नवी पहाट
नवी पहाट
नवी पहाट:
वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा गाडीचा वेग..गाडीत बसलेल्या दोघांचे प्रफुल्लित चेहरे..लग्नाचा दहावा वाढदिवस.. दोघांचाही रोमँटिक मूड..तिचं गाडी चालवताना झालेलं दुर्लक्ष..समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकवर गाडीचं जोरात आदळणं..
व्हीलचेअरवर बसलेल्या, दोन्ही पायांनी विकलांग झालेल्या समीरला हा विदारक प्रसंग जसाचा तसा आठवत होता. आजच त्या घटनेला दोन वर्षं पूर्ण झाली होती. प्रिया मात्र या अपघातातून वाचू शकली नव्हती. त्यांचा सहा वर्षांचा मुलगा नील, सुदैवाने घरीच थांबलेला असल्यामुळे बचावला होता.
समीर खिडकीबाहेरची दृश्यं न्याहाळत बसला होता. त्यातला अर्थ त्याच्या मेंदूपर्यंत झिरपतही नव्हता. अस्ताला चाललेलं सूर्यबिंब जाता-जाता आकाशात नारिंगी रंगाची मुक्त उधळण करत होतं. पक्ष्यांची आपापल्या घरकुलात परतण्याची लगबग चालली होती. वाऱ्याच्या सुखद झुळुका मन प्रसन्न करत होत्या. खरंतर इतकं मनोहारी दृश्य होतं, पण समीरला आता कुठल्याच गोष्टीत गोडी वाटत नव्हती. तो नावाजलेला आर्किटेक्ट होता. टुमदार बंगला, दारात गाडी, व्यवसायातलं दमदार यश, सुंदर, सुविद्य पत्नी, गोंडस मुलगा, सगळं अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं. पण त्या एका क्षणात, सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. या दुर्दैवी घटनेला दोन वर्षं झाली होती तरीही तो यातून स्वतःला सावरु शकत नव्हता. स्वतः कुठे बाहेर जाणं, नीलला कुठे पिकनिकला नेणं वगैरे तर राहूच दे, तो स्वतःच्या ऑफिसमध्ये पण जात नव्हता. थोडीफार फोनवर कोणाशी तरी कामाची चर्चा करत होता इतकंच. हळूहळू त्याचे क्लायंट्स दुसरीकडे जायला लागले होते. त्याला हे सगळं कळत नव्हतं अशातला भाग नव्हता. पण काहीही करण्याची अनिच्छाच मनात काठोकाठ दाटून यायची. दुसरी निरर्थक भीती म्हणजे, 'मी अपंग झालेला बघून लोकं माझी कीव करतील', हाच विचार सतत त्याच्या मनात असायचा.
बिचारा नील तर पार भेदरुन गेला होता. जेमतेम आठ वर्षांचं ते पोर अकाली प्रौढ झालं होतं. त्याच्या बाबाला, जमेल तसं सांभाळून घेत होतं.
आत्ताही तो समीरच्या शेजारीच बसून होमवर्क करत होता. त्याचंही लक्ष खिडकीबाहेर गेलं. विजेच्या तारेवर ओळीने बसलेले काही पक्षी बघून तो बालसुलभ निरागसतेने म्हणाला, "बाबा, या पक्ष्यांची बघ, त्या तारेवर शाळा भरलीये. बहुतेक आता शाळा सुटायची वेळ झालेली दिसतीये."
"हो, आता अंधार पडणार ना, त्यामुळे पक्षी घरी निघालेत."
"आत्ता पडू दे अंधार. पण उद्या पुन्हा 'सन' येईल आणि खूप प्रकाश पडेल."
नील अगदी सहज हे बोलून गेला होता. पण त्याक्षणी समीरला जाणवलं, 'अरे, किती सोपा मूलमंत्र आहे जगण्याचा. अंधारानंतर प्रकाश येणार. तेच योग्य आहे. मी मात्र गेली दोन वर्षं स्वतःच्या दुःखाच्या अंधारात चाचपडतोय. नीलचा विचारही केला नाही. आता बास! पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागायचं.'
बाहेर आता काळोख दाटला होता, पण समीरला मात्र नव्या पहाटेची चाहूल लागली होती. पूर्वी ऐकलेल्या गीताचे शब्द त्याच्या मनात रुंजी घालायला लागले.
'एक-एक पाऊल उचली, चाल निश्चयाने,
नको बावरुनी जाऊ, नियतीच्या भयाने.'
