आत्ता इथून जो तरुण गेला तो मयूर का?’ ती एकदम गोरीमोरी होत जराशी अडखळतच बोलली, ‘काहीतरीच काय डॅडी! आता माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. तुम्ही उगाचंच काळजी करताय, डॅडी. आज तुम्ही याल असं मला वाटतंच होतं. नाहीतर मीच तुम्हाला कॉल करणार होते. तुमच्या आवडीचा बदामाचा शिरा मी केलाय. चला, आता डोक्यातले सगळे विचार बाजूला सारा.’

  “ती वरकरणी कितीही खेळीमेळीच्या स्वरात हसत बोलत असली तरी ती चांगलीच डिस्टर्ब्ड आहे आणि माझ्यापासुन काहीतरी लपवत आहे असं मला वाटून गेलं. मी ऑफिसला पोहोचल्या बरोबर धीरजला फोन केला. मागच्या आठवड्यातल्या त्याच्या बोलण्याचा रोख मयूर वर होता का ते त्याला विचारलं. आम्ही लग्नाआधीच काहीही न लपवता मयूरबद्दल चंदनलालना आणि धीरजला सगळं सांगितलं होतं. आता मी हे विचारल्यावर धीरज सूचक हसला आणि म्हणाला, ‘बरं झालं डॅडी, तुमच्या हे लक्षात आलं ते. तुमचा जुनाच प्रॉब्लेम नवीन रुपात तुमच्यासमोर आला आहे. आता तो तुम्ही कसा सॉल्व्ह करणार याचा विचार करा,’ असं म्हणून त्याने फोन ठेवला. मी निकिताला परत फोन करून मयूरबद्दल पुन्हा-पुन्हा खोदून विचारलं. तिने अजिबात दाद लागू दिली नाही. ‘परवा मी शताब्दी एक्सप्रेसने एका ऍडच्या शूटसाठी पुण्याला जाणार आहे. आल्यावर या विषयावर बोलू,’ असं तिने मला सांगितलं. एवढ्या गाड्या असताना रेल्वेने प्रवास करायची काय जरूर आहे, असं विचारल्यावर तिने सांगितलं नेहमी मी कारमधूनच सगळीकडे जाते. रेल्वेप्रवास शेवटचा कधी केला मला आठवत पण नाही. शताब्दी सारख्या रॉयल ट्रेनने एकदा तरी मला जायचंच आहे. हे ऐकल्यावर मी विक्रमला सांगून रिझर्वेशन करतो असं तिला सांगितलं, तेव्हा तिने तिच्या मेकअप आर्टिस्ट पूजाचंही रिझर्वेशन करायला सांगितलं. आज सकाळी निघायच्या आधी मला तिचा फोन आला होता. मला काय वाटलं कुणास ठाऊक पण मी ट्रेन सुटण्याच्या आधी स्टेशनवर जाऊन पोहोचलो. एक्झिक्युटिव्ह क्लासच्या बाहेरंच निकिता आणि पूजा दोघी मला दिसल्या. मला बघताच निकिताला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आम्ही मग आत शिरलो. त्या एका लॉबीमध्ये चार-पाच कंपार्टमेंट्स होती. आम्ही निकिताच्या कंपार्टमेंटमध्ये बसलो. तिच्या शेड्युलचे अपडेट्स ती मला देत राहणार होती. एवढ्यात ट्रेन सुटण्याची शिट्टी वाजली. मी जाण्यासाठी उठलो आणि निकिताला जपून जा असं सांगून बाहेर लॉबीत आलो. तेवढ्यात निकिता ‘डॅडी!’ असं म्हणत बाहेर आली. मी तिला, ‘काय ग, काय झालं?’ असं विचारलं तर ती एकदम मला मिठी मारून रडायला लागली. मला काहीच समजेना. ती पण काही बोलायला तयार नव्हती. नुसतीच रडत होती. मग मी तिला थोपटत राहिलो. जरा वेळाने ती शांत झाली. तिच्या रडण्याचं कारण तिला सांगता येईना. ‘आपण घरी जाऊ, पुण्याला तू नंतर जा,’ असं मी तिला सांगितलं पण आता ती खूपच सावरली होती. इतक्यात माझं लक्ष शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये गेलं. तिथे साधारण निकिताच्याच वयाची एक मुलगी बसली होती. ती दिसायला तर छान होतीच, पण तिचं शांत आणि सौम्य व्यक्तिमत्व प्रथम दर्शनीच दुसऱ्याला आपलंसं वाटणारं होतं. ती अनिमिष नेत्रांनी आमच्याकडेच बघत होती. आमचं लक्ष जाताच मग तिने नजर दुसरीकडे वळवली.

  “आता गाडीने हळूहळू वेग घ्यायला सुरुवात केली तसा मी खाली उतरलो आणि निकिताला हात हलवून निरोप दिला. गाडी जशी जोरात धावायला लागली तसा मी स्टेशनच्या बाहेर पडलो. का माहित नाही पण मन खिन्न झालं होतं. कसली तरी हूरहूर वाटत होती. तसाच घरी आलो आणि थोड्याच वेळात ही अभद्र न्यूज मिळाली,” असं सांगतानाच रसिकशेठचा बांध फुटला.

  त्यांच्या रडण्याचा आवेग थोडा ओसरताच मी त्यांना विचारलं, “माफ करा शेठ, पण या खुनामागे तुमच्या बिझनेस रायव्हल्सचा काही हात असेल असं वाटतं का तुम्हाला?”

  “नाही, नाही, गौतमजी. एवढी पराकोटीची दुश्मनी माझी कोणाशीच नाही. हां, आता बिझनेस आहे तिथे कॉम्पिटिशनही आहेच. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे. पण माझ्या मुलीची क्रूर हत्या करण्याएवढे उलट्या काळजाचे माझे कोणीही बिझनेस कलिग्ज नाहीत. मी दोन-अडीच वर्षांपूर्वी पॅरिसहून एक अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ माणिक खरेदी केलं होतं. असं बोललं जात होतं की ते इंग्लंडच्या राजघराण्यातील आहे. असा दिमाखदार रुबी माझ्या संग्रही असल्यावर माझे कलिग्ज जेलस मात्र झाले होते— जस्ट अ मिनिट!” शेठजी एकदम ओरडले. “परवाच मी तो रुबी निकिताला गिफ्ट दिला होता. ती त्यामुळे अतिशय हरखून गेली होती. त्याला असलेल्या छोट्याश्या छिद्रातून तिने एक छानशी साखळी ओवून लगेच गळ्यात घातली होती. ‘डॅडी, मी गोडबोले ज्वेलर्सच्या ऍडच्या शूटिंगसाठी हा वापरीन. मी तो माझ्याबरोबर पुण्याला नेते.’ ती असं बोलल्यावर मी तिला स्पष्टपणे सांगितलं, ‘हे बघ निकिता, या रुबीसाठी माझ्यावर एकदा प्राणघातक हल्ला झाला आहे. तुझा जीव कशासाठी धोक्यात घालते आहेस?’

  ” ‘डॅडी, एक तर तो रुबी माझ्याकडे आहे, आणि तो घेऊन मी पुण्याला रेल्वेने चालले आहे हे कोणाला कळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पूजाही आहेच माझ्याबरोबर. तीन-चार तासांचा प्रवास, शिवाय सकाळची वेळ त्यामुळे काही होणार नाही. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. नुसताच लॉकरमध्ये ठेवायचा तर तो विकत घ्यायचा तरी कशाला?’ असा युक्तिवाद तिने केल्यामुळे मी गप्प बसलो. तिला काळजी घेण्याविषयी वारंवार बजावले. मला त्या रुबीची चिंता नव्हती, माझ्या मुलीची चिंता होती.

  “शनिवारी सकाळी तिने मला सांगितलं की तो तिने बॅग मध्ये व्यवस्थित लॉक करून आणला आहे. त्या रुबीसाठी तिचा खून झाला असं तुम्हाला वाटतं का?”

  मी त्यांना म्हणालो, “मी पूर्ण तपास केल्याशिवाय कुठलंही विधान करत नाही. पण हा एक नवीन अँगल आपल्याला समजला आहे. बॅग व्यवस्थित लॉक केलेल्या स्थितीत दिसत आहे. ती उघडण्याची खटपट केलेली दिसत नाही. निकिताने तो खात्रीपूर्वक बॅगेत ठेवून आणला होता का?”

  “हो, अगदी खात्रीपूर्वक तसंच ती बोलली होती. बॅगेला नंबर लॉक आहे. पटकन दुसऱ्या कोणाला उघडता येणं शक्य नाही.”

  “तसं असेल तर आपण बॅग उघडून चेक करूया. त्याशिवाय या खुनामागचं मोटिव्ह समजणार नाही.”

  “गौतमजी, मोटिव्ह म्हणाल तर फक्त धीरजलाच आहे. निकिताच्या मृत्यूनंतरच तिची सगळी संपत्ती धीरजला मिळाली असती. मी त्या दोघांचा डिव्होर्स व्हावा या खटपटीत होतो. धीरजला ते अजिबात मान्य नव्हतं, कारण मग निकिताच्या वाट्याची जी प्रचंड प्रॉपर्टी होती त्याचा क्लेम त्याला सोडावा लागला असता. त्यामुळेच निकिताला या जगातून नाहीसं करण्याचे कृत्य धीरजने केलं असावं असा मला दाट संशय आहे.”

  “रसिकशेठ, आपण पुराव्याशिवाय कोणावर असे आरोप करू शकत नाही. नवरा-बायको मधला बेबनाव हा काही पुरावा होऊ शकणार नाही‌. धीरज खरंच खुनासारखं कृत्य करण्याएवढा निर्ढावलेला गुन्हेगार आहे का? नुसती हत्याच नाही, तर निकिताचा चेहरा विद्रूप करण्याएवढा खोलवर तिरस्कार त्याच्या मनात खरंच होता का? त्याच्यामते निकिताचंही वागणं खटकणारं होतं. कदाचित मयूरशी तिने पुन्हा नव्याने नातं जोडलं असेलही. रसिकशेठ तुम्ही प्रेज्युडाईज्ड नजरेने त्याच्याकडे बघत आहात. त्यामुळे तोच खुनी आहे असं तुम्हाला वाटतंय.”

  भोसले मध्येच म्हणाले, “आपण बॅग चेक करूया का? रुबी आहे का नाही हे कन्फर्म झाल्यावर चोरीच्या उद्देशाने हत्या झाली आहे का त्याचा शोध घेता येईल.”

  आम्ही संमतीदर्शक मान डोलावली. वरुण आणि भोसले यांनी मिळून बॅग उघडली. आतमध्ये ज्या माणकाची अपेक्षा आम्हाला होती तो मिळाला नाही. आम्ही कसून बॅगेचा शोध घेतला. पण माणिक गायब होतं.

  मी रसिकशेठना विचारलं, “या रुबीविषयी धीरजला काही माहिती होती का?”

  “मला वाटतं बहुधा नसावी. परवाच मी तो निकिताला दिला तेव्हा धीरज घरी नव्हता. त्या दोघांमध्ये क्वचितंच संभाषण होत होतं. कुठल्यातरी गोष्टींवरून वाद तेवढे व्हायचे. त्यामुळे निकिताने त्याला रुबीविषयी सांगण्याची शक्यता अजिबात नाही.”

  “रसिकशेठ, का कोण जाणे, पण मला तरी हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा असं वाटतंय. त्यामुळे धीरजबद्दल असलेला तुमचा संशय कितपत खरा आहे याची मला शंका आहे.”

  “गौतमजी, माझा संशय खरा आहे. माझ्या दृष्टीने धीरज गुन्हेगार आहे.”

  बाय हुक ऑर क्रूक, रसिकजी धीरजला खुनी शाबीत करणार असं मला वाटून गेलं.

  “भोसले, निकिताचा मोबाईल अनलॉक करता आला असता तर बरं झालं असतं. त्यातल्या डेटा वरून आपल्याला बरीच माहिती मिळू शकली असती. “

  यावर वरुण मला हळूच बोलला, “सर, मला एथिकल हॅकिंग येतं. मी ट्राय करू का?”

  भोसल्यांना विचारून मी वरुणला संमती दिली. थोड्याच वेळात वरुणने निकिताचा फोन अनलॉक केला. आमच्या दृष्टीने महत्त्वाचं व्हॉट्सअॅप चॅट मयूरबरोबरचं होतं. ते वाचून आम्हाला जबरदस्त धक्का बसला. आमच्या अपेक्षेपेक्षा हे प्रकरण पुढे गेलं होतं. रसिकशेठसाठी तर हा फारच मोठा मानसिक आघात होता. त्या चॅटचा थोडक्यात गोषवारा असा होता: निकिता आणि मयूर यांचं प्रेमप्रकरण पुन्हा बहरलं होतं. त्यांच्या चोरट्या गाठीभेटींचा सुगावा धीरजला लागला होता. त्यामुळे त्या दोघांच्या दृष्टीने काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची वेळ आली होती. मयूरचा एक वकील मित्र पुण्याला असतो. त्याच्याकडे निकिता आणि धीरजची डिव्होर्स केस फाईल करायची आणि रजिस्टर्ड मॅरेजची नोटीसही द्यायची असा प्लॅन त्यांनी आखला होता. मयूरचा तो मित्र लिगली इल-लीगल व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध होता. निकिताचा मेंदू बहुदा फ्रिझ झाला असावा. स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याची धूळधाण आपण उडवतोय हे तिला जाणवत नव्हतं. त्यांच्या प्लॅनचाच एक भाग म्हणून निकिता ट्रेनने पुण्याला चालली होती. मयूर पनवेलला तिला जॉइन होणार होता. तो आल्याचं कळू नये यासाठी पूजाला काहीतरी बहाण्याने पनवेलला उतरायला भाग पाडलं होतं. रसिकशेठचा तर यावर विश्वासच बसत नव्हता. एकुलत्या एक, अतिशय लाडक्या मुलीने केलेला जबरदस्त विश्वासघात आणि तिची दुर्दैवी हत्या असा दुहेरी तडाखा त्यांना बसला होता. निकिताने मयूरला रुबी विषयी सगळं सांगितलं होतं. मयूरने त्याच्या किंमतीचा अंदाजही विचारला होता. आता तो रुबी गायब असल्यामुळे संशयाची सुई मयूरकडे वळली होती. रसिकशेठ तर गप्पच होते.

  एवढ्यात रूमच्या बाहेरून एक तरुणी आत डोकावली. एवढे पोलिस अधिकारी आणि बाकीची लोकं बघून ती बावचळली. इन्स्पेक्टर सूर्यवंशींनी तिला आत बोलावलं आणि तिच्या येण्याचं कारण विचारलं. सांगावं की नाही या संभ्रमात तिने सांगायला सुरुवात केली.

  “मी आज शताब्दी ने पुण्याला चालले होते.”

_______

प्रकरण तिसरे

आत्ता रसिकशेठनी मान वर करुन तिच्याकडे बघितलं आणि ते बोलले, “तूच निकिताच्या शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये होतीस ना?”

  “हो, मीच होते. मी हेच सगळं सांगायला आले आहे.”

  इन्स्पेक्टर सूर्यवंशी मध्येच बोलले, “एक्झिक्युटिव्ह क्लासने जे लोक प्रवास करत होते त्यांची स्टेटमेंट माझी माणसं घेत आहेत. तिथेच तुझंही स्टेटमेंट घेतील. इथे वेगळं येऊन सांगण्याची जरुरी नाही.”

  “पण मला या केसच्या संदर्भात जी माहिती आहे ती माझ्या दृष्टीने बर्‍यापैकी महत्त्वाची आहे. म्हणून मी इथे आले आहे.”

  मी सूर्यवंशींना म्हणालो, “ती काय सांगते आहे ते ऐकून घ्यायला काहीच हरकत नाही. ती निकिताच्या शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये होती, तेव्हा तिच्या नजरेस काहीतरी पडले असण्याची शक्यता आहे. कुठलाही छोटा थ्रेडही आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही.”

  सूर्यवंशींनी तिला बोलण्याची परवानगी दिली. “हे तुझं स्टेटमेंट म्हणून याची लेखी नोंद होईल,” हे सांगायला ते विसरले नाहीत‌.

  ती तरुणी बोलायला लागली, “माझं नाव रिया हसबनीस. माझा नर्सिंगचा कोर्स झाला आहे. एकाकी, वृद्ध बायकांची देखभाल करण्यासाठी आमच्या ब्युरोमध्ये विचारणा होते. बर्‍याच जणांना विनापाश, त्यांच्याच बरोबर राहणारी नर्स हवी असते. माझे आई-वडील माझ्या लहानपणीच निर्वतले. मला जवळचे कोणीही नातलग नाहीत. त्यामुळे मी या कामासाठी तयार असते. दादरला आत्ता मी ज्या आजींकडे नर्सिंगसाठी राहत होते त्यांचं नुकतंच निधन झालं. नंतर लगेचच मला पुण्यातील एका ठिकाणी अशाच कामाची ऑफर आली म्हणून मी पुण्याला चालले होते. ट्रेनमध्ये माझी निकिताबरोबर ओळख झाली. ट्रेन सुटण्याच्या वेळेस हे लॉबीत आले होते,” असं म्हणून तिने रसिकशेठकडे बोट दाखवलं. “लगेचच निकिता पण तिथे आली आणि ‘डॅडी!’ असं म्हणून ती एकदम रडत-रडतच त्यांना बिलगली. माझ्या आई-वडिलांचे प्रेम कधीच माझ्या वाट्याला आलं नाही. त्यामुळे मी अगदी भान हरपून समोरचं दृश्य मनात साठवत होते. माझेही डोळे पाणावले होते. गाडी सुरू झाल्यावर निकिता आत येण्यासाठी वळली तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ही प्रसिद्ध मॉडेल आहे. तिच्या काही ऍड्स मी नेहमी बघते. आम्ही दोघीही एकमेकींकडे पाहून जुनी ओळख असल्याप्रमाणे हसलो. आम्ही माझ्या कंपार्टमेंटमध्ये बसून गप्पा मारायला लागलो. ती खूपच डिस्टर्ब्ड दिसत होती. पहिली औपचारिक ओळख करून दिल्यावर मी तिला तिच्या अस्वस्थपणाचं कारण विचारलं. कोणाशी तरी बोलल्यावर मन हलकं होईल असं तिला सांगितल्यावर ती बोलू लागली, ‘खरंतर, मी तुला पहिल्यांदाच पाहत आहे. पण का कोण जाणे तुझ्याशी काही गोष्टी शेअर कराव्याश्या वाटत आहेत. मगाशी माझ्या डॅडींना तू पाहिलंस. ते माझ्यावर जिवापाड प्रेम करतात. दोन वर्षांपूर्वी मी त्यांच्या शब्दाचा मान राखून त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं. सगळा फ्लॉप शोच आहे तो. थोड्या दिवसांपूर्वी माझा जुना बॉयफ्रेंड पुन्हा माझ्या आयुष्यात आला ज्याला मी कधीच विसरू शकले नव्हते. आता आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे. त्याच संदर्भात वकीलाला भेटायला मी पुण्याला चालले आहे. माझा बॉयफ्रेंड पनवेलला मला जॉईन होणार आहे. माझ्या डॅडींना या सगळ्याची यत्किंचितही कल्पना नाही. माझ्या नवऱ्याला मात्र संशय आला आहे. भावनेच्या भरात मी हे पाऊल उचललं पण नाऊ आय एम इन अ डायलेमा ऑफ वेदर आय ऍम राईट ऑर रॉंग. माझ्या डॅडींना मला अजिबात दुखवायचं नाही आहे. पण मला माझं आयुष्य माझ्या पसंतीच्या माणसाबरोबर घालवायचं आहे. रिया, माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस?’

  “मी तिला म्हणाले, ‘मी तुझ्या बॉयफ्रेंडला ओळखत नाही पण ज्या अर्थी तो असे लपून-छपून प्लॅन आखतोय त्याअर्थी तो नक्कीच भेकड असावा. राजरोस तुझ्या डॅडींना सांगण्याची त्याच्यात हिम्मत नाही. अशा माणसाबरोबर आयुष्य घालवण्याचा विचारही मी केला नसता. दुसरं म्हणजे, स्वतःच्या वडिलांचा असा विश्वासघात करून तुला कधीच समाधान लाभणार नाही. कायमंच तुला गिल्टी वाटत राहील. त्यापेक्षा तुझ्या डॅडींना स्पष्टपणे सगळं सांगून टाक. त्यांनाही तुमच्या लग्नाचा फियास्को झालेला दिसतंच असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ज्याच्याबरोबर नव्‍याने आयुष्याला सुरुवात करणार आहेस त्याला नीट पारखून घे. आयुष्याकडे इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली बघावं लागतं. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. इट्स युअर कॉल नाऊ.’

  “निकिता माझ्या जवळ येऊन माझे हात हातात घेऊन कृतज्ञतेच्या स्वरात म्हणाली, ‘थँक्यू, रिया! माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरवलंस. मी सुद्धा याच निर्णयाप्रत आले होते. थोडंसं कुणीतरी पुश करायला हवं होतं. हे माझं कार्ड ठेव. तुझाही कॉन्टॅक्ट नंबर मला दे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लागल्या की मी मुद्दाम पुण्याला येऊन तुला भेटेन. या प्रवासात मला अनपेक्षितपणे एक जिवलग मैत्रिण मिळाली.’ मी पण तिच्या हातावर थोपटत तिला काळजी घे म्हणून बजावलं. मग ती तिच्या कंपार्टमेंटमध्ये निघून गेली. लोणावळा स्टेशन यायच्याआधी साधारण पंधरा-वीस मिनिटांपूर्वी मी सहज लॉबीत पाय मोकळे करण्यासाठी गेले असताना, निकिताच्या कंपार्टमेंट मधून एका तरुणाला बाहेर येताना पाहिलं. त्याने बाहेर आल्यावर दार लावून घेतलं होतं. निळा टी-शर्ट घातलेला तो तरुण बऱ्यापैकी हँडसम होता पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र भाव मला दिसले. पुन्हा मागे वळून तो आत शिरला. तो अतिशय हादरलेला दिसत होता. तो निकिताचा बॉयफ्रेंड असावा असं मला तेव्हा वाटलं. मग मी पण माझ्या कंपार्टमेंटमध्ये शिरले. लोणावळा स्टेशन आल्यावर दहा मिनिटांतच हा सगळा प्रकार मला समजला. मला इतका धक्का बसला की लगेच पोलिसांना सगळं सांगण्याचं भानंच मला राहिलं नाही.”

  मी तिला विचारलं, “रिया, कदाचित असं विचारलेलं तुला आवडणार नाही, पण माझ्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून विचारतो. तू नर्सिंगची कामं करतेस, मग शताब्दीच्या एक्झिक्युटिव्ह क्लासने प्रवास करणं… आय मीन…”

  “तुमच्या बोलण्याचा रोख मला समजला. मी कसं काय हे अफोर्ड करू शकले हेच विचारायचं आहे ना तुम्हाला? मगाशी सांगितल्याप्रमाणे दादरच्या ज्या आजींकडे मी नर्सिंगचं काम करत होते त्या गेल्यानंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार बरीच रक्कम मला मिळाली. माझ्या कामावर खूष होऊन त्यांनी माझ्या नावावर हे पैसे ठेवले होते. माझ्याकडे त्याची लीगल डॉक्युमेंट्स पण आहेत. अचानक एवढे पैसे हातात आल्यावर मी थोडीशी चैन म्हणून पुण्याला येताना शताब्दी एक्झिक्युटिव क्लासने चालले होते.”

  “निकिताने तिच्या एवढ्या पर्सनल गोष्टी तुझ्यासारख्या अनोळखी मुलीशी शेअर केल्या हे पण फिजिबल वाटत नाही.”

  “थोडं ऑड आहे खरं, पण कधीकधी ज्याच्याबरोबर आख्खं आयुष्य आपण काढतो त्या नात्यांमध्ये विसंवादी सूर उमटतात, आणि एखाद्या अशा व्यक्तीशी मनाच्या तारा जुळतात जिला आपण एकदाच भेटतो. त्या छोट्याशा प्रवासात आमच्या वेव्हलेंथ्स जुळल्या एवढं नक्की.”

  “ठीक आहे. आता मला सांग तू त्या तरुणाला पुन्हा पाहिलं तर ओळखू शकशील?”

  “हो, नक्कीच! अगदी स्पष्टपणे त्याचा चेहरा मी पाहिला होता. आता असं वाटतंय की तेव्हाच सगळी भीड बाजूला ठेवून त्याच्या मागोमाग निकिताच्या कंपार्टमेंटमध्ये शिरायला हवं होतं.”

  “वरुण, निकिताच्या व्हॉट्सऍप वर मयूरचा प्रोफाइल फोटो असेल तर तो रियाला दाखव.”

  “सुदैवाने मयूरचा अगदी क्लियर फोटो मिळाला. रियाने तो पाहिला आणि तिने तो तरुण हा नाही असं सांगितलं. तो खूपच वेगळा दिसत होता आणि ह्याच्या इतका हँडसम नव्हता हेही तिने सांगितलं. म्हणजे लोणावळ्याच्या आधी निकिताच्या कंपार्टमेंटमध्ये शिरलेला तरुण मयूर नव्हता. मी मग वरुणला धीरजचा प्रोफाइल फोटो दाखवायला सांगितला.

  “हाच तो!” रिया एकदम ओरडली.

  रसिकशेठना आता जरा आजूबाजूचं भान आल्यासारखं वाटलं‌.

  ते एकदम उदगारले, “अरे! धीरज निकिताच्या कंपार्टमेंटमध्ये होता? गौतमजी, मी तुम्हाला म्हणत होतो ना की धीरजच खुनी आहे.”

  “रसिकशेठ, रिलॅक्स. धीरज जर खुनी असता तर तो रिया म्हणाली त्याप्रमाणे इतका हादरलेला दिसला नसता. शिवाय खून केल्यावर इतक्या उघडपणे तो लॉबीतही आला नसता.”

  एवढ्यात सूर्यवंशींचा माणूस घाईघाईने आला आणि सांगायला लागला, “सर, ऍम्ब्युलन्स आल्यामुळे आम्ही डेड बॉडी हलवली, तेव्हा आम्हाला हा लाईटर तिथे सापडला,” असं म्हणून त्याने तो सूर्यवंशींच्या ताब्यात दिला. त्यावरचे फिंगरप्रिंट्स घेऊन झाले होते आणि तो प्लॅस्टिक बॅग मध्ये ठेवला होता. त्या सोनेरी लाईटरवर खड्यांनी ‘एम’ अक्षर एम्बॉस केलं होतं. भोसले आणि सूर्यवंशी एकदमच ओरडले, “मयूर!”

_______

प्रकरण चौथे

रसिकशेठनी तो लाईटर नीट बघितला आणि ते विचारात पडले.

  “हा लाईटर कधीतरी, कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. कुठे ते मात्र आठवत नाही.”

  भोसले म्हणाले, “एम अक्षर कोरलेला लाईटर म्हणजे मयूर शिवाय दुसरं कोण असणार? निकिताने आता त्याच्याशी लग्न करण्याचा विचार बदलला होता त्यामुळे त्याच्या हाताशी आलेली संपत्ती त्याला मिळणार नव्हती. त्यामुळे चिडून त्याने तिचा खून केला असणार. त्यामुळे निदान तो रुबी तरी त्याच्या हाती लागला. गौतमजी, तुम्ही काहीच बोलत नाही?”

  “भोसले, आय स्मेल समथिंग फिशी.”

  “का बरं? लाईटरचा इतका निर्णायक पुरावा आपल्याला मिळाला आहे.”

  “म्हणूनच! म्हणूनच भोसले, मला काहीतरी गडबड वाटत आहे. खरा पुरावा इतका निर्णायक कधीच नसतो. तो नेहमीच व्हेग आणि अनसर्टन असतो. बऱ्याच चाळण्या लावून तो पारखून घ्यावा लागतो. मला वाटतं, इथलं आपलं काम आत्तातरी संपलं आहे. सूर्यवंशी, तुमच्याकडे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स, पत्ते आहेत. आम्ही पुन्हा चौकशीसाठी त्यांना मुंबईला बोलवू शकतो. तशी कल्पना, अगदी तिकीट चेकर पासून सगळ्यांना द्या. रिया, तू तर महत्त्वाची साक्षीदार आहेस. तुला चौकशीदरम्यान मुंबईला यावे लागेल.”

  “ओके, सर.”

   मुंबईचा परतीचा प्रवास…. लक्षात राहिला फक्त रसिकशेठचा विदीर्ण चेहरा आणि आम्हा सर्वांची अतिशय वाईट मानसिक स्थिती…. बस्स!

  दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर थोड्याच वेळात वरुण आला.

  त्याला आल्याआल्याच मी सांगितलं, “वरुण, रसिकशेठना कॉल करून सांग की आपण थोड्याच वेळात त्यांच्या बंगल्यावर येतोय. त्यांचा सेक्रेटरी विक्रम आणि निकिताची मेकअप आर्टीस्ट पूजा यांची चौकशी राहिली आहे. त्या दोघांनाही बंगल्यावर हजर रहायला सांग. रसिकजींचीही हालहवाल विचारायला पाहिजे. इतक्या कमालीच्या वाईट फेजमधून ते जात आहेत, आणि जवळचं असं कोणीच नाही.”

  “हो ना, सर. इतक्या चांगल्या माणसावर असा वाईट प्रसंग यावा याचा खूप वैषम्य वाटतं. त्यामुळेच निकिताचा खुनी लवकरात लवकर सापडायलाच हवा.”

  “म्हणूनच राहिलेल्या चौकशीसाठी मी आजंच जायचं ठरवलं आहे. भोसलेही गप्प बसणार नाहीत. मयूर आणि धीरजला लवकरच शोधून काढतील.”

  अकराच्या सुमारास आम्ही रसिकशेठच्या बंगल्यावर पोहोचलो. रसिकलाल एका रात्रीत कित्येक वर्षांनी म्हातारे झाल्यासारखे दिसत होते. विक्रम आणि पूजा तिथे आलेले होते. विक्रम सेक्रेटरी म्हणून एकदम परफेक्ट वाटत होता. आलेले फोनकॉल्स अटेंड करून व्यवस्थित उत्तरं देणे, रसिकजींना काही हवे नको असेल तर ते बघणे, मध्येच कामाच्या संदर्भातला एखादा फोन करणे, घरातील नोकरांना कामाच्या सूचना देणे, सगळं ऍट अ टाईम तो मॅनेज करत होता. मला त्याचं खूप कौतुक वाटलं.

  मी त्याला विचारलं, “विक्रम, तू कधीपासून इथे जॉब करतोस?”

  “सहा महिने झाले, सर.”

  “एवढ्या कमी कालावधीत खूपच एफिशिअंटली काम करतोस.”

  “सरांचं ऑफिस इथेच वरच्या फ्लोअरवर आहे. त्यामुळे ऑफिस आणि घर दोन्हीकडची व्यवस्था पाहण्याची लवकरच मला सवय झाली. निकिता मॅमचं लग्न झाल्यापासून सर एकटेच असतात. त्यामुळे हळूहळू घर आणि ऑफिस अशा दोन्ही जबाबदाऱ्या मी आपण होऊनच स्वीकारल्या.”

  “गुड, गुड. निकिताचं शताब्दीचं रिझर्वेशन तू कसं केलंस?”

  “मी ऑनलाईन बुकिंग केलं. लास्ट मोमेंट बुकिंग केल्यामुळे कन्फर्मेशन रात्री उशिरा आलं.”

  “तू हे बुकिंग केल्याचं कोणाला बोलला होतास का?”

  “अजिबात नाही, सर. रादर, तिकीट कन्फर्म झाल्याचंही मला काल सकाळीच कळलं. काल मी सरांच्या एका बिझनेस डीलच्या संदर्भात त्यांच्या कलिगना भेटायला पनवेलला गेलो होतो. त्यामुळे मी सकाळी लवकरच इथे आलो होतो. तेव्हा सर स्टेशनवर जाण्याच्या तयारीत होते. मग मी सरांना स्टेशनवर ड्रॉप केलं आणि गाडीने पुढे पनवेलला गेलो. सरांच्या कलिगना मी पनवेल स्टेशनजवळच्या पंचरत्न हॉटेल मध्ये भेटायला बोलावलं होतं. तिथे गेटपाशीच मला पूजा दिसली. तिला बघून मला प्रचंड आश्चर्य वाटलं. निकिता मॅडम पण आहेत असं मला वाटलं. पण पूजा एकटीच होती.”

  आतापर्यंत गप्प बसलेली पूजा आता बोलायला लागली, “सर, निकिता मॅमनी मला सकाळी स्टेशनवर गेल्या गेल्याच पनवेलला उतरायला सांगितलं. प्लॅनमध्ये थोडा बदल झाला आहे आणि माझी एक मैत्रीण मला पनवेलला जॉईन होणार आहे, असं त्यांनी मला सांगितलं. ऍडचं शूटिंग पोस्टपोन झालंय असंही त्या बोलल्या. त्यांनी मला स्टेशनजवळच्या पंचरत्न हॉटेलमध्ये थांबायला सांगितलं. पुढे काय करायचं ते त्या मला कॉल करून नंतर सांगणार होत्या. खरंतर, मला मॅडमच्या वागण्याचा थोडा रागच आला होता. प्लॅन बदलला असेल, तर पनवेलपर्यंत तरी मी जाण्याची काय गरज होती? पण मॅम खूप मूडी होत्या आणि त्यांच्या अश्या वागण्याची मला सवय होती. शूटिंग पोस्टपोन झाल्यामुळे तसंही मला दुसरं काहीच काम नव्हतं म्हणून मी काहीही आढेवेढे घेतले नाहीत. तासाभरातच पनवेल स्टेशन आल्यावर मॅडमना सांगून मी पटकन खाली उतरले. नंतर चालतच तिथून जवळच असलेल्या हॉटेलपाशी पोहोचले. आत जावं का तिथेच थोडंफार भटकावं या विचारात असताना मला विक्रम सर भेटले. त्यांना सगळं सांगताच ते म्हणाले, ‘माझं इथलं काम तासा-दीड तासातच संपेल. तोपर्यंत तू हॉटेलमध्येच थांब किंवा फिरून ये मग आपण गाडीनेच परत जाऊ.’ मी तिथेच आजूबाजूला थोडंसं शॉपिंग केलं. नंतर मी हॉटेलवर पोहोचले. विक्रम सरांचं बिझनेस डील होईपर्यंत तिथेच थांबले. नंतर आम्ही गाडीने परत आलो. मी मधल्या वेळात तीन-चार वेळा मॅमना मोबाईलवर कॉल केला. पण स्विच्ड ऑफ येत होता. मग मी मुंबईला परत जात असल्याचा मेसेज त्यांना टाकून ठेवला.”

  “सकाळी ट्रेनमध्ये बसल्यानंतर पनवेलला उतरेपर्यंत तुझं निकिताशी काही बोलणं झालं नाही का?”

  “नाही, ट्रेन सुरू झाल्यावर मॅम शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये एका मुलीशी बोलत होत्या. त्यानंतर त्या फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या आणि नंतर त्या गप्प-गप्पच होत्या, म्हणून मीही त्यांच्याशी काही बोलले नाही. पनवेलला उतरताना फक्त त्यांना जाते म्हणून सांगितलं. त्यावर त्या, ‘मी तुला नंतर कॉल करीन,’ असं बोलल्या.”

  “तू कधीपासून निकिता बरोबर मेकअप आर्टिस्ट म्हणून कामाला होतीस?”

  “सात-आठ महिने झाले, सर. पण आमचं ट्युनिंग छान जमलं होतं,” हे सांगताना पूजाच्या डोळ्यात पाणी तरळलं.

  रसिकशेठ मध्येच बोलले, “काल सकाळी पनवेलहून विक्रमचा फोन आला होता. पूजा तिथेच उतरल्याचं समजल्यावर मी निकिताला चार-पाच वेळा फोन ट्राय केला. पण तिचा मोबाईल स्विच्ड ऑफ होता. कदाचित काहीतरी अशुभ घडणार असल्याचं इन्ट्यूशन असेल पण मी फार अस्वस्थ होतो. त्यातंच निकिताशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नसल्यामुळे तर मला फारच काळजी वाटायला लागली. काय करावं ते सुचतंच नव्हतं. थोड्याच वेळात लोणावळा पोलिसांचा फोन आलाच.”

  “विक्रम पनवेलला कोणाला भेटायला गेला होता?”

  विक्रमनेच सांगितलं, “प्राणलाल पारेख.”

  रसिकशेठ सांगायला लागले, “विक्रम एकदम वर्कोहोलिक आहे. काल सकाळी सहा वाजायच्या आधीच इथे आला आणि म्हणाला की, ‘आज दुसरं काहीच काम नाहीये तर पनवेलचं डील करून येतो. खरंतर, त्या डीलची एवढी घाई नव्हती, पण काम नसेल तर विक्रम रेस्टलेस होतो.”

  “खूपच दुर्मिळ गुण आहे. कीप इट अप, विक्रम! रसिकलालजी, आता आम्ही निघतो. धीरज आणि मयूरचा काही सुगावा लागला तर कळवतो. विक्रम आणि पूजा, तुम्ही आम्हाला इन्फॉर्म केल्याशिवाय मुंबईच्या बाहेर जाऊ नका.”

  ऑफिसवर पोचल्यावर मी वरुणला धीरज आणि मयूरची आमच्या नेहमीच्या पद्धतीने डिटेल माहिती काढायला सांगितली.

  वरुणने मला विचारलं, “सर, तुम्हाला काय वाटतं, मर्डर मोटिव्ह काय असेल?”

  “माझी पूर्ण खात्री पटल्याशिवाय मी कधीच माझं मत व्यक्त करत नाही. पण गोंधळात टाकणाऱ्या तीन-चार गोष्टी आहेत. ‘एम’ हे अक्षर कोरलेला लाईटर, धीरजचाही नेमका खुनाच्या दिवशीच शताब्दीने प्रवास, निकिताचा विद्रूप केलेला चेहरा आणि गायब झालेला रुबी. या सगळ्याची सांगड घालणं मुश्किल आहे. शिवाय रियाचाही या थरारनाट्यातला प्रेझेंन्स जरा खटकतो. तिच्या बोलण्याला कुठलाही एव्हिडन्स नाही. पहिल्या भेटीत, पंधरा-वीस मिनीटांतच निकिताने एवढ्या पर्सनल गोष्टी शेअर केल्या असतील हे खरं वाटत नाही. माझ्या काही शंका आहेत, त्यांचं निरसन मी करून घेणारंच आहे, तोपरर्यंत धीरज आणि मयूरची माहिती तू लवकरात लवकर काढून आण.”

  “ओके, सर.”

  वरुणने जी माहिती आणली, त्यातली बरीचशी रसिकशेठ आणि भोसले यांच्याकडून समजली होतीच.

  दोघांचेही कुठलेही क्रिमिनल रेकॉर्ड नव्हते. मयूर विरुद्धही कुठल्याही मुलीने कंप्लेंट नोंदवली नव्हती. एक इंटरेस्टिंग गोष्ट मात्र समजली. खुनाच्या दिवशीच धीरजचं प्रेमपात्र, मैथिली हिने, ‘मिस्टर अँड मिसेस एम पांडे’ या नावाने शताब्दी एक्झिक्युटिव्ह क्लासचं रिझर्वेशन केलं होतं. तिची भेट झाली नाही, पण तिच्या घरी काम करणारी बाई भेटली. तिने सांगितलं की, ‘मॅडम दोन दिवसांसाठी लोणावळ्याला गेल्या होत्या. दोन दिवसांनंतर ती आज कामाला आली होती. त्यामुळे मॅडम परत कधी आल्या तिला माहित नाही.’

  माझ्या शंकांचं निरसन मी माझ्या पद्धतीने करून घेतलं होतं. सगळं धक्कादायक आणि अविश्वसनीय चित्र स्पष्ट झालं होतं. आता जास्त वेळ वाया घालवणं रिस्की होतं. मी भोसल्यांना कॉल केला तेव्हा आवाजावरून ते एकदम आनंदित झालेले वाटले.

  ते बोलायला लागले, “गौतमजी, आत्ता तुम्हालाच कॉल करणार होतो. मयूरला आम्ही ताब्यात घेतलं आहे. अंबरनाथला त्याच्या घरी दडी मारून बसला होता. त्याच्या कॉलेजमधलं मागचं रेकॉर्ड शोधून त्यावरून हा पत्ता आम्हाला मिळाला. धीरजशीही आमचा कॉन्टॅक्ट झाला आहे. त्याच्या एका मित्राचा पुण्याला अॅक्सीडेंट झाला होता. त्यामुळे तो पुण्याला गेलाय‌. उद्याच मुंबईला येईल. आल्यावर लगेच पोलीस स्टेशनला येईन असं त्याने आम्हाला सांगितलं आहे. आम्ही रसिकशेठनाही इन्फॉर्म केलं आहे.”

  “भोसले, एकदम चांगली बातमी दिलीत! तुम्हाला मी आता असं सुचवतो की, प्रत्येकाची वेगवेगळी स्टेटमेंट्स घेण्यापेक्षा आपण माझ्या ऑफिसवर सगळ्यांना एकदमच बोलवूया. रियालाही तुम्ही इन्फॉर्म करा आणि उद्या इथे हजर राहायला सांगा. विक्रम आणि पूजालाही सांगा आणि हो, तुमच्या दोन-तीन माणसांना माझ्या ऑफिसच्या दाराबाहेर तयारीत रहायला सांगा. त्यांची गरज आपल्याला भासणार आहे.”

  “गौतमजी, तुम्ही खुनी शोधून काढलात सुद्धा! उद्यापर्यंत तरी कशाला थांबायचं मग? आत्ताच आपण ऍक्शन घेऊ.”

  “थांबा, थांबा, भोसले. उद्यापर्यंत धीर धरा. उद्या तुमचा खुनी तुमच्या ताब्यात देतो. पण हे सगळं अतिशय टॅक्टफुली हॅन्डल करावं लागणार आहे. यावेळी अतिशय घातकी खुन्याशी आपली गाठ आहे.”

_______

प्रकरण पाचवे

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळे माझ्या ऑफिसमध्ये अर्धगोलाकार ठेवलेल्या खुर्च्यांवर बसले होते.

  प्रत्येकाच्या मनावरचा ताण चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मी करत असलेल्या ह्या नाट्यपूर्ण कृतीचं दडपणही प्रत्येकाला जाणवत होतं. अगदी आश्चर्यकारकरित्या या केसचे मला वाटणारे कच्चे दुवे एखादी जादू घडावी तसे एकापुढे एक मला समजले होते.

  मी बोलायला सुरुवात केली, “शनिवार सकाळची पावणेसातची वेळ. शताब्दीने हळूहळू वेग पकडला होता. निकिता आणि रियाची ट्रेनमध्ये ओळख झाली. एखाद्या जिवलग मैत्रिणीला सांगाव्यात अशा खुपशा पर्सनल गोष्टी निकिताने रियाला सांगितल्या. अगदी स्वतःजवळ असणाऱ्या रुबी बद्दल देखील.”

  हे ऐकल्यावर रिया काहीतरी बोलायला लागणार तोच मी तिला हातानेच गप्प राहण्याची खुण केली, आणि पुढे बोलायला लागलो, “रुबीबद्दल कळताच, रियाच्या मनात तो हडप करण्याचे विचार थैमान घालायला लागले. सगळी उमेदीची वर्षे आजारी लोकांची सेवा करण्यात वाया घालवण्यापेक्षा एकदाच मोठा हात मारावा हा विचार तिच्या मनात बळावला. बिचाऱ्या निकिताला कसलीच कल्पना नसल्यामुळे ती बेसावध होती. पनवेलला निकिताने टीसीला जेव्हा सांगितलं की तिची मेकअप आर्टिस्ट इथेच उतरल्याने ती आता एकटीच आहे, तेव्हाच रियाने ठरवलं की निकिताचा खून करून रुबी हस्तगत करायचा. त्याप्रमाणे ती निकिताच्या कंपार्टमेंटमध्ये गेली. निकिता डोळे मिटून शांत बसली होती. तिला कसलीही चाहूल लागू न देता रियाने स्वतःचा स्टोल काढून निकिताच्या गळ्याभोवती आवळला. काही क्षणांतच निकिता गतप्राण झाली. मग रियाने निकिताच्या बॅगेचे जोरदार घाव तिच्या चेहर्‍यावर घातले. झटापट करून बॅगेचं लॉक उघडलं आणि रुबी मिळवला. नंतर साळसूदपणे येऊन आपल्यासमोर साक्ष दिली.”

  “नाही, नाही! असं काहीही घडलेलं नाही!” रिया एकदम ओरडतंच उठली. “मी खून केलेला नाही. तुम्ही कोणत्या रुबीविषयी बोलताय मला माहितंही नाही. मी केवळ निकिताच्या मनावरचा ताण दूर करण्यासाठी तिच्याशी बोलले. खुनाच्या, चोरीच्या उद्देशाने अजिबात नाही. मला पहिल्या भेटीतंच निकिताविषयी एकदम आपुलकी वाटली आणि तिलाही तसंच वाटलं म्हणूनच तिने तिचं मन मोकळं केलं. बस्स! यापेक्षा दुसरा कुठलाही हेतू नव्हता. निकिताच्या कंपार्टमेंटबाहेर मी ह्यांना घाबरलेल्या अवस्थेत मात्र पाहिलं,” असं म्हणून तिने धीरज कडे बोट दाखवलं.

  मी रियाकडे लक्ष न देता पुढे बोलायला लागलो, “निकिताने रियाशी बोलणं झाल्यावर मयूरबरोबर पुण्याला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि त्याला फोन केला की, ‘तू आता पनवेलला यायची काहीच गरज नाही. मी तुझ्याशी लग्न करण्याचा विचार आता बदलला आहे. माझ्या डॅडींना मी दुखवू शकत नाही. त्यांना अंधारात ठेवून मी कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. सो, गुडबाय फॉरएव्हर!’ हे ऐकल्यावर मयूरचा पारा चढला. एवढी हाताशी आलेली सोन्याचं अंड देणारी कोंबडी निसटून जात आहे हे पाहिल्यावर त्याचा त्याच्या मनावर ताबा उरला नाही. तो पनवेलला ट्रेनमध्ये चढला. पूजा स्टेशनवर उतरून गेल्यामुळे निकिता तिच्या कंपार्टमेंटमध्ये एकटीच होती. दोघांची बोलाचाली झाली. निकिता तिच्या निर्णयावर ठाम होती. तिच्यातील हा अनपेक्षित आणि मयूरला अनफेवरेबल असणारा बदल पाहून मयूर संतापाने वेडापिसा झाला. त्याने निकिताचा बर्थवरचा स्कार्फ उचलून तिला काही कळायच्या आत तिचा गळा आवळला. त्याचभरात तिच्या चेहऱ्यावर हॅन्डबॅगचे घाव घालून चेहरा विद्रूप केला. नंतर तिच्या बॅगेतला रुबी घेऊन पुढच्या स्टेशनवर उडी मारून तो पसार झाला.”

  मयूरला आत्ता कंठ फुटला होता. तो ताडकन उठला आणि जोरजोरात हातवारे करून सांगायला लागला, “हे सगळं खोटं आहे! मी पनवेलला गेलोच नाही. निकिताचा मला फोन आल्यावर माझा संताप अनावर झाला होता. भरपूर पैसा मिळवण्याची सुवर्णसंधी हातातून निसटली होती. पण त्यासाठी खुनासारखं क्रूर कृत्य करणाऱ्यातला मी नाही. अगदी स्पष्टच बोलायचं तर ‘तू नही, और सही’ या कॅटेगरीतला मी आहे. तरुण, श्रीमंत मुलींची मुंबईत काही कमी नाही. पण आता मात्र या प्रकरणात मी चांगलाच पोळला गेल्यामुळे, कुठल्या मुलीकडे मी मान वर करून तरी बघीन का, शंकाच आहे.”

  “मग तुझं इनिशियल असलेला लाईटर कसा काय ट्रेनमध्ये निकिताजवळ सापडला?”

  “माझा लाईटर? मी स्मोकिंग करत नाही. लाईटरच नसेल, तर तो ट्रेनमध्ये सापडण्याची शक्यताच नाही. भोसले साहेबांनी माझे फिंगरप्रिंट्स घेतले आहेत. त्यावरून लाईटरवरचे फिंगरप्रिंट्स तुम्ही चेक करू शकता.”

  भोसले एकदम उसळून म्हणाले, “आम्हाला आमची काम कशी करायची ते चांगलंच समजतं. तू शिकवायची गरज नाही.”

  मी त्यांना शांत करत पुढे बोलायला लागलो, “शताब्दीने आता सुपरफास्ट स्पीड पकडला होता. बाहेर पावसाळी धुंद वातावरण आणि सोबतीला मैथिली. त्यामुळे धीरजला जगाचं काही भानंच नव्हतं. कर्जत स्टेशन येऊन गेल्यावर तो जरा भानावर आला. पाय मोकळे करायला म्हणून तो जरा लॉबीत फिरून आला. येताना काहीतरी गोंधळ झाला आणि उजवीकडे जाण्याऐवजी तो डावीकडच्या कंपार्टमेंटमध्ये शिरला. आतमधे शिरल्यावर तो हादरला, कारण तिथे निकिता बसली होती. तीसुद्धा त्याला बघून चमकली. दोघांमध्ये किरकोळ सुरू झालेल्या बोलाचालीला चांगलंच वादाचं स्वरूप आलं. आवाज चढले. ते ऐकून मैथिली तिथे जाऊन पोहोचली. तिला पाहताच निकिताचा पारा अजूनच चढला. ती मैथिलीला बरंच काही सुनवायला लागली. ते ऐकून धीरजही रागाने बेफाम झाला. त्या रागाच्या भरात त्याने मैथिलीच्या मदतीने बर्थवर असलेल्या निकिताच्या स्कार्फने तिचा गळा आवळला. त्या गडबडीत मैथिलीचा ‘एम’ अक्षर कोरलेला लाईटर तिथे पडला, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. मैथिली स्मोकिंग करते याबद्दल पेपरमध्येही छापून आलं होतं. रुबीबद्दल धीरजला मुंबईलाच समजलं असणार. त्याने तो बॅगेतून काढून घेतला असण्याची दाट शक्यता आहे. निकिताच्या मृत्यूमुळे त्याचे सगळेच प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटत होते. मैथिलीबरोबर तो राजरोस लग्नही करू शकला असता. त्यामुळे त्याने अश्या रीतीने निकिताचा काटा काढला की त्याच्यावर कोणाचाच संशय येऊ नये.”

  धीरज एकदम चवताळून उठला, “काय वाट्टेल ते आरोप करताय तुम्ही माझ्यावर! यातलं एक अक्षरही खरं नाही. मी पुण्याला माझ्या मित्राचा ऍक्सीडेंट झाला म्हणून गेलो होतो. मैथिली माझ्याबरोबर असण्याचं काही कारणंच नव्हतं. निकिता त्याच ट्रेनने प्रवास करत आहे हे मला माहित सुद्धा नव्हतं. मी फर्स्टक्लास ने प्रवास करत होतो. ट्रेन लोणावळ्याला थांबल्यावर काहीतरी गडबड झाली आहे असं समजलं. नक्की काय झालंय ते कळलं नव्हतं. आम्हा फर्स्टक्लासच्या पॅसेंजर्सची नावं, पत्ते आणि मोबाईल नंबर्स घेतले, आणि आम्हाला जाऊ दिलं. मला पुण्याला पोहोचण्याची घाई होती म्हणून मी तडक दुसरी लोकल पकडून पुण्याला गेलो होतो. तो आज मुंबईला येतोय. भोसले साहेबांचा फोन आल्यावर मला काय झालं आहे ते समजलं. तोपर्यंत मला कसलीही कल्पना नव्हती. पुराव्याशिवाय तुम्ही असा आरोप माझ्यावर करू शकत नाही.”

  मी त्याला विचारलं, “तुझ्या कोणत्या मित्राचा ऍक्सीडेंट झालाय? त्याचं नाव काय? कोणत्या एरियात ऍक्सीडेंट झाला? आणि आता त्याला कुठे ऍडमिट केले आहे?”

  तो जरा गडबडून म्हणाला, “मिहिर त्याचं नाव. आता त्याला डिस्चार्ज मिळाला आहे.”

  “वरुण, आपण जो पुणे पोलिसांकडून गेल्या पाच-सहा दिवसांचा ऍक्सीडेंट केसेसचा डेटा मागवला होता, त्यात हे नाव आहे का बघ जरा.”

  वरुण काही बघायच्या आतंच धीरज गडबडीने म्हणाला, “सर, मी… म्हणजे… मी मगाशी खोटं सांगितलं. आता एवढ्या गळ्यापर्यंत गोष्टी आल्यावर सगळं खरं सांगून टाकणंच श्रेयस्कर आहे. शनिवारी सकाळी मी आणि मैथिली शताब्दीने लोणावळ्याला चाललो होतो. दोन दिवस तिथे राहण्याचा प्लॅन होता. निकिता पलीकडच्या कंपार्टमेंटमध्ये आहे हे मला माहितही नव्हतं. लोणावळा स्टेशन यायच्या आधी थोडावेळ मी जरा लॉबीत फिरून आलो. उजवीकडे जायच्या ऐवजी चुकून डावीकडच्या कंपार्टमेंटमध्ये शिरलो. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसा खरंच हादरलो. कारण आतमध्ये निकिताचा मृतदेह बर्थवर पसरला होता. तिच्या चेहऱ्याकडे तर बघवत नव्हतं म्हणून मी घाईघाईने बाहेर आलो. पण बाहेर आल्यावर ती निकिताच होती याची खात्री वाटेना, म्हणून पुन्हा मनाचा हिय्या करून आत गेलो. चेहऱ्याची अवस्था बघवत नसली तरी चेहऱ्याची ठेवण निकितासारखीच होती. केस, शरीराचा बांधा सगळं निकितासारखंच होतं. त्या खेरीज तिचा उजवा हात पालथा होता, त्यामधील डायमंड रिंग मी ओळखली. लग्नानंतरच्या तिच्या वाढदिवसाला डॅडींनी तिला ती गिफ्ट दिली होती. तेव्हापासून ती कायम तिच्या बोटात असायची. मी तेव्हा तिला काहीच गिफ्ट देऊ शकलो नव्हतो. त्यावरून आमचं भांडणही झालं होतं. त्यामुळे डॅडींनी दिलेली रिंग माझ्या पक्की आठवणीत राहिली आहे. नंतर मला एकदम भान आलं की पोलिसांनी जर मला इथे बघितलं तर ते नक्कीच मला अरेस्ट करतील. म्हणून मी घाईघाईने तिथून बाहेर पडलो. मैथिली आणि मी लोणावळा स्टेशन जवळ आल्यावर गाडी स्लो झाली तेव्हाच बाहेर उड्या मारल्या. मैथिलीला मी परत मुंबईला जायला सांगितलं आणि मी पुण्याला गेलो. दोन दिवस फोन स्विच ऑफ केला होता. तिसऱ्या दिवशी भोसले साहेबांचा फोन आला तेव्हा मित्राच्या ऍक्सीडेंटचा बहाणा केला. शताब्दीचं बुकिंग मैथिलीच्या नावावर, तेसुद्धा ‘एम. पांडे’ असं होतं त्यामुळे मी अडकण्याची शक्यता नव्हती. रियाने मला तिथे बघितलं हेसुद्धा मला आत्ताच समजलं.”

  रसिकशेठ मध्येच बोलले, “गौतमजी, तुमची स्ट्रॅटेजी मला कळत नाहीये. तुम्ही नक्की कोणाला गुन्हेगार ठरवत आहात? खरा खुनी कोण आहे?”

  “सांगतो ना. भोसले, तुमच्या खुन्याला त्याब्यात घ्या.”

  भोसले आणि वरुण तयारीतच होते. शिवाय भोसल्यांची माणसंही आत येऊन खुन्याच्यामागे थांबली होती. तरीही त्या काही क्षणांत खुन्याच्या हातात पिस्तूल आलं होतं, आणि तो ते फायर करणार तेवढ्यात भोसल्यांनी त्याच्या हातावर जोरदार फटका मारला आणि पिस्तूल खाली पडलं. वरुणने चपळाईने ते उचललं आणि त्याच्यावर नेम धरून तो उभा राहिला. बाकीचे सगळे आ वासून बघत राहिले होते. सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला होता.

  मी बोलायला सुरुवात केली, “शनिवार सकाळची वेळ. शताब्दी आता हळूहळू वेगात धावायला लागली होती. निकिताने रियाशी बोलून झाल्यावर मयूरला फोन केला. ‘तुझ्याशी लग्न करण्याचा विचार मी रद्द केला आहे,’ असं त्याला सांगून ती आता तिच्या कंपार्टमेंटमध्ये आली. आतमध्ये पूजाबरोबर विक्रमला बसलेलं बघून तिला खूप आश्चर्य वाटलं. विक्रमने तिला सांगितलं की त्यालाही पुण्याला जायचं आहे. तिच्या डॅडींच्या एका बिझनेस डीलच्या संदर्भात तो चालला आहे. निकिता तिच्या विचारांमध्ये गुंग होती. त्यामुळे तिनेही जास्त खोलात जाऊन चौकशी केली नाही. काही क्षणांतच तिला विक्रम हातात मफलर घेऊन तिच्या दिशेने येताना दिसला. तीच तिची शेवटची जाणीव. विक्रमने सर्व ताकदीनिशी तिचा गळा आवळला. पूजाने तिच्या चेहऱ्यावर हॅंडबॅगचे घाव घालून चेहरा विद्रूप केला. नंतर त्या दोघांनी मिळून बॅगेतील रुबी हस्तगत केला. थोड्याच वेळात पनवेल स्टेशन आल्यावर विक्रम खाली उतरला आणि पंचरत्नला डीलसाठी पारेखांना भेटायला गेला. तो गेल्यानंतर पूजाने तिकीट चेकर ला बोलावलं आणि लोणावळा स्टेशन आल्यावर इन्फॉर्म करण्याविषयी सूचना दिली. पुढच्या स्टेशनवर गाडी थोडी स्लो झाल्यावर ती सुद्धा उतरली आणि परत लोकल पकडून पनवेलला गेली. तिथल्या पंचरत्न हॉटेलपाशी ती विक्रमला भेटली. तिथून त्यांनी रसिकशेठना फोन केला आणि परत ते मुंबईला आले. पूजा येईपर्यंतच्या मधल्या वेळात विक्रमने पारेखांबरोबर बिझनेस डील केलं.

  “हाच निकिताचा खुनी. जगप्रसिद्ध शर्विलक— आपण ज्वेलथीफ म्हणूया— मॅक आणि ही त्याची पार्टनर जेनी. रसिकशेठ, तुमच्यावर त्या रुबीसाठी जो प्राणघातक हल्ला झाला होता तो यानेच केला होता. एकदा प्रयत्न फसल्यावर तो हात धुवून तुमच्या मागे लागला होता. सात-आठ महिन्यांपूर्वी त्याने पूजाला निकिताकडे कामाला पाठवलं आणि सहा महिन्यांपासून तो स्वतः तुमच्या कडे जॉब करायला लागला. योग्य संधीची तो वाट बघत होता. त्याने सहा महिन्यांत तुमचा एवढा विश्वास संपादन केला की प्रत्येक गोष्टीत तुम्ही त्याच्यावर रिलाय व्हायला लागलात. तिकडे पूजानेही निकिताबरोबर छान मेतकुट जमवलं होतं. एकीकडे ब्युटी ट्रीटमेंट्स करता करता ती निकिताच्या पर्सनल गोष्टी जाणून घेत असणार याची मला खात्री आहे.”

  या बोलण्यावर पूजाने नजर चुकवली.

  “मॅक आणि जेनी दोघंही उलट्या काळजाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. दोघंही धाडसी पण तितकेच क्रूर. त्यांची रॉबरीची मोडस ऑपरेंडी पण फेमस आहे. जगभरातील दुर्मिळ आणि अतिशय मौल्यवान रत्नांबद्दलची अचूक इन्फॉर्मेशन, अतिशय फुलप्रूफ प्लॅन आणि तो एक्झिक्युट करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत बसण्याचा पेशन्स, यामुळे आत्तापर्यंत ती दोघेही पोलिसांच्या हाती लागत नव्हती. प्रॉस्थेटिक मेकअपच्या सहाय्याने डिसगाईज् करण्यातही दोघांचा हातखंडा होता. मला पहिल्यापासूनंच निकिताचा खून रुबीसाठीच झाला असावा असं वाटत होतं. धीरज आणि मयूरची डिटेल इन्फॉर्मेशन मी काढली. त्यावरून ते दोघेही खुनशी प्रवृत्तीचे नाहीत हे मला समजलं. विक्रम आणि पूजाशी बोलल्यावर मला जेव्हा समजलं की ती दोघंही सात-आठ महिन्यांपासूनच तुमच्या इथे कामाला आहेत तेव्हाच माझ्या डोक्यात धोक्याचा अलार्म वाजायला लागला.

  “खुनाच्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी विक्रम सहा वाजायच्या आधीच तुमच्या इथे आला होता असं तुम्ही सांगितलंत तेव्हाही मला त्याचा संशय आला. बिझनेस डीलसाठी एवढ्या सकाळी जाण्याची काय जरूर होती? तो खरंच पनवेलला गेला होता की नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी मी तुमच्या बिझनेस कलिग, पारेखांना, फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की विक्रम आला होता. आमचं डीलही झालं. पण त्याचबरोबर त्यांनी एक छोटीशी तक्रार केली. विक्रमने त्यांना डील संदर्भात पंचरत्नला सकाळी साडेआठ वाजता बोलवलं होतं. एवढ्या लवकर कशासाठी असं विचारल्यावर नंतर दुसरं अर्जंट काम आहे असं त्याने उत्तर दिलं होतं. तेव्हाच मला त्याच्या वागण्याची लिंक लागली. पनवेलला जाण्याचा त्याने नुसता बहाणा केला होता. रसिकशेठना स्टेशनवर सोडल्यावर त्यांची नजर चुकवून तो पण शताब्दीमध्ये शिरला. पावणेसातची शताब्दी साधारण तासाभरात पनवेलला पोहोचते. तोपर्यंत निकिताचा खून करून साडेआठला पंचरत्नला डीलसाठी तो सहज जाऊ शकत होता. म्हणजेच निकिताचा खून पनवेल येण्यापूर्वी झालेला होता. याचा दुसरा अर्थ पनवेल स्टेशन गेल्यानंतर टीसी बरोबर पूजा बोलली, निकिता नाही. पण ही माझी गृहीतकं होती. याला पुरावा काय? आपल्या सुदैवाने विक्रमच्या हातून नकळतपणे एक छोटीशी चूक झाली होती. त्याचा ‘एम’ अक्षर कोरलेला लाईटर निकिताच्या खून करण्याच्या गडबडीत तिथेच पडला. त्याच्या ते अजिबात लक्षात आलं नाही. लाईटरवरचे फिंगरप्रिंट्स पोलीस रेकॉर्ड वरच्या त्याच्या फिंगरप्रिंट्सशी मॅच करून बघितले, ते पर्फेक्ट मॅच झाले.”

  रसिकशेठ एकदम म्हणाले, “आत्ता आठवलं! हा लाईटर मी एकदा विक्रमच्याच टेबलवर बघितला होता. विक्रमने माझ्यासमोर कधीच स्मोकिंग केलं नव्हतं. त्यामुळे लाईटर बघून मला थोडं आश्चर्य वाटलं होतं.”

  “विक्रमला लाईटर्सचा शौकीन म्हटलं तरी चालेल. त्याच्याकडे लाईटर्सचं खूप मोठं कलेक्शन आहे, असं मी वाचलं होतं. नंतर मी इन्स्पेक्टर सूर्यवंशींना फोन केला आणि त्यांच्याकडून तिकीट चेकरचा नंबर घेतला. तिकीट चेकर ला फोन करून मी त्याला शनिवारी सकाळी नक्की काय काय झालं हे सगळं डिटेलमध्ये सांगायला सांगितलं. सुरुवातीला तो थोडा रिलक्टंट वाटला पण नंतर त्याला थोडं विश्वासात घेतल्यानंतर त्याने सांगायला सुरुवात केली. ही घटना घडून गेल्यावर त्याने सोशल मीडियावर निकिताची न्यूज आणि फोटो पाहिले आणि तो खूपच चक्रावून गेला, कारण निकिता म्हणून तो शनिवारी ट्रेनमध्ये ज्या मुलीशी बोलला होता ती मुलगी कोणी वेगळीच होती. निकिताच्या ऍडव्हर्टाइजमेंट्स त्याने बघितल्या नव्हत्या. त्यामुळे मॉडेल म्हणून निकिता त्याला परिचित नव्हती. पूजाने स्वतःची निकिता अशी ओळख करून दिल्यावर तो तिच्याशी निकिता समजूनच बोलला होता. इतक्या वर्षांच्या त्याच्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदाच ही अशी घटना घडली होती, आणि आता रिटायरमेंटला आल्यावर ही घटना बघून तो चांगलाच घाबरला होता. चौकशीचा ससेमिरा मागे नको म्हणून तो कुणाजवळंही हे बोलला नव्हता. निकिताचा चेहरा विद्रूप करण्यामागे विक्रम आणि पूजाचा हाच उद्देश होता की तिकीट चेकरला तिच्या चेहऱ्याची ओळख लगेच पटू नये. डेड बॉडीकडे तो एवढं निरखून बघणारही नाही ही त्या दोघांची अटकळ होती, आणि झालंही तसंच. तिकीट चेकरच्या साक्षीनुसार पनवेल टेशन येऊन गेल्यानंतर निकिता जिवंत होती असं सगळ्यांना वाटत राहिलं असतं. आणि तेव्हा विक्रम आणि पूजा दोघेही पनवेलला होते याची साक्ष दोघांनी एकमेकांच्या बाजूने दिली असती. त्यामुळे त्यांची बाजू सेफ झाली असती, आणि त्यांच्यावर कोणाचाही संशय आला नसता. त्या दोघांची अॅलेबी निर्माण करण्याच्या दृष्टीने पूजाने पनवेल स्टेशन येऊन गेल्यानंतर मुद्दाम टी.सी.ला बोलावून त्याच्याशी बोलण्याचं नाटक केलं होतं. त्या दोघांचा प्लॅन अतिशय परफेक्ट होता. कुठलेही लूपहोल्स त्यात नव्हते‌. अगदी टी.सी.सारख्या कॉमन मॅनच्या सायकॉलॉजीचाही त्यांनी विचार केला होता. पण त्या दोघांच्या दुर्दैवाने लाईटरने मात्र गडबड केली.

  “सो हियर आय प्रेझेंट द मर्डर मोटिव्ह ऍन्ड द मर्डरर बिफोर यू. दॅट्स ऑल.”

  विक्रम रागाने नुसता धुमसत होता. तो फक्त एकच वाक्य बोलला, “शेवटी मुंबई पोलिसांनी ह्या मॅकचा अवतार संपवलाच.” पूजाने मात्र कबूल केलं की निकिताला हेड मसाज करताना ती मयूरशी करत असलेलं चॅटींग नेहमी वाचायची. त्यावरूनच तिला त्यांचा पुण्याला जाण्याचा प्लॅन समजला. ती आपल्याबरोबर रुबी घेऊन जात आहे हे सुद्धा तिला समजलं. त्यामुळे तिने आणि विक्रमने मिळून त्यांचा प्लॅन आखला. पण यावेळेस मात्र त्यांना अनुकूल असे फासे पडले नाहीत. भोसल्यांची माणसं दोघांनाही अरेस्ट करून पोलिस स्टेशनवर घेऊन गेली. भोसल्यांना अत्यानंदामुळे शब्दच सुचत नव्हते. त्यांच्या दृष्टीने हा डबल धमाका होता. निकिताचा खुनी सापडला होता आणि पोलिसांच्या हिटलिस्टवर असणारा जगविख्यात कुप्रसिद्ध ज्वेलथिफही सापडला होता. त्यांनी नुसतेच कृतज्ञतेने माझे हात धरले. त्यांनी रसिकशेठना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनवर येऊन ते माणिक घेऊन जाण्यासाठी सांगितले.

  रसिकशेठ पाणावलेल्या नजरेने, जड आवाजात बोलले, “आता ते माणिक घेऊन मी काय करू? त्यापायी माझ्या निकिताला मात्र मी कायमची गमावून बसलो आहे.”

  मी त्यांच्या खांद्यावर थोपटत त्यांना म्हणालो, “रसिकलालजी, सहज मनात विचार आला तो बोलून दाखवतो. रिया तुमच्या निकिताच्याच वयाची आहे. शांत, सालस मुलगी आहे. रुग्णांची सेवा करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा कदाचित तिलाही इथेच रहायला आवडेल. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. जास्ती काही सांगायला नको.”

  रसिकलालजी भावनेने ओथंबलेल्या स्वरात म्हणाले, “थँक्यू, गौतमजी. यू ऑल्वेज हॅव्ह अ वंडरफुल सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम. मी लवकरच तुम्हाला परत येऊन भेटेन,” असं म्हणून ते रियाबरोबर बाहेर पडले. धीरज आणि मयूरही माझे पुन्हा पुन्हा आभार मानत निघून गेले.

  मी समाधानाने म्हणालो, “ऑल्ज वेल दॅट एन्ड्ज वेल.”

  वरुण मला म्हणाला, “सर, तुम्ही धीरजला पुण्याच्या ऍक्सीडेंट्सच्या केसेसची लिस्ट माझ्याकडे आहे असं खोटं सांगून चांगलंच चकवलंत!’

  “वरुण, कधी कधी सत्य समोर येण्यासाठी असत्याचा आधार घ्यावाच लागतो,” असं म्हणून मी माझ्या आवडत्या खुर्चीवर बसून, टेबलावरचा लॅपटॉप ऑन केला.

  वरुण आश्चर्याने माझ्याकडे बघत म्हणाला, “सर, लगेच कामाला सुरुवात?”

  मी मिस्कीलपणे हसत लॅपटॉपवर मूव्ही सुरू केली.

  सुसाट वेगाने धावणारी एक्सप्रेस…


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime