आनंदसरी
आनंदसरी
निळंशार निरभ्र आकाश, समोर अथांग सागर, हवीहवीशी सोबत..
एखादी स्वर्गीय अनुभूती देणारी गाण्याची मैफल..
एखादा सुंदर सिनेमा, नाटक..
एखादं छानसं पुस्तक..
मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी, पिकनिक्स्.. छोट्या-मोठ्या नानाविध खरेद्या..
सुग्रास, मनपसंत जेवणाचं भरगच्च ताट.. विविध परीक्षा, नोकरीत मिळालेलं घवघवीत यश...
कोण म्हणतं आनंद फक्त अश्या मोठया
गोष्टींमुळेच मिळतो?
आपल्या रोजच्या जीवनात आजूबाजूला इतके आनंदाचे क्षण विखुरलेले असतात की वेचायचे ठरवले तर उभं आयुष्य कमी पडेल. पण मोठे आनंद मिळवण्याच्या नादात, अश्या क्षणांकडे आपलं सपशेल दुर्लक्ष होतं.
पाच-सहा वर्षांपूर्वी, अनपेक्षितपणे माझा हरवलेला आनंदाचा ठेवा माझ्या आयुष्यात आला आणि अव्याहतपणे आनंदाची बरसात करत राहिला.
तो कोणता हे सांगितल्यावर माझी चेष्टा होईल, कदाचित वेड्यातही काढलं जाईल. पण माझ्यासाठी तो अमूल्य आहे.
आमच्या पश्चिमेकडच्या गॅलरीतून, संध्याकाळी पाचच्या सुमारास, प्रकाशाचा अचूक कोन पकडून येणारा उन्हाचा तिरका पट्टा. माझी अनमोल ठेव. इतक्या वर्षांत न गवसलेली.
वाचून भुवया उंचावल्या ना!
ह्या पट्टयावरून मी रोज अलगद माझ्या बालपणीच्या सुखद मनोराज्यात जाऊन पोचते.
माझं माहेर सदाशिव पेठेत भरत नाट्यमंदिरजवळ. तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या ब्लॉकला मोठी टेरेस आहे. आम्ही इतके सुदैवी, की टेरेसवरुन सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही झकास पाहू शकतो. आजूबाजूला उंच इमारती, झाडे फारशी नाहीत. जी आहेत ती ह्या लोभस नजाऱ्याच्या बिलकुल आड येत नाहीत. मी पहिलीत असल्यापासून टेरेसवरुन खोलीत येणारा उन्हाचा तिरका पट्टा पहात आलीये.
त्यावेळेस नुकतीच शाळेतून येऊन, आईने दिलेला काहीतरी आवडीचा खाऊ खात मी हा पट्टा बघत बसायचे. नेमक्या त्याच वेळेस खालून एक फुगे विकणारा माणूस, रोज फुग्याचा विशिष्ठ आवाज करत स्वतःच्या आगमनाची वर्दी द्यायचा. मग आम्ही बिल्डिंगमधल्या मैत्रिणी धावत खाली जाऊन त्याच्या मोठ्या झोळीतल्या अनेक गंमतीशीर, रंगीबेरंगी वस्तू, बाहुल्या, फुगे न्याहाळायचो, हाताळायचो. विकत क्वचितच कोणीतरी घेत असू. त्यानेही कधी मनाई केली नाही. खजिनाच होता तो त्या वयात. जरा मोठी झाल्यावर जाणवलं, गजरेवालाही त्याच वेळेस येत होता. वार्षिक परिक्षेच्या वेळेस त्याच्याकडून मोगऱ्याची फुलं घेऊन त्याचा गजरा करुन घातला तरच पेपर सोपा जातो असा माझा नवीन शोध त्याच काळातला.
शाळेत सायन्स पिरिअडला नुकतंच
व्हायरसेसबद्दल शिकलेलं असायचं. त्या सोनेरी पट्टयात मग अगदी लहान काहीतरी वळवळ करत असल्याचा भास व्हायचा आणि वाटायचं, हे आता आपल्या नाकात जाणार. पट्टयातले विविधरंगी धूलिकण बघतानाही जाम मजा यायची. पावसाळ्यात मात्र हा आनंद काहीकाळ दुरावायचा. हळूहळू कॉलेज, ऑफिस, लग्न ह्यामुळे हा आनंद पार विस्मृतीत गेला होता, तो अचानक पुन्हा गवसला. आता वयाप्रमाणे विचारांत थोडी परिपक्वता आल्यावर जाणवतंय की मी कोणाच्या तरी जीवनात असे आनंदाचे क्षण निर्माण करु शकले तर? असाच विचार सगळेच करायला लागले तर?
तर..आपल्या सर्वांचंच रोजचं जीवन एक आनंदसोहळा होईल.
वास्तवाच्या रुक्ष वाटेवर, अवचित बरसल्या
आनंदसरी..
पाहता-पाहता भरुन वाहिली, रिक्त ओंजळ सारी...
